वार – २ : (अपरा). बहुसंख्य सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारा आणि गर्भ व गर्भाशयाची  भित्ती यांना जोडणारा वाहक (शरीरातील द्रायू-द्रव किंवा वायू-वाहून नेणारा), मांसल अवयव. हा गर्भ व माता यांच्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या –पेशींच्या – समूहांच्या) बद्ध रचनेने बनलेला असून प्राणिवैज्ञानिक दृष्ट्या हा तात्कालिक अवयव आहे म्हणजे प्रसूतीनंतर तो गर्भाशयातून बाहेर पडतो. याच्या मधोमध दोरी-सारखा मांसल भाग चिकटलेला असतो, त्याला ⇨ नाळ म्हणतात. नाळेचे दुसरे टोक गर्भाच्या बेंबीच्या ठिकाणी जोडलेले असते. गर्भाला आवश्यक असलेले अन्न, ऑक्सिजन, खनिजे यांसारखे पदार्थ वारेमार्फत मातेकडून गर्भाला मिळतात, तर गर्भाकडून उत्पन्न होणारे कार्बन डाय-ऑक्साइड, यूरिया इ. टाकाऊ पदार्थ उत्सर्जनाकरिता याच्यामार्फत गर्भाकडून मातेकडे नेले जातात. थोडक्यात गर्भ व मातेच्या चयापचयात्मक (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींविषयीच्या) देवाणघेवाणीत वार मध्यस्थ म्हणून काम करते. गर्भाशयाची श्लेष्मलकला (कोशिकामय बुळबुळीत पटल) आणि वारेची ऊतके ही एकमेकांच्या निकट संपर्कात आलेली असतात. यामुळे गर्भ व माता यांचे रक्त एकमेकांच्या घनिष्ट संपर्कात येऊन विसरणाने (द्रव, वायू व घन पदार्थांच्या उत्स्फूर्तपणे होणाऱ्या हालचालींद्वारे व विखुरले जाण्याने) व विवेचक स्थानांतरणाने द्रव्यांची देवाणघेवाण होते. मात्र येथे रक्तांची सरमिसळ होत नाही. वारेच्या बोटांसारख्या वाहक रसांकुरांचे गर्भाशयाच्या श्लेष्मलकलेतील रूपांतरित क्षेत्रांशी अंतर्बंधन (जोडणी) झालेले असल्याने असे घडते.

उल्ब, पीतककोश आणि ⇨अपरापोषिका या गर्भकला[⟶ भ्रूणविज्ञान] म्हणजे पक्षी, सरीसृप (सरपटणाऱ्या) व सस्तन उल्बी प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे तर सायक्लोस्टोम, शार्क, अस्थिमत्स्य आणि उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे) या अनुल्बी प्राण्यांत सामान्यपणे आदिम प्रकारचा पीतककोश आढळतो. अपरापोषिकेतील गर्भवाहिन्यायुक्त खरी उल्ब अपरापोषिकीय वार ही अंडज स्तनी (उदा., काटेरी मुंगीखाऊ, प्लॅटिपस) व शिशुधान (मादीच्या पोटावर पिलाला नेण्यासाठी पिशवीसारखा अवयव असणारे, उदा., कांगारू) प्राणी वगळता सर्व सस्तन प्राण्यांत असते. मात्र शिशुधान प्राण्यांच्या काही जातींत , काही माशांत व काही जरायुज सरीसृपांतही वार आढळते. सस्तन प्राण्यांत गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात ती निर्माण होते. पीतककोशातील वाहिन्यांमार्फत पदार्थांचा पुरवठा होणारी पीतकवार सर्व शिशुधानींत व बहुसंख्य अपरास्तनींत या ना त्या रूपात व निदान तात्पुरती तरी आढळते. जरायुज शार्कमधील आदिम पीतककोशाचे गर्भाशयभित्तीशी वारेसारखे नाते असते. जरायुज माशांत बहुतकरून गर्भधारणा अंडाशयात होते म्हणून पीतकातील अशुद्ध रक्ताच्या केशवाहिन्यांचे जाळे व गर्भाशयाऐवजी अंडाशयाची ऊतके यांच्यात घनिष्ट संपर्क असतो. नीच दर्जाच्या थोड्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) व काही अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणाऱ्या) प्राण्यांतही वारेसारखी संरचना वा अवयव आढळतो. कृंतक (कुरतडणाऱ्या) व कीटकभक्षक प्राण्यांत वार निर्माण होते आणि गर्भाशयाला गर्भ जोडला जाण्याच्या प्रक्रियेच्या आधीच्या अवस्थेत पीतककोशीय वार निर्माण होते आणि नंतर उल्ब- अपरापोषिकीय वारेत परिवर्तन होऊन तिला परिपूर्ण रूप प्राप्त होते. अंडज प्राण्यातील भ्रूणाला (गर्भाला) मुख्यतः अंड्यातील बलकापासून अन्न मिळते आणि अंड्याच्या कवचातील कलांमार्फत त्याचे श्वसन चालते. यांकरिता वारेसारखी रचना नसते.

सस्तनप्राण्यांची वार विविध आकारांची असते. वटवाघूळ व नरवानर गणातील प्राण्यांत ती तबकडीसारखी असते, कुत्र्यात ती गर्भाच्या सर्व बाह्य कलांभोवती कड्यासारखी असते, गायीत तिचे विखुरलेले पट्टे असतात, तर घोड्यात व डुकरात ती संपूर्ण गर्भकलांभोवती लपेटलेली असते.

आकारवैज्ञानिक प्रकार : गर्भारपणात वारेचा विकास होतो तसेच गर्भ गर्भाशयाला जोडला जातो. या क्रिया तसेच सर्वच गर्भकला यांचा विकास कसकसा होत जातो, हे जाणून घेण्याची उत्सुकता वैज्ञानिकांना दीर्घकाळापासून आहे. हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. कारण प्रत्येक गर्भकला बदलत असतेच शिवाय त्यांची संरचना शारीर व शरीरक्रियाविज्ञान यांच्या दृष्टीने गुंतागुंतीची असते. परस्परांशी विशेष संबंध नसलेल्या प्राणिगटांमध्ये वारेचा आकारवैज्ञानिक प्रकार मुळात सारखा असतो  (उदा., विशिष्ट प्रकारचे सरडे, शिशुधानी  व अपरास्तनी) तर सस्तन प्राण्यांच्या एकाच गणात अगदी आदिम प्रकारापासून ते अगदी  गुंतागुंतीच्या प्रकारापर्यंतची वार आढळते.

वारेचे विविध प्रकारे वर्गीकरण करतात. यांपैकी माता व गर्भ यांचे रक्त अलग राखणाऱ्या स्तररचनेवर आधारलेले वर्गीकरण त्यांतल्या त्यात अधिक अर्थपूर्ण म्हणता येते. यानुसार वारेचे पुढील चार मूलभूत प्रकार होतात (आ. १).

