वर्तनविकृति : मनुष्यप्राण्याचा अपवाद सोडल्यास, प्रत्येक प्राण्याचे वर्तन जातिसामान्य – म्हणजे आपापल्या जातीनुसार, नियमाप्रमाणे विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट प्रकारचे – असे होत असते. ते क्वचितच नियमबाह्य होते. पण मनुष्यप्राण्याचे वर्तन मात्र अत्यंत जटिल व विभिन्न असते. वय, लिंग, संस्कृती, शिक्षण, सामाजिक स्तर, तो राहत असलेला भौगोलिक परिसर, व्यक्तिगत आनुवंशिकता व मानसशास्त्र असा विविध बाबींवर त्याचे वर्तन अवलंबून असते. त्यामुळे माणसामाणसांच्या वर्तनांत इतकी विभिन्नता येऊ शकते, की सामान्य आणि अपसामान्य वर्तनातील भेदही अस्पष्ट होत जातात.
वर्तनविकृती ही संकल्पना लाक्षणिक आहे. म्हणजे विविध मनोविकारांत एकाच प्रकारचे वर्तन पाहायला मिळते. शारीरिक हालचालींमधून आविष्कृत होणाऱ्या आणि निरीक्षणीय असणाऱ्या वर्तनविकृती व त्यांतील लक्षणीय बदल तेवढे ह्या नोंदीत अंतर्भूत केलेले आहेत. भावनिक व वैचारिक विकृतींमुळेही वर्तनात बदल होऊ शकतात पण ते सर्व ‘वर्तनविकृती’ ह्या सदरात बसत नाहीत.
वर्तनविकृतीला कारणीभूत ठरणारे मुख्य मनोगतिकी कारक असे आहेत : सुप्त परंतु निषिद्ध अभिलाषा (फॉर्बिडन विशेस), मनोविग्रह (अन्कॉन्शस कॉन्फ्लिक्ट), विविध गंड, तसेच मनोसंरक्षणयंत्रणेकडून होणारे टोकाचे प्रकार. उदा., बोधविच्छेदन (डिसोसिएशन) [⟶ मानसचिकित्सा].
वर्तनविकृती अनेक असून वर म्हटल्याप्रमाणे, विविध मनोविकारांत आढळतात म्हणून त्यांचे वर्गीकरण मनोविकारांनुसार करण्याऐवजी त्यांच्या ढोबळ गुणवैशिष्ट्यांप्रमाणे केले आहे, ते असे : (१) अतिरेकी वा अतिक्रियाशीलतेच्या (ओव्हरॲक्टिव्हिटी) वर्तनविकृती, (२) मंद अथवा अभावी वर्तनविकृती, (३) वरील दोन्ही वर्गांत न बसणाऱ्या विशिष्ट वर्तनविकृती. ह्या वर्तनविकृतींची लक्षणे अशी : (१) अतिरेकी वा अतिक्रियाशीलतेच्या वर्तनविकृती: अस्वस्थता, अतिचंचलता (हायपर कायनेसिस), वाचाळता (लॉक्वॅसिटी), क्षोभण (ॲजिटेशन), पुनरावृत्ती आणि सक्तियुक्त कृती (रिपिटिशन अँड कंपल्शन), मनोप्रेरक उत्तेजन (सायकोमोटर एक्साइटमेंट), आक्रमकता, हिंसकता, आत्म-इजा वा आत्मांगछेदन (सेल्फ-म्यूटिलेशन), आत्महत्या-प्रयत्न, निद्राभ्रमण (सोम्नँब्यूलिझम), उन्मादी झटके (हिस्टेरिकल फिट्स).
