वालुकामय खडक : (आरेनाइट). वाळूपासून बनलेला अथवा वाळूयुक्त गाळाचा खडक. यातील कण मध्यम म्हणजे वाळूच्या आकारमानाचे (०.०६ – २ मिमी. व्यासाचे) असतात. असा सैलसर खडक म्हणजे वाळू होय. ती घट्ट होऊन वालुकाश्म, संकोण वालुकाश्म (खरीचा दगड), अर्कोज, ग्रेवॅक इ. खडक तयार होतात. वालुकामय खडकांतील कण मुख्यत्वे कॉर्ट्झ या खनिजाचे बनलेले असतात. काही वेळा अन्य खनिजांचे कणही प्रमुख असतात. उदा., मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटाच्या कणांचे बनलेले वालुकामय खडक यांना कॅल्कआरेनाइट म्हणतात व त्यांची गणना चुनखडकांत होते. तसेच काही ज्वालामुखी बेटांवर मुख्यत्वे पायरॉक्सीन या खनिजाची वाळू आढळते.
वालुकामय खडक सर्वसामान्यपणे आढळणारे खडक असून विस्तृत प्रदेशांत आढळतात. हे आर्थिक दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण बांधकामाचे दगड म्हणून त्यांचा उपयोग होतो रासायनिक उद्योगाला लागणारी काही महत्त्वाची द्रव्ये यांच्यापासून मिळतात. काही अंदुकाश्मी (माशाच्या अंड्यांच्या पुंजक्यासारखी रचना असलेली) लोह धातुके (कच्च्या रूपातील धातू) व ग्लॉकोनाइटाचे थर ही वालुकामय खडकांची उदाहरणे असून त्यांचा लोखंड मिळविण्यासाठी उपयोग होऊ शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे खनिज तेल व गोडे पाणी यांचे साठे वालुकामय खडकांत आढळू शकतात.
बहुसंख्य वालुकामय खडकांना वालुकाश्म म्हणतात आणि या दोन्ही संज्ञा जवळजवळ समानार्थी आहेत.
पहा – गाळाचे खडक वालुकाश्म वाळू.
ठाकूर, अ. ना.