आ. १. वारेचे आकारवैज्ञानिक प्रकार : (अ) रक्तजरायु – रसांकुरयुक्त, (आ) रक्तजरायु – जालिकाकार, (इ) बाह्यकलाजयायु – रसांकुरयुक्त, (ई) अंत:कलाजरायु – जालिकाकार : (१) गर्भाची केशवाहिनी, (२) जरायू पोषजनक, (३) गर्भाची रोहिणी, (४) गर्भाचे संयोजी (जोडणारे) ऊतक, (५) मातेचे रक्त, (६) गर्भाशय बाह्यकला, (७) मातेची रोहिणी, (८) गर्भाशयाचे संयोजी ऊतक, (९) मातेची केशवाहिनी.

(अ) रक्तजरायु – रसांकुरयुक्त : यात गर्भाकडून मातेकडे गर्भवाहिनी अंतःकला, आधार द्रव्य व जरायूतील पोषजनक (गर्भाला पोषक घटक ज्याद्वारे पुरविले जातात तो थर) अशी पटलातील स्तररचना असते म्हणजे मातेचे रक्त पोषजनकाच्या थेट संपर्कात येते. ही रसांकुरयुक्त वार मानव , मोठे कपी व माकडांत आढळते.

(आ) रक्तजरायु –जालिकाकार : अशी वार कृंतक वा बिळात राहणारे प्राणी (उदा., उंदीर, घूस, ससा इ.) व पुष्कळ कीटकभक्षक प्राण्यांत व टार्सिअरांमध्ये आढळते.

(इ) बाह्यकलाजरायु -रसांकुरयुक्त : यातजरायू व मातेचे रक्त यांच्यामध्ये बाह्यकलेचा स्तर असतो व वार रसांकुरयुक्त असते. अशी वार खुरी प्राणी (उदा., गाय, हरीण, शेळी इ.), लेमूर व देवमासा यांच्यात असते.

(ई) अंतःकलाजरायु- जालिकाकार : यात मातेचे रक्त  व जरायू यांमध्ये केशवाहिन्यांच्या अंतःकलेचा थर असतो व वार जालिकाकार असते . सर्व मांसाहारी  प्राणी , कुत्रा, वटवाघूळ, हत्ती वगैरे प्राण्यांत अशी वार असते.

इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने कोशिकेचे (पोषजनकाचे) अतिसूक्ष्म स्तर असल्याचे दिसून आले. यानुसार प्राण्यांच्या निरनिराळ्या जातींमध्ये पोषजनकाचा स्तर एकेरी  (उदा., पूर्ण विकसित, मानवी वार), दुहेरी (उदा., ससा) व तिहेरी (उदा., घूस) असतो.

आ. २. सगर्भ गर्भाशय (दुसऱ्या महिन्याच्या सुरूवातीस) : (१)पार्श्व गर्भशय्या, (२) गर्भाशय स्नायुभित्ती, (३) आधार गर्भशय्या, (४) उल्बगुहा, (५) नाळ, (६) पीतककोश, (७) गर्भशय्या संपुट, (८) गर्भाशय पोकळी, (९) गर्भाशय ग्रीवा.

मानवी वार : सर्वसाधारणपणे वारगर्भाशयभित्तीला बुध्‍न (गर्भाशयाच्या वरच्या टोकाच्या मोठ्या) भागात चिकटलेली असते. तिचा गर्भाकडील पृष्ठभाग  पारदर्शक  व गुळगुळीत उल्बाने आच्छादलेला असून त्याखालून नाळेतून आलेल्या गर्भाच्या रक्तवाहिन्या वारेत शिरतात. वारेचा मातेकडील पृष्ठभाग त्या मानाने खडबडीत दिसतो व तो अर्धवट पडद्यांनी  अनियमित आकाराच्या खंडांत म्हणजे वारेच्या दलांत विभागलेला असतो. गर्भारपणाच्या काळात एकूण दलांची संख्या कायम राहते परंतु प्रत्येक दलाच्या वाढीमुळे एकूण वारेच्या आकारमानात व वजनातदिवस भरेपर्यंत सारखी वाढ होत राहते. वार हा चकतीसारखा अवयव असून दिवस भरण्याच्या सुमारास तिचा व्यास १५ ते २० सेंमी., जाडी २-३ सेंमी., घनफळ अंदाजे ४३० मिमी. व वजन ४५० ते ५०० ग्रॅ. असते. (आ. २).

वारेची वाढ होत जाते तसतसे तिच्या स्थूल व सूक्ष्मरचनेत बदल होत जातात. अंतःस्रावनिर्मिती, पदार्थाचे स्थानांतरण व रक्ताभिसरण यांतील वाढीवरून हे बदल तिची कार्यक्षमता वाढण्याच्या दिशेने झाल्याचे दिसते व गर्भाच्या वाढत्या मागणीनुसार ते आवश्यक असते. दिवस भरत आल्यावर मात्र काही बदल कार्यक्षमता घटल्याचे दर्शवितात.

गर्भशय्या : गर्भधारणा झालेल्या गर्भाशयाच्या अंतःस्तरास गर्भशय्या असे म्हणतात. अंडविमोचनानंतर अंडकोशनिर्मिती गर्भरक्षक अंतःस्रावामुळे गर्भ रुजण्यास व गर्भाच्या पोषणास योग्य असे बदल अंतःस्तरात होतात व नंतर वारनिर्मित अंतःस्रावांमुळे ते चालूच राहतात. गर्भशय्या त्रिस्तरीय असून घट्ट व स्पंजासारखा सुच्छिद्र असे वरचे दोन स्तर वारेचे कार्य सुरू होईपर्यंत गर्भाचे पोषण करतात. प्रसूतीच्या वेळी वार व गर्भकला गर्भशय्येच्या या दोन स्तरांबरोबर पडून गेल्यानंतर अंतःस्तराच्या उरलेल्या आधारस्तरापासून नवीन अंतःस्तराची निर्मिती होते [⟶ भ्रूणविज्ञान].

प्रसूतीचा तिसरा टप्पा : या टप्प्यात वार गर्भाशयभित्तीपासून सुटी होते व गर्भाशयातून बाहेर पडते. बाळाच्या जन्मानंतर गर्भाशयाच्या आकारमानात अचानक घट झाल्याने (आकुंचन व प्रत्याकर्षण) व वारेचे आकारमान मात्र न बदलल्याने वार चिकटलेल्या गर्भशय्येच्या स्तरांवर ताण पडतो व त्यांतील कमकुवत सुच्छिद्र स्तरात फट पडते. ही फट वाढत जाऊन सर्व वार सुटी होते. त्याचबरोबर गर्भकलांनाही  घड्या पडून त्याही सुट्या होत जातात. सुटी  झालेली वार गर्भाशयाच्या आकुंचनाबरोबर व मातेच्या जोर करण्याच्या क्रियेने बाहेर टाकली जाते. त्यानंतर गर्भाशयाचे घट्टपणे आकुंचन होऊन वार  चिकटलेल्या जागी उघड्या पडलेल्या वाहिन्यांची तोंडे बंद होऊन रक्तस्रावावर नियंत्रण ठेवले जाते. प्राकृत प्रसूतीत एकूण  रक्तस्राव अंदाजे ३०० ते ५०० मिलि. होतो. ही क्रिया व्यवस्थित न झाल्यास प्रसोवत्तर रक्तस्राव होतो. [⟶ प्रसूतीविज्ञान].

