वर्ष : कालगणनेचे एक मोठे नैसर्गिक माप वा एकक. कोणत्या तरी एका बिंदूच्या अथवा दिशेच्या संदर्भात पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी अथवा प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणाऱ्या काळाला वर्ष म्हणतात. पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा कशाच्या सापेक्ष पाहिली जाते, त्यावर वर्षाचा कालावधी अवलंबून असतो. ज्योतिषशास्त्रात वर्षाचे असे अनेक प्रकार असून त्यांच्या कालावधीत किंचित फरक असतो. यांपैकी काही महत्त्वाच्या प्रकारांची माहिती पुढे दिली आहे.
⇨ संपात बिंदूच्या संदर्भात होणाऱ्या पृथ्वीच्या सूर्यप्रदक्षिणेला सांपातिक वर्ष म्हणतात. सूर्य संपात बिंदूपासून निघून पुन्हा त्याच संपात बिंदूपाशी येण्यास जो कालावधी लागतो, तो या वर्षाचा काळ होय. अशा एका वर्षात ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद अथवा ३६५.२४२२० माध्य सौर दिवस असतात. यालाच सौरवर्ष असेही म्हणतात. संपात बिंदूवर ॠतू अवलंबून असतात. त्यामुळे हे वर्ष ॠतुमानाशी जुळणारे असते. हे वर्ष व्यवहारात व ज्योतिषशास्त्रात वापरले जाते. नेहमीचे वापरातील कॅलेंडर वर्ष हेही सांपातिक वर्षावर आधारलेले असते.
संपाताऐवजी एखादा स्थिर तारा अथवा अवकाशातील एक विशिष्ट दिशा संदर्भ म्हणून घेऊन त्यासापेक्ष पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जो काळ लागतो, त्याला नाक्षत्र वर्ष म्हणतात. या वर्षाचा काळ ३६५ दिवस, ६ तास, ९ मिनिटे व ९.५ सेकंद किंवा ३६५.२५६३६ माध्य सौर दिवस इतका असतो. हे वर्ष केवळ ज्योतिषशास्त्रातील आकडेमोडीसाठीच वापरतात. प्रकाशवर्ष हे अंतराचे ज्योतिषशास्त्रीय एकक याच कालावधीला धरून काढतात.
संपात बिंदूला विलोम वा उलट म्हणजे पूर्व-पश्चिम गती असते. त्यामुळे प्रदक्षिणेच्या सुरुवातीला संपातापाशी असलेला सूर्य प्रदक्षिणेच्या शेवटी संपात बिंदूपाशी थोडा लवकर येतो. म्हणून सांपातिक वर्षाचा कालावधी नाक्षत्र वर्षापेक्षा सु. २० मिनिटांनी कमी असतो.
इतर ग्रहांचा पृथ्वीच्या कक्षेवर दीर्घकालीन परिणाम होतो. त्यामुळे वर्षाचे कालावधी किंचित बदलतात. उदा., नाक्षत्र वर्षाचा कालावधी एका शतकात ०.०१ सेकंदाने वाढतो, तर एवढयाच कालावधीत सांपातिक वर्ष ०.५३ सेकंदाने लहान होते. (या लेखात वापरलेले वर्षांचे कालावधी १९०० साली घेतलेल्या वेधांवर आधारलेले आहेत).
चंद्राची कक्षा व क्रांतिवृत्त ही एकमेकांस राहू व केतू या नावांनी ओळखण्यात येणाऱ्या पातबिंदूमध्ये छेदतात [⟶ राहु-केतु]. यांपैकी एका पातबिंदूच्या सापेक्ष (उदा., राहूसापेक्ष) होणाऱ्या सूर्याच्या प्रदक्षिणेस जो कालावधी लागतो, त्याला ग्रहण वर्ष म्हणतात. हे वर्ष ३४६ दिवस, १४ तास, ५२ मिनिटे व ५१ सेकंदांचे म्हणजे ३४६.६२००५ माध्य सौर दिवसांचे असते. या पातबिंदूंनाही उलट म्हणजे पूर्व-पश्चिम अशी गती (उदा., राहूला दर वर्षी सु. २००) असल्याने हे वर्ष सांपातिक वर्षाहूनही २० दिवसांनी लहान आहे.
क्रांतिवृत्तावरील उपसूर्यबिंदूपासून (सूर्याला जवळात जवळ असणाऱ्या बिंदूपासून) निघून पुन्हा त्याच बिंदूपाशी येण्यास पृथ्वीला जो काळ लागतो त्याला परिवर्ष किंवा उपवर्ष म्हणतात. हे वर्ष ३६५ दिवस, ६ तास, १३ मिनिटे व ५३ सेकंदांचे म्हणजे ३६५.२५९६४ माध्य सौर दिवसांचे असते. उपसूर्यबिंदूलाही पूर्व-पश्चिम अल्पशी गती असल्याने हे वर्ष नाक्षत्र वर्षापेक्षा ४.५ मिनिटांनी मोठे आहे.
अमावास्या ते आमावास्या असा एक महिना धरून असे बारा चांद्र महिने पूर्ण होण्यास लागणाऱ्या कालावधीला चांद्र वर्ष म्हणतात. हे वर्ष ३५४ दिवसांचे असते.
