वारली : भारतातील एक अनुसूचित जमात. वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांत तसेच दाद्रा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे व नासिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. एकूण लोकसंख्या सु. ५,६७,०९३ (१९८१) एवढी होती.
वारली या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी अनेक कथा, दंतकथा व वदंता प्रसृत झाल्या आहेत. प्राचीन साहित्यातही या जमातीचे भिन्न नावांनी उल्लेख आढळतात. कात्यायनाने वार्तिकात निषाद, व्यास व वरूड या तीन अनार्य जमातींचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी वरूड म्हणजे वारली होत, असे वि. का. राजवाडे यांनी महिकावतीच्या बखरीत म्हटले आहे. ‘वरूड’ शब्दावरून वरुडाई-वारुली-वारली अशी त्यांनी व्युत्पत्ती दिली आहे. डॉ. विल्सन यांच्या मते दक्षिणेतील सात कोकणांपैकी वरलाट ह्या कोकणात राहणारे ते वारली, अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. आर्. इ. एन्थोवेन व लॅथॅम हे वारली ही भिल्लांचीच एक पोटजात असल्याचे नमूद करतात.
वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला ‘पाडा’ म्हणतात. दहा-बारा पाड्यांचे एक खेडे बनते. झोपडीच्या भिंती कुडाच्या, शेण-मातीने लिंपलेल्या असतात. शेळ्या-मेंढ्या अगर गुरे यांच्यासाठी झोपडीला एक पडवी असते. झोपडीच्या परसात पालेभाज्या, सुरण, अळू, मका, भोपळा, मिरची, काकडी इ. फळभाज्या लावतात. शेती हाच वारल्यांचा प्रमुख व्यवसाय आहे तथापि त्यांच्या मालकीची अशी फार थोडी जमीन असून ते खंडाने वा कराराने शेती करतात. ते भात, नाचणी, वरी, उडीद, तूर इ. पिके घेतात. शेतमजुरी, पशुपालन व जंगलातील लाकूडतोड हे त्यांचे अन्य व्यवसाय होत. अलीकडे ते खाण-कारखान्यांमधून काम करू लागले आहेत. वारल्यांचा मुख्य आहार तांदूळ व नाचणी यांचा असतो. भाकरी तांदळाची किंवा नाचणीची करतात. चवळी अगर तुरीचे चिंच घालून केलेले कालवण (आंबट) त्यांना आवडते. दिवाळीत सावेलीच्या पानांत तांदळाच्या कण्या व काकडी उकडून केलेला ‘सावेला’ हे त्यांचे पक्वान्न असते. मळणी झाल्यावर तांदळाच्या पिठाचे उकडून केलेले लाडू, हे त्यांचे आणखी एक पक्वान्न आहे. बांबूचे कोवळे तुकडे (वास्ते) खारवून तसेच कडू कंदही ते उकडून खातात.
उजळ वर्ण, मोठे नाक, पिंगट तपकिरी डोळे, कृश व काटक देहयष्टी आणि मध्यम उंची, ही वारल्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. पुरुष शेंडी ठेवतात आणि कुडते व लंगोटी लावतात. स्त्रिया नऊवारी लुगडे कमरेला तीन वेढे देऊन गुडघ्यापर्यंतच नेसतात आणि गाठीची चोळी घालतात. त्यांना तांबडे लुगडे फार आवडते. पितळ, कथिल व क्वचित चांदी यांचे दागिने स्त्रिया घालतात. त्यांचे मंगळसूत्र (घाठी) दुहेरी व मण्यांचे असते. गोंदून घेण्याची प्रथा मात्र त्यांच्यात फारशी नाही. नागरी संस्कृतीशी संपर्क आल्याने वेशभूषेत फरक पडू लागला आहे.