आ. ३. (अ)  जरायू व रसांकुरांची सुरुवात : (१) जरायू, (२) भ्रूणबाह्य देहगुहा, (३) प्रारंभिक रसांकुर वृंत (देठ), (४) अपरा- आंत्र अंधवर्ध, (५) जरायु – मध्यस्तर, (६) संयोजी वृंत, (७) उल्बवाहिनी, (८)उल्बगुहा, (९) दुय्यम पीतककोश, (आ) नीरंकुरी जरायू व परिअंकुरी जरायू : (१) नीरंकुरी जरायू, (२) भ्रूणबाह्य देहगुहा, (३) संयोजी वृंत, (आता अधर बाजूने जोडलेला), (४) परिअंकुरी जरायू अपरा क्षेत्र,(५) अवस्कर पटल, (६) अपरा नाल, (७) उल्बगुहा, (८) आद्यांत्र, (९) मुखग्रसनीकला, (१०) परिहृदय.

वारेचा विकास : गर्भधारणेनंतर अंदाजे ७२ तासांनी कोरकपुटीतील किंवा एकभित्तिकेतील (कोशिकांच्या एका थरात सीमित अशा द्रायूने भरलेल्या गोलसर संरचनेतील) ५८ कोशिकांचे विभेदन (प्रकारीकरण) होऊन ५ गर्भजनक व ५३ पोषजनक कोशिका तयार होतात. या वेळेपर्यंत गर्भ अंडवाहिनीतून गर्भाशयात पोहोचतो व गर्भशय्येत रुजतो. पोषजनक कोशिकांचे वारंवार द्विभाजन व वाढ होऊन त्या गर्भशय्येत घुसतात व पसरतात. या क्रियेत गर्भशय्येतील रक्तवाहिन्यांची तोंडे उघडतात व त्यातून वाहणारे रक्त  पोषजनक कोशिकांचे भरीव स्तंभ (प्रारंभिक रसांकुर) व त्यांमधील मातेच्या रक्ताने भरलेल्या पोकळ्या यांची गुंतागुंतीची  जालिकाकार रचना निर्माण होते (आ. ३). प्रारंभिक रसांकुरांच्या आत मध्यस्तरनिर्मित गाभा वाढून दुय्यम रसांकुर निर्माण होतात. पुढे त्यांत वाहिनी जनन (रक्तवाहिन्यांची निर्मिती) होऊन तिय्यम रसांकुर निर्माण होतात.  गर्भधारणेपासून अंदाजे सतराव्या दिवशी वारेतील मातेच्या व गर्भाच्या रक्तवाहिन्या कार्यान्वित होऊन वारेतील रक्ताभिसरण सुरू होते. गर्भाच्या शरीरातील रक्तवाहिन्या नाळे मार्फत रसांकुरांतील गर्भाच्या रक्तवाहिन्यांशी जोडल्या गेल्यावर गर्भाचे रक्ताभिसरण चक्र पुर्ण होते.

सुरुवातीला जरायुकलेच्या संपूर्ण पृष्ठभागावर रसांकुर असतात. त्यातील आधार गर्भशय्येच्या सान्निध्यात असलेल्या जरायूच्या भागापासून (परिअंकुरी जरायू), रसांकुरांचे गुणन (फाटे फुटून संख्यावाढ) व वाढ होऊन , वार तयार होते आणि गर्भशय्या संपुटाच्या (गर्भाला आच्छादणाऱ्या भागाच्या) सन्निध असलेल्या जरायुकलेवरील रसांकुरांचा नाश होऊन ती गुळगुळीत बनते. तिसऱ्या महिन्यात उल्ब व जरायुकला एकत्र चिकटून मानवात आढळणारी  उल्बजरायुकला निर्माण होते.

वारनिर्मितीच्या ठिकाणी मुख्य रसांकुर गर्भशय्येला घट्ट चिकटलेले असतात. त्यांना अनेकवार फाटे फुटून मधील पोकळ्यांत तरंगणाऱ्या रसांकुरांचे जाळे निर्माण होते. मुख्य रसांकुर व त्याचे सर्व फाटे मिळून वारेचे एक दल तयार होते व वारेत अशी अनेक दले असतात.

सुरुवातीचा लहान चकतीच्या आकाराचा गर्भ वारनिर्मितीच्या ठिकाणाशी देठासारख्या देहवृंताने जोडलेला असतो. या देहवृंतापासून नाळ निर्माण होते [⟶  नाळ].

पोषजनक : हा अत्यंत बदलत्या रचनेचा भाग असून त्यापासूनच पुढे वार व जरायूची निर्मिती होते. गर्भधारणेनंतर तिसऱ्या आठवड्यात पोषजनकाचे कोशिकीय व बहुकेंद्रकी या प्रकारांत विभेदन होते. कोशिकारूप पोषजनक (लांगरहान्स कोशिका) घनाकार, फिक्कट व स्वच्छ कोशिकाद्रव्ययुक्त व सोप्या सूक्ष्मरचनेच्या कोशिकांनी बनलेला असतो. त्याचे कार्य संपूर्णपणे माहीत नाही. बहुकेंद्रकी पोषजनक कोशिकाद्रव्यात तरंगणाऱ्या अनेक केंद्रांच्या स्वरूपात असून त्याचे कोशिकाद्रव्य गुंतागुंतीचे  आणि सूत्रकणिका, गॉल्जी पिंड, अंतःप्राकल जालक इ. अनेक सूक्ष्म -रचनांनी  युक्त असते [⟶कोशिका]. वारेतील अंतःस्रावनिर्मिती व प्रथिननिर्मिती यांचे हेच क्षेत्र असते. पोषजनकाचा आक्रमक गुणधर्म सुरुवातीला एकभित्तिका वा कोरकपुटी रुजण्यासाठी व पुढे वार-निर्मितीसाठी उपयुक्त ठरतो. वारेतील पदार्थांच्या स्थानांतरण प्रक्रियेतही पोषजनकाचा सहभाग असतो.

उल्ब : मानवामध्ये गर्भधारणेनंतर अंदाजे सातव्या किंवा आठव्या दिवशी , बहुदा कोशिकीय पोषजनकाचा थर अलग होऊन किंवा गर्भाच्या बाह्यस्तराचा विस्तार होऊन उल्ब निर्माण होते. आधी ते लहान पुटिकेच्या स्वरूपात असून नंतर त्याचा द्रवाने भरलेला कोश (पिशवी) तयार होतो. पुढे हा कोश गर्भाभोवती पसरून गर्भ त्याच्या पोकळीत वाढत राहतो. पुढील वाढीबरोबर उल्ब जरायुसन्निध येऊन पहिल्या तिमाहीनंतर दोहोंचे एकच आवरण (उल्ब-जरायुकला) बनते व ते गर्भाशय पोकळीत सर्व बाजूंनी गर्भशय्येला चिकटते. वारेचा गर्भाकडील भाग  व नाळ उल्ब कलेने आच्छादलेली असते [⟶ उल्ब].

