भूमिज : भारतातील एक आदिवासी जमात. त्यांची वस्ती पश्चिम बंगाल, बिहार व ओरिसा राज्यांत आढळते. इतर शेजारील राज्यांतही ती थोड्या प्रमाणात आढळते. १९७१ च्या शिरगणतीनुसार एकूण लोकसंख्या ४,४१,३२२ होती. वांशिक दृष्ट्या हे लोक मुंडा वंशातले आहेत. यांचे मूलस्थान बिहारातले पण व्यवसाय तसेच लोकसंख्यावाढीमुळे ते आजूबाजूच्या राज्यांत वा प्रदेशांत राहावयास गेले आहेत. गहू वर्ण, मध्यम उंची, पुष्ट बांधा अशी यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून भूमिज म्हणजे मुंडा जमातीचीच एक शाखा असेही मानले जाते. भूमिज जमातीचे अनेक पोटविभाग असून त्यांत अनेक बहिर्विवाही कुळी आहेत. मुलेमुली वयात आल्यानंतर वडीलधाऱ्यांमार्फत विवाह ठरविले जातात. पुरोहिताकडून विवाहविधी साजरा केला जातो. विवाहसमारंभ मुख्यतः वधूच्या घरी होतो. यांच्यात देवरविवाहाची पद्धत असून विधवेला धाकट्या दिराबरोबर लग्न करता येते पण ते नाकारल्यास मृत नवऱ्याच्या लोकांना वधूमूल्य परत करावे लागते. वधूमूल्याची प्रथा असून मुलगी कुमारीदशेत गरोदर राहिल्यास तिचे प्रियकराबरोबर लग्न लावून देतात.

भूमिजांवर बंगालमधील चालीरीतींचा खूपच परिणाम झाल्यामुळे खाणेपिणे, भाषा, पोशाख, व्यवसाय इत्यादींमध्ये बरीच आधुनिकता आढळते. शेती हा यांचा मुख्य धंदा. यांची मुंडारी वा उढिया ही मूळभाषा लोप पावत असून प्रदेशपरत्वे विशेषतःबंगाली शब्दोच्चार प्रचारात आढळतात. भूतपिशाच्चांवर जमातीचा विश्वास असला, तरी बळी देण्याची पद्धत हळूहळू मंदावत आहे. हिंदुदेवतांची पूजा ते करतात. शहरवासियांच्या घरांत तुळसपूजा आढळते. त्यांचा प्रमुख देव सूर्य असून त्याला सिनबोंबा किंवा धर्म म्हणतात. यांशिवाय जहिर बुरू, काराकाता, बाघ-भूत इत्यादी देवांना ते भजतात. ‘करम’ हा भूमिजांचा एक लोकप्रिय सण आहे.

जमातीबाहेरील पण समतोल परिस्थितीच्या कुटुंबातील दोघे पुरूष किंवा दोघी विधवा वा सधवा स्त्रियांमध्ये विशिष्ट हेतुसाठी समारंभपूर्वक मैत्री जोडतात. या मैत्रीमुळे दोन्ही कुटुंबानी बंधुभाव मानून एकमेकांची सर्व जबाबदारी पतकरायची असते. ब्राह्मणांव्यतिरिक्त सामान्य भूमिजांचे लाया हे नाव धारण करणारे पुरोहित असतात.

मृतांचे दहन करून अस्थी पुरतात. कुळींच्या ज्येष्ठतेनुसार अस्थी पुरण्याची जागा ठरविलेली असते. मृताचा मुलगा चितेला अग्नी देतो. काही अस्थी तुळशीवृंदावनापाशी पुरतात. स्वतःच्या ऐपतीप्रमाणे या जागेवर लहानमोठ्या स्मृतिशिला उभारतात.

संदर्भ :1. Bandopadhyay, B. Ceremonial Friendship Among the Bhumij of Manbhum : Man in india, Vol. 35. No. 4. October December, 1955. Calcutta.

           2. Dalton, E. T.Discriptive Ethnology of Bengal, Calcutta. 1960.

           3. Sinha. S. Some Aspects of Change in Bhumij Religion in South Manbhum (Bihar): Man in India, Vol. 33. No. 2, April -June.1953. Calcutta

कीर्तने, सुमति