वाद्य व वाद्यवर्गीकरण : संगीतध्वनी निर्माण करण्याचे साधन म्हणजे वाद्य. मूलतः कोणत्याही वाद्याला कंपित्र (व्हायब्रेटर) व सहकंपक (रेझॉनेटर) हे दोन भाग असावे लागतात. वाद्यवादनात कंपित्राला गती दिली जाते आणि त्याच्या कंपनाने ध्वनी उत्पन्न होतो. सहकंपक असा निर्मित ध्वनी वाढवितो आणि पसरवितो. विद्युच्चलित वाद्यात ही क्रिया विद्युतशक्तीच्या योगाने होते. कंपित्राला कंपनवेगामुळे निर्माण होणाऱ्या स्वरांची उंची ठरते. उदा., दर सेकेंदाला ‘क्ष’ कंपने असणाऱ्या स्वरांपेक्षा, दर सेकंदाला ‘२ क्ष’ कंपनांचा स्वर पहिल्यापेक्षा सप्तकाने उंच असतो. कंपित्राच्या कंपनांच्या कमीजास्त आवाक्यामुळे स्वरध्वनी हळू किंवा मोठा ऐकू येतो. कंपित्र व सहकंपक यांचा आकार, लांबी व इतर भौतिक विविध गुणधर्म यांनुसार भिन्नभिन्न प्रकृतींचे संगीतस्वर उत्पन्न होतात. साधारणतः सहकंपक आकाराने मोठा असेल, तर मंद्र स्वर येऊ शकतात. उदा., लहान मुरलीपेक्षा लांब मुरलीचे स्वर ढाले असतात. त्याचप्रमाणे भोपळ्याच्या लहान-मोठेपणावर वीणासदृश्य वाद्यातून तार किंवा मंद्र स्वर निघतात.

संगीतस्वर प्रायः  शुद्धस्वरक नसतात तर शुद्धस्वरक आणि संवादी स्वरांचे मिश्रण असतात. कंपित्रामुळे स्वरक उत्पन्न होतेवेळीच संवादी स्वरही निघत असतात. या वैशिष्ट्यामुळे संगीतध्वनींत एकसुरीपणा न येता रंजकता येते. तंबोऱ्यासारख्या तंतुवाद्यातून या वैशिष्ट्याची प्रचीती येते. तंबोरा छेडताना मूळ स्वर व त्याचे वरच्या गांधारापर्यंतचे संवादी स्वर ऐकू येतात.

निरनिराळ्या वाद्यांचे आकार व स्वरूप हे त्या त्या वाद्याची आवाज-उत्पादकता, वादनपद्धती व अन्य अपेक्षित गुणधर्म यांमुळे निश्चित झाले आहे. तारेवर फिरणाऱ्या गजाला माया राखण्यासाठी सारंगी किंवा व्हायोलिन या वाद्यांची सहकंपके आकुंचित कमरेची असतात. वाद्यवादन सुलभ करण्यासाठी तसेच आवाजवैशिष्ट्य राखण्यासाठी जरूर असलेली लांब नळी फिरवून, वळवून, तिचा आकार लहान करून अनेक पाश्चात्त्य वाद्ये बनविलेली आहेत. तिबेटी वाद्ये अशी व्यवस्था नसल्यामुळे लांबच लांब व अवजड असतात.

वाद्यांची निर्मिती मानवी संस्कृतीइतकीच प्राचीन आहे. एका दृष्टीने सर्वांत प्राचीन वाद्य म्हणजे खुद्द मानवी शरीरच आहे. भारतीय शास्त्रकार त्याला ‘दैवी वीणा’ म्हणतात व मानवाने तयार केलेल्या वाद्यांना ‘मानुषी’ म्हणतात. या कल्पनेमुळेच शिर, उदर, दंड वगैरे नावे वाद्याच्या अंगोपांगांना मिळाली असावीत. गायनांच्या लय व स्वर या अंगांच्या उत्क्रांतीबरोबरच वाद्यांचीही उत्क्रांती झाली असावी. त्यातही लयीची जाणीव अगोदरची असावी. चालताना किंवा पळताना होणारा लयींतला फरक तसेच मानवी प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी केलेल्या शारीरिक हालचाली –उदा., हाताने टाळ्या वाजविणे, पाय दणादणा आपटणे, छाती बडविणे, उघड्या तोंडावर हात आपटून आवाज काढणे इ. या सर्वांतून लयवाद्यांची कल्पना आली असावी. मानवी आवाजातील लहान-मोठेपणा, भिन्न उंची, पशुपक्ष्यांचे आवाज यांमुळे स्वरवाद्यांची कल्पना आली असावी. प्रारंभीच्या काळात वाळलेल्या शेंगा, लाकडी काटक्या, पोकळ ओंडके ह्यांसारख्या वस्तूंचा वाद्ये म्हणून वापर झाला असावा. नंतर जमिनीतील खड्ड्यावर कातडे टाकून, किंवा पोकळ ओंडक्यांचे तोंड आच्छादून त्यावर हाताने किंवा काठीने आवाज काढणे ही क्लृप्ती सुचली असावी. पोकळ नळ्यांत फुंक मारून आवाज निघतो, हे कळल्यानंतर स्वरवाद्यांची कल्पना आली असावी. धनुष्याच्या शोधानंतर त्यातून निघणाऱ्या टणत्कारातून तंतुवाद्याविषयी मूळ जाणीव झाली असावी. पण या सुरुवातीच्या वाद्यांचा उपयोग केवळ करमणुकीसाठी होत नसावा. करमणुकीपेक्षाही जनावरांना किंवा शत्रूंना भिवविण्यासाठी आणि भीतीपोटी उत्पन्न झालेल्या जादूटोण्यातील विधीसाठी असावा. आजमितीसह आदिवासी जमातींत वाद्यांचा वापर जादूटोण्यासाठी केला जातो. कालांतराने संदेश दूरवर पोहोचवण्यासाठी वा युद्धप्रसंगी वाद्यांचा वापर केला गेला असावा. धकाधकीचे आयुष्य संपुष्टात येऊन स्थिर जीवन जगणे शक्य झाल्यावर नृत्यासाठी व करमणुकीसाठी वाद्यांचा वापर होऊ लागला. मूळच्या जादूटोण्याऐवजी धर्मविषयक कल्पना रूढ झाल्यावर, संगीताचा आणि त्याबरोबरच वाद्यांचाही वापर धार्मिक विधींमध्ये होऊ लागला. धार्मिक कार्यासाठी वापरण्याच्या वाद्यांच्या रचनेबाबतही काही बंधने आली (उदा., चीनमधील धार्मिक वाद्यांच्या रचनांबाबत काही निर्बंध होते). मानवी जीवनात वाद्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. काही जमातींत जमातप्रमुखाशिवाय इतरांना वाद्ये पाहूही देत नसत. अधिकाराचे गौरवपर चिन्ह म्हणून आजही तुतारीसारखे वाद्य राजदरबारी वापरतात. जसजसे मानवी कौशल्य प्रगत झाले, तसतशी वाद्यांच्या निर्मितीत व प्रकारांत वाढ झाली. संगीतपद्धतींतील भेदांमुळे, प्रगतीमुळे व साधनसामग्रीच्या वैचित्र्यामुळे देशोदेशीची वाद्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरली. भारत व इतर पौर्वात्य देशांतील एकधुन पद्धतीमुळे वाद्य हे केवळ मानवी गायनाबरोबर साथीचे म्हणून किंवा मानवी आवाजसदृश आवाज काढण्याचे साधन म्हणूनच राहिले. लयवाद्ये मात्र वेगळी होती. त्यांचाही दर्जा नृत्याच्या साथीचे दुय्यम वाद्य हाच असे. बीनसारख्या स्वतंत्रपणे वाजविण्याच्या वाद्याकडूनही मानवी आवाजाप्रमाणे बोलण्याचीच अपेक्षा असते. ‘जे बोलते ते वाद्य’ अशीच वाद्याची भारतीय संकल्पना आहे. याउलट बहुधुन पद्धतीमुळे पाश्चात्त्य संगीतात प्रत्येक वाद्याला स्वतंत्र किंवा सांघिक वादनातील वैशिष्ट्यपूर्ण वाद्य म्हणून स्थान आहे आणि यामुळे प्रत्येक वाद्याच्या स्वरनिर्मितीचे वैशिष्ट्य राखण्यासाठी व वाढविण्यासाठी त्या वाद्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या आणि विविध स्वरांच्या आवाक्यासाठी एकाच वाद्याचे लहानमोठे प्रकारही झाले. काही प्राचीन वाद्ये आजही त्यांच्या मूळ स्वरूपांत प्रचारात आहेत तर काहींमध्ये सुधारणा होऊन बदल झाले आहेत.


वाद्यांचे वर्गीकरण : वाद्यांचे प्रकारभेद सगळीकडे सारखेच दिसतात. काही पद्धतींत थोडे पाठभेदही आहेत. वाद्यांची भारतीय वर्गवारी अशी : (१) तत किंवा तंतु म्हणजे तारा छेडून वा गजाने वाजविण्याची वाद्ये. (२) वितत तसेच वितत –अवनद्ध म्हणजे कातड्याने मढविलेली व हातांनी किंवा काठ्यांनी वाजविण्याची वाद्ये. (३) सुषिर म्हणजे फुंकून किंवा हवेचा प्रवाह सोडून वाजविण्याची वाद्ये व (४) घन म्हणजे ध्वनि-उत्पादक घनवस्तू एकमेकांवर आपटून वाजविण्याची वाद्ये. दाक्षिणात्य भारतीय पद्धतीत तत प्रकाराला ‘नरांबु कारूविगल’, सुषिर प्रकाराला ‘कत्रु’ किंवा ‘तुलाई कारूविगल’ व अवनद्ध प्रकाराला ‘तोल कारूविगल’ अशी तमिळ नावे आहेत.

वाद्यांची पाश्चात्त्य वर्गवारी अशी : (१) ‘स्ट्रिंग्ज’ –ग्रीक नाव ‘एन्-कॉर्डन’, लॅटिन ‘टेन्साइल’, ‘कॉर्डोफोन्स’ म्हणजे संस्कृत तत वा तंतुवाद्ये. (२) ‘विंड’ म्हणजे ग्रीक ‘न्यूमॅटिकोन’, लॅटिन ‘इनफ्लेटिबल एरोफोन्स’ म्हणजे संस्कृत सुषिर वाद्ये. (३) ‘पर्कशन’-ग्रीक ‘क्राऊस्टिकॉन’, लॅटिन ‘पुल्‌साटाईल’, शिवाय ‘मेंब्रोफोन्स’ अथवा ‘इडिओफोन्स’ म्हणजे संस्कृत घन व अवनद्ध वाद्ये आणि (४) ‘इलेक्ट्रोफोन्स’- अर्थात अत्याधुनिक विद्युच्चलित वाद्ये. याशिवाय पहिल्या प्रकारामध्ये गजांनी वाजविण्याची, छेडून वाजविण्याची व कळफलकाची (की बोर्ड) हे उपभेद आहेत. दुसऱ्या प्रकारात शिट्टीसारखी जिव्हाळीची, नुसत्या ओठांच्या कंपनाने वाजविण्याची आणि कळफलकाची हे उपप्रकार आहेत. तिसऱ्या प्रकारात थरथरणाऱ्या ताणलेल्या कातडी मुखाची, आपटून वाजविण्याची, पोकळ घंटेसारखी व कळफलकाची हे उपप्रकार आहेत तर चौथ्या प्रकारात एकधुन पद्धतीची व कळफलकाची असे उपभेद आहेत.

यांशिवाय वाद्यांच्या उपयोगांप्रमाणेही लयवाद्ये, स्वरवाद्ये, स्वतंत्रपणे वाजविण्याची म्हणजेच शुष्क वाद्ये, साथीची वाद्ये, वृंदवाद्ये तसेच देवालये, चर्च वगैरे ठिकाणी असलेली आणि धार्मिक प्रसंगी वाजविण्याची वाद्ये, रणवाद्ये, संदेशवाहक वाद्ये असेही अनेक भेद करता येतील. शास्त्रीय संगीतवाद्यांशिवाय लोकवाद्ये आणि एकच संगीतरचना यांत्रिक क्लृप्तीच्या साहाय्याने पुनःपुन्हा वाजविण्याची स्वयंचलित वाद्ये, यांचाही उल्लेख करता येईल.

प्राथमिक आणि प्राचीन वाद्ये : प्राथमिक वाद्ये ही प्राचीन आहेत आणि आजही जगातील वेगवेगळ्या भागातील आदिवासी जमातींत प्रचारात आहेत. आद्य प्राचीन संस्कृतींत प्रचारात असलेल्या पण आज नष्ट झालेल्या वा परिष्कृत रूपात अस्तित्वात असलेल्या अशा दोन्ही प्रकारांतील वाद्यांची गणना प्राचीन या सदराखाली करता येईल. पहिल्या वर्गात जास्त वाद्ये आघाती व घनवाद्ये आहेत. निरनिराळ्या जमातींच्या नृत्यप्रसंगी त्यांचा वापर होत असावा. खुळखुळणारी, हलवून वाजविण्याची (वाळक्या शेंगा, भोपळे वगैरेसारखी वाद्ये), घर्षणाची (करकऱ्यासारखी), एकमेकांवर आपटून वाजविण्याची (करताल, चिपळ्या यांसारखी), हाताने आघात करून वाजविण्याची (निरनिराळ्या आकारांचे ढोल, किंवा खंजिऱ्यांसारखी काठ्यांनी) वाजविण्याची (नगारा, ताशा यांसारखी) लयवाद्ये आणि निरनिराळ्या स्वरांत लावलेल्या लाकडी पट्ट्यांनी, दगडी तुकड्यांची, घंटांचीझायलोफोन (आजही प्रचारात असलेले), मारिंबा, सांसा, पियेनचिंग यांसारखी स्वरवाद्ये किसोर, ओंबी, नांगा यांसारखी मूळ धनुष्यापासून निघालेली ततवाद्ये आणि तोंडाने किंवा नाकाने फुंकून वाजविण्याची, जिव्हाळीची हरतऱ्हेची सुषिर वाद्ये प्राथमिक वाद्यांत होती आणि काही अद्यापही रूढ आहेत. आदिमानवाच्या संगीताच्या प्राथमिक गरजा या वाद्यांमुळे पुऱ्या होत असाव्यात.