वार व मातेची रोगप्रतिकारक्षमता : रोपणासंबंधीचे रोगप्रतिकारक्षमतेचे नियम वारेच्या बाबतीत लागू पडत नाहीत, असे दिसते. गर्भ व वारेतील पोषजनक हे मातेच्या शरीराला परके असल्याने ⇨प्रतिजनाप्रमाणे  वर्तणूक करतात. तरीही गर्भाचे रोपण मातेच्या शरीराकडून कसे सहन केले जाते, यासंबंधी विवेचन करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत परंतु तो प्रश्न अजून अनुत्तरितच आहे.

आ. ४. वारेची संरचना व तिच्यतील रक्ताभिसरण

वारेमध्ये मातेचे व गर्भाचे रक्ताभिसरण जवळजवळ संपूर्णपणे अलग राखले जाते आणि रोगप्रतिकारक्षमतेच्या संदर्भातील प्रतिबंध कायम राखणे हे पोषजनकाचे मुख्य काम असते. तरीही काही परिस्थितींत (विशेषतः प्रसूतीनंतर वार सुटी होताना) दोन्हीकडील रक्तकोशिका व इतरही काही कोशिका (मुख्यतः पोषजनक) एकमेकींच्या रक्तात आढळतात [ऱ्हीसस ऋण मातेत ऱ्हीसस धन गर्भ राहिल्यास होणाऱ्या रोगाच्या उदाहरणावरून हे सिद्ध होते⟶ ऱ्हीसस घटक] परंतु  या वस्तुस्थितीचे रोगप्रतिकारक्षमतेच्या संदर्भातील महत्व संपूर्ण ज्ञात नाही.

याशिवाय मातेच्या रक्तातील  गॅमा ग्लोब्युलीन–जी ही प्रतिपिंडे [⟶ प्रतिपिंडे] वारेतून गर्भाच्या रक्तात प्रवेश करतात.

वारेतीलरक्ताभिसरण : वार हा मुख्यत्वे माता व गर्भाच्या रक्तातील पदार्थाच्या देवाणघेवाणीचा अवयव आहे. त्यामुळे वारेमध्ये दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात रक्ताभिसरण होत असते (दिवस भरण्याच्या सुमारास मातेकडून दर मिनिटाला अंदाजे ६०० मिलि. इतका रक्तपुरवठा वारेला होतो).

गर्भाचे (वारेतील) रक्ताभिसरण : ऑक्सिजनरहित व गर्भाच्या चयापचयामुळे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ मिसळलेले गर्भाचे रक्त  नाळेतील दोन रोहिण्यांमार्फत वारेकडे येते. तेथे रोहिण्यांना फाटे फुटून रसांकुरांत केशवाहिन्यांचे जाळे निर्माण होते. केशवाहिन्यांतून फिरणारे गर्भाचे रक्त  वरसांकुरांभोवती  फिरणारे मातेचे रक्त यांत पदार्थांची देवाणघेवाण होऊन ऑक्सिजन व अन्नपदार्थांनी समृद्ध वटाकाऊ पदार्थरहित गर्भाचे रक्त  नाळेतील नीलेमार्फत गर्भाकडे जाते.

मातेचे वारेतील रक्ताभिसरण : यासंबंधी अनेक उपपत्ती असून नवीन अभ्यासातून पुढे आलेली उपपत्ती पुढीलप्रमाणे आहे. वारेच्या तळात (मातेच्या बाजूला) सर्पिल रोहिण्या तळाला लंब दिशेत व नीला तळाला समांतर दिशेत उघडतात. रक्तदाबाच्या जोरामुळे रोहिण्यांतून रक्ताचे फवारे वारेच्या गर्भाकडील पृष्ठभागापर्यंत उडतात. तेथून रक्त बाजूला रसांकुरांभोवतालच्या पोकळ्यांत पसरून रसांकुरांवरून ओघळत तळापर्यंत येते. तेथे उघडणाऱ्या नीलावाटे त्याचा निचरा होतो (आ. ४). प्रसूतीच्या वेळी  कळा येताना गर्भाशयस्नायूंना समांतर असलेली नीलांची तोंडे बंद होत असल्याने रक्त वारेतून पिळून काढले जात नाही व पदार्थांच्या देवाणघेवाणीचे कार्य कमी प्रमाणात परंतु सुरू राहते.

वारेची कार्ये: अंतःस्रावनिर्मिती आणि मातेच्या व गर्भाच्या रक्तांतील पदार्थांची देवाणघेवाण करणे ही वारेची दोन प्रमुख कार्ये आहेत. शिवाय माता व गर्भ यांमध्ये रोगप्रतिकारक्षमतेच्या संदर्भात अलगपणा राखणे हेही वारेचे कार्य म्हणता येईल.

(१) वारनिर्मित अंतःस्राव : वारेतील बहुकेंद्रकी पोषजनक हे अंतःस्रावनिर्मितीचे क्षेत्र असून गर्भारपणात सर्व काळ सतत मोठ्या प्रमाणात हे कार्य सुरू असते. मानवी जरायुजन्य जनन ग्रंथी पोषक आणि वारजन्य लॅक्टोजेन हे प्रथिनस्वरूपातील व गर्भरक्षक व स्त्रीमदजन ही दोन स्टेरॉइड स्वरूपातील अंतःस्राव वारेत निर्माण होतात. यांशिवाय अधिवृक्क बाह्यकजन्य स्टेरॉइड, जरायुजन्य अधिवृक्क-बाह्यकपोषक व अवटुपोषक हे अंतःस्रावही वारेत निर्माण होत असावेत परंतु त्याचा प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाही.

(अ) जरायुजन्य जननग्रंथिपोषक अंतःस्राव : मातेच्या अंड-कोशातील पीतपिंडे अधिक काळपर्यंत कार्यक्षम ठेवणे आणि गर्भाचे वृषण व वारेला स्टेरॉइड अंतःस्रावनिर्मितीसाठी चालना देणे ही याची  मनुष्य-प्राण्यातील कार्ये आहेत. हा अंतःस्राव गर्भार स्त्रीच्या मूत्रावाटे बाहेर पडतो. त्यामुळे गर्भारपणाचे व गर्भारपणातील काही विकृतींच्या निदानासाठी त्याचे मूत्रातील अस्तित्व व प्रमाण मोजले जाते. (उदा., जुळे गर्भ, द्राक्षार्बुद, जरायु-कर्करोग इ. विकृतींत त्याचे प्रमाण खूप वाढते, तर गर्भपात, गर्भाशयांतर्गत गर्भमृत्यू इ. विकृतींत हे प्रमाण खूप कमी होते किंवा याचा अभाव आढळतो). शिवाय वंध्यत्वाच्या विशिष्ट प्रकारांत अंडविमोचन घडवून आणण्यासही त्याचा उपयोग होतो.