अस्वस्थता हे बऱ्याच मनोविकारांचे प्राथमिक लक्षण असते. चित्तविकृतीत आणि मज्जाविकृतीतही सतत येरझाऱ्या घालणे हे भावक्षोभी लक्षण अवसाद (ॲजिटेटेड डिप्रेशन) तसेच छिन्नमानस व उद्दीपन ह्या चित्तविकृतींत आढळते. त्यांची भावनिक अवस्था मात्र अनुक्रमे उदासीन, निर्विकार व उल्हसित अशी असते. बुद्धिभ्रंशासारख्या ऐंद्रिय चित्तविकृतीत रुग्ण गोंधळलेल्या मनःस्थितीत दिशाहीन फिरत रहातात. बाल्यावस्थेत मेंदूच्या काही विकारांमुळे मूल स्वस्थ बसूच शकत नाही. दिसतील त्या वस्तू उचलून टाकणे, चढणेउतरणे आणि एकूण सतत धडपडत रहाणे असे हे अतिगतिकी स्वरूपाचे वर्तन असते. उद्दीपन ह्या चित्तविकृतीत सर्व शारीरिक हालचालींना ऊत येतो. बडबड करणे, सर्वांना हटकणे, खूप हसणे, रागावणे तसेच शिव्या देणे आणि काही वेळा अंगावर धावून जाणे, अशी लक्षणे सर्वसामान्यतः असतात. जीर्ण उद्दीपनविकृतीत गावोगावी हिंडत रहाणे हे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असते. छिन्नमानसी भटकंती आवेगी व विक्षिप्त असून काही वेळा असा रुग्ण परत येतच नाही. बोधविच्छेदनामुळे होणाऱ्या स्मृतिखंडनात (फ्यूग) कठीण परिस्थितीला टाळण्यासाठी विशेषतः विद्यार्थिदशेत, रुग्ण अचानक गाव सोडून जवळच्या मोठ्या शहरात विमनस्कपणे फिरतो परंतु वाट चुकत नाही आणि थोड्या दिवसांनंतर घरी परततो. ह्या भ्रमंतीच्या काळाचे मात्र त्याला पूर्ण विस्मरण होते. आक्रमकता व हिंसकता ही उद्दीपनापेक्षा ध्यानावस्थी व प्रणालीसंभ्रमयुक्त छिन्नमानसी विकृतीत जास्त आढळते. श्रवणभासामुळे किंवा पीडनसंभ्रमामुळे (इतर आपल्याला पीडा देत आहेत असा संभ्रम होऊन) इतरांवर भयानक हल्ला केला जातो. अपस्माराच्या मनोप्रेरक प्रकारात काही रुग्ण झटक्याच्या अंमलाखाली अचानक पळत सुटतात व मधे कुणी आल्यास त्यांना मारतातही. ‘अमॉक’ ह्या सुदैवाने अप्रचलित सांस्कृतिक मनोविकृतीत (कल्चरल सायकोसिस) एरव्ही प्राकृत असलेल्या व्यक्तीचे मनावरचे नियंत्रण हरपल्यामुळे जवळच्या लोकांवर अचानक खुनी हल्ला केला जातो. समाजविरोधी व्यक्तिमत्त्व विकारात अत्यंत बेजबाबदार, अनैतिक व गुन्हेगारी वर्तन सतत घडते. पौगंडावस्थेतील काही अपसमायोजना मुळे निर्माण झालेल्या विकृतींत पालकांविरुद्ध बंडखोरी जास्त दिसून येते. काही सौम्य प्रकारचे मनोविकल रुग्ण समज कमी असल्यामुळे बालगुन्हेगारी करतात. अट्टल गुन्हेगार अशांचा गैरवापर करतात. भावातिरेकी विचारांच्या दडपणापासून तसेच भयगंडी भीतीपासून सुटका मिळविण्यासाठी सक्तीयुक्त कृती पुन्हा पुन्हा केली जाते. उदा., हात धुणे, आपल्या वस्तू तसेच गॅसची चावी व विजेचे स्विच तपासून पहाणे, देवाला नमस्कार करीत रहाणे. एवढे करूनही समाधान न झाल्याने ह्या क्रियांची सतत पुनरावृत्ती केली जाते. आवेगनियंत्रण विकृतीमुळे (इंपल्स कंट्रोल डिस्ऑर्डर) सक्तीने चोऱ्या करणे, जुगार खेळणे, हिंसा करणे किंवा आगी लावणे अशी वर्तनलक्षणे दिसून येतात.
आत्म-इजा ह्या छिन्नमानसी लक्षणात डोके भिंतीवर जोरजोरात आपटणे वा ब्लेडने स्वतःच्या शरीरावर जखमा करणे, असे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन दिसून येते. काही वेळा असे रुग्ण अचानक आत्महत्याही करतात.
