वाग्भट : प्राचीन भारतातील वैद्य. या नावाचे दोन वैद्य होऊन गेल्याचे मानतात. आजोबाचे नाव नातवाला देण्याच्या त्या काळातील प्रथेनुसार हे दोघे आजोबा व नातू असावेत. त्यांचा काळ निश्चित करता आलेला नाही. चिनी प्रवासी इत्सिंग यांनी वाग्भटांचा उल्लेख केला आहे. त्यावरून थोरल्या वाग्भटांचा काळ इ. स. सातव्या शतकाआधीचा असावा, असे ए. एफ्. आर्. हॉर्नले यांचे मत आहे. त्यांच्याच मते धाकट्या वाग्भटांचा काळ इ. स. आठवे व नववे शतक असा अनिश्चित आहे. धाकटे वाग्भट रसायन, रसकुपी व कायाकल्प यांकरिता प्रसिद्ध होते. त्यांच्या गुरूंचे नाव अवलोकितेश्वर होते व ते बौद्ध धर्ममताचे होते. एका आख्यायिकेनुसार ईजिप्तच्या राजावर उपचार करण्यासाठी गेले असता त्यांचे तिकडेच निधन झाले.
अष्टांगसंग्रह व अष्टांगहृदयसंहिता हे आयुर्वेदीय ग्रंथ दोन व्यक्तींनी लिहिले असावेत, असे हॉर्नले व ज्योतिष चंद्र सरस्वती यांचे मत आहे (म्हणजे पहिला ग्रंथ आजोबांनी व दुसरा नातवाने लिहिला असावा) तर गणनाथ सेन व पंडित यादवजी त्रिकमजी आचार्य यांच्या मतानुसार या ग्रंथांचे स्वरूप, भाषाशैली व रचना पाहता दोन्ही ग्रंथ एकाच व्यक्तीने (धाकट्या वाग्भटांनी) लिहिले असावेत.
अष्टांगसंग्रहाच्या शेवटी लेखकाने वाग्भटांचा पुत्र सिंहगुप्त व सिंहगुप्तांचा पुत्र वाग्भट असा उल्लेख केला आहे तसेच आपण सिंध देशाचे राहणारे आहोत, असेही म्हटले आहे. या ग्रंथाची रचना चरक व सुश्रुत यांच्या ग्रंथांसारखी असून तो गद्यपद्यमय आहे. ग्रंथात चरक व सुश्रुत यांचे आधार नावनिशीवार दिलेले आहेत. या ग्रंथाला ‘बृहत्/वृद्ध वाग्भट’ असेही म्हणतात व तो इ.स. आठव्या शतकाआधी लिहिलेला असावा.
अष्टांगसंग्रहाचे सार सूत्ररूपाने अष्टांगहृदयसंहिता या ग्रंथात आलेले दिसते. यामध्ये वैद्यकशास्त्राचे श्लोकबद्ध विवेचन दिलेले असून शस्त्रक्रियेविषयी विस्तृत विवेचन केले आहे. या ग्रंथाला ‘वाग्भट’ वा ‘लघु वाग्भट’ असेही संबोधितात. हा ग्रंथ इ. स. आठव्या शतकानंतरचा असावा. अफू, नाडीपरीक्षा व रसायनक्रिया यांचा यात उल्लेख नाही. आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये यावर सर्वाधिक (हरिशास्त्री पराडकरांच्या मते ३४) टीकाग्रंथ लिहिले आहेत. पैकी अरुण दत्तांची सर्वांग सुंदरी (इ. स. बारावे शतक) व हेमाद्रींची आयुर्वेद रसायन (इ. स. तेरावे शतक) या टीका उल्लेखनीय आहेत. या ग्रंथाचे तिबेटी व जर्मन भाषांत अनुवाद झालेले आहेत.
भालेराव, य. त्र्यं.