(आ) मानवी वारजन्य लॅक्टोजेनस्राव : हा अंतःस्राव वारेतून मुख्यतः मातेच्या रक्तात मिसळतो. तो प्रभावी दुग्धजनक, वृद्धी हॉर्मोनांशी साम्य असलेला व अनेक चयापचय क्रियांना चालना देणारा आहे.

(इ) वारनिर्मित स्त्रीमदजन : गर्भारपणाच्या सर्व काळात याची मातेच्या रक्तातील पातळी सतत वाढत असते व प्रसूतीनंतर ती एकदम  खाली (पूर्ववत) येते. तो इस्ट्रिऑलच्या स्वरूपात असून मातेच्या मूत्रावाटे बाहेर पडतो. त्याची मूत्रातील पातळी त्या वेळच्या वारेच्या कार्यक्षमतेची व म्हणून गर्भाच्या स्थितीची निदर्शक असते.

(ई) वारनिर्मित गर्भरक्षक अंतःस्राव : हा अंतःस्रावही गर्भार-पणाच्या संपूर्ण काळात खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. याला गर्भरक्षक म्हटले जात असले व वारंवार गर्भपात किंवा गर्भपाताची शक्यता असलेल्या रोग्यांना तो बाहेरून देण्याचा उपचार प्रचारात असला, तरी त्याचे गर्भारपणाच्या काळातील नक्की कार्य अजून समजलेले नाही. [⟶ अंतःस्रावी ग्रंथि].

(२) वारेतील देवाणघेवाण वा स्थानांतरण : ऑक्सिजन व गर्भाची वाढ व ऊर्जानिर्मितीला आवश्यक सर्व पोषक द्रव्ये मातेकडून गर्भाकडे पोहोचवणे आणि कार्बन डाय-ऑक्साइड वायू व गर्भाच्या चयापचयातून निर्माण झालेले इतर सर्व टाकाऊ पदार्थ गर्भाकडून मातेकडे पोहोचविणे हे वारेचे एक गुंतागंतीचे व प्रमुख कार्य आहे. याप्रमाणे वार गर्भाची फुप्फुसे, वृक्क व पचनमार्ग असल्याप्रमाणे कार्य करते. वारेत गर्भाच्या व मातेच्या रक्तांमध्ये पोषजनक आधारद्रव्य व केशवाहिनी अंतःस्तर यांचे स्तर (रसांकुरभित्ती) असतात. ते केवळ प्रतिबंधाचे किंवा गाळण्याचे काम करत नसून क्रियाशील किंवा अक्रियाशील स्थानांतरणाला मुभा देणे, मदत करणे आणि स्थानांतरणाच्या प्रमाणावर व गतीवर नियंत्रण ठेवणे इ. कामे सतत करत असतात.

पदार्थांचे वारेतील स्थानांतरण (विसरण) या भौतिक प्रक्रियेद्वारे व विवेचक स्थानांतरणाद्वारे होते.

(अ) विसरण : कमी रेणुभाराच्या बहुतेक सर्व पदार्थांचे [उदा., ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड, पाणी, बहुतेक संयुगे व विद्युत् विच्छेद्य द्रव्ये (योग्य विद्रावकात विरघळविणाऱ्या पदार्थात-विरघळविली असता वा द्रवीभूत झाली असता-विद्युत् संवाहक बनणारी द्रव्ये), शुद्धिहारक द्रव्ये व वायू, ग्लुकोज, नैसर्गिक ॲमिनो अम्ले इ.] स्थानांतरण या प्रक्रियेने, त्या पदार्थाची पदार्थाची जास्त संहती (प्रमाण) असलेल्या रक्ताकडून कमी संहती असलेल्या रक्ताकडे होते. इन्शुलिन, स्टेरॉइड व अवटू इ. अंतस्रावांचे स्थानांतरणही याच प्रक्रियेने परंतु मंद गतीने होते. वारनिर्मित अंतःस्राव माता व गर्भ दोघांच्याही रक्तात परंतु वेगवेगळ्या प्रमाणांत मिसळतात. रोगप्रतिकारक्षम गॅमा ग्लोब्युलीन-जी चा अपवाद वगळता १,६०,००० पेक्षा जास्त रेणुभाराच्या पदार्थांचे स्थानांतरण या प्रकारे होत नाही.

(आ) विवेचक स्थानांतरण :  अनेक पदार्थांचे माता व गर्भा-च्या रक्तातील तौलनिक प्रमाण जरूरीप्रमाणे विशिष्ट पातळीपर्यंत राखण्यासाठी स्थानांतरणात मोठ्या प्रमाणात विवेचकक्षमता आढळते. मातेच्या रक्तात अल्प असलेल्या परंतु गर्भवाढीसाठी अत्यावश्यक अशा अनेक कमी रेणुभाराच्या पदार्थांचेही (उदा., क जीवनसत्व व लोहसंयुगे) मातेकडून गर्भाकडे विवेचकपणे स्थानांतरण केले जाते.

यांशिवाय अनेक विषाणू (व्हायरस), उपदंशाचे सूक्ष्मजंतू, हिवतापाचे परोपजीवी (इतर जीवांवर उपजीविका करणारे) आदिजीव, क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू व इतर अनेक सूक्ष्मजंतू वारेचा अडथळा ओलांडून गर्भाच्या रक्तात प्रवेश करतात व गर्भाला ग्रासतात. मातेच्या शरीरावर परिणाम करणारी बहुतेक सर्व औषधे शुद्धिहारक, झोपेची व वेदनानिवारक द्रव्ये आणि विषारी व बिनविषारी रसायने वारेचा अडथळा कामीजास्त प्रमाणात ओलांडून गर्भाच्या रक्तात प्रवेश करतात. त्यांचे गर्भावरील परिणाम गर्भवाढीच्या टप्प्यावर अवलंबून असून अनिश्चित व अतर्क्य असतात.

वारेचे रोग व विकृती :(१) वाढ व विकासातील दोष आणि वारोद्‌भव अर्बुदे (कोशिकांची अत्यधिक वाढ होऊन बनलेली न शरीराला निरुपयोगी अशी गाठ), (२) वार व नाळेच्या रचनात्मक विकृती, (३) वारेच्या अनैसर्गिक रोपण व वाढींमुळे उद्‍भवलेल्या विकृती वा रोग आणि (४) इतर रोग या प्रकारे वारेच्या विकृती व रोगांचे वर्गीकरण करतात.