प्राचीन ईजिप्शियन, ग्रीक, ॲसिरियन, बॅबिलोनियन व यूरोपीय संस्कृतीत प्रचलित असलेल्या वाद्यांपैकी लायर, ⇨हार्प, पॅनपाइप (सिरिंक्स), डबल पाइप, सिस्ट्रम या वाद्यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. यांशिवाय अनेक प्रकारची लयवाद्येही प्राचीन काळी प्रचारात होती. हार्पसारखे वाद्य आजही प्रचारात आहे. भारतातही वीणा (तत), वेणू वा बासरी (सुषिर) व मृदंग (अवनद्ध) हे वाद्यप्रकार प्राचीन आहेत. वेदकाळात भूमिदुंदुभी हे प्राचीन वाद्य प्रचारात होते.

पाश्चात्त्य वाद्ये : पाश्चात्त्य यूरोपीय संस्कृती जिथे जिथे प्रसृत झाली तिथे तिथे पाश्चात्त्य वाद्ये रूढ झाली व काही आजही प्रचलित आहेत. प्राचीन ईजिप्त व ग्रीक संस्कृतींचा स्वरगुणांबाबतचा वारसा वाद्यांबाबतही टिकून आहे. तसेच इतर पौर्वात्य देशांतूनही वाद्यांची उसनवारी केली गेली. वाद्यरचनेतील अनेक प्रयोगांनंतरही परिष्कृत रूपातील आजची वाद्ये ही प्रायः वृंदवादनासाठी आहेत. पाश्चात्त्य संगीपद्धतीतील निश्चित स्वरस्थानामुळे व प्रत्येक वाद्याचे आवाजवैशिष्ट्य अबाधित राखण्याच्या कटाक्षामुळे वाद्यांचे आकारवैविध्य व स्वरूपभिन्नताही निर्माण झाली. इलेक्ट्रोफोनिक आणि कळचाव्यांची वा कळफलकाची वाद्ये ही त्यांचे खास वैशिष्ट आहे. वाजविण्याचे गज, स्वरमेलाच्या सोयी यांतही प्रयोग होऊन सुधारणा झाल्या आहेत. प्रायः पाश्चात्त्य वाद्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर व प्रगत झालेल्या नमुन्याबरहुकूम असते. काही पाश्चात्त्य वाद्ये भारतीय संगीतासाठीही वापरली जातात. पाश्चात्त्य तंतुवाद्यांतही गजवाद्ये व छेडवाद्ये हे प्रकार आहेत. सहसंवादी तारांचाही वापर क्वचित केला जातो. गजवाद्यांत बोटांनी तारांची लांबी कमी करून स्वर काढण्याची पडद्याची किंवा बिनपडद्याची आणि छेडवाद्यांत खुल्या तारा छेडून किंवा बोटे वापरून वाजविण्याची पडद्याची किंवा बिनपडद्याची वाद्ये आहेत.


गजवाद्यांत व्हायोलिन, व्हायॉल, लायरा आणि रेबेक असे प्रमुख गट आहेत. लायरा, व्हायॉल व रेबेक गट हे व्हायोलिन-गटापेक्षा प्राचीन होत. व्हायोलिन–गटापैकी व्हायोलिन चेलो किंवा नुसतेच चेलोडबल बेस ही मोठी वाद्ये आपल्याकडील चित्रपट संगीतातही वाद्यवृंदात लयवाद्ये म्हणून वापरली जातात. पाश्चात्त्य संगीतात त्यांच्या धीरगंभीर आवाजांचा उपयोग करतात. डबल बेस उभ्याने, तर चेलो बसून वाजवितात.

व्हायॉल गटातील गजांचा, वाद्यांचा आकार व रचना व्हायोलिन-गटापेक्षा निराळी असते. शिवाय तातीचे पडदे असतात व वाजविताना गज खालून धरतात. व्हायॉल द गाम्बा, लायरा व्हायॉल, पार्दसू द व्हायॉल आणि इतर लहान-मोठ्या आकारांची व स्वर-आवाक्यांची वाद्ये या गटातील होत.

लंबगोल आकाराची, लांब व मऊ केसांच्या गजाची लायरा वाद्ये प्राचीन लायर वाद्यांपेक्षा निराळी आहेत. लायरा दा ब्राचीओ (हातात धरण्याचे), लायरा दा गाम्बा (पायात धरून वाजविण्याचे) व या गटाशी साधर्म्यदर्शक क्रूथ हे वेल्श वाद्य ही काही प्रमुख वाद्ये होत.

प्रबोधनकालीन व मध्ययुगीन ‘रेबेक’ गटातील वाद्याचा आकार साधारणपणे अर्ध्या कापलेल्या  नासपती फळासारखा असून त्यात ध्वनिस्तंभ नसतो व ध्वनिपट सपाट असतो. त्यावेळच्या शिल्पांत त्याचे चित्रण आढळते.

तंतुवाद्यांपैकी छेडवाद्यांच्या गटात ल्यूट, ⇨गिटार, सिटर्न व हार्प ही वाद्ये आहेत. हाताने छेडण्याचे ल्यूट हे आकाराने नासपतीसारखे, पट्ट्यांनी तयार केलेल्या गोलाकार सहकंपकांचे, पातळ ध्वनिफलकांचे, घाडी नसलेले, झंकारतरफांचे, जोडतारांचे व पडद्याचे एक प्रमुख वाद्य आहे. आर्चल्यूट, थीओर्बो व कीडरोने हे याचे लहान-मोठे प्रकार. ह्याच्या मँडोरा या उपप्रकारातील नखीने छेडण्याचे मेंडालिन हे वाद्य सुपरिचित आहे. आकारदृष्ट्या  गिटारसारखे पण ध्वनिदृष्ट्या ल्यूटसारखे व्हीवेल हे स्पॅनिश वाद्य आहे. पडद्याचे गिटार वाद्य दोन्ही बाजूंनी सपाट आणि आकसलेल्या कमरेचे असते. स्पेनमधील या लोकप्रिय वाद्याचे गिटारेल्लो रकिंते, तेनोरे, गिटारा, यूकलेली हवाईयन गिटार असे प्रकार आहेत.

गोलाकार वा सपाट पाठीचे तसेच आकारवैविध्य सिटर्न (वा सिदर्न) एलिझाबेथ राणीच्या वेळी लोकप्रिय होते. बँडोरा (पँडोरा), आर्फरीयन, पॉलीफंट आणि बँजो ही वाद्ये या गटातीलच होत. बँजोचा सहकंपक धातूच्या कड्यावर ताणलेल्या कातड्याचा असतो.

हार्प या वाद्यगटात हार्पच्या प्रकारांशिवाय, त्रिकोणी किंवा चौकोनी ध्वनिपेटीचे व खुल्या तारांचे साल्ट्री, झिथर व डल्सिमर ही वाद्ये आहेत. डल्सिमर (सिंबलम) हे लोकवाद्यवृंदातील वाद्य आहे. ते दोन हातोड्यांनी किंवा काठ्यांनी वाजविता येते.

कळफलकाच्या वाद्यांत पियानो, ⇨क्लॅव्हिकॉर्ड आणि हार्पसिकॉर्ड ही प्रमुख वाद्ये आहेत. क्लॅव्हिकॉर्डची परंपरा चौदाव्या शतकापासूनची आहे. कळफलकाची पट्टी दाबतच स्पर्शपट्टी उचलली जाऊन तारेला स्पर्श करते व तेवढ्याने उत्पन्न झालेल्या कंपनामुळे इष्ट स्वर निघतो. गेवुंडेन (फ्रेटेड) क्लॅव्हिकॉर्ड व सध्या प्रचलित असलेले वुंडफ्री (फ्रेटलेस) क्लॅव्हिकार्ड हे त्याचे प्रकार होत. ह्याच्या समकालीन हार्पसिकॉर्डमध्ये स्पर्शपट्टीऐवजी तारा छेडण्याची यांत्रिक व्यवस्था असते. स्पिनेट, व्हर्जिनल ही इंग्रजी वाद्ये याचीच प्राथमिक रूपे होत.

सुषिर (विंड) वाद्यगटात वाद्य आडवे धरून वाजवण्याची मुखरंध्राची, वाद्य उभे धरून वाजवण्याची शिट्टीची, निरनिराळ्या प्रकारच्या जिव्हाळ्या असलेली आणि नुसत्या ओठांनी वाजवण्याची वाद्ये असे अनेक प्रकार आहेत. ट्रॅन्सव्हर्स (जर्मन) फ्ल्यूट, वाद्यवृंदातील ऑर्केस्ट्रल फ्ल्यूट आणि इतर अनेक प्रकार आडव्या मुखरंध्र वाद्यांचे आहेत. शिट्टीच्या प्रकारांत रेकॉर्डर, पिकोलो वगैरे लाकडी वाद्यांचे तसेच फ्लॅजिओलेटासारखे धातूच्या वाद्यांचे प्रकार आहेत. पुष्कळशा आडव्या वाद्यांत असलेली कळचाव्यांची व्यवस्था अशा वाद्यांत प्रायः नसते. या वाद्यांचे आकार दंडगोलाकार किंवा शंकूसारखे असतात.


 धातूची, वेताची किंवा तत्सदृश एकेरी, दुहेरी, आपटत्या किंवा मुक्त जिव्हाळीची वाद्ये वाद्यवृंदात आगळी असतात. शॉम, ⇨ओबो, ⇨बसून, ⇨सॅक्सफोन, बॅगपाइप्स, ⇨क्लॅरिनेट हे यातील प्रमुख प्रकार होत. शॉम व पॉमर (मोठा शॉम) यांना नलिकेत बसविलेली वेताची दुहेरी जिव्हाळी असते व शंक्वाकार नलिकाग्रांना कर्णाकार असतो. ओबो वाद्यकुलाची वेगवेगळे कर्णाकार, द्विदल जिव्हाळी व शंक्काकार नलिका ही वैशिष्ट्ये होत. कळचाव्यांचीही व्यवस्था असते. ह्या गटात कॉर आंग्ले, बॅरिटोन ओबो (हेकेलफोन) व इतर प्रकारही आहेत. बसूनमध्ये दुहेरी व रुंद जिव्हाळी असते. नलिका अरुंद व लांब म्हणून वळवून दुहेरी केलेली असते व कर्णाकार गोल असतो. ह्याचे स्टँडर्ड, डबल बसून, डिस्कॅट, फॅगॉट (जर्मन) वगैरे प्रकार आहेत. सॅक्सफोन हे वाद्य ॲडोल्फ सॅक्सने सु. १८४० च्या दरम्यान तयार केले. हे एक प्रमुख आधुनिक वाद्य आहे. एकेरी आपटती जाड जिव्हाळी, पितळी शंक्काकार नळी व कळचाव्या असलेल्या या वाद्याचे लहान-मोठे अनेक प्रकार आहेत. यासारखेच पण दुहेरी जिव्हाळीचे सारूसोफोन हे वाद्य आहे. बॅगपाइप्स हा प्रकार आपल्याकडेही परिचित आहे.

आपल्याकडील शिंगासारखी किंवा शंखासारखी फुंकून वाजविण्याची, जिव्हाळी किंवा शिट्टीऐवजी पेल्याच्या आकाराच्या मुखरंध्राची पाश्यात्त्य वाद्ये अनेक आहेत. अगदी हळू किंवा कर्कश स्वर यांतून निघतात. यांतील सध्या प्रचलित नसलेल्या लाकडी कार्नेट (Cornett) प्रमाणेच ब्यूगल, ⇨हॉर्न, ब्रास कॉर्नेट (Cornett), ट्रोंबोन व ट्रंपेट हे प्रकार कर्णा असलेल्या पितळी नळीचे आहेत. नळीच्या कमीजास्त लांबीप्रमाणे ही वाद्ये सरळ वा वळवून अनेक आकारांची केलेली असतात. कॉर्नेट (Cornett) वाद्यगटात वक्राकार सर्पंट (सर्पासारखी वक्र काष्ठनलिका असलेले), ऑफ्लिक्लाइड इ. वाद्यांचा समावेश होतो. ही वाद्ये सध्या प्रचलित नाहीत. ब्यूगलमध्ये ट्यूबा, सॅक्सहॉर्न वगैरे प्रकार येतात. हॉर्न प्रकारात झडपदट्ट्या असलेले व्हॉल्व्ह हॉर्न व झडपदट्ट्या नसलेले नॅचरल अथवा हँडहॉर्न हे प्रकार आहेत. जुन्या फ्रेंच पोस्ट हॉर्नपासून उत्क्रांत झालेल्या कॉर्नेट (Cornett) प्रकारांपैकी कॉर्नेट-अ-पिस्टन्स, कॉर्नोपियन वगैरे प्रचलित आहेत.

ट्रोंबोन वाद्यगटात स्लाइड ट्रोंबोन, व्हॉल्व्ह ट्रोंबोन वगैरे प्रकार आहेत. त्यांत रचना व आकार या दृष्टींनी भिन्नता आढळते. ट्रंपेट हा प्रकार त्यांच्या सारखाच. या लष्करी संगीतवाद्याचे जुन्या काळातील लांब नॅचरल ट्रंपेट व आज प्रचलित असलेले आखुड क्लॅरिन बासेन, स्लाइड ट्रंपेट, बेस ट्रंपेट इ. प्रकारभेद आहेत. हॉर्मोनियम,ऑर्गन, तोंडाने वाजविण्याचे माउथ ऑर्गन (जर्मन मुंडहार्मोनिका) यांसारखी वाद्येही सुषिर गटातीलच आहेत.

