पानसे, नानासाहेब : (सु. १८४० – सु. १९१७). प्रसिद्ध पखावजवादक. मूळ नाव नारायण थारपे. जातीने गुरव. जन्म वाईजवळील बावधन या गावचा. वाईस पानसे ह्या कीर्तनकारांच्या साथीला मृदंग वाजवत म्हणून त्यांना ‘पानशांचा नाना’ म्हणू लागले. त्यांचे सुरुवातीचे थोडे शिक्षण त्या काळातील प्रसिद्ध पखावजवादक वाईचे चौंडे महाराज यांच्याकडे झाले. पुढे जोरवरसिंगाच्या परंपरेतील ज्योतिसिंग (जोधसिंग) नावाच्या राजपूत ब्राह्मणाकडे सु. बारा वर्षे काशीस त्यांचा मृदंगवादनाचा अभ्यास झाला. पराकाष्ठेच्या मेहनतीमुळे त्यांच्या वादनात अतिशय नरमाई आली. त्यांच्या घराण्याचे म्हणून जे काही बोल उपलब्ध आहेत, त्यांत लयकारीच्या अतिमनोहारी खाचाखोचा जाणवतात. तबलावादन आणि नृत्यकला ह्यांतही त्यांनी प्रावीण्य संपादन केले. शिकविण्याचा सरलसुलभ पद्धतीमुळे त्यांना मोठा शिष्यवर्ग लाभला. बळवंतराव पानसे आणि सखारामपंत आंगले ह्यांना त्यांनी पखावज आणि वामनराव पानसे आणि सखारामपंत आंगले ह्यांना त्यांनी पखावज आणि वामनराव चांदवडकर यांना तबला शिकविला. ‘सुदर्शन’ ह्या नावाचा नवीन ठेका त्यांनी बांधला. इंदूर सरकारचा त्यांना राजाश्रय होता. इंदूर येथे त्यांचे निधन झाले.

मंगरूळकर, अरविंद