वायुविकार : हा विशिष्ट रोग नसून पचन तंत्राच्या संदर्भात रोग्याने केलेली ती तक्रार असते. पचन मार्गाच्या एखाद्या भागात झालेला वायुसंचय हे पोटातील अस्वस्थपणाचे कारण आहे असे वाटणे अथवा जठरातून मुखावाटे किंवा बृहदांत्रातून (मोठ्या आतड्यातून) गुदद्वारावाटे जास्त प्रमाणात वायू बाहेर पडतो (सतत ढेकर किंवा पाद येणे) असे वाटणे किंवा पोट जड व फुगल्यासारखे वाटणे आणि पोटात गुरगुरणे या संवेदनांचे वर्णन करण्यासाठी ही तक्रार केली जाते. पचन मार्गात वायूचे अस्तित्व नेहमीच असते व काही वेळेस त्यामुळे काही तक्रारी उद्भवण्याची शक्यताही असते परंतु बहुधा इतर अनेक रोगांमुळे वा कारणांमुळे येणाऱ्या पोटातील अस्वस्थपणाचा अर्थ व्यक्ती चुकीच्या पद्धतीने लावत असते.
खालील पद्धतींनी वायू पचनमार्गात प्रवेश करतो किंवा पचनमार्गातून बाहेर पडतो.
(१) हवा गिळली जाणे आणि जठर किंवा बृहदांत्रावाटे वायू बाहेर पडणे. अन्नाबरोबर हवाही नेहमी गिळली जात असते. ती जठराच्या आकुंचनाबरोबर सहजपणे ढेकराच्या रूपाने मुखावाटे बाहेर पडते किंवा काही हवा ग्रहणीवाटे (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागावाटे) लध्वांत्रात (लहान आतड्यात) प्रवेश करून तेथून पुढे ढकलली जाते व शेवटी बृहदांत्रातुन गुदद्वारावाटे अपान वायूच्या वा पादाच्या रूपाने बाहेर पडते.
(२) वायूचे विसरण: आंत्रपोकळीतील वायू व रक्तातील वायू यांची आंत्रभित्तीमार्गे देवाणघेवाण किंवा विसरण होते व विसरणाच्या नियमाप्रमाणे संतुलित अवस्था येईपर्यंत हे होत असते.
(३) आंत्रात वायुनिर्मिती व रक्तात शोषण : अम्लधर्मी जाठररस व अल्कधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म अंगी असलेला) अग्निपिंडरस यांच्या मिश्रणाने दिवसाला ३ ते ४ लिटर कार्बन डाय ऑक्साइड वायू लंध्वांत्रात निर्माण होतो. शिवाय काही वेळा कार्बोहायड्रेटांच्या किण्वनाने (आंबवण्याच्या क्रियेने) हा वायू निर्माण होतो. सहसा तो रक्तात शोषला जाऊन फुप्फुसांवाटे बाहेर टाकला जातो. प्रथिनयुक्त अन्नपदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेने निर्माण होणारे वायू बृहदांत्रावाटे बाहेर टाकले जातात किंवा रक्तात शोषले जाऊन, प्रथम यकृतात निर्विषीकरण(विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्रिया) करून फुप्फुसांवाटे बाहेर टाकले जातात. प्राकृत (सर्वसाधारण) अवस्थेत अन्न कुजण्याची व किण्वनाची क्रिया फक्त बृहदांत्रात काही प्रमाणात होते. एरवी पचनमार्गात अडथळा असल्याने अन्नपदार्थ साचून राहाणे किंवा पचन तंत्राच्या रोगांमुळे पचनाचे कार्य नीट न होणे यांमुळे असे घडते. या कारणांशिवाय ही क्रिया पचनमार्गात इतरत्र होत नाही. हायड्रोजन सल्फाइडसारखे काही वायू काही प्रमाणात इतर पदार्थांशी रासायनिक संयोग होऊन त्या अवस्थेत शरीरातून बाहेर टाकले जातात.