मानसिक अवसाद विकृतीत आत्महत्येचा प्रयत्न जास्त प्रचलित असतो आणि त्याच्या बुडाशी उदासीन विचार व आत्मनिंदा असते.
उन्मादी विकारातील उन्मादी झटके या लक्षणात शुद्ध हरपल्यासारखे होऊन दातखिळी बसते व अपस्माराच्या झटक्यांचे नकळत अनुकरण केले जाते. परंतु हे झटके अनियमित, अतिरेकी व दीर्घकालीन असतात. दुसऱ्या निद्राभ्रमण या उन्मादी प्रकारात रुग्ण झोपेतून उठून चालतो व हेतूप्रमाणे संयोजित क्रिया करतो, तसेच त्याला ह्या अवस्थेत त्याने काय केले हे आठवत नाही त्यामुळे ह्या अवस्थेत केलेल्या कृत्यांबद्दल त्याला दोष मिळत नाही. (२) मंद क्रियाशीलता (अंडरॲक्टिव्हिटी): गलितगात्रावस्था (लॅसिट्यूड), अलिप्तता (विथ्ड्रॉअल), मनोप्रेरक वर्तनमांद्य (सायकोमीटर रिटार्डेशन), वर्जन (अव्हॉइडन्स), मूकता (म्यूटिझम), तंद्रावस्था (स्ट्यूपर), अर्भकीय अभिप्रावस्था वा स्वलीनता (ऑटिझम) ह्यांचा ह्या प्रकारात अंतर्भाव होतो.
सकाळचा गळाठा व निष्क्रियता तसेच कमालीचा थकवा हे मानसिक अवसादाचे प्राथमिक लक्षण सामान्य असते. भयगंड व भावातिरेकी सक्तीयुक्त कृती विकारात ज्या वस्तू वा परिस्थितीबद्दल अवास्तव व अतिरेकी भीती वाटते, ती वस्तू वा परिस्थिती टाळण्याची वा तीपासून दूर जायची वृत्ती लक्षणीय असते. उदा., कुत्री जेथे असतात, ती जागा टाळून लांबून जाणे. ह्याला भयगंडी पलायन (फोबिक अव्हॉइडन्स) असे म्हणतात.
मानसिक अवसादाची प्रमुख वर्तनलक्षणे उद्दीपनाच्या उलट असतात. मनोप्रेरक मांद्यामुळे अशा रुग्णांच्या एकंदर हालचाली मंदावतात. बोलणे निमित्तमात्र होते तसेच नेहमीची कामे करणे अत्यंत जड जाते. परंतु प्रचंड आळस व निष्क्रियता, घरातच पडून रहाणे, स्वच्छता व टापटिपीकडे पूर्ण दुर्लक्ष करणे ही लक्षणे बहुतेक छिन्नमानसी प्रकारात सुरुवातीस आढळतात. ध्यानावस्थी छिन्नमानसात रुग्ण पुढे पूर्ण निश्चल होऊन पुतळ्यासारखा एकाच शरीरावस्थेत राहतो (पॉश्चरायझेशन). त्याचा अहम् निकामी झाल्यामुळे काही वेळा असा रुग्ण इतरांचा आज्ञाधारक गुलाम बनतो. ही स्वयंचलित आज्ञाधारकता असते. तसेच त्याला इतर हलवतील व ठेवतील त्या शरीरावस्थेत बराच काळ तो राहतो. ह्या सर्वाचा शेवट म्हणजे तंद्रावस्थेत निश्चल व निर्जीव रहाणे (स्ट्यूपर). अभिप्रावस्था वा स्वलीनता ह्या एका अर्भकीय मनोविकारात मूल आईवडिलांच्या व भावंडांच्या मायेला प्रतिसाद देऊ शकत नाही व निर्विकारपणे डुलत किंवा विक्षिप्त चाळे वरील कोपऱ्यात बसून राहते. (३) उपर्युक्त दोन वर्गांबाहेरील वर्तनविकृती : विक्षिप्त चाळे (मॅनरिझम्स), तऱ्हेवाईक आणि साचेबंद वर्तन (स्टेरिओटायपी), वर्तनसातत्य (पर्सेव्हरेशन), अनियंत्रित मलमूत्रउत्सर्जन (एन्कोप्रेसिस-एन्यूरीसिस), प्रत्युद्गार (एकोलेलिआ), प्रतिवर्तन वा अनिच्छानुकरण (एकोप्रॅक्शिआ), ऋणरोध (नेगेटिव्हिझम), लैंगिक अपमार्गण (सेक्शुअल डिव्हीएशन) उदा., लैंगिक वस्तुकामुकता, समलिंगी कामुकता, बालकामुकता, स्वपीडन व परपीडन, वेषांतरण आणि प्रतिलैंगिकता [⟶ लैंगिक अपमार्गण].