महाराष्ट्रातील वारली जमातीच्या कुळांची संख्या जवळजवळ दोनशे असून प्रत्येक कुळातील व्यक्तीने कुलबाह्य विवाह केला पाहिजे, असा जमातीचा दंडक आहे. वारल्यांची मुरडे, दावर (डावर), निहिर आणि शुद्ध अगर घाटी, अशा चार प्रादेशिक पोटजमातींत विभागणी झाली असून प्रत्येक विभाग स्वतःला श्रेष्ठ मानतो आणि दुसऱ्या पोटजमातीत विवाहसंबंध करीत नाही. आते-मामे भावंडांच्या विवाहास जमातीत प्राधान्य आहे. दीर-भावजय विवाह हाही अधिमान्य विवाहाचा प्रकार मानला जातो. विधवेने नवऱ्याच्या लहान भावांपैकी कोणत्याही एकाबरोबर लग्न करावे, अशी त्यांच्यात प्रथा आहे. वारली कुटुंब हे पितृसत्ताक असले, तरी त्यांची संस्कृती काहीशी स्त्रीप्रधान आहे. घरातील कर्तेपण बाईकडेच असते. पैसा-अडका सांभाळणे, घरखर्च करणे, घराची देखभाल, वाटणी करणे हे अधिकार स्त्रीलाच असतात मात्र घराबाहेर पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यांचा मुखिया लढत देऊन आपले पद मिळवितो. वारल्यांत परमेसर (परमेश्वर), धरतरी (धरित्री), गावतरी (गायत्री-गाय), कणसरी (धान्यश्री) इ. प्रमुख देवता असून परमेसर हा पाऊस पाडतो व शेत पिकवितो, असा त्यांच्यात समज आहे, तर धरतरी विपुल धान्य देते आणि गावतरी शेतीला साहाय्यभूत ठरते. या प्रमुख देवतांशिवाय नारनदेव, बाघया (वाघ्या) आणि हिमाई या आणखी काही देवता असून ‘ हिरवा’ नावाचा एक देव आहे. प्रत्येक धार्मिक विधीच्या प्रारंभी नारनदेवाचे पूजन करतात. प्रत्येक कुळाचा एक स्वतंत्र नारनदेव असतो. नारनदेव हा पाऊस देतो, अशी वारल्यांत समजूत आहे, तर हिरवा ही त्यांची कुलदेवता आहे. हिमाई देवतेची मुख्यत्वे स्त्रिया पूजा करतात. या जमातीत सण असे फारसे नाहीत पण सभोवतालच्या प्रगत समाजांशी त्यांचा सतत संपर्क येत गेल्याने हिंदूंचे दसरा, दिवाळी, होळी, गणेशोत्सव इ. सण त्यांना परिचित झाले आहेत. सुगीच्या वेळी गावात मेळे भरतात. त्यावेळी होणाऱ्या लोकगीतांत तसेच कथाकथन व प्रश्नोत्तरे यांतून हिंदू पुराणकथांचे प्रतिबिंब काही प्रमाणात त्यांच्यात आढळून येते.
जमातीतील मुखिया वा भगत हा वैद्य, ज्योतिषी व पुरोहित असतो. सर्व धार्मिक विधी तोच करतो. तो रोगाचे निदान व भूतबाधेचे अनुमान करतो. भगताचे शिक्षण फार गुप्तपणे डोंगरातील गृहात (भुईघर) होते. या व्रताला वारली लोक ‘ पालतुक ‘ म्हणतात. शिक्षण घेणाऱ्या तरुणांना ‘ मावले’ म्हणतात. त्यांची व्रते कडक असतात. वयात आलेल्या मुला-मुलींचे विवाह प्रौढ व्यक्तीद्वारे ठरविले जातात. प्रत्येक कुळातील व्यक्तीने असमान गोत्रात (बहिर्विवाही) विवाह केला पाहिजे, असा जमातीचा दंडक असतो. यांच्यात देज देण्याची पद्धत आहे, मात्र देज वा वधूमूल्य रोख रक्कम, वस्तू वा धान्य यांपैकी कोणत्याही प्रकारात चालते. वधूमूल्य देण्याची ऐपत नसलेला तरुण घरजावई होतो त्याला ‘ घरोरी’ म्हणतात. कुठलाही विधी न करता हा तरुण मुलीच्या घरी जाऊन राहतो. त्या दोघांना एक खोली देतात. पुष्कळदा घरोऱ्याचे त्या स्त्रीबरोबर विधियुक्त लग्न होईपर्यंत त्याला मुलेही झालेली असतात. लग्नात नऊ मेढींचा मांडव घालतात आणि उंबराची फांदी मधोमध रोवतात. नवरा मुलगा तिची पूजा करतो. सकाळी हळदीचा कार्यक्रम होऊन संध्याकाळी नवरीच्या घरी लग्नासाठी जातात मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी लग्न लागते व मुलगी सासरी येते.
प्रत्येक खेड्यात ‘जातेला’ नावाची पंचायत सभा असते आणि वयोवृद्ध आदरणीय व्यक्तींतून तिचे सभासद निवडले जातात. त्यांच्या प्रमुखाला ‘पटेल’ म्हणतात. तो तीन-चार खेड्यांचा पुढारी असतो. पटेलचा हुद्दा वंशपरंपरागत असतो. जमातीत जोपर्यंत सभासदाबद्दल आदराची भावना असते, तोपर्यंतच ते सभासद काम करतात. जमातीचे नियम, रूढी, परंपरा, रिवाज व संकेत यांनुसार पंचायत भांडणतंटे, घटस्फोट, व्यभिचार इ. गुन्ह्यांबाबत निर्णय घेते. यांत शक्यतो सामोपचाराने संघर्ष मिटविणे, हा हेतू असतो. गुन्ह्यांसाठी दंड, ज्ञातिबहिष्कार इ. शिक्षा देतात.
