वस्तुभेद : ज्या परिस्थितीत ग्राहक वा विविध ग्राहकसमूह विशिष्ट प्रकारची वस्तू पसंत करतात आणि तिच्यासाठी थोडी अधिक किंमत देण्यासही तयार असतात तसेच एकाच प्रकारची वस्तू, परंतु विशिष्ट विक्रेत्याकडूनच घेण्याची पसंती दर्शवितात, त्या परिस्थितीला ‘वस्तुभेद’ असे म्हणतात. वस्तुभेद निरनिराळ्या वस्तूंची बोधचिन्हे, एकस्व, बाह्य वेष्टन, गुणधर्म, रंग, कलाकुसर, वस्तूंवरील आकर्षक चित्रे इ. वैशिष्ट्यांवर आधारलेला असू शकतो, त्याचप्रमाणे वस्तूंच्या विक्रीबाबतची परिस्थिती म्हणजे मोक्याची सोईस्कर जागा, दुकानाचा बाह्याविष्कार, विक्रेत्याची कार्यक्षमता, कसब, कौशल्य, सचोटी तसेच ग्राहकांना विक्रेत्याविषयी जिव्हाळा व आकर्षण वाटेल अशी परिस्थिती यांवर आधारलेला असू शकतो. प्रत्येक विक्रेता एकसारख्या वस्तूंबरोबर ग्राहकांना काही अधिक सेवाही देत असतो. एखादा विक्रेता विक्रीपश्चात् सेवा अधिक दीर्घकाळ व अधिक आपुलकीने देत असेल, तर ग्राहक त्याकडे साहजिकच आकृष्ट होतात.

वस्तुभेद हे मक्तेदारी-स्पर्धा या वास्तविक बाजार परिस्थितीचे वैशिष्ट्य आहे. विशुद्ध स्पर्धा व विशुद्ध मक्तेदारी या दोन बाजारपरिस्थितींच्या दरम्यान जो अखंड प्रदेश आहे, तो मक्तेदारी स्पर्धेने व्यापलेला आहे. मक्तेदारी स्पर्धेच्या बाजारपरिस्थितीत वस्तूच्या किंमती व त्यांच्या विक्रीबाबतची परिस्थिती तसेच त्यांचे गुणधर्म या सर्वांवर स्पर्धा आधारलेली असते. मक्तेदारी स्पर्धेच्या अवस्थेत विविध उत्पादनसंस्था निकट प्रस्थापनीय वस्तू निर्माण करीत असल्यामुळे त्यांच्यात स्पर्धा असते. परंतु प्रत्येक उत्पादनसंस्थेने निर्माण केलेल्या आपल्या वस्तूची काही वैशिष्ट्ये असल्यामुळे सर्व प्रस्थापनीय वस्तू एकसारख्या म्हणजे एकजिनसी नसतात, त्यामुळे मक्तेदारी अंशाचा प्रादुर्भाव होतो. मक्तेदारी स्पर्धेत प्रत्येक उत्पादनसंस्थेच्या वस्तूला काही ग्राहक खचितच असतात. उदा., काही ग्राहक फोरहॅन्स दंतधावनाची मागणी करतील, काहीजण कोलगेटबद्दल आग्रह धरतील, तर अन्य काही सिबाका दंतधावन मागतील. याचा अर्थ असा की, त्या त्या ग्राहकांची मागणी केवळ दंतधावनासाठी नसून विशिष्ट प्रकारच्या दंतधावनासाठी आहे.