आघातवाद्य (पर्कशन)-गटात कातड्याने मढविलेली घन, पोकळ व कळफलकाची वाद्ये येतात. अवनद्ध वाद्यांत दोन काठ्यांनी वाजविण्याचे, भांड्याच्या आकाराचे, दोन भागांचे केट्लड्रम्स, दंडगोलाकार बेस, टेनॉर, साइड ड्रम्स वगैर वाद्ये टेबर आणि पाइप या जोडवाद्यातील हातांनी वाजविण्याचे टेबर  व आपल्या खंजिरीसारखे (थाप मारून वा हलवून वाजविण्याचे) टॅम्बरीन ही लयवाद्ये येतात. केट्लड्रम्सना स्वरमेलनासाठी मळसूत्रे असतात व ड्रमच्या प्रकारांत ताणदोरी असते. टिम्पनी ही इटालियन संज्ञा केट्लड्रम्ससाठी साधारण सतराव्या शतकापासून प्रचारात आहे.

घन वाद्यगटात दोन पितळी चकत्यांचे सिंबल्स (झांज) व लाकडी तुकड्यांचे चिपळ्यांप्रमाणे कॅस्टनेट्स ही एकमेकांवर आपटण्याची वाद्ये होत. दुसऱ्या प्रकारात घनवस्तूंवर आघात करून स्वरनिर्मिती केली जाते. त्यात लोखंडी कांबेची ट्रँगल्स (त्रिकोण) दोन काठ्यांनी वाजविण्याची विविध स्वरांतील लाकडी पट्ट्यांची झायलोफोन (काष्ठतरंग) व मारिंबा ही वाद्ये तसेच धातूच्या पट्ट्यांचे आणि नळ्यांचे सहकंपक असलेली व ऐरणीयुक्त अशी ग्लॉकेनस्पिएल, ट्यूबाफोन व ॲनव्हिल ही वाद्ये आहेत. पोकळ वाद्यगटांतील बेल्स, ट्यूबबेल्स, म्युझिकल बेल्स, म्युझिकल बेल्स, म्युझिकल ग्लासेस ही काही वाद्ये होत. सेलेस्टा, कॅरिलॉन, डल्सिटोन ही कळफलकाची वाद्ये होत.

विद्युच्चलित वाद्यप्रकारात ध्वनिवर्धनासाठी तसेच वाद्यचालनासाठी विद्युत्‌शक्तीचा वापर केला जातो. या प्रकारातील इलेक्ट्रिक गटार, व्हायर्लिंग व्हायोलिन व निओ-बेखस्टाईन पियानो ही काही वाद्ये होत. विद्युत्‌शक्तीच्या द्वारे विविध वाद्यध्वनी निर्माण करणारी एकस्वरसंवादी, कळफलक नसलेली अशी वाद्ये म्हणजे थेरेमिन, ट्राउटेनियम, ओंड म्युझिकल किंवा ओंड मार्टनो इ. होत. अनेकस्वरसंवादी, कळफलकांची  वाद्ये हॅमंड इलेक्ट्रिक ऑर्गन, क्लॅव्हिओलिन, सोलोव्होक्स ही होत.


पौर्वात्य वाद्ये : पौर्वात्य वाद्ये प्रायः एकस्वरसंवादी संगीतासाठी व मानवी आवाजांच्या साथीसाठी आहेत. चीन, सयाम, ब्रह्मदेश इ. देशांतील वाद्यांपैकी काही वाद्ये खास वृंदवादनासाठीच आहेत.

 

चीन :  चीनमध्ये वाद्यांचे सामान्यतः आठ प्रकार मानतात. दगडी, धातूची, रेशमी धाग्याची ( तत वा तंतुवाद्ये), लाकडी, बांबूची, भोपळ्याची, कातड्याची (चर्मवाद्ये) व भाजलेल्या मातीची वाद्ये हे ते प्रकार होत.

 

कमीजास्त जाडीच्या सोळा दगडी पट्‌ट्यांचे, काठ्यांनी वाजविण्याचे पिएन चिंग हे वाद्य, यूंताय (संगमरवरी मुरली), है-लो (फुंकून वाजवावयाचा शंख) वगैरे पहिल्या जातीची वाद्ये होत, पिऐनथचुंग (प्राचीन को-युग) हे घंटावाद्य, झांजेप्रमाणे सिआओ-बो-ल्वो म्हणजे तास व सिआओ-तउंग-क्यो (तुतारी) वगैरे वाद्ये दुसऱ्या प्रकारातील आहेत. च्यीन हे रेशमी तारांचे प्राचीन झिथरसारखे वाद्य, ‘सान-यूसिएन’ हे लांब दांड्यांच्या ल्यूटसारखे, यू-च्यीन वा आखुड ल्यूटसारखे व यांग-चिन हे डल्सिमरसारखे वाद्य इ. वाद्ये तिसऱ्या प्रकारातील होत. चू हे आघातवाद्य, यू हे वाघाच्या आकाराचे घर्षणवाद्य, भू-मू हे फटीचे लाकडी ड्रम व शू-पात हे कॅस्टनेटसारखेच इ. वाद्ये चौथ्या प्रकारची आहेत. पाइ-चूसिआओ हे पॅनपाइपसारखे, ताय किंवा या ही बांबूच्या मुरलीसारखी व सो-ना हे जिव्हाळीचे वाद्य इ. वाद्ये पाचव्या प्रकारची होत. शेंग हे तोंडाने वाजविण्याचे स्वरनलिकांचे ऑर्गनसारखे वाद्य सहाव्या प्रकारचे आहे. यिंग कू, त्सू-कू, टाओकू, पँग-कू वगैरे अवनद्ध वाद्ये सातव्या प्रकारात मोडतात. चूसूआन हे मातीचे गोलाकार फ्ल्यूटसारखे वाद्य आठव्या प्रकारातील आहे. चिनी वाद्यपरंपरा प्राचीन व वैविध्यपूर्ण आहे. चीनजवळच्या इतर देशांत हीच वाद्ये निरनिराळ्या नावांनी प्रचलित आहेत.

 

जपान :  जपानी  वाद्ये धार्मिक व लौकिक अशा प्रकारांत विभागलेली आहेत. हार्पसारखे कोतो हे वाद्य व त्याचे प्रकार, प्रसिद्ध शामिसेन वाद्य, गजवाद्य कोकियु आणि बिवा ही तंतुवाद्ये तुये, टेकी ही बासरीवर्गातील वाद्ये, रापा म्हणजे तुतारी, चिनी शेंगसारखे शो व ओबोसारखे हिचिरिकी ही सुषिर वाद्ये, ताइको हे अवनद्ध वाद्यांचे प्रकार, झायलोफोनसारखे मोविकन दो-को म्हणजे तास प्रकारचे आणि निहोआयहागी (झांज) ही घनप्रकारची अशी काही जपानी वाद्ये आहेत. 

कोरिया : हेंग-ताय (बासरी), सेइंग (चिनी शेंगसारखे), कोमुंको (जपानी कोतोसारखे), यांग-गो (डल्सिमरसारखे) ही कोरियातील काही प्रमुख वाद्ये होत. पुष्कळशी वाद्ये चिनी वाद्यांसारखीच आहेत. 

 

लाओस, कंबोडिया, थायलंड (सयाम), इंडोनेशिया, ब्रह्मदेश व मलेशिया या देशांताल वाद्यांची परंपरा चिनी व भारतीय वाद्यांनुसारी आहे. चीनजवळच्या देशांत चिनी छाप जास्त आढळते, तर प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेल्या देशांत भारतीय वाद्यांचा प्रभाव जास्त दिसून येतो. ब्रह्मदेशातील वाद्यांत सौन हे धनुष्याकृती तंतुवाद्य वौशिष्ट्यपूर्ण आहे.

व्हिएटनाम : कै हे सामान्य उपपद वाद्यांच्या नावांमध्ये वापरले जाते. धार्मिक उद्दिष्टांसाठी व वाद्यवृंदांसाठी ही वाद्ये वापरतात. तंतुवाद्यांत कै नाय हे हस्तिदंती व रेशमी तारांचे फिड्‌लसारखे शूलवाद्य, कै दान दे हे ल्यूटसारखे वाद्य वगैरे घनवाद्यांत कै काप के (कॅस्टनेटसारखे), कै थिऊ कान (घटांतरंग), कै सिन (घर्षणवाद्य), कै चुम चुआ (झांजेसारखे) इ. अवनद्ध प्रकारात कै बॉन (मृदंगासारखे) वगैरे व सुषिर प्रकारात कै केम (सनईसारखे), कै-ओंग-दिख (आडवी बासरी), कै-साओ (उभी बासरी) वगैरे वाद्ये आहेत. एकूणच चिनी वाद्यांचा प्रभाव जास्त आहे.

 

लाओस : सो-इ, सो-यू (फिड्‌लसारखी  शूलवाद्ये), पि-आह (झिथरसारखे ) वगैरे तंतुवाद्ये होत. खोंग-नाई (घंटातरंग) सारखी घनवाद्ये व खोंग-थाट व टॅफोन ही चर्मवाद्ये, खुई व खेनसारखी सुषिर वाद्ये वगैरे अनेक चिनी प्रकारची वाद्ये आहेत.


कंबोडिया : (सध्याचे ख्मेर प्रजासत्ताक). भारतीय वसाहतीची पूर्वपीठिका असलेल्या या देशातील निरनिराळ्या एकवीस प्रकारच्या वाद्यांवर भारतीय छाप आढळत नाही. दरबारी वाद्यवृंदाचे पुरुषांचे व स्त्रियांचे असे दोन प्रकार असतात. घंटातरंग व काष्ठतरंग यांसारखी वाद्ये प्रमुख असतात. सा-दियू किंवा ताखे (मगरीच्या आकाराचे वाद्य), चा-पै-थाँग (चा-पै) सारखी तंतुवाद्ये, खोंग-हुई, खोंग-थोम यांसारखी घंटावाद्ये, ख्ब्लोई (आडवी बासरी), सा-न्गाय (नासिकावाद्य), पि-शभाई (ओबोसारखे) वगैरे सुषिर वाद्ये आणि सँफोर, स्कोर-थोम यांसारखी अवनद्ध वाद्ये आणि त्यांचे लहान-मोठे प्रकार प्रचलित आहेत.

 

थायलंड : (सयाम)  थायलंडवर भारतीय हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही संस्कृतींचा प्रभाव आहे.  कंबोडियाच्या संगीतवृंदातील वाद्यांसारखीच वाद्ये सयामी वाद्यवृंदात वापरतात. पि, पि-नाई यांसारखी सुषिर वाद्ये चाखे (सुसरीच्या आकाराचे वाद्य), सा-द्यूलंग,सा-ताई, सो-लुआंग यांसारखी  शूल व तंतूवाद्ये सैंग-वैंग (तबला-तरंग), चॅप (झांजा) यांसारखी घनवाद्ये ही काही निवडक वाद्ये होत.

 

इंडोनेशिया : बाली बेटे सर्वस्वी हिंदू संस्कृतीचा प्रभाव असलेली तर इतर जावा वगैरे भाग इस्लामी व इतर संस्कृतीचा प्रभाव दर्शविणारे आहेत. वृंदवाद्ये ही येथलीही वैशिष्ट्ये आहेत. वृंदवादन समारंभप्रसंगीच केले जाई. त्यातील बहुतेक वाद्ये घनवाद्ये आणि अवनद्ध वाद्ये असतात. ‘गेम्‌लान’ हे वाद्यवृंदाचे सामान्य नाव असून यात जेंडेर (किंवा समोन) सारखी धातुतरंगवाद्ये, रेजाँगबोनांग-रेयांग यांसारखी घंटावाद्ये, दोन गंगसा अर्थात तास व ग्रांतांग व चोएंगक्लिक यांसारखी दोन प्रकारची काष्ठतरंगवाद्ये असतात.

 

यांशिवाय स्वतंत्र वादनाची सेलोमप्रेस (सनईसारखे), सुलिंग (बासरीसारखे), संतो (नलिका झिथर), कोतोंएंग-केतोएंग (बांबूचे झिथर), रबाब (सारंगीसारखे पण शूल असलेले), क्रोमो (अश्मतरंग), क्रो-चोंग (गिटार), पि-चबार (सनईसारखे), पिब्‌-पिब (पातीचे अलगूज), चेलेपुंज (झिथर) ही वाद्ये इंडोनेशियात प्रचलित आहेत.

 

मलेशिया : येथील पुष्कळशी वाद्येही वरील प्रकारचीच आहेत. त्यांची नावे मात्र निराळी आहेत. यांशिवाय सालुंदी (जेंडेरसारखे), सारोब (काष्ठतरंग), साबांग (फटीचे घनवाद्य), सानदाऊ (बांबूचे अलगूज), साफे (ल्यूट),सासते (दोन नळ्यांचे सुषिर वाद्ये), सासते अर्किश (ज्यूज् हार्प किंवा मोरशिंग), सांग-तोंग (नलिका झिथर) अशी अनेक वाद्ये आहेत.

ब्रह्मदेश : येथेही वाद्यवृंदाची प्रथा आहे. घंटा, काष्ठ, धातुतरंग, इ. वाद्यप्रकार त्यात प्रामुख्याने असतात. त्रां (व्हायोलिनसारखे), पि क्रॅप (ज्यूज् हार्प), पि सून (बासरी), सा दिऊ (शूल व्हायोलिन), चैंग-वैंग (अवनद्ध तरंग), मेगियाँग (मगराकृती घर्षवाद्य), पताला (बांबू-काष्ठतरंग), या स्विन, थान हिन (झांजा), पि-बत (जिव्हाळीचे दोन नळ्यांचे वाद्य) अशी अनेक वाद्ये आहेत. काही वाद्यांना लाखी रंग देऊन ती सुशोभित केलेली असतात.