वारली मृताला जाळतात व लहान मुलांना पुरतात. श्राद्ध एकदाच व दोनचार वर्षांत करतात. त्याला ‘ दीस करणे ‘ म्हणतात. संध्याकाळपासून तीन भगत दीस करण्यासाठी बैठक मारतात. त्यांच्याजवळ तांदळाची मनुष्याकृती काढून तीवर फडके झाकून ठेवतात. अंत्यविधी करणाऱ्या भगताला ‘ कामडी ‘ म्हणतात. तो ‘आवाज’ नावाच्या वाद्यावर मृताचे नाव घेऊन गाणी म्हणतो. या गाण्यांत पांडुराजाच्या मरणाच्या तसेच सृष्ट्युत्पत्तीच्या पौराणिक कथा असतात. पितर-अमावास्या हा सण पूर्वजांच्या स्मरणार्थ साजरा करतात.
महाराष्ट्रातील आदिवासींच्या लोककलांत वारलींची चित्रकला विशेष प्रसिद्ध आहे. सणासुदीला तसेच लग्नसोहळ्याच्या वेळी वारली महिला झोपडीच्या भिंतींवर परंपरागत पद्धतीने चौक काढून त्यात चित्रे काढतात. कागद असो वा भिंत असो, प्रथम त्यावर तांदळाच्या पिठीने पार्श्वभूमी रंगवितात. चित्रातील विषय प्रामुख्याने त्यांचा आदिम धर्म आणि नित्यनैमित्तिक जीवनातील दृष्ये हा असून त्यात कन्सारी देवता, पिशाच्चपरिहार विधी इत्यादींना प्राधान्य असते. यांशिवाय त्यांत भौमितिक रचनाबंध, शिकारीची दृष्ये, सुगीचा हंगाम, पाखडणे, नृत्य, मिरवणूक यांचाही समावेश असतो. आतापर्यंत ही कला प्रामुख्याने वारली महिलांनीच जोपासली आहे आणि पुरुषांचा सहभाग तीत कमी आढळतो.
वारल्यांच्या चित्रकलेचे काही नमुने मानवशास्त्रज्ञांनी गोळा केले परंतु या कलेस खरी प्रसिद्धी दिल्लीच्या भारतीय हस्तव्यवसाय व हातमाग निर्यात निगमाने दिली. त्यांनी डहाणू तालुक्यातील गंजाड खेड्यातील चार स्त्री-कलाकारांना १९७४ मध्ये खास निमंत्रण देऊन दिल्लीला बोलाविले. कधीही प्रवास न केलेल्या या स्त्रियांबरोबर त्याच गावचा जिव्या सोमा महले हा हौशी वारली तरुण कलाकार गेला. त्याच्या मदतीने या स्त्री-कलावंतांनी काही कलाकृती काढल्या. चित्रकामासाठी कागद वापरावा म्हणजे ती चित्रे अधिक आकर्षक व नाजूक दिसतील आणि त्यांची विक्रीही होईल असे निगमाने सुचविले पण रूढिप्रिय महिलांनी यांस नकार दिला. जिव्या सोमाने मात्र ही कल्पना उचलली आणि आतापर्यंत स्त्रियांची मक्तेदारी असलेल्या वारल्यांच्या चित्रकलेत आमूलाग्र बदल घडविला. त्याने स्वतः काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई व दिल्ली येथे भरविले. पुढे त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला (१९८२). तो बेल्जियमला कलापथकांतून गेला. लंडनच्या भारत महोत्सवातही त्याने चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखविले. सध्या तो काही वारली तरुण विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवीत आहे. त्याच्याप्रमाणेच लक्ष्मी नावाची एक स्त्री प्रसिद्धीच्या झोतात आहे.
चित्रकलेशिवाय वारली नवऱ्याचा कलापूर्ण पोशाख आणि त्यांचे वैविध्यपूर्ण मुखवटे यांतूनही त्यांच्या कलागुणांचे दिग्दर्शन होते. धनुर्विद्या हा त्यांचा आणखी एक आवडता छंद असून सेऊल (सोल) येथील १९८८ च्या ऑलिंपिक क्रीडासामन्यांत वारली खेळाडूने धनुर्विद्येत पस्तिसावा क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वारल्यांच्या खेळात विशेष लक्ष घातले असून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘खेळकूद प्रकल्प’ हाती घेतला आहे.
आर्थिक दृष्ट्या मागासलेले वारली सामान्यतः शांत वृत्तीचे व सहनशील असतात तथापि अन्यायाविरुद्ध प्रसंगोपात्त ते आवाजही उठवितात. ठाणे जिल्ह्यातील वारल्यांनी १९४५ – ४६ दरम्यान सशस्त्र बंडे केली होती.
संदर्भ : 1. Enthoven, R. E. Tribes and Castes of Bombay, 3 Vols., Bombay, 1920-22.
2. Save. K. J. The Warlis, Bombay,1945.
3. Singh, K. S. The Scheduled Tribes, Bombay, 1994.
4. The Maharashtra Census Office, Census of India, 1961-Vol. X-Maharashtra-Scheduled Tribes in Maharashtra: Ethnographic Notes, Bombay, 1972.
५. नाडगोंडे, गुरुनाथ, भारतीय आदिवासी, पुणे, १९८६.
६. संगवे, विलास, आदिवासींचे सामाजिक जीवन, मुंबई, १९७२.
देशपांडे, मु. र.
“