वालेसा, लेक : (२९ सप्टेंबर १९४३-). पोलंडमधील सॉलिडॅरिटी या स्वतंत्र कामगार संघटेनेचे नेते, जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे पहिले पोलिश मानकरी (१९८३) आणि पोलंडचे अध्यक्ष (डिसें. १९९० पासून). व्हिश्चला नदीखोऱ्यातील पोपोव्हो या खेड्यात एका सामान्य सुतार कुटुंबात बॉलेस्लाफ व फेलीक्सा या दांपत्यपोटी त्यांचा जन्म झाला. वालेसा ह्यांचे वडील जर्मनीतील नाझी छळाला बळी पडले होते (१९४५). बालपणापासूनच वालेसांच्या मनावर रोमन कॅथलिक चर्चचा प्रभाव होता. पोलंड हे रशियाच्या अंकित असून ही साम्यवादी विचारसरणीबद्दल त्यांना कधीच आस्था वाटली नाही. लिप्नो येथील शासकीय औद्योगिक तांत्रिक विद्यालयात व्यावसायिक पदविका घेऊन काही दिवस त्यांनी तेथील एका कार्यशाळेमध्ये नोकरी केली. पुढे १९६७ मध्ये गदान्यस्क येथील लेनिन जहाजबांधणी कंपनीत ते वीजतंत्री म्हणून नोकरीस लागले. या सुमारास त्यांचा डॅन्यूता या युवतीशी विवाह झाला (१९६९). त्यांना आठ मुले (चार मुलगे व चार मुली) आहेत. जहाजबांधणी कंपनीत झालेल्या १९७० च्या कामगार संपाचे नेतृत्व त्यांनी केले. पुढे त्यांच्याकडे तेथील कामगार संघटनेचे अध्यक्षपद आले. त्यातूनच पुढे १९८० मध्ये ‘सॉलिडॅरिटी’ ही प्रसिद्ध कामगार संघटना उदयास आली.
दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडची गणना रशियाच्या अंकित राष्ट्रांत होऊ लागली. त्यामुळे साहजिकच तेथे रशिया व कम्युनिस्ट पक्ष यांचे वर्चस्व अबाधित होते. पोलंड रशियाचे संबंध, मार्क्सवाद इ. विषयांवरील वृत्तपत्रीय लेखनावर असलेली कडक नियंत्रणे अनेकांना जाचक वाटत असत. पोलंडचे पंतप्रधान गोमुल्का यांचे कॅथलिकांविषयीचे सौम्य धोरण रशियाला अमान्य होते. पोलंडमधील या राजकीय घडामोडींचा वालेसा व त्यांचे कामगार सहकारी यांवर नकळत परिणाम झाला. पोलंडमध्ये अन्नटंचाईच्या निषेधार्थ मोठा उठाव झाला होता (१९६८) त्याचे पडसाद जनतेत उमटत होते तशातच नागरिकांच्या स्वातंत्र्यावर शासनाने बंधने लादली. परिणामतः विद्यार्थ्यांच्या दंगली उसळल्या आणि कामगारांच्या असंतोषात भर पडली. पोलिश सरकारने १९७० मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाट वाढविल्या. या परिस्थितीने जनता अधिकच त्रस्त झाली आणि कामगारांनी याविरुद्ध उठाव केला. परिणामतः गोमुल्कांचे शासन पदच्युत होऊन एडव्हार्ट ग्येरेक यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली तथापि परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. ग्येरेक यांनी निवडणुकीनंतर कामागारांतील असंतोष कमी करण्यासाठी काही उपाययोजना मांडल्या (१९७६) तरीही त्रस्त जनता असमाधानीच राहिली. कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व झुगारून देऊन वालेसांच्या नेतृत्वाखालील सॉलिडॅरिटी या संघटनेने शांततामय मार्गांनी असहकार, उठाव इत्यादींचा अवलंब करून कामगारांच्या मागण्यांचे निवेदन कम्युनिस्ट पक्षनियंत्रित कामगार संघटेनला दिले. यामुळे वालेसांना आपल्या नोकरीस मुकावे लागले (१९७६). यावेळी कामगार संरक्षण समिती कामगारांना मदत करीत होती. वालेसाही तिचे क्रियाशील सभासद होते. पुढे तिचे नामांतर ‘कमिटी ऑफ फ्री ट्रेड युनियन ऑफ बाल्टिक कोस्ट’ असे करण्यात आले. तीमध्ये नोकरीवर रुजू झालेल्या वालेसांना काही