जठरोद्भव वायुविकार : गिळलेल्या हवेमुळे कधीही तक्रार उद्भवत नाही. जठरात साचलेल्या वायूची तक्रार केली जाते तेव्हा बहुधा रोग्यास तक्रारीचे स्वरूप व कारण नीट कळलेले नसते (उदा., अम्लपित्त, पचनज व्रण, रक्तपुरवठ्यातील कमतरतेमुळे होणारे हृदरोग इ. रोगांत जाणवणारी पोटाच्या वरच्या भागातील अस्वस्थता किंवा वेदना) किंवा वायू जठराशिवाय इतरत्र साचलेला असतो. काही वेळा रोगी नकळत हवा गिळत राहतो (उदा., सर्दी व घशाचे विकार मानसिक दबाव, मानसिक असंतुलन इ. कारणांमुळे) व सतत ढेकर येणे किंवा पोटफुगीची तक्रार करत राहतो.कोणत्याही कारणाने जठरनिर्गमद्वार किंवा ग्रहणीमध्ये अवरोध असल्यास (व विशेषतः जठरात हायड्रोक्लोरिक अम्लाची कमतरता असल्यास) अन्न जठरात साचून कुजते व निर्माण होणारे घाण, करपट वासाचे वायू ढेकरावाटे बाहेर पडतात.
लघ्वांत्रोद्भव वायुविकार : प्राकृतावस्थेत लघ्वांत्रातील वायू सूक्ष्म बुडबुड्यांच्या स्वरूपात असल्याने क्ष-किरण छायाचित्रातही तो दिसू शकत नाही. कोणत्याही कारणाने आंत्राचा अंगवध झाल्यास (शरीराच्या एखाद्या विभागाची किंवा विभागातील स्नायूंची चलनवलन शक्ती बंद पडल्यास) हा वायू सुटा होऊन क्ष-किरण छायाचित्रात दिसू शकतो. तसेच आंत्ररोधामध्ये मूळच्या वायूंचा व अन्न कुजण्याने तयार झालेल्या वायूंचा संचय होऊन पोट फुगते परंतु आंत्रात आकुंचन पावण्याची क्षमता असल्याशिवाय नुसत्या वायूच्या अस्तित्वाने कोणतीही तक्रार उद्भवत नाही. सहसा आंत्राचा अंगग्रह ( पोकळ अवयवाच्या स्नायूचे वा स्नायुतंतूंचे झालेले अनैच्छिक व असाधारण आकुंचन) व आकुंचन-प्रसरणातील इतर दोषांमुळे तक्रारी उद्भवतात व वायुसंचय किंवा पोटातील गुरगूर किंवा जास्त प्रमाणात पाद येणे या दुय्यम परिणामस्वरूप गोष्टी असतात.
बृहदांत्रोद्भव वायुविकार : सतत पाद येणे या तक्रारीत पाद वासरहित असल्यास वायू गिळलेल्या हवेतील नायट्रोजन किंवा किण्वनामुळे निर्माण झालेला कार्बन डाय-ऑक्साइड वायू असतो. अग्निपिंडरसाची कमतरता किंवा अन्न घाईने पुढे ढकलले जाणे यांमुळे न पचलेली प्रथिने मोठ्या प्रमाणात बृहदांत्रात आल्यास तेथे ती कुजल्याने घाण वासाचे वायू पादावाटे बाहेर पडतात.
निदान व उपचार : या प्रकारच्या किंवा पोटातील इतर संदिग्धपणे जाणवणाऱ्या अस्वस्थपणाच्या तक्रारींकडे ‘वायुविकार’ म्हणून दुर्लक्ष न करता किंवा तो किरकोळ तक्रार न समजता तक्रारीचे मूळ व खरे स्वरूप समजावून घेणे, मुळाशी असलेल्या रोगाचे निदान करणे व त्यानुसार योग्य उपचार करणे महत्त्वाचे असते.
प्रभुणे, रा. प.