वायवर्णा : (हाडवर्णा हिं. वरना, बार्णा, बिलियाना गु. वरणो क. बितुसी, नखे सं. अश्मरिघ्न, वरुणक लॅ. क्रटेव्हा नुर्व्हाला, क्र. रेलिजिओजा कुल-कॅपॅरिडेसी). सु. ९ – १२ मी. उंच असलेला हा पानझडी वृक्ष भारतात, श्रीलंकेत व म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) बहुधा सर्वत्र रानटी अवस्थेत व बागेत किंवा रस्त्यांच्या दुतर्फा लावलेला आढळतो. पाने संयुक्त, त्रिदली (तीन स्वतंत्र दले असलेली), फांद्यांच्या टोकांस गर्दीने वाढलेली व लांबट वाटोळी असतात. दले ५ – १५×२.५ – ५ सेंमी. व अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखी) असतात. फुलोरा गुलुच्छासारखा [पुष्पबंध] व फुले प्रथम पांढरी असून मग पिवळसर व शेवटी जांभळट होतात ती डिसेंबर–मार्च–एप्रिलमध्ये येतात. संदले लहान, पाकळ्या चार (२.५× १.८ सेंमी.) व केसरदले अनेक असून लांब किंजधरावर (स्त्रीकेसराच्या खालच्या दांड्यावर) मृदुफळ तयार होते [फूल]. ते लांबट वाटोळे (२.५ – ३.८ सेंमी. व्यासाचे), गर्द शेंदरी व कठीण बनते बिया अनेक असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कॅपॅरिडेसी कुलात (वरुण कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

चुना चिकट व कठीण करण्यास याच्या फळातील मगज घालतात. रंग पक्का करण्यास सालीची पूड मिसळतात लाकूड पिवळट रंगाचे, मध्यम व कठीण व गुळगुळीत असून ढोल, फण्या, साधे सजावटी सामान, आगकाड्या इत्यादींस उपयुक्त असते. साल व फळ संधिवातावर चोळण्यास चांगले खोडाच्या सालीत टॅनीन व सॅपोनीन ही असतात. सालीचा काढा सारक असून तो अश्मरीवर व मूत्रमार्गाच्या तक्रारींवर देतात. पानांचा रस पाय सुजणे, तळव्याची आग इत्यादींवर गुणकारी असून मुळांच्या सालीने व पानांच्या रसाने कातडी लाल होते व फोडही येतात. फुले स्तंभक (आकुंचन करणारी) असून त्यांमुळे यकृतावर उत्तेजक परिणाम होतो. महाभारतात व चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांच्या वैद्यक ग्रंथांत वरुणक या नावाने वायवर्ण्याचा उल्लेख आला आहे.

 घवघवे, ब. ग.