केप ते कैरो रेल्वे : दक्षिण आफ्रिकेचा एक मुत्सद्दी व वित्तप्रबंधक सेसिल जॉन ऱ्होड्स ह्याने संकल्पिलेला एक प्रकल्प. ऱ्होड्सने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस केपटाउन (दक्षिण आफ्रिका) व कैरो (ईजिप्त) ही दोन शहरे लोहमार्गाने जोडावयाचे ठरविले होते. तथापि त्याचे हे स्वप्न पोर्तुगाल, जर्मनी, बेल्जियम, इटली, व फ्रान्स ह्या राष्ट्रांच्या वसाहतविषयक हितसंबंधांमुळे साकार होऊ शकले नाही. परिणामी राजकीय वर्तुळात अनेक कटकटी उद्भवल्या आणि हा लोहमार्ग पुरा होऊ शकला नाही. ही योजना प्रत्यक्षात येण्याच्या मार्गात जर्मनीच्या ताब्यात असलेला पूर्व आफ्रिकेचा प्रदेश हा मोठाच अडथळा होता. केपटाउन व कैरो ही शहरे आता खुष्कीच्या मार्गांनी व हवाई मार्गांनी जोडण्यात आलेली आहेत.                                              

गद्रे, वि. रा.