 

तिबेट: या भागात प्रभाव जास्त दिसून येतो. पि-वंग (लांब दांड्याचे ल्यूटसारखे ), रकात-दून (तुतारीसारखे), पि-पि (प्ल्यूटसारखे), ग्लिन-बू (टोकाला घंटाकार असलेले उभे सुषिर वाद्य), रय्या-ग्लिन (ओबोसारखे), र्‌न्‌गा-चून (करकऱ्यासारखे) ही काही वाद्ये होत.

 

श्रीलंका: श्रीलंकेमधील वाद्यांवर दक्षिण भारतीय प्रभाव आहे. अनेक प्रकारची मृंदगासारखी अवनद्ध वाद्ये तसेच वीणासदृश तंतुवाद्ये तेथे आहेत. होरानावा (ओबोसारखे) वाद्य लोकप्रिय आहे. कोंबोने (हॉर्नसारखे), डौबाला (डमरूसारखे), टम्मीटम्‌ (डफसारखे), रावणी (डफचाच प्रकार), उडकिआ (सर्वांत लोकप्रिय, मृदंगासारखे अवनद्ध वाद्य), बेरीगोडीआ (मृदंगासारखे), ताल्लीआ (ताससारखे), रावणहस्त (गजाने वाजविण्याचे वीणावाद्य) आणि वेणा किंवा वेणावाह हे तंतुवाद्य ही येथील काही प्रमुख वाद्ये होत.


ईजिप्त : प्राचीन वाद्यांबरोबरच शेजारच्या अफ्रिकेतील आणि अरबस्तानातील वाद्येही येथे प्रचारात आहेत. नोफ्रे अर्थात नेफेर, बिंत (सारमंडलासारखे), तन्‌बुर अर्थात सिमसिमीया, किस्सोर (लायरसारखे), इबा, सेशेशेल (सिस्ट्रम), औलुस मेमेट, फोटींक्स ही दोन नळ्यांची सुषिर वाद्ये दाराबुख, डफ, बाझ, तब्ल ही अवनद्ध वाद्ये क्रोटाला (करताल) हे घन आणि अर्घुल, झुमारा, ने ही सुषिर वाद्ये ही  काही प्रमुख वाद्ये होत.

 

आफ्रिकेतील इतर देश : आफ्रिका खंडातील इतर देशांत निरनिराळ्या नाम-आकार-रचना-फरकांनी अनेक प्रकारची अवनद्ध वाद्ये, घनवाद्ये, तंतुवाद्ये आणि सुषिर वाद्ये आढळतात. मारिंबा, बालाफो ही काष्ठतरंगासारखी झांझे (सांस) व त्या तऱ्हेची अनेक वाद्ये, नांगा, ओंबी ही सारमंडलासारखी, बगाना हे लायरसारखे दाराबुख, बेंदीर, धालुका यांसारखी अवनद्ध वाद्ये धायता, गास्वा यांसारखी सुषिर वाद्ये हे काही प्रकार होत. या वाद्यांपैकी पुष्कळशी प्राथमिक वाद्येच आहेत पण मारिंबाव झांझे यांसारखी वाद्ये यूरोपीय वाद्यप्रकारांत समाविष्ट झाली.

 

तुर्कस्तान : इस्लामी  संस्कृतीतील वाद्ये येथे आढळतात. कानून, संतीर, तंबूर, केमान्‌जे (गजवाद्य) फेल्लाही वगैरे तंतुवाद्ये घैडा (बॅगपाइपसारखे), झुरना, ने वगैरे सुषिर वाद्ये दाराबुखसारखी अवनद्ध वाद्ये इ. वाद्ये प्रचलित आहेत.

अरबस्तान :  इस्लामपूर्व आणि इस्लामोत्तर अरबी संस्कृती यूरोप, आफ्रिका, इराण, भारत, व अतिपूर्वेपर्यंत पोहोचली होती. संगीत हा या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे तेथील संगीतवाद्येही दूरवर पसरली आहेत. यूरोपमधील व भारतातील अनेक वाद्यनामांचे मूळ येथे सापडू शकते. संगीतवाद्ये कशी तयार करावीत, याबद्दलही येथे ग्रंथ निर्माण झाले. प्राथमिक वाद्य म्हणून क्वादिब किंवा तालयष्टीचा उल्लेख केला पाहिजे. मुसाफिक, शुकैफार, शुनुज वगैरे झांजासारखी कुबा, दाराबुका, मिझार ही डमरू व खंजिरी यांसारखी तब्ल हे सामान्य नाव असलेली व नरकात, कुसुत, कुर्गा, क्वासा, डफ इ. चर्मवाद्ये तुसुत, साज-इ-कासात ही जलतरंगासारखी साज-इ-अल्वाह-इ-फौलाद हे धातुतरंग कर्णा, नाफिर ही तुतारीसारखी मिझमार, झमार, सुरनाई (घैता) वगैरे जिव्हाळीची अर्घुल, क्वसाब, मुझिकाल यांसारखी सुषिर वाद्ये अनेक आहेत. त्याशिवाय सारमंडलासारखे जंक, संज, किथारासारखे मिझाफ, कानून (डल्सिमर), संतूर अर्थात संतीर, रबाब, कमान्‌जा, घीचक यांसारखी गजवाद्ये ल्यूटसारखी ऊद, बरबत पँडोरासारखी तुंबुर-बगदादी वगैरे अनेक प्रकारची तंतुवाद्ये आहेत.

 

इराण : (पर्शिया). इस्लामी संस्कृतीपूर्वीही तेथे संगीतपरंपरा होती. वाद्यपरंपराही प्राचीन आणि इस्लामी आहे. चंग हे सारमंडलासारखे, लांब व आखुड दांड्याचे ऊद संतीर (संतूरसारखे), सेहतार, तंबूरा, कमान्‌जा, रबाय ही तंतुवाद्ये नायझुरनोसारखी जिव्हाळीची व कर्णा वगैरे सुषिर वाद्ये धावुल वगैरेसारखी अवनद्ध वाद्ये  इ. अनेक प्रकार आहेत. शिवाय अरबी, ग्रीक, ज्यू, ईजिप्शियन इ. अनेक वाद्यांची इराणी रुपेही प्रचलित आहेत.

 

उत्तर व दक्षिण अमेरिका : येथील निरनिराळ्या जमातींच्या पारंपरिक वाद्यांमध्ये अनेक प्रकारचे, लहान-मोठ्या आकाराचे डमरू, ढोल, मृदंग यांसारखी अवनद्ध वाद्ये करताल, करकरी, घर्षक व काष्ठतरंग यांसारखी घनवाद्ये शिट्‌ट्या, बासरी, तुताऱ्या, शंख यांसारखी सुषिर वाद्ये यांचे प्रमाण जास्त आढळते.

 

ऑस्ट्रेलिया आणि आसपासची बेटे : येथील प्राथमिक जमातीची वाद्येही अशीच प्राथमिक आणि प्रायः घन, सुषिर आणि अवनद्ध वर्गातील आहेत आणि तीही हाडे, बांबू, शंख वगैरेंपासून केलेली असतात.

 

पाश्चिमात्य संस्कृतीबरोबर या देशांत व खंडांत पाश्चात्त्य वाद्येही त्या संस्कृतीच्या प्रभावाखाली आलेल्या जमातींपर्यंत पोहोचली आहेत.


भारतीय वाद्ये : भारतीय वाद्यांची प्राचीन परंपरा वैदिक काळापासूनची आहे. या प्राचीन काळापासून प्रचारात असलेल्या वाद्यवर्गवारीचा उल्लेख आज नसला, तरी अशा चारही प्रकारच्या वाद्यांचा तपशील मात्र मिळतो. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट वाद्य वापरण्याबद्दल महत्त्वपूर्ण सूचना होत्या. उदा., गृहसूत्रांत लग्नप्रसंगी ‘बाण’ तऱ्हेचे वाद्य वाजवावे किंवा चार सुवासिनींनी ‘नंदी’ हे वाद्य विवाहपूर्व विधींत वाजवावे, असे उल्लेख आहेत. महाव्रताच्या वेळी उद्‌गाता शततंत्री वीणा वाजवी व त्याच्याबरोबर यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या पत्नी काण्डवीणा (तंत्रीवाद्य) व पिच्छोरा (सुषिर वाद्य) ही वाद्ये वाजवीत. चार कोपऱ्यांत ठेवलेल्या दुंदुभी काठ्यांनी आणि भूमि-दुंदुभी (जमिनीतील खड्‌ड्यावर बैलाचे कातडे ताणून केलेले व शेपटीच्या गोंड्याने वाजविण्याचे अवनद्ध वाद्य ) वाजवीत.

 

प्राचीन काळातील तंतुवाद्ये म्हणजे वीणेचेच निरनिराळे प्रकार असत. अवनद्ध वाद्यांत दुंदुभी, मृदंग, पणव, वगैरे वाद्ये सुषिर वाद्यांत शंख, तूणव, पिच्छोरा-ला ( बासरीसारखे), नाडी किंवा नाली (बांबूची किंवा वेताची) व घनवाद्यांत आघाटी (ती) वगैरेचा उल्लेख आहे. वाद्यांच्या उत्पत्तीबद्दलच्या पौराणिक संकेतांनुसार पिनाक वीणा शंकराने, महती वीणा नारदाने तंबोरा तुंबरूने, मृदंग स्वातीने किंवा ब्रह्मदेवाने व रावणस्त्रम्‌ रावणाने शोधून काढले. या पौराणिक काळातही पाणिनीच्या ग्रंथात व मनुस्मृति, रामायण, महाभारत, इ. ग्रंथांत वाद्यांची वर्णने आहेत. वैदिक काळातील वाद्यनामांशिवाय, अवनद्ध प्रकारांत भेरी, नंदीरती, डिंडिम, आनक (नगारा) आलंबर किंवा आडंबर, मुरज, पट्ट-कुंभथूण, घटदद्दर, आलिंग्य, ढक्का, दर्दुर, नंदीवाद्य, तोमर, मड्‌डुक, नंदीमुख, कुंभचेलिका ही नावे आढळतात. सुषिर प्रकारात गोमुख, वेणू, खरमुख गोविषाणिक, किलकिला, क्रकच ही वाद्ये घनप्रकारात झर्झर, स्वस्तिक, ताल, करताल आणि तत (तंतु) प्रकारात अनेक प्रकारच्या वीँणांचे उल्लेख आहेत. जैन सूत्रांत वाद्यप्रकारांना तत, वितत, घन, सुषिर या नावांनी संबोधिले आहे. ततवाद्यांत वीणाप्रकार दिले आहेत आणि शिवाय तुणक, पाणक, धंकुन अशाही संज्ञा आहेत. विततमध्ये नंदी-मृदंग, झल्लरी, हुडुक, भंभा घनप्रकारात कास्य-ताल, लति, गौहिय, किरकिरीय वगैरे व सुषिर प्रकारात पिरपिरिया, खरमुही, तूणइल्ल (बॅगपाइप), शृंग ही नवीन नावे आहेत.

 

बौद्ध ग्रंथांतून तंतुवाद्यगटात ‘नकुल’ (दोन तारांची वीणा) व इतर वीणाप्रकार सुषिर वाद्ये म्हणून ‘सुघोषक’ व अवनद्ध वाद्यांत ‘मरूपटह’ यांचे उल्लेख आढळतात.

 

इ. स. दुसऱ्या ते चौथ्या शतकांच्या आरंभापर्यतचा काळ भारतीय संगितावरील महत्त्वाच्या अनेक ग्रंथांसाठी प्रसिद्ध आहे. यांमध्ये साकल्याने वाद्यविचार आहे. सुषिर वाद्यांत कुलल कोण्रई, अंबल, मुल्लई, मसक (बॅगपाइप) इ. वाद्ये अवनद्ध प्रकारात किनई, टमटम, आतोघ, वामक ही वाद्यनामे नवीन आहेत. जलमंडक, जलतरंग, उदकवाद्य हा नवीन प्रकारही आढळतो. गुप्तकालीन ग्रंथांतून जुन्या नावांची पालीसारख्या प्राकृत भाषांतील रूपे मिळतात. त्यांत काही नवीन नावेही आहेत. तूर्य हे नाव सुषिर वाद्यासाठी आणि शिवाय वृंदवादनासाठीही वापरले गेले आहे. कुतप हेही वृदंवादनाचेच प्राचीन नाव होय. अकराव्या-बाराव्या शतकांपासून भारतात मुसलमानी अंमलाची सुरुवात झाली. अरबी, पर्शियन (इराणी) संगीतपद्धतींच्या अनेक वाद्यांची भारतीय वाद्यांत भर पडली. क्वचित् जुन्या नावांबद्दल अरबी किंवा पर्शियन नावेही आली. आज प्रचारात असलेली बरीचशी वाद्ये बव्हंशी याच काळातील आहेत. सतार, जंतर, किन्नर, सारमंडल, रबाब, सारंगी, सुरवतन, बीन, सिरबीन, अधौती, अंब्रिती, किनगेरा या तंतुवाद्यांचा ताल व कुतू-इ-ताल या घनवाद्यांचा व शेहना, मुष्क (बॅगपाइप), मुरली, औपुंक या सुषिर वाद्यांचा उल्लेख आईन-इ-अकबरीमध्ये आहे. तसेच (१) कुंगा अर्थात दमामा (प्रचंड चर्मवाद्य, अठरा जोड्या), (२) नगारा (वीस जोड्या), (३) दुहुल (चार), (४) कर्णा (धातूचे सुषिर वाद्य, कमीत कमी चार), (५) सुरता (नऊ), (६) नाफिर (दोन), (७) शिंग (दोन) व (८) झांझ अशा वाद्यांच्या शाही नगाराखान्यांचाही उल्लेख आहे. सतार, इसराज, दिलरुबा, ताऊस, सूरसिंगार, ⇨तबला यांसारखी नविन वाद्येही प्रचारात आली. इंग्रजी अंमलात व्हायोलीन, हार्मोनियम, क्लॅरिनेट वगैरे वाद्येही भारतीय संगीतासाठी वापरात आली. दक्षिणात्य संगीतपद्धतीत वीणा-वेणू-मृदंग ही वाद्यत्रयी महत्त्वाची आहे. प्राचीन याळ ही धनुष्याकृती वीणा होय. या खंडप्राय देशात अनेक प्राथमिक आणि आदिम वाद्यप्रकार इतर संगीतवाद्यांबरोबर आजही प्रचारात आहेत. बाहेरून जशी नवीन वाद्ये येथे आली, तशी येथील वाद्येही पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांत निरनिराळ्या काळी गेली.