(१) विकासातील दोष व वारोद्‌भव अर्बुदे : (अ) द्राक्षार्बुद वा द्राक्षरूप द्रवार्बुद : हे निरुपद्रवी परंतु मारक होण्याची क्षमता असलेले अर्बुद आहे. दोन हजार गर्भार स्त्रियांत एक असे याचे प्रमाण असून आशिया खंडाच्या काही भागांत ते जास्त आहे. या विकृतीत काही किंवा सर्व रसांकुरांचे रूपांतर स्वच्छ द्रवाने भरलेल्या लहान (अंदाजे १ ते १० मिमी.) पुटिकांच्या (पटलयुक्त व बहुधा द्रायूने भरलेल्या कोशांच्या) घोसांत होऊन त्यांच्या वाढीने सर्व गर्भाशय भरून जाते. यामुळे गर्भाची वाढ होऊ शकत नाही.

गर्भधारणेनंतर तीन महिन्याच्या सुमारास थोडा थोडा व वारंवार रक्तस्राव, पांडुरोग, गर्भाशयाची प्रमाणाबाहेर वाढ, ही गर्भाशयात गर्भ असल्याच्या खुणा न जाणवणे व गर्भपाताची लक्षणे ही या रोगाची लक्षणे असतात. श्राव्यातीत ध्वनिप्रतिमादर्शन (शरीरांतर्गत संरचनांचे परीक्षण व मापन करण्यासाठी तसेच शरीरातील विकृती ओळखण्यासाठी द्विमितीय प्रतिमा निर्माण करण्याचे हे निदानीय वा चिकित्सेचे तंत्र असून यात मानवाला ऐकू येणाऱ्या ध्वनितरंगांपेक्षा अधिक कंप्रतेचे-दर सेकंदात होणाऱ्या कंपनसंस्थेचे-ध्वनितरंग वापरतात) व जरायुजन्य जनन ग्रंथिपोषक अंतःस्रावाच्या मूत्रातील पातळीतील प्रमाणाबाहेर वाढ दर्शवणाऱ्या तपासण्यांवरून या रोगाचे निदान होते. या रोगात काही वेळा सहजगत्या वा उत्स्फूर्त गर्भपात होत असला, तरी निदान होताच गर्भाशयग्रीवा तानन (प्राकृत आकारापेक्षा अधिक ताणले जाण्याची क्रिया) व खरवडणे या शस्त्रक्रियेने गर्भाशय त्वरित रिकामे करणे महत्त्वाचे असते. तसेच पुढे बराच काळ जरायुजन्य जनन ग्रंथिपोषक अंतःस्रावाच्या पातळीवरील लक्ष ठेवून जरायु-कर्करोगाची शक्यता तपासून पाहणेही महत्त्वाचे असते.

(आ) जरायु-कर्करोग : मुख्यत्वे गर्भारपणानंतर (द्राक्षार्बुद व उत्स्फूर्त गर्भपात झालेल्या रोग्यांत प्रत्येकी ४०% प्रमाण हा पोषजनकाचा कर्करोग होतो. तो श्लेष्मकलेचा (बुळबुळीत पटलाचा) कर्करोग असला, तरी त्याची वर्तणूक बहुधा मांसकर्काप्रमाणे असते [⟶ कर्करोग].

गर्भधारणासमाप्तीनंतरच्या काळात अनियमित रक्तस्राव, गर्भाशयाचे अंशनिवर्तन (काही प्रमाणात पुन्हा मूळचे आकारमान प्राप्त होण्याची क्रिया), गर्भाशयाला छिद्र किंवा भेग पडणे, पर्युदरपोकळीत किंवा परागर्भाशयात (गर्भाशयालगतच्या संयोजी ऊतकात व वसेत) रक्तस्राव इ. लक्षणे व चिन्हे या रोगात आढळतात. काही वेळा इतरत्र कर्कप्रक्षेपाची (अन्यत्र प्रसार झाल्याची) लक्षणे हीच प्रथम लक्षणे असतात. वेळेत उपचार न झाल्यास अतिशय वेगाने रोगाची वाढ होऊन मृत्यू येतो. या रोगाची शक्यता नेहमी विचारात घेऊन कोणत्याही विशेषतः गर्भारपणसमाप्तीनंतरच्या, अनियमित रक्तस्रावाच्या रोग्यांच्या सर्व तपासण्या करून निदान निश्चिती करणे महत्त्वाचे असते. गर्भाशयग्रीवातानन व खरवडणे व गर्भाशयांतःस्तर जीवोतक परीक्षा, जरायुजन्य जनन ग्रंथिपोषक अंतःस्रावाच्या पातळीचे वारंवार मापन आणि छातीचे क्ष-किरण छायाचित्र या तपासण्यांनी निदान निश्चिती होते. उपचारपद्धतींपैकी रसायनचिकित्सा ही पद्धती जास्त योग्य आहे. रोग गर्भाशयापुरताच मर्यादित असल्यास काही वेळा शस्त्रक्रियेचा विचार केला जातो.

(इ) आक्रमक द्रवार्बुद : या रोगात पोषजनक व रसांकुर आधारद्रव्य गर्भाशयाचे स्नायू किंवा आजूबाजूच्या अवयवापर्यंत जास्त खोलवर रुजतो, परंतु त्याची आक्रमकता स्थानिक असून कर्कप्रक्षेप क्वचितच होतो म्हणून तो कमी मारक समजला जातो. जरायु-कर्करोगाप्रमाणेच रसायनचिकित्सा योग्य ठरते.

(ई) इतर अर्बुदे : वाहिनी-अर्बुद (मुख्यत्वे रक्तवाहिन्यांचे अर्बुद) व इतर द्रवार्बुदे वगैरे अर्बुदे संभवतात. [⟶ अर्बुदविज्ञान].

(२) वार व नाळेच्या रचनात्मक विकृती : (अ) वारेच्या विकृती : (i) अनेक वारी : वारेचे अपूर्ण विभाजन असल्यास त्यास द्विभाजित वार व संपूर्ण विभाजन असल्यास त्या द्विदल वार असे म्हणतात. असे बहुधा दोन खंड आढळतात. क्वचित त्रिदल, चतुर्दल इ. प्रकार आढळतात.

आ. ५. खंडयुक्त वार

(ii) खंडयुक्त वार : या प्रकारात मूळ वारेपासून अलग परंतु गर्भाच्या रक्तवाहिन्यांनी मूळ वारेस जोडलेले एक किंवा अनेक लहान पूरक वारखंड जरायुकलेत आढळतात. (आ. ५). प्रसूतीनंतर मूळ वार  बाहेर पडल्यावर हे खंड गर्भाशयातच राहून त्यामुळे मोठा रक्तस्राव होऊ शकतो.

(iii) पटलरूप वार : सर्व गर्भ कार्यक्षम रसांकुरांनी आच्छादलेला राहिल्यास (सर्व गर्भाभोवती आवरणाच्या स्वरूपात वार निर्माण झाल्यास) ही क्वचित आढळणारी पण मोठ्या रक्तस्रावाला कारणीभूत होणारी गंभीर विकृती होते.