बौद्धिक वाढ न झाल्यामुळे वयाने व शरीराने वाढलेली मनोविकल मुले अगदी लहान मुलांसारखी वागतात. काही तीव्र प्रकारांत मलमूत्रउत्सर्जनावरही त्यांचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांना बाळाप्रमाणे सांभाळावे लागते. परंतु परागती (रिग्रेशन) या लक्षणात जीर्ण छिन्नमानसी, तसेच तीव्र बुद्धिभ्रंशाचे रुग्ण मलमूत्रउत्सर्जनावरील नियंत्रण गमावल्यामुळे कपड्यातच घाण करतात अथवा विष्ठा अंगाला फासतात.
छिन्नमानसात विक्षिप्तपणा हे आणखी एक प्रचलित व प्रमुख लक्षण आहे. उदा., विचित्र चाळे, आरशात तासन्तास बघत राहून हातवारे करणे, स्वतःशीच हसत रहाणे, ध्यानावस्थी प्रकारात ठराविक साचेबंद पुनरावृत्त व निरर्थक अशा हालचाली केल्या जातात. उदा., एकाच जागेवर मागेपुढे करीत रहाणे, तसेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता तोच प्रश्नच पुन्हा विचारला जातो (प्रत्युद्गार). प्रतिवर्तन ह्या लक्षणात समोरील व्यक्ती करील तशाच हालचाली रुग्ण करतो. वर्तनसातत्य ह्या लक्षणात ध्यानावस्थी रुग्ण एक कृती करायला लागल्यावर तीत बदल करू शकत नाही. उदा., जेवून झाले तरी ताटापासून तोंडाकडे हात नेत राहतो.
उन्मादी बोधविच्छेदनाचा एक विशिष्ट विकार म्हणजे बुद्धिभ्रंशाभास. ह्या विकारात रुग्ण काही काळ बुद्धी व स्मृती लोपल्यासारखा किंवा वेड लागल्यासारखा वागतो. असे वर्तन आरोपींत किंवा कैद्यांत शिक्षा टाळावी ह्या अर्धवट जाणिवेतल्या हेतूने घडते.
व्यक्तित्त्व विकार किंवा व्यक्तित्व गुणविशेष विकार (पर्सनॅलिटी ट्रेट डिस्ऑर्डर) ह्या विकृतीत आधी न दिलेली काही लक्षणे उल्लेखनीय आहेत. विकृत संताप तसेच अनियंत्रित आक्रमकता या लक्षणांमुळे व्यक्ती एकदम भडकते आणि आक्रस्ताळी व हिंसक वर्तन करते विशेषतः मुलांना वा पत्नीला बदडून काढते. अपघाती वृत्ती (ॲक्सिडेंट प्रोननेस) ह्या लक्षणात व्यक्ती कळत-नकळत अपघातात पुन्हा पुन्हा सापडते, तसेच अनुभवाने सुधारत नाही. तुफानी वेगाने दुचाकी चालविण्यामागे बऱ्याच वेळा आत्मघातकी मनोगतिकी असते.
संदर्भ : 1. Cavner, J. O. Brodie, H. K. H. Ed. Signs and Symptoms in Psychiatry, Philadelphia, 1983.
2. Hamilton, Max, Ed. Fish’s Clinical Psychopathology, Bristol, 1974.
3. Kaplan, H. J. Sadock, B. J. Ed. Comprehensive Textbook of Psychiatry, Fifth Vol. Part, I & II, Baltimore, 1989.
शिरवैकर, र. वै.
“