वाघाटी : (वागाटी लॅ. कॅपॅरिस मूनाय कुल-कॅपॅरिडेसी). या जाडजूड वेलीचा प्रसार पश्चिम घाटातील जंगलात सामान्यतः आहे. खोडाचा व्यास कधी १५ सेंमी.पर्यंत असतो. कोवळ्या फांद्या जांभळट, चकचकीत व गुळगुळीत असून पाने साधी, लंबगोल-आयत (७.५–११.५ x ३.५–५ सेंमी.), वरच्या बाजूस चकचकीत व दोन्ही बाजू गुळगुळीत उपपर्णी काटे व वाकडे बळकट फुले पांढरी व मोठी (व्यास १०–१२ सेंमी.) असून फुलोरे शेंड्याकडे व गुच्छ प्रकारचे [⟶ पुष्पबंध] केसरदले पांढरी, अनेक व लांब आणि किंजधर (स्त्रीकेसराचा दांडा) ५–७.५ सेंमी. लांब असतो. फळ गोलसर (व्यास ५–१० सेंमी.), मृदू, टोकदार, पिकल्यावर तांबडे बिया अनेक व बारीक असतात. हिरव्या फळांची भाजी करतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨कॅपॅरिडेसी कुलात (वरुण कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. वाघाटी हे नाव कॅपॅरिस प्रजातीतील दोन-तीन जातींना दिलेले आढळते. तथापि ⇨गोविंदफळ हेच खरे वाघाटी मानतात.
पहा : काबरा तरटी नेपती.
घवघवे, ब. ग.