(iv) कंगोरायुक्त वार : उल्ब, जरायू व अपकर्ष (ऱ्हास) झालेल्या गर्भशय्येच्या दुहेरी घडीमुळे गर्भाच्या बाजूने वार मधे खड्डा पडलेली व भोवताली करड्या रंगाचा कंगोरा (कडे) असलेली दिसते (आ.६). असा कंगोरा वारेच्या परिघावर असल्यास त्यास परिसीमांत वार म्हणतात. या विकृतीमुळे अकाल प्रसूती व प्रसूतिपूर्व रक्तस्राव होऊ शकतो.

आ. ६. कंगोरायुक्त वार

(v) मोठी वार : या रोगात मोठी वार (०.५ ते १.५ किग्रॅ. वजनाची) आढळते.

(vi) वारजन्य मांसवृद्धी : काही वेळा वारखंड प्रसूतीनंतर गर्भाशयात राहून कालांतराने अंतःस्तराने आच्छादला गेल्यास त्याचे वारजन्य मांसवृद्धीत रूपांतर होते. त्यामुळे गर्भाशयाचे निवर्तन उशिरा होते व कालांतराने होणारा प्रसूति-उत्तर रक्तस्राव होतो.

(vii) वारेतील अभिकोथ : अनेक कारणांमुळे होणारी व अनेक वेळा सहज आढळणारी ही विकृती आहे. हिच्यामध्ये रक्तपुरवठ्याअभावी ⇨ ऊतकमृत्यू, तंत्वी अपकर्ष व कॅल्सीभवन (ऊतकांत कॅल्शियम संयुगे साचण्याची अप्राकृत क्रिया) या गोष्टी आढळतात. सूक्ष्म अभिकोथ नेहमी आढळणारे असून प्राकृत व बिनमहत्त्वाचे समजले जातात. मृतगर्भ जन्मानंतर काही वेळा त्या वारेत मोठे अभिकोथ व कॅल्सीभवन आढळते. त्यामुळे मातेचे काही रोग (उदा., गर्भारपणाशी संबंधित उच्च रक्तदाब), मोठे अभिकोथ व कॅल्सीभवन, वारेचा कमी रक्तपुरवठा व वारेची अकार्यक्षमता आणि गर्भाचे कुपोषण किंवा गर्भाशयातच गर्भमृत्यू या गोष्टींचा एकमेकींशी संबंध जोडला जातो (अभिकोथ).

(आ) नाळेच्या विकृती : (i) नाळेतील एका रोहिणीचा अभाव : यात दोनाऐवजी एकच नाळ रोहिणी असते. या विकृतीबरोबरच इतर गंभीर जन्मजात दोष गर्भात असण्याची शक्यता असल्याने गर्भपात व गर्भमृत्यूचे प्रमाण वाढते. इतर जन्मजात दोष नसल्यास व गर्भ पूर्ण दिवस वाढू शकल्यास जन्मानंतर काही प्रश्न उद्‍भवत नाहीत.

(ii) नाळ वारेत शिरण्यातील वा वारेला जोडण्याच्या ठिकाणातील किंवा वारेला चिकटण्यातील बदल : नाळ वारेच्या गर्भाकडील बाजूस सहसा मध्यबिंदूच्या बाजूला वारेत शिरते. याऐवजी ती वारेच्या कडेने वारेत शिरल्यास त्यास विमध्यमी (विकेंद्री) वार (आ.७) असे म्हणतात. काही वेळा (सहसा जुळ्या, तिळ्या गर्भधारणेत) नाळेतील रक्तवाहिन्या जरायुपटलामधेच अलग होऊन वारेत शिरतात. अशा पटलातून जाणाऱ्या रक्तवाहिन्या गर्भाशयग्रीवांतर्मुख ओलांडून गेल्यास मुखस्थवाहिन्या प्रसूतीच्या वेळी गर्भाच्या मार्गात येतात.त्यामुळे प्रसूतीच्या वेळी गर्भाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा आल्यामुळे गर्भाला धोका पोहोचतो व मोठा रक्तस्रावही होऊ शकतो. अशा वेळी गर्भात इतरही जन्मजात विकृती आढळण्याची शक्यता असते.

(iii) इतर विकृती : नाळेच्या लांबीतील बदल, नाळेला गाठी पडणे, नाळेची वेटोळी गर्भाच्या अवयवांभोवती मुख्यतः गळ्याभोवती असणे, नाळेला पीळ पडणे व इतर विकृतीही आहेत.  [⟶ नाळ].

आ. ७ विमध्यमी वार

(३) वारेच्या अनैसर्गिक रोपण व वाढीमुळे उद्‍भवलेल्या विकृती :(अ) अन्यत्र गर्भधारणा : गर्भाशयाच्या बुघ्न भागातील गर्भशय्या सोडून फलित अंडे इतरत्र (अंडवाहिनी, अंडकोश, पर्युदर पोकळी, गर्भाशयाचा अधःखंड म्हणजे मुखस्थ अपरा, गर्भाशयग्रीवा इ.) रुजण्याच्या विकृतीस अन्यत्र गर्भधारणा असे म्हणतात. या जागा वारनिर्मितीस अयोग्य असतात व वार सुटी झाल्यावर गर्भाशय बुध्‍नाप्रमाणे आकुंचन पावू शकत नाहीत. त्यामुळे व तेथील रक्तपुरवठ्यात वाढ झालेली असल्याने शस्त्रक्रियेच्या वेळी आणि एरवीही तेथून मोठा व प्राणघातक रक्तस्राव होऊ शकतो. [⟶ गर्भारपणा].

(आ) मुखस्थ वार : या विकृतीत वार गर्भाशयग्रीवेच्या अंतर्मुखावर किंवा त्याच्या जवळ निर्माण झालेली असते. अनेकदा गर्भ-धारणा, उतार वय, मोठी वार इ. कारणांमुळे काही वेळा अभिवृद्ध वार या विकृतीबरोबर व अंदाजे २०० ते ४०० गर्भधारणांपैकी एकीत ही विकृती आढळते. गर्भाशयग्रीवांतर्मुखाच्या संदर्भातील स्थानाप्रमाणे या विकृतीच्या (i) संपूर्णमुखस्थ वार, (ii) आंशिक मुखस्थ वार, (iii) सीमांत मुखस्थ वार (वारेची फक्त कड अंतर्मुखावर येणे) व (iv) प्राकृत स्थानापेक्षा खाली असलेली वार (आ.८) या चार श्रेणी आढळतात व त्या ग्रीवामुखाच्या तत्कालीन तानन अवस्थेवर अवलंबून असतात.

गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीनंतर अचानक, वारंवार व प्रत्येक वेळी वाढत्या प्रमाणात होणारा वेदनारहित रक्तस्राव हे या विकृतीचे प्रमुख लक्षण आहे (त्याआधी होणाऱ्या अनेक गर्भपातांचे कारणही ही विकृती असू शकेल). शेवटच्या तिमाहीत प्रसूतीची पूर्वतयारी म्हणून गर्भाशयाचा अधोखंड तयार होणे व गर्भाशयग्रीवेचे सूक्ष्म तानन यामुळे मुखस्थ वार अकाली सुटी होऊ लागून हा रक्तस्राव होतो.