प्रचलित भारतीय वाद्यांत – (१) अभिजात वा शास्त्रीय संगीतवाद्ये, (२) लोकवाद्ये आणि (३) प्रादेशिक वाद्ये असे भेद मानता येतील. याशिवाय स्थूलपणे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असेही वाद्यभेद आहेत. एकाच वाद्याचे अनेक नामभेदही आहेत. काही प्रमुख निवडक वाद्यांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. त्या यथास्थळी बाणांकनाने दर्शवल्या आहेत. या वाद्यांप्रमाणेच खालील वाद्येही प्रचारात आहेत :

 

(१) अभिजात वा शास्त्रीय संगीतवाद्ये : खास शास्त्रीय संगीताची वीणा व वीणाप्रकारांशिवाय इतर महत्त्वाची स्वतंत्र किंवा साथीची काही वाद्ये पुढे दिली आहेत :


(अ) तंतुवाद्ये : (१) ताऊस :  मोर या पक्षाचे पर्शियन नाव. दक्षिणेत अशाच वाद्याला बालासरस्वती किंवा मयूरी असेही म्हणतात. मोराच्या आकाराचे चर्मयुक्त कंपित्र असलेली, गजाने उभी धरून वाजविण्याची सतार असे थोडक्यात वर्णन करता येईल. मोरासारखा रंगही दिला जातो. चलपडदे आणि तरफाही असतात. मोराऐवजी माशाच्या आकाराच्या सहकंपकाच्या अशाच वाद्यास बंगालमध्ये मीनसारंगी म्हणतात. स्वतंत्र वादनांची ही वाद्ये आहेत.

 

(२) दिलरुबा : दिलरूबा व त्यासारखीच पण सहकंपकाच्या आकारात थोडे फरक असलेली इसराज अर्थात इसरार व मंदारबहार ही बंगालमधील लोकप्रिय वाद्ये, ताऊससदृश वाद्यातील सहकंपकांचे विविध आकार नसलेली पण त्यासारखीच चार धातुतारांची, तरफांची, चलपडद्यांची गजवाद्ये आहेत. वादनपद्धतीही  एकच आहे. मंदारबहारचा आकार मोठा असून त्याला तारांऐवजी ताती असतात.

 

(३) रबाब : इस्लामी संस्कृतीच्या मध्य पूर्वेकडील सर्व देशांत व काश्मीर, पंजाबमध्ये प्रचलित असलेले हे वाद्य प्रख्यात गायक तानसेन वाजवत असल्याच्या कथा आहेत. आकसलेल्या कमरेच्या या लाकडी व चर्मयुक्त वाद्यांचा संबंध यूरोपीय व्हायोलिनपपर्यंत पोहोचतो. हे मूलतः गजवाद्य, पण प्रचलित धनुर्वाद्य चार ते सहा प्रमुख तारा (त्यांपैकी काही तातीच्या), तरफा, तातीचे पडदे, दोन भागी लाकडी कोठ्याचे असते. अर्धा कोठा चामड्याने व अर्धा लाकडाने बंद असतो. या वाद्याचा आवाज मधुर व सारंगीपेक्षा गंभीर असतो. त्याचे छेडकाम कोणाने करतात. प्यारखाँ, बहाद्‌दुरखाँ, बहाद्‌दूरसेन हे काही प्रसिद्ध रबाबवादक होत. उत्तर भारतात विशेषत्त्वाने प्रचलित असलेले सध्याचे लोकप्रिय तंतुवाद्य सरोद हे रबाबाचेच भांवड शोभावे, इतके त्यांच्यात साधर्म्य आहे.

 

(४) सूरसिंगार : सूरशिंगार, सूरसिंघार, सूरशृंगार, स्वरशृंगार इ. नामभेदांनी प्रसिद्ध असलेले हे स्वतंत्र वादनाचे वाद्य म्हणजे महती वीणा, रबाब आणि कच्छपी वीणा यांचे संमिश्र रूप आहे. वादनपट पोलादी पत्र्यांचा व पडद्यशिवाय असतो. भोपळ्याचे आणि लाकडी असे जोड सहकंपक, सहा मुख्य तारा व तरफा असलेले हे वाद्य बोटात घातलेल्या नखीने छेडतात आणि स्वर काढण्यासाठी दोन बोटांच्या मध्ये तार पकडतात. भरदार आणि मधुर आवाजीचे हे वाद्य वाजविण्यास कठीण म्हणून दुर्मिळ आहे. याच्या शोधाचे श्रेय रामपूरच्या सय्यद कल्ब अली खान बहाद्‌दुर या नबाबाला किंवा लखनौच्या उस्ताद प्यारखाँला देतात. रामपुरचा महमद अलिखाँ व बहाद्‌दुरखाँ सैन हे प्रसिद्धवादक होत.

(५) सूरबहार : सूरबाहर वा सूरवीणा या पाठभेदांनी ओळखले जाणारे, सतारीसारखे पण अचल पडद्यांचे व खोलगट वादनदंडाचे वाद्य. वादनक्रिया सतारीप्रमाणेच.

(६) स्वरबत : वा स्वरबथ हे मूळ स्वरंगत या नावाचे पाठभेद असलेले एक मोठे अवजड व विचित्र आकाराचे वाद्य आहे. याचे सहकंपक बादलीच्या आकाराचे व चामडे चढविलेले असते आणि त्यात दोन वर्तुळाकृती ध्वनिछिद्रे असतात. वादनदंड अरुंद व त्यावर तातीचे पडदे असतात. वाद्यशीर्षाला पोपटाचा आकार असतो. याच्या सहा तारा शिंगाच्या कोणाने छेडून वाजवतात.

 

(७) स्वरमंडल : (वा सारमंडल). या तंतुवाद्यात भिन्न स्वरांसाठी स्वतंत्र अशा बावीस ते छतीस तारा असतात. प्राचीन शततंत्री किंवा कात्यायनी वीणा ही याचीच पूर्वरूपे. लंबचौकोनाकार पोकळ लाकडी सहकंपक पेटीवरील घोडीवर तारा समांतर अशा लावतात व त्या स्वरात लावण्यासाठी खुंट्या असतात. दोन्ही हातांनी प्रायः नख्यांनी छेडून व पिवळी कड्याने दाबून हे वाद्य वाजविले जाते.


(८) विचित्रवीणा : हे  अभिजात संगीतातील भारदस्त तंतुवाद्य तारा घासून वाजविले जाते. त्याचा दांडा लाकडाचा असून तो सु. १३५ सेंमी. लांब, १० सेंमी. रुंद व ३ सेंमी. जाड असतो. दांड्याच्या वरचा भाग सपाट असून खालचा गोलाकार असतो.  दांड्याच्या खाली दोन बाजूंना दोन मोठे भोपळे फिरकीच्या खिळ्यांनी जोडलेले असतात. या दोन भोपळ्यांच्या बैठकीवर वाद्य समोर ठेवून वाजवले जाते. दांड्याच्या एका टोकाला हस्तिदंती  घोडी बसवलेली असते, त्यावरून सहा मुख्य तारा घेऊन, दांड्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या तारदानातून नेऊन त्या बाजूला असलेल्या खुंट्यांना बांधलेल्या असतात. याशिवाय तीन बाजूच्या तारा असतात. या वीणेला सहकंपक सु. १३ तारा कमी-अधिक लांबीच्या असून, त्या मुख्य तारांच्या खालच्या बाजूला समांतर असतात. उजव्या हाताच्या बोटात घातलेल्या मिजराबांनी घोडीजवळ तारा छेडून, डाव्या हातात घेतलेला काचेचा गोळा दांड्यावर तारांवरून सरकवून स्वर वाजवतात. हिच्या ध्वनीचा घुमारा विलक्षण असतो.

 

(९) गोट्‌टुवाद्यम्‌ : या दक्षिण भारतीय वाद्याचे दुसरे नाव ‘महानाटक विणा’ असून, कर्नाटक संगीतात हे वाद्य महत्त्वाचे आहे. हे वाद्य रुद्रवीणेसारखेच असले, तरी त्याला स्वरांचे पडदे नसतात आणि स्वर वाजविण्यासाठी तारांवर शिसवी लाकडाच्या गुळगुळीत कांड्याने घासतात. या कांड्याला ‘कोडू’ म्हणतात. व त्यावरूनच वाद्याला ‘गोट्‌टु’ हे नाव पडले आहे. या वाद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला सात तारांची तरब (सहकंपनासाठी जोडलेले जादा घोषक) असते कर्नाटक संगीतातील दुसऱ्या कोणत्याही वीणेला तरब नसते. याला दोन भोपळे असल्यामुळे ते विचित्रवीणेप्रमाणे समोर जमिनीवर ठेवून वाजविले जाते. या वाद्याच्या वादनात अनेक प्रकारची गमके व अंलकार सुंदर रीत्या निर्माण करात येतात. अत्यंत शोभिवंत असे नक्षीकाम या वाद्यावर केलेले असते.

 

(१०) गेट्‌टुवाद्यम्‌ : हे लहान तंबोऱ्यासारखे पण जमिनीवर आडवे समांतर राहण्यासाठी आधार असलेले, चार तारांचे, दोन काठ्यांनी आघात करून वाजविण्याचे असे लय धरण्याचे तालवादक दाक्षिणात्य तंतुवाद्य आहे.

 

(आ) घनवाद्ये: (१) जलतरंग : या  वाद्यात लहान-मोठ्या वाडग्याच्या आकाराच्या, अर्धचंद्राकृती ठेवलेल्या अठरा चिनी  मातीच्या पेल्यांतून कमीजास्त पाणी घालून स्वर मिळवितात आणि ते मधोमध बसून दोन काठ्यांनी, दोन्ही हातांनी भांड्याच्या कडेवर डावीकडून उजवीकडे लयबद्ध आघात करून वाजवितात. उदकवाद्य म्हणून प्राचीन ग्रंथांत जो उल्लेख मिळतो तो या वाद्याला अनुलक्षून असावा, असा काही विद्वानांचा तर्क आहे. सतराव्या शतकातील संगीत-पारिजात या ग्रंथात जलतरंगाचा स्पष्ट निर्देश आहे.

(२) काष्ठतरंग: हा प्रकार जगभर प्रचलित आहे. यात डावीकडून उजवीकडे लहान होत जाणाऱ्या भिन्न स्वरांच्या सु. वीस उभ्या आणि समांतर लाकडी पट्‌ट्या असतात आणि त्या चौकटीवर बसविलेल्या असतात. जलतरंगाप्रमाणेच हेही वाद्य काठ्यांनी वाजवितात. आदिम, विशेषतः आफ्रिकन संगीतात लोकप्रिय असलेले झायलोफोन वाद्य, काष्ठतरंगाचाच एक प्रकार होय. आधुनिक पाश्चिमात्य संगीतातही त्याचा वापर होतो.

 

(३) काचतरंग : (वा मुकुरतरंग). हे काष्ठतरंगाप्रमाणेच पण लाकडी पट्‌ट्याऐवजी कठीण काचेच्या पट्‌ट्या बसवलेले वाद्य आहे. त्याचा आवाज काष्ठतरंगापेक्षा जास्त स्पष्ट असतो. उत्तर भारतात हे लोकप्रिय आहे.

 

(४) मोरशिंग : मोरचंग, मूरसिंग, माचंग इ. पर्यायी नावांनी ओळखले जाणारे हे दाक्षिमात्य वाद्य ज्यूज्‌ हार्पसारखे आहे. शाळुंकीच्या आकाराच्या लोखंडी कड्यांत, टोकाला लाकडी असलेली लवचिक, अरुंद व पातळ पोलादी पट्टी उभी बसविलेली असते. शाळुंकीच्या खालचा दांडा डाव्या हातात धरतात व शाळुंकी आडवी तोंडात ठेवतात. पट्टीचा बाकदार भाग बाहेर राहतो, तो उजव्या हाताने छेडून निरनिराळ्या लयी मृदंगाबरोबर किंवा स्वतंत्रही वाजवितात. तोंडाचा उपयोग कंपित्र म्हणून होतो. म्हैसूरचे मोरशिंग सीताराम अय्यर हे एक नामवंत वादक होत.

 

(५) दक्षिणेकडील काही देवळांत असलेले भिन्न स्वरी संगीतस्तंभ ही एकप्रकारे अश्मवाद्येच होत.


  (इ) अवनद्ध वाद्ये : (१) पखावज : पखावज हे दक्षिणेतील मृदंगासारखे धृपदाच्या आणि कीर्तनाच्या साथीचे वाद्य आहे. याच्यापेक्षा जास्त लांबीच्या प्राचीन वाद्यास ‘नाल’ म्हणतात.

