वामन :(सु. ८००). संस्कृतातील काव्यालंकारसूत्र ह्या ग्रंथाचा कर्ता. ह्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. तथापि काश्मीरचा राजा जयापीड ह्याचा कोणी एक वामन नावाचा मंत्री होता, असा उल्लेख राजतरंगिणीत आढळतो. जर्मन पंडित ब्यूलर ह्याने जयापीडाचा मंत्री असलेला वामन हाच काव्यालंकारसूत्रकार वामन होय, ह्या मताकडे आपला कल दर्शविला आहे. हे मत स्वीकारल्यास सु. ८०० हा वामनाचा काळ मानता येतो.
वामनाचा काव्यालंकारसूत्र हा ग्रंथ तीन भागांत विभागलेला आहे : सूत्रे, वामनाची स्वतःची वृत्ती आणि नंतर उदाहरणे. ह्या ग्रंथाची पाच अधिकरणे आहेत आणि प्रत्येक अधिकरण हे दोन किंवा तीन अध्यायांचे आहे. एकूण अध्याय बारा आहेत. ग्रंथातील एकूण सूत्रे ३१९ आहेत. ‘शारीर ’ ह्या नावाच्या पहिल्या अधिकरणात वामनाने काव्याच्या प्रयोजनांचा विचार केला असून रीती हा काव्याचा आत्मा होय, असे म्हटले आहे. वैदर्भी, गौडी आणि पाञ्चाली ह्या तीन रीतिप्रकारांविषयीचे विवेचनही त्याने केले आहे. ‘दोषदर्शन ’ हे दुसऱ्या अधिकरणाचे नाव. त्यात पद, वाक्य आणि वाक्यार्थ ह्यांच्याशी संबंधित अशा दोषांबद्दल त्याने लिहिले आहे. ‘गुणविवेचन ’ ह्या तिसऱ्या अधिकरणात गुणांचा विचार त्याने केला असून गुण आणि अलंकार ह्यांत फरक असल्याचे म्हटले आहे. वामनाने गुणांना आंतर आणि अलंकारांना बाह्य स्थान दिले आहे. मुळात सौंदर्याचा अभाव असेल, तर दागिने घालून स्त्रीला सुंदर होता येत नाही पण ती सौंदर्यवती असेल, तर दागिन्यांमुळे तिचे सौंदर्य वाढेल. तसेच अलंकार हे काव्यातील गुणमूलक सौंदर्य वाढवितात. अनलंकृत, पण शुद्ध गुणयुक्त काव्यही रसिकांना आनंद देतेच. ओजसादी दहा गुण सांगून त्यांची उदाहरणेही त्याने दिली आहेत. ‘आलंकारिक ’ ह्या चौथ्या अधिकरणात यमक, अनुप्रास आणि उपमा ह्या अलंकारांचे विवेचन आहे. उपमेचे सहा दोषही त्याने दाखवून दिले आहेत. पाचवे अधिकरण ‘ प्रायोगिक ’ ह्या नावाचे. कवींनी पाळले पाहिजेत, असे काही संकेत त्याने ह्या अधिकरणात नमूद केले आहेत. उदा., एकच शब्द पुन्हा वापरू नये पद्याच्या पादात-पद्याच्या पहिल्या अर्ध्या भागाच्या शेवटाचा अपवाद वगळता-संधीचे नियम पाळावेत. वामनाने एकूण ३३ अलंकार सांगितले. सर्व अर्थालंकार उपमेतूनच निर्माण होतात, असे त्याचे मत असल्याने पर्यायोक्त, भाविक, सूक्ष्म ह्यांसारखे, साधर्म्यावर न आधारलेले अलंका र त्याने मानले नाहीत.
शब्दार्थमय काव्यशरीर आणि त्याचे अलंकार ह्यांतच मर्यादित झालेली वामनापूर्वीची काव्यचर्चा, रीतीला काव्याचा आत्मा मानून वामनाने आत्मनिष्ठ केली. वामनाच्या मते रीती म्हणजे गुणविशेषयुक्त काव्यरचना होय.
वामनाचा सहदेवनामक टीकाकार सांगतो, की वामनाचा ग्रंथ काही काळ प्रचारातून नाहीसा झाला होता परंतु पुढे भट्टमुकुल किंवा मुकुलभट्ट ह्याला त्याची एक प्रत उपलब्ध झाली आणि त्याने तो पुन्हा प्रचारात आणला. गोपेंद्रतिप्पभूपालाने ह्या ग्रंथावर कामधेनुनामक टीका लिहिली आहे.
पहा : रीतिसिद्धांत.
संदर्भ : 1. Kane, P. V. History of Sanskrit Poetics, Delhi, 1961.
२. देशपांडे, ग. त्र्यं. भारतीय साहित्यशास्त्र, मुंबई, १९६३.
कुलकर्णी, अ. र.