वाटा : हा मासा घोडा मासा व नळी मासा यांचा जवळचा आप्त आहे. याचा समावेश सिन्ग्नॅथिडी कुलात होत असून सिन्ग्नॅथस इंटरमिडियस (ट्रॅकिर्हॅंफस इंटरमिडियस) असे याचे शास्त्रीय नाव आहे. याचा प्रसार भारताच्या दोन्ही किनाऱ्यांलगतच्या सागरांत व शैलभित्तीत आहे. या जातीखेरीज सिन्ग्नॅथिडी कुलातील आणखी चार जाती भारतात आढळतात. घोडा माशाप्रमाणे याची शेपटी प्रतिकर्षी (वळविता येणारी) नसते व पाठीवरील पर सामान्यतः असतो. याचा रंग करडसर व पट्टेरी असतो. पाठीवरील परावर ठिपके असतात. हा पर मध्यम उंचीचा असतो व तो शरीराच्या तिसऱ्या वलयापासून सुरू होतो. शेपटीच्या पराची लांबी मुस्काटाच्या निम्मी असते. एकूण शरीर सडपातळ व खूप लांब असते. याची सरासरी लांबी १५–२० सेमी. असून सर्वांत लहान मासा दोन सेंमी.पेक्षा कमी व मोठ्यात मोठा मासा ५५ सेंमी. लांब असतो.
वाटा मासा कवचधारी प्राणी, इतर जलचरांची पिले व लहान मासे खाऊन जगतो. आपले भक्ष्य तो तोंडात ओढून घेतो. प्रजोत्पादनाच्या काळातील याच्या सवयी घोडा माशासारख्या असतात. नर पोटाखाली असलेल्या पिशवीमध्ये मादीने घातलेली अंडी घेऊन हिंडतो.
पहा : घोडा मासा नळी मासा.
जमदाडे, ज. वि.
“