आ. ८. मुखस्थ वार

प्रसवपूर्व अपघाती रक्तस्रावाच्या ‘वार निखळणे’ (याची माहिती पुढे दिली आहे) या कारणापासून ही विकृती केवळ लक्षणांवरून वेगळी ओळखणे अवघड आहे. श्राव्यातीत ध्वनिप्रतिमादर्शनाने निदाननिश्चिती होते. गर्भाची वाढ, प्रसूतीची सुरुवात, तात्काल प्रसूतीची निकड व रक्तस्रावाची तीव्रता यांवर उपचार अवलंबून असतात. मुख्यतः मातेच्या जीवाला असलेल्या धोक्यासाठी शस्त्रक्रियेने (सिझेरियन वा छेद-प्रसूतीची शस्त्रक्रिया) उपचार केले जातात. वार चिकटलेल्या अधोखंडाच्या आकुंचन पावण्याच्या अकार्यक्षमतेमुळे प्रसवोत्तर तीव्र रक्तस्रावाची शक्यता वाढते.

(इ) वार अकाली निखळणे : गर्भाशयात योग्य ठिकाणी चिकटलेली वार गर्भजन्माआधी सुटी होण्याला वार निखळणे असे म्हणतात. याची सर्व कारणे ज्ञात नाहीत, परंतु उच्च रक्तदाब, आघात, आखूड नाळ, गर्भाशयातील दाब एकदम कमी होणे (जलउल्ब या विकारात म्हणजे उल्बात जादा द्रायू साचल्याने गर्भकला एकदम  फुटणे किंवा जुळ्यांपैकी एकाचा जन्म होणे यामुळे), अधोमहानीलेत अडथळा आणि फॉलिक अम्लाची कमतरता ही सुचविलेली कारणे आहेत.

वार निखळल्याने होणारा रक्तस्राव आतल्या आत राहिल्यास त्याला अप्रगट वा प्रच्छन्न रक्तस्राव म्हणतात. कालांतराने गर्भकला अलग करून हे रक्त योनिमार्गातून बाहेर पडते तेव्हा त्याला प्रगट रक्तस्राव म्हणतात. असा प्रसूतिपूर्व रक्तस्राव, अतिबली (जादा ताण दर्शविणारे) गर्भाशय, स्पर्शासह्यत्व, गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू न येणे आणि मोठ्या रक्तस्रावाची इतर चिन्हे ही या विकृतीची लक्षणे आहेत. श्राव्यातीत ध्वनि-प्रतिमादर्शनाने निदान निश्चिती होते.

द्रव व रक्त रक्तवाहिनीतून त्वरित व मोठ्या प्रमाणात शरीरात भरणे व रोग्याची अवस्था, गर्भाची अवस्था, रक्तस्रावाची तीव्रता व इतर गुंतागुंत पाहून त्यानुसार योनिमार्गाद्वारे किंवा शस्त्रक्रियेने प्रसूती करणे या पद्धतीने उपचार केले जातात. त्वरित निदान व उपचार न केल्यास अनेकदा जीवास धोकादायक गुंतागुंती निर्माण होतात.

(ई) प्रसूतीनंतर वार आत राहणे : प्रसूतीनंतर काही मिनिटांत वार सुटी होते व कलेबरोबर बाहेर पडते. या प्रक्रियेत उशीर होण्याची कारणे दर वेळी समजत नाहीत, परंतु गर्भाशयाचे अपुरे आकुंचन व प्रत्याकर्षण (मूळच्या स्थितीत येणे) व अभिवृद्ध वार ही कारणे असू शकतात. अशा वेळी भूल देऊन व निर्जंतुकीकरणाची काळजी घेऊन वार हाताने काढावी लागते. गर्भाशयभित्तीला अनैसर्गिकपणे घट्ट चिकटलेल्या वारेस अभिवृद्ध वार म्हणतात. आधीच्या सिझेरियन शस्रक्रियेचा व्रण, खरवडण्याची शस्त्रक्रिया, बहुप्रसवता, गर्भाशयाचा अधोखंड, अन्यत्र गर्भधारणा इ. कारणांमुळें गर्भशय्या नीट तयार झालेली नसल्यास रसांकुर गर्भाशय स्नायूंना चिकटतात (अभिवृद्ध वार) किंवा स्नायूंमध्ये घुसतात (आंतरवृद्ध वार) किंवा स्नायू पार करतात (पारित वार). याप्रमाणे संपूर्ण वार किंवा काही खंड घट्ट चिकटतात.

या प्रकारच्या वारेमुळे प्रसूतिपूर्व रक्तस्राव (मुखस्थ वार असल्यास), गर्भाशय फाटणे, पर्युदरशोथ, प्रसूति-उत्तर तीव्र रक्तस्राव, वारजन्य मांसवृद्धी, गर्भाशय अंतर्वलन इ. गंभीर गुंतागुंती निर्माण होतात. तात्कालिक विशिष्ट परिस्थितीप्रमाणे द्रव व रक्त शरीरात भरून उपचार केले जातात. त्वरित निदान आणि त्वरित व योग्य उपचार करूनही काही गुंतागुंतीचे फलानुमान (विकृतीचे पूर्वानुमान) चांगले असत नाही.

वारेची संक्रामणे : रुबेला, कांजिण्या, गोवर, गालगुंड, पोलिओ इ. विषाणुजन्य, क्षयरोग व उपदंश इ. सूक्ष्मजंतुजन्य व टॉक्सोप्लाझ्मा, हिवताप इ. आदिजीवजन्य संक्रामणे (संसर्ग) गर्भाला वारेमार्फत होऊ शकतात. यांपैकी बहुतेक वेळा वारही या संक्रामणांनी ग्रासलेली असते. तसेच गर्भकला फुटून बराच काळ झाला असल्यास पूयजनक (पू निर्माण करणारी) संक्रामणे वार व गर्भाला ग्रासतात.

पहा : गर्भकला गर्भारपणा नाळ प्रसूतिविज्ञान भ्र णविज्ञान.

संदर्भ : 1. Baird, D. Combined Textbook of Obstetrics and Gynecology, Edinburgh, 1962.

2. Brosens, A. I. and others, Eds., Human Placentation, New York, 1975.

3. Dawn, C. S.Text Book of Obstetrics, Calcutta, 1974.

4. Kaufman, P. King, B. F., Eds., Structural and Functional Organization of Placenta, New York, 1982.

5. Lawson, J. B. Stewart, D. B. Obstetrics and Gynaecology in the Tropics and Developing Countries, London, 1974.

6. Masani, K. M. A Textbook of  Obstetrics, Bombay, 1976.

7. Pritchard, J. A. MacDonald, P.C. Williams Obstetrics, New York, 1976.

प्रभुणे, रा. पा.; भालेरावं, कमल य.