 

(२) खंजरी : खंजरी वा डफ हे सगळीकडे आढळणारे वाद्य आहे. लाकडी पट्टीच्या कड्यावर बहुधा घोरपडीचे कातडे ताणलेले असते व कड्यांतील खाचांत पितळी गोल चकत्या असतात, त्यात क्वचित घुंगरूही लावतात. कंजिरा ह्या दक्षिणेकडील लोकवाद्याला अभिजात कर्नाटक संगीतवाद्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे. मृदंगाबरोबर वाजविताना ते हलवून व लयबद्ध आघात करून वाजवितात. महाराष्ट्रात जंगम, गोसावी, वाघ्ये हे वाद्य वाजवतात.

 

(३) घट: घटम्‌, कुंभवाद्य, कूट, कूटम्‌ आदी पर्यायी नावांनी प्रचलित असलेले हे वाद्य प्रायः नुसते मातीच्या घड्यासारखे असते. वाद्यघड्याची खास माती लोहमिश्रित असते. दाक्षिणात्य संगीतातील घटम्‌ हे वाद्य खूपच परिष्कृत असून त्याला शास्त्रीय संगीतवाद्याचा दर्जा आहे. मृदंगाबरोबर त्याच्यासारखे लयीचे प्रकार यातून वादक काढतो. वादक घड्याचे तोंड पोटाशी धरून दोन्ही हातांनी हे वाद्य वाजवितो. या मूलतः घनवाद्य असलेल्या वाद्याला क्वचित्‌ कातडे लावून अवनद्ध वाद्याचे स्वरूप दिले जाते. गुम्मटी, पुल्लुवनकुडम्‌ ही अशा प्रकारची दाक्षिणात्य वाद्ये होत.

 

(ई) सुषिर वाद्ये : वेणू  आणि त्याचे अलगूज, वंशी, पावा, बासरी, मुरली इ. विविध प्रकार तसेच सनई (शहनाई) ही या गटातील प्रमुख संगीतवाद्ये आहेत. त्यांचा प्रसार देशभर आहे. शास्त्रीय संगीतवाद्य आणि लोकवाद्य म्हणूनही त्यांचे महत्त्व आहे.

 

(२) लोकवाद्ये : शास्त्रीय  संगीतापेक्षा लोकसंगीत, धार्मिक संगीत,उत्सव संगीत यांसाठी वापरात असलेली काही प्रमुख वाद्ये पुढीलप्रमाणे होत :

 

(अ) तत-लोकवाद्य : सर्वांत प्राचीन तंतुवाद्ये म्हणजे धनुर्वीणा होत. सिंधू संस्कृतीपासून ते अकराव्या शतकापर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या धनुर्वीणांची चित्रे व शिल्पे भारतात आढळतात.

 

(१) गोगिया बाण : गोगिया बाण हे आदिवासी जमातीचे लोकवाद्य म्हणजे प्राचीन धनुर्वीणेचेच प्रचलित रूप होय. आंध्र प्रदेशातील राजगोंड जमातीचे गोगिया बाण हे वाद्य आहे. त्याचे बूड पोखरलेल्या लाकडाचे असते व त्यावर चामडे मढवलेले असते. बुडातून बसवलेल्या कमानीवर पाच तारा असतात. एरंडीच्या खुंटाने तारा वाजवतात.

 

(२) तुणतुणे :  तुणतुणा, टुनटिना अशा उच्चारभेदांनी प्रसिद्ध असलेले व सर्वत्र प्रचलित असे हे लोकवाद्य आहे. यातील एकच तार, खालच्या बाजूला चामडे लावलेल्या पोकळ लाकडी दंडगोलाकाराच्या खालील चामड्याच्या मध्यातून धातूच्या चकतीतून ओढून, दंडगोलाच्या बाजूस लावलेल्या गोल दांडीच्या दोन्ही टोकांस लावलेली असते. स्वर कमीजास्त करण्यासाठी वर खुंटी असते. गायकाच्या आधारस्वरात लावलेली ही तार, तर्जनीने किंवा काडीने लयीत छेडून एकस्वराची आणि लयीची साथ करतात. गोंधळी, शाहीर व तमासगीर याचा उपयोग करतात.

 

(३) गोपीचंद : अर्थात्‌ गोपीयंत्र किंवा खमक या बंगालच्या लोकवाद्यात तुणतुण्याप्रमाणेच खालच्या बाजूस चामडे लावलेला पोकळ दंडगोल असतो. एका दांडीऐवजी एका बांबूच्या दोन फाक्या, दंडगोलाच्या दोन बाजूंस बसविलेल्या असतात. एकाच पोलादी तार चामड्याच्या मध्यातून घेऊन वर खुंटित जोडलेली व आधारस्वरात मिळवलेली असते. बोटाने छेडून वाजविताना दुसऱ्या हाताने दोन फाक्या कमीजास्त दाबून व तारेचा ताण कमीजास्त करून जास्त स्वर काढतात.


(४) आनंदलहरी : ह्या बंगाली लोक-लयवाद्यात लहान, बहिर्वक्र दंडगोलाकार पोकळ लाकडाच्या खालील भागावर कातडे ताणलेले असते व त्याच्या मध्यातून तात ओढून घेतलेली असते आणि तिला एक लाकडी तुकडा बांधलेला असतो. वाद्य वाजविताना वाद्यातील तात डाव्या हातात धरून लाकडी कोठा पोटाशी कोपऱ्याने दाबून धरतात. डाव्या हाताने तार कमीजास्त खेचून कमीजास्त उच्च स्वर उजव्या हातातील लहान काठीने छेडतात. जमिटीका वा झमलिका हे दाक्षिणात्य वाद्यही असेच आहे.

 

(५) एकतार : एकतारा, एकतारी किंवा पंजाबमधील यकतारा हे सर्वांत साधे वीणासदृश लोकवाद्य आहे. चपट्या भोपळ्यावर चामडे लावलेल्या सहंपकात गोल बांबूची दांडी असते, तिच्या वरच्या टोकाला खुंटी असते, त्यात गुंतविलेली तार भोपळ्यावरच्या घोडीवरून नेऊन बांबूच्या खाली बाहेर आलेल्या टोकाला बसविलेली असते. तर्जनीने छेडून वादन होते. भजनी मंडली, गोसावी, जंगम वगैरे याचा वापर करतात.

 

(६) सूरसोटा:  भोपळ्याशिवायच्या तंबोऱ्यासारखे आणि त्याच उपयोगाचे हलके, एकदांडी लोकवाद्य.

(७) नंदुनी :  मलबारमधील देवळांत वाजविण्याचे, तीन तारांचे, सात पडद्यांचे, कोणाने छेडण्याचे वाद्य.

 

(८) सारिंदा :  (वा सारिंदी). हे सारंगीचे जानपद स्वरूप आहे. सारंगीपेक्षा अरुंद खोका आणि विचित्र आकाराचा चर्मयुक्त कोठा असलेल्या या वाद्याला तीन ताती किंवा केस लावलेले असतात व ते गजाने वाजवितात.

 

सारंगीसारखीच पण काहीसा आकार व रचना यांत भेद असलेली आणखी लोकवाद्ये म्हणजे भोपळ्याची अलाबु सारंगी, साझसाझिंदा, चारतार, दोतार (मारवाडी व हिंदुस्थानी), चिकार व तीड-ताड संयोगी ही आहेत.

 

(९) सूरसंग :  ह्या छेडवाद्याला पडदे, व्हायोलिनसारखे बाकदार शीर्ष, चर्मयुक्त कोठा, लाकडी खोका आणि सहा धातुतारा असतात.

(१०) संतूर : हे स्वरमंडलासारखे पण लंबचैकोनी लाकडी पेटीवर एका बाजूला पंधरा व दुसऱ्या बाजूला पंधरा अशा घोड्यांच्या जोड्यावरून प्रत्येकी तीन-तीन किंवा चार-चार ताणलेल्या तारा असलेले काश्मीरी वाद्य आहे. ते शेवटी  टोकाला गोलाकार वा आकडेवार असलेल्या काड्यांनी वाजविले जाते.

 

(११) कानून :  हा स्वरमंडलाचा उभ्याने वाजविण्याचा प्रकार असून याला तेवीस तारा असतात.

(१२) कमान्‌जा : (कामाणजा वा कमाणची). या गजवाद्यात वरचा भाग सतारीसारखा आणि खालचा भाग सारंगीसारखा असतो.


(१३) रावणहत्यो : (किंवा रावणहस्त वीणा). या गजवाद्याची परंपरा प्राचीन मानली जाते. त्याचा संबंध पौराणिक काळातील रावणाशी  जोडला जातो. नारळाच्या अर्ध्या चर्मयुक्त करटीला लावलेला बांबूचा दांडा, तारखुंट्या व दोन वादनतारा आणि सु. बारा तरफा या वाद्यात असतात. गजाला घोड्याचे केस व शिवाय घुंगरू लावलेले असतात. कोठा छातीशी  धरून ते वाजवितात.

 

(आ) घन-लोकवाद्ये : (१) झांजा : मध्यभागी अर्धगोलाकार घुमटी असलेले व दोरीने एकमेकांना जोडलेल्या काशाच्या दोन गोल तुकड्यांचे, लय ठेवण्याचे, कीर्तनकार व भजनी मंडळींचे लयवाद्य. दोन तुकडे एकमेकांवर आपटून ते वाजवितात. दक्षिणेकडील ब्रह्मताल वा बृहद्‌ताल हा झांजांचाच मोठा प्रकार होय. मंजिरी वा मंजिरा हे सुद्धा ह्याच प्रकारचे लहान वाद्य आहे. एळत्तालम्‌ ह्या झांजवाद्याचा कथकळी नृत्यात वापर होतो.

 

(२) टाळ : (वा तालम्‌).  हे घुमटीच्या आकाराच्या, स्वतंत्रपणे धरण्यासाठी लाकडी गोळे लावलेल्या, काशाच्या दोन तुकड्यांचे लयवाद्य आहे. यात वाद्याच्या कडा एकमेकांवर आपटतात. भजन, कीर्तन, हरिकथा, तेवारा भजन आणि नागस्वरम्‌ वाद्यवृंदात याचा उपयोग करतात. 

   

(३) तास : (किंवा तमिळ सेग्माङ्‌कळम्‌). हे वर्तुळाकार काशाचे, मोगरीने ठोकून वाजविण्याचे वाद्य आहे. देवाच्या आरतीच्या वेळी त्याचा वापर होतो. 

 

(४) घंटा : लहानमोठ्या पेल्यांच्या आकाराच्या पोकळीत धातूचे किंवा लाकडी लोलक बसविलेले वाद्य. लहान घंटांना हलवून वाजविण्यासाठी मूठ असते. मोठ्या घंटा लोलक हलवून किंवा घंटाच हलवून वाजवितात. देवळात किंवा देवपूजेत यांचा वापर अधिक होतो. विजयप्रसंगी वाजविण्याच्या मोठ्या घंटांना ‘जयघंटा’ म्हणतात. 

   

(५) घुंगरू : नृत्यप्रसंगी रूण्‌झूण्‌ असा लयबद्ध नाद निर्माण करण्यासाठी लहान करवंदांएवढ्या पितळी पोकळ गोळ्यांत धातूचे खडे घातलेल्या अनेक घुंगरांच्या माळा वा पट्टे पायांत बांधतात. घुंगरांना तमिळमध्ये गेज्जई, तेलगूमद्ये गेज्जलू व कानडीत गेज्जे म्हणतात. संस्कृतमध्ये किंकणी, नुपूर किंवा क्षुद्र घंटिका म्हणतात. रुणझूणणाऱ्या घंटिकेचा दुसरा एक प्रकार म्हणजे पैजण. धातूचे पोकळ कड करून त्यात वाळूचे बारीक खडे भरतात. हे कडे भोवतालून बंद किंवा एका रेषेत भेग असलेले असते, तसेच ते सरळ गोल किंवा नागमोडी गोलही असू शकते. तमिळमध्ये त्याला ‘सिलंबू’ म्हणतात. पायांत घालावयाच्या कड्याला ‘काल-सिलंबू’ व मनगटावर घालायच्या कड्याला ‘कै-सिलंबू’ म्हणतात. कर्नाटकात काल-सिलंबूला ‘गग्गर’ म्हणतात, तर उत्तर भारतात पैजन (पैंजनिया) किंवा नूपुर वा पायल असे शब्द रूढ आहेत. 

   

(६) टिपऱ्या : रास किंवा इतर फेरनृत्यांत आघात करून लय ठेवण्यासाठी, हातात धरण्याच्या व टोकाकडे थोड्या निमुळत्या अशा दोन गोल लाकडी काठ्यांना टिपऱ्या म्हणतात.  

 

(७) चिमटा: दोन्ही  हातांनी वाजविण्याचे, दोन्ही पट्ट्यांवर खेळत्या चकत्या लावलेल्या लोखंडी चिमट्याचे हे लयवाद्य शीख लोक धार्मिक प्रसंगी, विशेषत्वाने भजन प्रसंगी वापरतात. चिंतल किंवा हरिबोल हे दाक्षिणात्य वाद्यनाम होय. 

 

(इ) अवनद्ध लोकवाद्ये : या प्रकारात आकारमानाने, रचनाभेदाने, उपयोगाने निर्माण झालेले अनेक भिन्न भिन्न वाद्यप्रकार आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचाच येथे केला आहे. 


(१) डफ : हे जगभर सर्वत्र प्रचलित असे वाद्य आहे. डफ हा शब्द अरबी आहे. यात लाकडी पट्टीच्या गोल कड्यावर कातडे बसविलेले असते. स्वर चढविण्यासाठी कातडे तापवितात तमाशात लावणी गीतनृत्यात याचा वापर होतो. वाजविताना छातीशी धरून, मनगट कमीजास्त दाबून घुमकी, पंजाने थाप मारून किंवा वेताची छडी आपटून वादन करतात. दक्षिण भारतात गोलाकार मोठ्या डफाला ‘तम्मटे’ (कन्नड), ‘तम्मट्टे’ (तमिळ) आणि ‘तम्मट’ (तेलगू) म्हणतात. तप्पटे, तप्पटै व तप्पेटा हे याचेच नामंभेद आहेत. उत्तर भारतात ‘डफ’ म्हणतात तर दक्षिणेत डप्पु, डफळी, टेप अशीही नावे डफ या अर्थी रूढ आहेत. डफली म्हणजे छोटा डफ. ‘खंजरी’ म्हणजे मध्यम आकाराचा (२० ते ४० सेंमी. व्यास ) डफ तर दक्षिणेकडील कंजिरा हा त्याहून लहान आकाराचा (१५ ते २० सेंमी. व्यास ) डफ होय. ‘डप्पु’ हे मोठे वाद्य काठ्यांनी वाजवितात. 

