वर्मा, वृंदावनलाल: (९ जानेवारी १८८९-२३ फेब्रुवारी १९६९). ऐतिहासिक हिंदी कादंबरीकार, कथाकार व नाटककार. माऊ रानीपूर, जि. झांशी (उ. प्र.) येथे जन्म. वडिलांचे नाव अयोध्याप्रसाद, आईचे नाव सबरानी. यांचे आजोबा झांशीच्या राणीच्या बाजूने लढत असता मारले गेले. आपल्या पणजीकडून झांशीची राणी लक्ष्मीबाई हिच्याबद्दलच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या हकीकती त्यांनी ऐकल्या होत्या. आईकडून रामायण, महाभारत इ. धार्मिक ग्रंथांचे संस्कार त्यांच्यावर झाले व चुलत्यामुळे वाङ्मयाची गोडी लागली. त्यांना लहानपणापासून लेखन-वाचनाची अत्यंत आवड होती. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली. वकिलीबद्दल आकर्षण वाटून त्यांनी ‘व्हिक्टोरिया कॉलेज’ मध्ये नाव घातले. १९१६ मध्ये एल्एल्. बी. होताच त्यांनी वकिली सुरू केली.
लहानपणी मार्सडनच्या हिस्टरी ऑफ इंडियाच्या वाचनाने व चुलत्याकडे वाचलेल्या अश्रुमती या बंगाली नाटकाने त्यांचे मन इतिहासाकडे वळले. ⇨ देवकीनंदन खत्री यांची चंद्रकांता-संतति ही बारा भागांची बृहद् कादंबरी, रामचरितमानस, मुद्राराक्षस, शाकुंतल, तसेच गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, रॉबिन्सन क्रूसो, रेनॉल्ड्सकृत सोल्जर्स वाइफ, गटेचे फाउस्ट, शेक्सपिअरची नाटके वगैरे ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांनी शालेय जीवनात केला. वकिली करीत असतानाही त्यांनी उत्तमोत्तम पाश्चात्त्य कृतींचा व्यासंग चालूच ठेवला. अनुठे देवेश ही कादंबरी व रामचरितमानसाचे गद्य रूपांतर हे त्यांचे सुरुवातीचे लेखन होय. वयाच्या पंधराव्या वर्षी नारान्तक वध नावाचे नाटक त्यांनी लिहून सादरही केले होते. १९०८ मध्ये बुद्धाचे चरित्र त्यांनी लिहिले, तसेच शेक्सपिअरच्या टेंपेस्ट नाटकाचे भाषांतरही केले. ‘राखीबंद भाई’ व ‘राजपूतकी तलवार’ या त्यांच्या पहिल्या कथा १९१० मध्ये सरस्वती मासिकात प्रसिद्ध झाल्या. त्याच वर्षी सेनापति ऊदल (१९०९) हे त्यांनी लिहिलेले नाटक सरकारने जप्त केले. स्वदेश बांधव या पत्रात ‘चातकराय’ नावाने ते लिहीत तर कधीकधी प्रभा व व्यंकटेश समाचार या पत्रांतही लिहीत. जय जिझौती व स्वाधीन या वृत्तपत्रांचे संपादनही त्यांनी काही काळ केले.
ते शिकार करण्यास गेले असता गढकुंडार किल्ला पाहून त्या विषयावर कादंबरी लिहिण्याची स्फूर्ती त्यांना झाली. गढकुंडार (१९२७) या ऐतिहासिक कादंबरीमुळे प्रख्यात देशभक्त व पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांनी ‘हिंदी भाषेचे स्कॉट’ म्हणून त्यांना गौरविले. इतिहासाच्या पार्श्वभूमीवर कादंबरीच्या कथानकाची उभारणी ते कलात्मक रीत्या करीत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये विराटकी पद्मिनी (१९३०), झाँसीकी रानी लक्ष्मीबाई (१९४६), कचनार (१९४७), मृगनयनी (१९५०), अहिल्याबाई, माधवजी सिंधीया (१९५७), भुवन विक्रम (१९५७) इ. उल्लेखनीय आहेत. त्यांच्या बहुतेक ऐतिहासिक कादंबऱ्या बुंदेलखंडातील विविध घटनांवर आधारलेल्या आहेत. ऐतिहासिक वातावरणनिर्मिती करण्यात त्यांना लक्षणीय यश लाभले. संगम (१९२८), लगन (१९२९), प्रत्यागत (१९२९), सोना (१९५२), अमरवेल (१९५३) इ. सामाजिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांत समाजातील वैगुण्यांचे चित्रण आढळते. या कादंबऱ्यांनी त्यांना हिंदी साहित्यात अग्रगण्य स्थान मिळवून दिले. कथांच्या क्षेत्रातही पात्रानुकूल वातावरण व भाषेचा वापर या वैशिष्ट्यांमुळे त्यांची ख्याती झाली. ऐतिहासिक कथांतून बुंदेलखंडातील वातावरण आढळते. शरणागत (१९५०), कलाकार का दंड (१९५०) इ. सात कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. आदर्शवादाकडे कल असलेल्या त्यांच्या नाटकांत प्रयोगक्षमतेपेक्षा साहित्यिक गुणच अधिक आहेत. फूलों की बोली (१९४७), झाँसी की रानी (१९४८), हंसमयूर (१९४८), बीरबल (१९५०) इ. ऐतिहासिक व धीरे धीरे (१९३९), राखीकी लाज, सगुन (१९५०), नीलकंठ (१९५१) इ. सामाजिक नाटके त्यांनी लिहिली. एकांकिका-लेखनातही त्यांनी स्पृहणीय यश मिळविले. काश्मीरका काँटा (१९४८) ही त्यांची एकांकी प्रसिद्ध आहे.
साहित्याखेरीज शिकार, संगीत, प्रवास, कुस्ती व अन्य व्यायाम ह्यांत त्यांना रस होता. मानववंशशास्त्र, पुरातत्त्वविद्या, मानसशास्त्र, मूर्तिकला, चित्रकला इ. विविध क्षेत्रांत त्यांना जाणकारी होती. त्यांना अनेक मानसन्मान लाभले : पद्मभूषण, आग्रा विद्यापीठाची सन्माननीय डी. लिट्. पदवी, डालमिया साहित्यकार संसद, हिंदुस्थानी अकादमी, प्रयाग नागरी प्रचारणी सभा इत्यादींकडून प्राप्त झालेले पुरस्कार यांचा त्यांत समावेश होतो.
दुबे, चंदुलाल द्रविड, व्यं. वि.
“