नेहमीच्या व्यवहारांत वापरात असलेले ग्रेगरियन कॅलेंडरचे वर्ष हे सांपातिक वर्षच असून त्याचा माध्य कालावधी ३६५ दिवस, ५ तास, ४९ मिनिटे व १२ सेकंद म्हणजे ३६५.२४२५ माध्य सौर दिवस एवढा असतो. व्यवहारात त्याचे पूर्ण ३६५ दिवस धरतात. राहिलेला फरक भरून काढण्यासाठी चार वर्षांनी येणाऱ्या वर्षाचे ३६६ दिवस धरतात व त्याला लीप वर्ष म्हणतात. यामुळे (ज्यूलियन) कॅलेंडर वर्षाचा सरासरी कालावधी ३६५.२५ दिवसांचा होतो. परिणामी दर साली ११ मिनिटे १४ सेकंद (०.०३१२ दिवस) इतका कालावधी जास्त धरला जातो. ही कसर वा फरक भरून काढण्याकरिता दर शतकाअखेर येणारे लीप वर्ष हे साध्या वर्षाप्रमाणे ३६५ दिवसांचे आणि प्रत्येक चवथ्या शतकातील शेवटचे वर्ष लीप वर्षाप्रमाणे ३६६ दिवसांचे (लीप शतक) धरतात. उदा., ४०० ने भाग न जाणारे साल (१९०० वा २१००) हे ३६५ दिवसांचे तर ४०० ने भाग जाणारे साल (२०००) ३६६ दिवसांचे मानतात. अशा प्रकारे ४०० कॅलेंडर वर्षे व ४०० सांपातिक वर्षे यांच्यातील तफावत तीन तासांपेक्षा कमी रहाते आणि कित्येक हजारो वर्षांच्या बाबतीत ही तफावत १ दिवसापर्यंतच राहील.
यांखेरीज सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि त्यांच्या या परिभ्रमण कालासही वर्ष म्हणण्याचा प्रघात आहे. उदा., गुरूचे वर्ष पृथ्वीच्या ११.८६२ वर्षांचे असते.
संपात बिंदूची ताऱ्यांच्या सापेक्ष एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास लागणाऱ्या काळास प्लेटॉनिक वर्ष म्हणतात. हे २५,७०० वर्षाचे असते. आकाशगंगेच्या मध्याभोवती सूर्यकुलाला एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीस (सु. २२५,०००,००० वर्षे) वैश्विक वर्ष म्हणतात.
व्याधाचा अस्त झाल्यानंतर तो पुन्हा सूर्योदयापूर्वी पहाटे पूर्वेस दिसू लागण्यास व्याधोदय म्हणतात. अशा लागोपाठच्या दोन व्याधोदयांमधील काळास प्राचीन ईजिप्तमध्ये वर्ष म्हणत असत.
धार्मिक कामासाठी जगभर वेगवेगळी वर्षे वापरली जातात. ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू, ज्यू इ. धर्मीयांची वर्षे अशी भिन्नभिन्न आहेत. रोमन कॅथलिक व बहुतेक प्रॉटेस्टंट पंथीय लोक चर्च कॅलेंडरचा वापर करतात. हे वर्ष अंशतः सौर व अंशतः चांद्र असते. यामुळे सौर गणनेप्रमाणे येणाऱ्या सणवारांच्या तारखांत बदल होत नाही उलट चांद्र गणनेवर आधारलेल्या ईस्टरसारख्या सणांच्या तारखा बदलतात. इस्लामी वर्ष चंद्राच्या कलांवर आधारलेले (चांद्र) असून ते ३५४ दिवसांचे असते. यामुळे इस्लामी वर्षाचा आरंभ ॠतूंच्या संदर्भात आधी होत जातो. ३० इस्लामी वर्षांच्या चक्रामध्ये ११ लीप वर्षे येतात व तीही अनियमित कालावधीने येतात. हिंदूचे वर्ष हे मुख्यत्वे चांद्र कालगणनेवर आधारलेले असून काही ठिकाणी त्याला सौर काल गणनेचीही जोड दिलेली आढळते. त्यामुळे वरील प्रकारचे फरक त्यातही आढळतात. भारतात प्राचीन काळी वर्षगणनेचे ब्राह्म दैव, पित्र्य, प्रजापत्य, गौरव, सौर, सावन, चांद्र आणि नाक्षत्र असे नऊ प्रकार होते.
सेकंदाची व्याख्या करण्यासाठी १९५६ साली वर्षाचा उपयोग करण्यात आला. त्यानुसार ३१ डिसेंबर १८९९ म्हणजेच ० जानेवारी १९०० (मध्य रात्री) जेवढे सांपातिक वर्ष होते त्याचा १/३१५५६९२५९७४७ एवढा भाग म्हणजे सेकंद होय, अशी सेकंदाची व्याख्या करण्यात आली आहे.
पहा : ऋतु कालगणना, ऐतिहासिक कालमापन तास दिवस पंचांग मिनिट संपात सेकंद.
ठाकूर, अ. ना.