वर्षांतच नोकरीवरून काढून टाकण्यात आले. याचवेळी एका कामगार महिलेसही नोकरूवरून काढण्यात आले. तिला कामावर रुजू करून घ्यावे म्हणून लेनिन जहाजबांधणी कंपनीमधील कामगारांनी संप पुकारला. साहजिकच त्याचे नेतृत्व वालेसांकडेच आले. हा संप सर्वत्र पसरला आणि देशभर उठाव झाला. सॉलिडॅरिटीने वेळेची गरज जाणून सरकारपुढे मागण्या मांडल्या त्यांपैकी काही मान्यही झाल्या तथापि परिस्थिती आटोक्याबाहेर जात आहे, हे लक्षात घेऊन पोलंडमध्ये लष्करी कायदा जारी करण्यात आला आणि वालेसांना तुरुंगात डांबण्यात आले (१९८१ – ८२)
वालेसा सु. अकरा महिने तुरुंगात होते. महात्मा गांधींच्या तत्त्वप्रणालीवर त्यांची दृढ निष्ठा होती व त्यांचे मार्ग सत्याग्रह, असहकार असे अहिंसेचे होते. या अहिंसात्मक कार्याला रोम कॅथलिक चर्चेने प्रथमपासूनच पाठिंबा दिला होता. दिनांक ३१ ऑगस्ट १९८२ रोजी शासन आणि संपावरील कामगार यांच्यामध्ये ऐतिहासिक करार झाला. शासनाने सॉलिडॅरिटी संघटनेस मान्यता दिली. स्वतंत्र कामगार संघटनेचे अस्तित्व, संपाचा हक्क, संपात भाग घेतलेल्या कामगारांना संरक्षण, भाषण लेखन स्वातंत्र्य इ. गोष्टींना मान्यता देण्यात आली. वालेसांच्या ह्या अभूतपूर्व विजयामुळे कामगारांबरोबर शेतकरीवर्गही त्यांच्याकडे आकृष्ट झाला व त्यांच्या संघटनेस आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाही प्राप्त झाली. वालेसांनी सरकार व सॉलिडॅरिटी यांत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. संघटना स्थापन करणे, हा संयुक्त राष्ट्रांच्या सनदेप्रमाणे एक प्रमुख हक्क आहे आणि तो मिळविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. साहजिकच त्यांच्या अहिंसात्मक धोरणामुळे यूरोपातील कामगार चळवळींतील तणाव कमी झाले.
वालेसांना शांततामय कार्याबद्दल अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी ‘लेट अस लिव्ह’ – ‘स्वीडिश जर्नल’ तर्फे (१९८१), ‘लव्ह इंटरनॅशनल ॲवॉर्ड’ – अथेन्स (१९८१), ‘फ्रीडम मेडल’ – फिलाडेल्फिया (१९८१), ‘मेडल ऑफ मेरिट’ – अमेरिकेतील पोलश समाज परिषद (१९८१), ‘फ्री वर्ल्ड प्राइझ’ – नॉर्वे (१९८२), ‘ह्यूमन राइटस प्राइझ’ – काउन्सिल ऑफ यूरोप (१९८९) इ. शांततेचे पुरस्कार महत्वाचे असून कोलंबिया, सेंट डेनिस, कॅथलिक, हार्व्हर्ड इ. विद्यापीठांनी त्यांस सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. १९८१ मध्ये त्यांना न्यूयॉर्क राज्यातील बफालो तसेच जपानमधील ओसाका ह्या शहरांचे सन्माननीय नागरिकत्व देण्यात आले. ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका ह्या देशांतील जगप्रसिद्ध वृत्तपत्रांनी-साप्ताहिकांनी वालेसांना ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती’ (मॅन ऑफ द यिअर – १९८० – ८१) ह्या बिरुदाने गौरविले. या सर्व पारितोषिकांत सर्वश्रेष्ठ असे १९८३ चे शांततेचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात येऊन त्यांच्या शांतता कार्याचा उचित गौरव करण्यात आला. हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी पोलिश शासनाने त्यांना ऑस्लो येथे जाऊ दिले नाही. तेव्हा त्यांच्या पत्नीने तो पुरस्कार स्वीकारला. पारितोषिकाची रक्कमही त्यांनी ख्रिस्ती धर्मपीठाने उभारलेल्या खासगी कृषिनिधीला देण्याचे जाहीर केले.