एडवर्ड हेस्टिंग्ज चेंबरलिन (१८९९-१९६७) या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी वस्तुभेदाच्या सत्य परिस्थितीवर जोर देऊन सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांची (उदा., ॲडम स्मिथ, रिकार्डो, मॅल्थस, जॉन स्ट्यूअर्ट मिल या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांपासून जे. बी. से या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञांपर्यंत – १७९० ते १८७० पर्यंतच्या काळातील अर्थशास्त्रज्ञ) ‘स्पर्धा व मक्तेदारी यांचा एकमेकांत अंतर्भाव होत नाही’ ही कल्पना खोटी पाडली. निरनिराळ्या निकट प्रतिस्थापनीय वस्तूंच्या सारखेपणाच्या भागामुळे स्पर्धेचे व विभिन्नतेच्या भागामुळे मक्तेदारीचे अंश निर्माण होतात, म्हणून एकाच बाजार परिस्थितीमध्ये स्पर्धा व मक्तेदारी अशा दोहोंचेही अंश असतात, असे चेंबरलिन यांनी दाखवून दिले. अर्थशास्त्रीय साहित्यात ‘प्रॉडक्ट डिफरेन्शिएशन’ (वस्तुभेद) ही संज्ञा रूढ करण्याचे श्रेय चेंबरलिन यांच्याकडे जाते.

परंपरागत अर्थशास्त्रीय विवेचनात एकस्व व लेखाधिकार (कृतिस्वाम्य) हे मक्तेदारीत समाविष्ट करण्यात आले आहेत. परंतु या दोहोंमुळे वास्तव जीवनात काही अंशी स्पर्धा व काही अंशी मक्तेदारी यांचे संमिश्रण झालेले असते. विशिष्ट अधिकारांच्या योगे मक्तेदारी आणि इतर एकस्वित व बिगर-एकस्वित वस्तूंच्या अस्तित्वामुळे स्पर्धा, अशा दोहोंचे मिश्रण आढळते. एकस्व कायद्यामुळे जसा मक्तेदारीचा, त्याचप्रमाणे खाजगी उपक्रमांमुळे स्पर्धेचा जन्म होतो.

काही वेळा वस्तुभेदामध्ये वस्तूचा दर्जा सुधारलेला असतो, अशी सुधारित उत्पादने मूळ वस्तूंशी कमीजास्त प्रमाणात स्पर्धा करीत असतात. उदा., कृत्रिम धाग्याचे कपडे व सुती कपडे किंवा रबरी टायर व नायलॉन धाग्याने बनविलेले टायर. मात्र अशा तऱ्हेच्या वस्तुभेदात त्या सुधारित वस्तूचा उत्पादनखर्च व तिची मागणी या दोन्ही गोष्टी मूळ वस्तूपासून भिन्न असू शकतात. अशा वेळी बाजारातील इतर सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊनच विक्रेता बाजारात वस्तू विकत असतो.

वस्तुभेदामुळे विविध वस्तूंना एकजिनसी बाजारपेठ लाभत नाही, तर लहानलहान परस्परावलंबी बाजारविभाग निर्माण होतात. सबंध एकजिनसी बाजारपेठेचे अशा रीतीने विभाजन झाल्यामुळे परस्परावलंबी लहानलहान बाजारांचे जाळेच झालेले असते. विविध उत्पादनसंस्थांच्या वस्तूंच्या मागणी रेषा व उत्पादनव्यय रेषा ह्या मागणी किंमतीच्या लहानशा कक्षेत फारच लवचिक झालेल्या असतात. त्यामुळे वस्तूची मागणी रेषा क्ष-भुजेकडे थोडीफार कललेली असते. प्रत्येक उत्पादनसंस्थेच्या मागणी रेषा ह्या विशिष्ट असल्यामुळे व उत्पादन-व्यय रेषा वेगवेगळ्या असल्यामुळे मक्तेदारी स्पर्धेच्या परिस्थितीत मूल्य निर्धारण विवेचनासाठी सुरुवात उत्पादनसंस्थेच्या संतुलनविवेचनापासून होते. 

पहा : मक्तेदारी

संदर्भ : Chamberlin, Edward Hastings The Theory of Monopolistic Competition : A Re-Orientation of the Theory of Value, Cambridge (Mass.), 1962

सुर्वे, गो. चिं.