(२) संबळ : तबल्याप्रमाणे दोन वाद्ये असलेले पण ही वाद्ये एकत्र बांधलेले, सनईच्या साथीला तसेच गोंधळ्यांच्या गाण्यांबरोबर गोल टोकाच्या काठ्यांनी वाजविले जाणारे हे चर्मवाद्य आहे. अलगूजाच्या साठीसाठी हे हाताने वाजवितात. डाव्या बाजूच्या खर्जस्वरातील वाद्यास ‘बंब’ किंवा ‘धम’ आणि उजव्या चढ्या वाद्यास ‘झिल’ म्हणतात. डावे भांडे क्वचित तांब्याचेही असते. कातडे वेताच्या कडीने मढवून त्याच्या सुतळीच्या  ताणदोऱ्या खालच्या कड्यांत गुंतविलेल्या असतात. याच तऱ्हेची दाक्षिणात्य वाद्ये –(१) ‘उमरम्‌’ (देवळातील मिरवणूक-प्रसंगी बैलाच्या पाठीवरून नेण्याचे ) व (२) ‘किरकट्टी’ (नागस्वरम्‌च्या साथीचे) ही आहेत. 

(३) तविल : हे उभ्याने किंवा बसून वाजविण्याचे, नागस्वरम्‌ या सनईसारख्या वाद्याच्या साथीचे, बहिर्वक्र दंडगोलाकार पिंपासारखे दक्षिणात्य चर्मवाद्य आहे. दोन्ही टोकांवरील कातडे अंबाडी आणि बांबूच्या कड्यांवर ताणून जाड चामडी गजऱ्याने बसविलेले असते. स्वर कमीजास्त करण्यासाठी चामडी वादी दोन्ही गजऱ्यांतून ओवून घेतलेली असते. उजवी बाजू हाताने आणि डावी बाजू जाड काठीने वाजवितात. 

(४) शुद्धमंडलम्‌ :  हे कथकळी नृत्याच्या साथीचे, मोठ्या आवाजाचे व मोठ्या मृदंगासारखे दाक्षिणात्य वाद्य आहे. 

(५) खोळ : हे मृदंगसदृश पण निमुळते व लहान तोंड असलेले, निश्चित स्वरांचे, बंगालमधील कीर्तनाच्या आणि रवींद्रसंगीताच्या साथीचे मातीचे वाद्य आहे. 

 

(६) ढोल : ढोलक, ढोलकी, ढोलके इ. वाद्ये ही दोन्ही तोडांना चामडे लावलेल्या, कड्यांतून ओवलेल्या सुती ताणदोऱ्या असलेल्या, सरळ किंवा बहिर्वक्र दंडगोलाकार अशा एकाच लाकडी वाद्याची विविध रूपे आहेत. तबल्यासारखे हातांनी  वाजविण्याचे हे वाद्य लोकगायन व लोकनृत्य यांच्या साथीसाठी सर्वत्र प्रचारात आहे. क्वचित हाताने व काठीनेही ते वाजवितात.

(७) डमरू : (डमरूम्‌). हे प्राचीन संगीतवाद्य असून पौराणिक संकेतानुसार ते शंकराचे वाद्य मानले जाते. आज त्याची गणना लोकवाद्यात केली जाते. दोन अर्धगोलाकार भाग उलटे जोडून होणाऱ्या मापट्यासारखा त्याचा आकार असतो. दोन्ही तोंडांवरील कातडी एकमेकांशी सुतळीने सांधलेली असतात. दोरीच्या टोकाला गाठ असते, किंवा दुसऱ्या पदार्थाची लोळी लावलेली असते व ही दोरी वाद्याच्या मध्यभागी बांधलेली असते. वाद्य हलविले म्हणजे दोरी दोन्ही तोंडांवर आपटते व नाद उत्पन्न होतो. आकार, साधने व प्रादेशिक भिन्नता यांनुसार डमरूका, बुडबुडके, डौर, डौरी, हुडुक्क, उडुक्कै (पितळी, लाकडी किंवा मातीचे), दवणदाई, वीरबंदी, तिमिल, ठुरूक असे अनेक प्रकार आहेत. या प्रकारातील इडक्क हे केरळातील वाद्य, ताणदोऱ्या हाताने कमीजास्त दाबून व काठीने घासून किंवा आपटून वाजवितात. डौरी, पांगूळ वगैरे लोक हे वाद्य वाजवितात. तसेच धार्मिक प्रसंगी व नृत्यसाथीत दक्षिणेकडे या वाद्याचा वापर केला जातो.  

(८) चेंडा : हे दोन्ही चर्मयुक्त तोंडे असलेले दंडगोलाकार, गळ्यात अडकविण्याचे वाद्य दोन काठ्यांनी वाजवतात. ते यक्षगान व कथकळी या नृत्यांच्या साथीचे वाद्य आहे. त्याचा आवाज मोठा असतो. केरळमध्ये हे वाद्य विशेषत्वाने प्रचलित आहे.  


(९) उरूमी :  हे वाद्य मध्यभागी बारीक आणि तोंडाकडे मोठे असते. ते काठी घासून वाजवितात. हे फक्त शोक व मृत्यू या प्रसंगीच वाजविले जाते. तमिळनाडूमध्ये हे विशेषत्वाने प्रचलित आहे. 

(१०) पम्बे :  (तमिळनाडू ), किंवा पम्बा (आंध्र)  हे दोन दंडगोलाकार चर्मवाद्ये (ढोल) एकत्र उभी बांधून तयार केलेले, गळ्यात अडकवून (किंवा कमरेला आडवे बांधून) हाताने आणि काठीने वाजविण्याचे जोडवाद्य आहे. 

(११) पंचमुख वाद्य : या वाद्याला मध्यभागी एक व चार बाजूंना चार अशी पाच चर्मयुक्त तोंडे एका मोठ्या धातूच्या डेरेदार भांड्यावर बसविलेली असतात. हे स्वतंत्र वाद्य तिरुवायुर, तिरुतुराईपुंडी या देवालयांत विशिष्ट धार्मिक प्रसंगी वाजवितात. 

(१२) सूर्यपिरै-चंद्रपिरै : सूर्यपिरै (सूर्यमंडल) व चंद्रपिरै (चंद्रमंडल) हे सूर्याकृती व चंद्राकृती चर्मयुक्त कड्यांचे, कपळावर बांधून काठ्यांनी वाजवण्याचे वाद्यद्वय दक्षिणेकडील देवळांतील खास वाद्यप्रकार आहे. 

(१३) नगारा :  हे जुन्या भेरी-दुंदुभी, नौबत यांसारखे प्रचीन काळचे युद्धवाद्य होते. पण आज ते देवालयांत वा उत्सव प्रसंगी वाजवले जाणारे, एक मोठ्या अर्धगोलाकार धातूच्या (तांबे वा पितळ वा लोखंड) भांड्यावर कातडे चढविलेले वाद्य आहे आणि आजही ते दोन काठ्यांनी वाजवितात. घोड्यावर बांधून वाजविण्याच्या लहान नगाऱ्यासारख्या दोन वाद्यांच्या जोडवाद्याला ‘डंका’ म्हणतात. 

(१४) ताशा : (तार्शा, कर्नाटकातील तासे). हे पूर्वीचे रणवाद्य असून ते मातीचे किंवा आता धातूचे (तांब्याचे), घंगाळाच्या आकाराचे, पूर्वी कातडे नुसते चिकटविलेले आणि आता ताणचाव्या (पितळी स्क्रू) असलेले वाद्य आहे. ते वेताच्या दोन छड्यांनी वाजवतात. 

(१५) चौघडा : हे गोलाकार तळाच्या कुंडीसारख्या तांब्याच्या किंवा लोखंडाच्या, एक लहान व एक मोठे अशा जोडीच्या चार चर्मवाद्यांच्या गटाचे वाद्य आहे. तोंडावरील मढविलेले चामडे वादीने तळापर्यंत गूंफून बसविले जाते. मोठ्याला नगारा आणि लहानाला टिमकी म्हणतात. दोन काठ्यांनी ते वाजवितात. दोन वादक असून त्यांपैकी एक साधी लय, तर दुसरा वेगवेगळे लयप्रकार करून आळीपाळीने वाजवितात. चार वाद्यांचा समूह म्हणून चौघडा हे नाव आले पण सामान्यतः सूर, सनई, कर्णा, झांज याही वाद्यांचा या नावात समावेश होतो. पूर्वी राजांच्या स्वारीत व आता देवळात, लग्नसमारंभ वा इतर उत्सव प्रसंगी, मिरवणुकीत याचा उपयोग होतो. 

(ई) सुषिर-लोकवाद्ये : (१) नागस्वरम् : हे दक्षिणेकडील फार प्रसिद्ध वाद्य आहे. नागस्वरम् व त्याच्या इतर नामभेदांची दक्षिणात्य वाद्ये थोडाफार फरकाने सनईसारखीच आहेत. लहान सनई किंवा सुंदरीसारखे ‘मुखवीणा’, सूर या एकस्वरी सनईच्या साथीच्या वाद्यासारखे ‘ओत्तु’ (नागस्वरम्‌बरोबर जोडीने वाजवले जाणारे श्रुतिवाद्य) ही दाक्षिणात्य वाद्ये आहेत. प्रयः खुल्या जागेत उत्सव प्रसंगी वाजविण्याचे नागस्वरम् वाद्य जवळून ऐकल्यास कर्कश वाटते. नागस्वरम्‌वर उच्च स्वर व लोकसंगीत वाजवितात. नागस्वरम्‌ला तामिळनाडूमध्ये ‘मेळम्‌’ (वाद्यसंचातले प्रमुख वाद्य या अर्थी ) व कर्नाटकात ‘ओलग’ (दरबारी संगीतातले प्रमुख वाद्य) असे म्हणण्याचा प्रघात आहे. 

 

(२) शंख : हे जगभर प्रचलित असलेले नैसर्गिक वाद्य आहे. रणवाद्य म्हणून त्याची प्रसिद्धी होती. शंखाच्या टोकाला भोक पाडून त्यावर फूंकून वाजविण्यासाठी पितळी वाटीच्या आकाराचे मुखरंध्र बसवतात. शंकराच्या देवळात विशेषकरून जंगम हे वाद्य वाजवितात. भारतात फार प्राचीन काळापासून हे प्रचलित आहे. जुन्या काळी लांब नळी लावलेले शंख वाद्य असे. 


फुंकून वाजविण्याच्या वाद्यांपैकी शिंग (प्राथमिक अवस्थेत प्रत्यक्ष जनावराचे ), रणशिंग, कोम्बु, कर्णा, काहला, तुतारी, तुराई (पूर्वीचे तूर्य), भूरी, सर्प ही वक्राकृती वाद्ये नफारी (नेफारी), कुमा, एक्कलम्, तसेच एकदम दोन नळ्या वाजविण्याचे तिरुचित्रम् ही सरलरेषाकृती वाद्ये अशी विविध आकारांची, ध्वनिवैशिष्ट्यांची, पितळी किंवा तांब्यांची एकेकाळची रणवाद्ये होत. आज ती देवळातील धार्मिक वा इतर सामाजिक उत्सव प्रसंगी वाजवली जातात. 

 

(३) पुंगी : या वाद्याला गोल आकाराचा भोपळा असतो. त्याच्या एक टोकाला फुंकण्यासाठी भोक पाडलेले असते. त्या भोपळ्याला वर एक किंवा दोन आणि खाली दोन अशा लाकडी वा पोकळ बांबूच्या नळ्या जोडलेल्या असतात. वरच्या दोन नळ्यांत प्रत्येकीत जिभली असते, फुंगल्यावर या दोन्ही जिभल्या कंप पावतात. या भोपळ्याच्या खालच्या नळ्यांतील एका नळीला असलेल्या भोकावर बोटे ठेवून स्वर निर्माण करतात व दुसऱ्या नळीची भोके बंद करून आधारस्वर निर्माण करतात. पूर्वी हे वाद्य नाकपुड्यांनी वाजवीत असल्याने याला ‘नासायंत्र’ म्हणत. दक्षिणात्य संगीतात हे वाद्य मगुडी या नावाने ओळखले जाते तर उत्तरेस बीन, तुंबी, नागरस, सपेऱ्याची बन्सी इ. नावे या वाद्यासाठी प्रचलित आहेत. 

 

(४) मसक: (दक्षिणेतील तुत्ती वा तित्ती). मसक हे वाद्य पुंगीच्या धर्तीवर असते पण त्यात भोपळ्याऐवजी कातडी पिशवी वापरतात. हे यूरोपीय बॅगपाइपसारखे दिसते. त्याला एकेरी जिव्हाळी आणि सहा वाद्यरंध्रे असतात. 

 

(५) न्यस्तरंग : हे लहान तुतारीकारखे पण मुखरंध्राच्या खाली कागदाचा पातळ वा अन्य पदार्थाचा पापुद्रा लावलेले मुखवाद्य आहे. वाजविताना तोंडातील हलत्या ध्वनिनिर्मित स्नायूंच्या भरीस या जादा कंपित्राची भर पडते. 

 

याशिवाय स्वरपेटी, तंबोरापेटी यांसारखी स्वरपूरक आधुनिक वाद्येही आहेत.