वालेसांनी १९८३ नंतर पोलंडच्या सक्रिय राजकारणात सॉलिडॅरिटी द्वारे भाग घेण्यास सुरुवात केली. सॉलिडॅरिटीचे अल्पकाळातच पक्षाच रूपांतर झाले. १९८९ च्या जूनमध्ये झालेल्या मुक्त वातावरणातील सार्वत्रिक निवडणुकीत संसदेच्या (सेज्म) ४६० जागांपैकी २९९ जागा शासनमान्य संघटनांसाठी राखीव ठेवलेल्या होत्या. उरलेल्या १६१ जागांवर इतर राजकीय पक्षांतून निवड झाली. मान्यताप्राप्त संघटनांपैकी पोलिश युनायटेड वर्कर्स पार्टी या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने १७३ जागा जिंकल्या, तर उर्वरित १२६ जागा द युनायटेड पेझंट्स पार्टी, डेमॉक्रॅटिक पार्टी आणि रोमन कॅथलिक संघटना यांनी जिंकल्या. मुक्त जागांपैकी सर्व जागा (१६१) वालेसांच्या नेतृत्वाखालील सॉलिडॅरिटी पक्षाने जिंकल्या आणि कम्युनिस्टांचा या निवडणुकीत पराभव झाला तथापि कोणत्याच पक्षास निर्विवाद बहुमत मिळाले नाही. तेव्हा वालेसांनी कम्युनिस्टांना वगळून अन्य पक्षांच्या सहकार्याने संयुक्त शासन स्थापण्याचा घाट घातला. या सर्व पक्षांनी पंतप्रधानपदासाठी त्याचे नाव एकमताने सुचविले कारण चर्च, विभिन्न गट, संपवाले या सर्वांना एकत्र नेऊ शकणारा, सुधारणावादी आणि त्यागी वृत्तीचा तो एकमेव नेता होता. त्यामुळे साहजिकच वालेसा आणि त्यांचा सॉलिडॅरिटी पक्ष यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. वालेसांनी स्वतः बाजूला राहून ६२ वर्षे वयाच्या मॅझोविकी या सॉलिडॅरिटीच्या निष्ठावान कार्यकर्त्याची पंतप्रधानाची निवड केली आणि दिनांक १५ ऑगस्ट १९८९ रोजी संयुक्त सरकार सत्तारूढ झाले. शासनात प्रत्यक्ष सहभागी नसूनही ह्या शासनाची वाटचाल स्थैर्याच्या दिशेने होत रहावी आणि पोलंडच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक समस्यांचे निरसन व्हावे यांकरिता वालेसा प्रयत्नशील आहेत. या संदर्भात त्यांनी अमेरिका व अन्य प्रगत राष्ट्रे यांची मदत मिळविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले आहेत.
संदर्भ : 1. Bagchi, A. K. Ed. Hinduja Foundation – Encylcopaedia of Nobel Laureates 1901 – 1987, Delhi 1988.
2. William, Broyles Ed. Newsweek – The Prize Winner, October 17, New York, 1983.
३. शेख, रुक्साना, शांतिदूत, सातारा, १९८५.
शेख, रुक्साना
“