वल्करंध्र : अनेक वनस्पतींच्या ⇨ परित्वचेमध्ये [अपित्वचेच्या जागी बनलेल्या नवीन ऊतक थरांच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांच्या थरांच्या) मध्ये ⟶ अपित्वचा] वायुविनिमयाकरिता सूक्ष्म छिद्रे असतात, त्यांना ‘वल्करंध्रे’ म्हणतात. पाने, उपपर्णे, कोवळी खोडे इ. भागांवर याच कार्याकरिता ⇨त्वग्रंधे असतात परंतु खोडामध्ये नवीन ऊतकांची भर पडून अपित्वचेचा नाश झाल्यावर, तेथे बनलेल्या परित्वचेवर वल्करंघ्रे आवश्यक ठरतात. त्यांचे स्वरूप मसुरासारखे असून गुळगुळीत सालीवर त्यांच्यामुळे खरबरीतपणा येतो, कारण प्रत्येक वल्करंध्र बारीक उंचवट्यावर येते. प्रत्येक वल्करंध्रामध्ये त्वक्षाकर अधिक वेळ विभागून त्यापासून बनणाऱ्या त्वक्षाकोशिकांची मांडणी त्वक्षेतल्याप्रमाणे परस्परांशी चिकटून नसते [⟶ त्वक्षा]. परित्वचेचा इतर भाग बनण्यापूर्वी वल्करंध्राचा पूर्ण विकास होऊ शकतो व त्यानंतर त्वक्षाकर त्या वल्करंध्राभोवती वाढत पसरतो. वल्करंध्राच्या कोशिकावरणात सुबेरिन हे मेदयुक्त द्रव्य असतेच असे नाही व या सर्व किंवा काही कोशिका हळूहळू परस्परांपासून अलग होतात. काही वनस्पतींत सलग व अलग कोशिकांचे थर एकाआड एक असतात व आतून बनत येणाऱ्या नवीन कोशिकांच्या दाबाने केव्हा केव्हा वरचे सलग थर फुटतात. सलग थरातल्या कोशिकांना ‘बंद करणाऱ्या कोशिका’ व विरळ कोशिकांना ‘पूरक कोशिका’ म्हणतात. वनस्पतीच्या विश्रांतीच्या काळापूर्वी (प्रसुप्तावस्थेपूर्वी) बंद करणाऱ्या कोशिकांचा थर बनतो व त्यानंतर पूरक कोशिकांचा थर बनतो. समुद्रकिनाऱ्यावर खाऱ्या चिखलात वाढणाऱ्या काही कच्छ वनस्पतींच्या जमिनीतल्या मुळांपासून जमिनीवर वाढणाऱ्या श्वसनमुळांवर वल्करंध्रे आढळतात (उदा., कांदळ, तिवार). सर्वच वनस्पतींच्या मुळांवर वल्करंध्रे नसतात परंतु काहींत (उदा. तुती, ग्लेडित्सिया) ती मुळांवर आडव्या लांबट आकाराची असतात.
पहा : त्वक्षा परित्वचा वल्क शारीर, वनस्पतींचे.
परांडेकर, शं. आ.
“