(३) प्रादेशिक वाद्ये :  प्रचलित वाद्यांचे प्रदेशपरत्वे असंख्य उपप्रकार आहेत. विशिष्ट वाद्ये विशिष्ट प्रांतांत, जमातींत रूढ आहेत. 

 

आसाममध्ये निरनिराळ्या जमातींत-(१) दिनतारा, का-दुईतारा, सरोंग, बीनथैला, पेना ही तंतुवाद्ये (२) रंगसारखी घनवाद्ये (३) डामा, डाकी, धुरकी, यांसारखी अवनद्ध वाद्ये व (४) अदील, वंशी, काबिझली, काक्सीन, कातंमुरी, मुंओऊ, पेपा, पिलुली, सिंग, सिपा वगैरे सुषिर वाद्ये प्रचारात आहेत. 

   

काश्मीरमध्ये इस्लामी वाद्यांचा पगडा जास्त दिसून येतो : (१) चरगा, चिकारा, रबाब, संतूर, कानून, कमाणचा, साझ यांसारखी  तंतुवाद्ये (२) तुंबकनारी (तुकनारी) सारखी अवनद्ध वाद्ये आहेत. 

 

उत्तर प्रदेशातील तंतुवाद्यांत सारंगीचे सारिंदा, संयोगी यांसारखे उपप्रकार धुनधुनवा, दाराकुन हे भूमियार जमातीचे धनुर्वाद्य, चमारांचे ढोल, हुरूक (हुडुक) ही अवनद्ध वाद्ये यांसारखी वाद्ये आहेत. पंजाबमधील वाद्यांत यकतारा, अलगोजा, चरखी, चिमटा वगैरेंचा उल्लेख करता येईल. ओरिसातील माहुरी बंगालमधील खोळ, सूरसंग, इसराज, गोपीचंद, आनंदलहरी गुजरातमधील रावणहत्यो मध्य प्रदेशातील मुरिआंची नाचाच्या वेळची मुयांग ( पाठीवर बांधण्याच्या घंटा), इरना, डुमरी हे तंतुवाद्य डाकी, ढोल, गोगाढोल, पररंग, मांद्री वगैरे अवनद्ध वाद्ये यांचा उल्लेख करता येईल.  


दाक्षिणात्य प्रदेशातील वाद्ये असंख्य आहेत. नेडुंकुळल, अयारकुळल, बिल्लुकोट्‌टु, बिलाडीवाद्यम्‌, तंतीपातई, रामडोलु, चौढकी, धवलशंख ही त्यातील काही वाद्यनामे होत. केरळमध्ये तिमिल, इड्डक, चेंडा, चेंगाला आणि कोम्बु ही पंचवाद्ये देवळात वापरतात. मिळावु हे केरळचे अवनद्ध वाद्य आहे. एका मोठ्या तांब्याच्या भांड्याला लहानसे तोंड ठेवतात व त्यावर चामडे बसवतात. तोंड फार लहान असल्यामुळे त्याचा आवाज फार किनरा असतो. सामान्यतः कुडीयाट्टम नृत्याला या वाद्याची साथ असते. अंदमानात अगदी प्राथमिक पकुडा, मुकुटा-येमंगा यांसारखी आघातवाद्ये आहेत. महाराष्ट्रातील एकतारी, तुणतुणे, डफ, खंजरी, गुबगुबी, करताल, चिपळ्या, ⇨लेझीम ही काही सुप्रसिद्ध वाद्ये होत. 

 

वादनपद्धती : सर्व  प्रकारची वाद्ये वाजविण्यासाठी निरनिराळ्या मानवी अवयवांचा व ध्वनिसाधनांचा उपयोग केला जातो.  

(१) तंतुवाद्ये :  छेडवाद्यांत-उदा., हार्पसारख्या प्रत्येक स्वरासाठी एकेक तार असलेल्या वाद्यात-दोन्ही हातांचा प्रत्यक्ष, किंवा हातात कोण घेऊन वादनासाठी उपयोग केला जातो. सतारीसारख्या पडदे असलेल्या वाद्यात तारेची लांबी स्वरानुरूप कमीजास्त करण्यासाठी एका हाताचा व कोणाने किंवा नखीने छेडण्यासाठी दुसऱ्या हाताचा उपयोग होतो. पडद्याच्या किंवा बिनपडद्याच्या दिलरुबा, सारंगी यांसारख्या गजवाद्यांत दुसऱ्या हातात गज धरतात. तारांवर किंवा तातींवर प्रत्यक्ष बोटे ठेवून किंवा नखे वापरून, वेगवेगळ्या स्वरस्थानी थांबून तुटक स्वर किंवा हात घसरवून मींड काढतात. पियानोसारख्या कळफलकाच्या वाद्यात पट्‌ट्या दाबण्यासाठी दोन्ही हातांच्या बोटांचा उपयोग करतात. संतूरसारख्या वाद्यात हातात काड्या घेऊन तारांवर आघात करतात. वाहत्या वाऱ्याचा उपयोग आकाशवीणेच्या तारा स्पंदित करण्यास होतो. 

(२) घनवाद्ये : प्राथमिक ओंडक्यासारखी वाद्ये त्यांवर पाय आपटून वाजवितात. दोन घन तुकडे हाताने एकमेकांवर वाजविण्याची क्रिया चिपळ्या, टाळ, वगैरे वाद्ये वाजवताना केली जाते. दगडी, लाकडी, काचेच्या, धातूंच्या वगैरे वस्तूंवर (अश्मतरंग, काष्ठतरंग, जलतरंग, तास वगैरे) काठ्या, हातोडा, मोगरा यांनी दोन किंवा एका हाताने आघात करतात. घुंगरूसारखी वाद्ये हलवून त्यांतील दोन घन वस्तू एकमेकांवर आपटवून नाद उत्पन्न करतात. 

(३) अवनळू वाद्ये : ही  वाद्ये प्रत्यक्ष हातांनी, बोटांनी, मनगटांनी, संबंध पंज्यांनी किंवा लाकडी काठ्यांनी आघात करून वाजवितात. आघाताप्रमाणे घर्षणाचाही उपयोग निरनिराळे ध्वनी काढण्यासाठी करतात. वाद्यप्रकार अनेक असले, तरी वादनक्रिया फारशा भिन्न नाहीत. 

(४) सुषिर वाद्ये: ह्या वाद्यात वादक हवा तोंडाने, क्वचित् नाकाने, किंवा यांत्रिक भात्याने वाद्यरंध्रांत सोडतात आणि हवेचा स्तंभ हातांनी रंध्रे मिटून किंवा मोकळी सोडून, कमीजास्त लांब करून ध्वनिनिर्मिती करतात. बासरी, क्लॅरिनेट वगैरे वाद्ये अशा प्रकारे वाजवली जातात. शंख आणि वेणू ही प्राचीन काळापासूनच प्रचारात असलेली सुषिर वाद्ये होत. वेणू किंवा वंश हे वाद्य मुळात बांबूचे असे पण पुढे ते लाकडापासून वा धातूपासूनही बनवले जाऊ लागले. वेणूच्या स्वरसंध्रांवर कौशल्याने बोटांचा वापर करून वादक विविध स्वरांच्या छटा निर्माण करीत हार्मोनियम, ऑर्गन यांसारख्या वाद्यांत वादक निरनिराळ्या पट्‌ट्या हाताने दाबतात आणि योग्य त्या स्वरातून हवा जाईल, असे करतात. पॅनपाइपमध्ये स्वरांतून नळ्या असल्याने वादक फक्त त्यांत फुंकर मारतात आणि वाद्य योग्य तसे तोंडापुढे फिरवतात. माउथ-ऑर्गनमध्येही हीच वादनक्रिया अवलंबली जाते. प्रत्यक्ष फुंकीच्या तुतारीसारख्या वाद्यांव्यतिरिक्त इतर हार्मोनियम, सनई, ओबो  यांसारख्या वाद्यांत एकेरी, दुहेरी, आपटल्या जिव्हाळ्या किंवा गाबडी (पुस्ती वा जोड) बसवून शिट्टीसारखी व्यवस्था केलेली असते. बासरीत वाद्यरंध्रांच्या कडेचा उपयोग हवेचा स्तंंभ हलविण्यासाठी होतो. 


पहा : बँड लोकवाद्ये लोकसंगीत वाजंत्री वाद्यवृंद संगीत.

संदर्भ : 1. Baines, Anthony, European and American Musical Instruments, London, 1966.

           2. Baines, Anthony, Ed., Musical Instruments Through the Ages, Harmondsworth, 1961.

           3. Baines, Anthony, Woodwind Instruments and their history, London, 1962.

           4. Donington, Robert, The Instruments of Music, London, 1962.

           5. Harriosn, Frank Rimmer, Joan, European Musical Instruments, London, 1964.

           6. krishnaswamy, S. Musical Instruments of India, Delhi, 1967.

           7. Kuast, Jaap, Hindu-Javanese Musical Instruments, 1968.

           8. Malm, W. P. Japanese Music and Musical Instruments, Tokyo, 1959.

           9. Marcuse, Sibyl, Musical Instruments : A Comprehensive Dictionary, London, 1966.

         10. Sachs, Curt, The History of Musical Instruments, New York, 1940.

         11. Sambamoorthy, P. Laya Vadyas, New Delhi, 1959.

         12. Sambamoorthy, P. Sruti Vadyas, New Delhi, 1957.

         13. Sambamoorthy, P. Catalogue of Musical Instruments Exhibited in the Government Museum, Madras, 1962.

         १४. तारळेकर, ग. ह. भारतीय वाद्यांचा इतिहास, पुणे, १९७३.

         १५. देव, बी. चैतन्य, अनु. पारधी, मा. कृ. भारतीय वाद्ये, मुंबई, १९७६.

गोंधळेकर, ज. द.


 सुषिर वाद्ये : १. ओबो : लंडन, सु. १७८०. २. क्लॅरिनेट : पॅरिस, सु. १७८०. ३. बॅगपाईप : पोलंड, १६ वे शतक. ४. शंख (ट्रंपेट) - आदिम वाद्य. ५. हॉर्न : वाद्यकार-विल्यम बूल, लंडन, १६९९. ६. रेकॉर्डर : वाद्यकार-झां ऑत्तेर, फ्रान्स, १७ वे शतक. ७. सर्पंट : इंग्लिश बँड, १८ वे शतक. अवनद्ध (आघात) वाद्ये : ८. झायलोफोन : प्राचीन लोकवाद्य, आग्नेय आशिया. ९. टिम्पनी (केट्‌ल ड्रम). १०. ड्रम : ऑस्ट्रिया, १७९४. तंतुवाद्ये : ११. ट्यूब झिथर : प्राचीन वाद्य, प. आफ्रिका. १२. व्हायोलिन : वाद्यकार-जॉर्ज पेरी, डब्लिन, १७४१. १३. रेबेक : आधुनिक यूरोपीय वाद्य. १४. हार्प : यूरोपीय वाद्य. कळफलक (की बोर्ड) वाद्ये : १५. हार्पसिकॉर्ड : वाद्यकार-जेरोम ऑफ बोलोन्या, इटली, १५२१.

१. मँचुरियन तंतुवाद्य, चीन. २. बँडोरा : तंतुवाद्य. ३. लायर : प्राथमिक तंतुवाद्य, पूर्व आफ्रिका. ४. सौन : धनुष्याकृती तंतुवाद्य, ब्रह्मदेश. ५. कॉर आंग्ले : सुषिर वाद्य, फ्लॉरेन्य, सु. १७८०. ६. हत्तीच्या सुळ्यापासून कोरून तयार केलेली तुतारी : आदिम सुषिर वाद्य, प. आफ्रिका. ७. बसून : काष्ठ-सुषिर वाद्य, न्यूअर्क, सु. १७८०. ८. करकोच्याच्या हाडापासून बनवलेला प्राचीन फ्ल्यूट, प्रागैतिहासिक काळ, सेमॉस. ९. पिआनोफोर्ते : कळफलक वाद्य वाद्यकार-बार्तोलोमेओ क्रिस्तोफोरी, फ्लॉरेन्स, सु. १७२०. १०. ज्यूज्‌ हार्प : घनवाद्य, १९ वे शतक.


तंतुवाद्ये : १. सतार. २. दिलरुबा. ३. वीणा. ४. सूरसिंगार. ५. ताऊस. ६. स्वरमंडल : उत्तर भारत. ७. तुणतुणे : लोकतत्‌वाद्य, महाराष्ट्र. सुषिर वाद्ये : ८. शृंग (दाक्षिणात्य कोम्बु). ९. ओत्तु : दाक्षिणात्य वाद्य. १०. बासरी. अवनद्ध (आघात) वाद्ये : ११. सूर्यपिरै-चंद्रपिरै : दाक्षिणात्य लोकवाद्य. १२. उडुक्कै (डमरू) : लोकवाद्य, तमिळनाडू. १३. विल्लडि वाद्यम्‌ : दाक्षिणात्य लोकवाद्य. १४. ढोलक : लोकवाद्य. १५. पंचमुख वाद्य : दाक्षिणात्य लोकवाद्य, तमिळनाडू.

१. अलंकृत प्राचीन तंबोरा : तंतुवाद्य. २. सरोद : तंतुवाद्य. ३. सारंगी : तंतुवाद्य. ४. मकर वीणा : तंतुवाद्य. ५. कच्छपी वीणा : तंतुवाद्य. ६. झांजा : घनलोकवाद्य. ७. शहनाई (सनई) : सुषिर वाद्य. ८. गोपीचंद : ततलोकवाद्य, बंगाल. ९. सूरसोटा : ततलोकवाद्य. १०. पखवाज : अवनद्ध वाद्य. ११. ताशा : अवनद्ध लोकवाद्य. १२. तविल : दाक्षिणात्य अवनद्ध लोकवाद्य.