वर्मा, भगवतीचरण : (३० ऑगस्ट १९०३-५ ऑक्टोबर १९८१). आधुनिक हिंदी कादंबरीकार, कथाकार व कवी. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील उन्नाओ जिल्ह्यात शफीपूर या छोट्या खेड्यात झाला. शिक्षक जगमोहन विकसित यांच्या प्रेरणेने भगवती चरणांनी मैथिलीशरणांचे भारतभारती काव्य अभ्यासले व त्या प्रभावातून सातव्या इयत्तेत असल्यापासूनच ते स्वतः कविताही रचू लागले. बी.ए. (१९२६), एल् एल्.बी. (१९२८) झाल्यावर १९३५ पर्यंत त्यांनी वकिली केली. काही काळ ते भदरी संस्थानाधिपतींच्या दरबारी होते. पुढे त्यांनी कलकत्त्यात विचार साप्ताहिकाचे संपादक म्हणून (१९४०-४२) तसेच मुंबईत चित्रपटसृष्टीत पटकथाकार म्हणून (१९४२-४७) काम केले. १९४८ ते १९५७ पर्यंत ते लखनौ येथील नवजीवन या दैनिकाचे संपादक होते. १९५० पासून त्यांची आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर हिंदी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. उत्तर प्रदेशातील ‘भारती’ या साहित्यिक संस्थेचे संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले.
वर्मांच्या साहित्यसेवेचा प्रारंभ कवितांनी झाला. मधुकण हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर प्रेम-संगीत (१९३७) व मानव (१९४०) हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशिक झाले. त्यांच्या कवितेवर प्रारंभी छायावादाचा प्रभाव असला, तरी एका विशिष्ट वादाला धरून अशी त्यांची कविता पुढे राहिली नाही. मानवतावादी दृष्टिकोण त्यांच्या सर्व लेखनातून प्रकट होतो. त्यांचा भाग्यवादावर (दैववादावर) विशेष विश्वास होता. कविता छंदोबद्ध असावी, असा त्यांचा आग्रह होता. एक प्रकारची बेहोषी, कलंदरपणा व स्वच्छंदतावादी वृत्ती हे विशेष त्यांच्या काव्यात आढळतात. पतन ही त्यांची पहिली कादंबरी (१९२८). त्यानंतरची चित्रलेखा (१९३३) ही त्यांची कादंबरी अत्यंत गाजली. सु. दोन लाखांपर्यंत (सु. २५ आवृत्या) खप झालेल्या या कादंबरीने लेखकाला दिगंत कीर्ती मिळवून दिली. अनेक भारतीय भाषांत व इंग्रजीतही या कादंबरीचे भाषांतर झाले. या कादंबरीच्या आधारे चित्रपटही तयार करण्यात आला. गुप्त साम्राज्यकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारलेल्या चित्रलेखा या कादंबरीत पाप व पुण्य यांच्यासंबंधीची नैतिक मूल्यांचा आधार असलेली किंवा प्रवृत्ती व निवृत्ती यांची बैठक असलेली परंपरागत कल्पना माणसाच्या स्वभावाच्या संदर्भात पारखून घेऊन त्यांनी त्याज्य ठरवली. माणसाच्या खऱ्या प्रेमाची वाट वासनेतून व प्रवृत्तीतून जात असते व खरे प्रेम हेच त्याच्या जीविताचे साफल्य, असे त्यांनी या कादंबरीत दाखविण्याचा प्रयत्न केला. तीन वर्ष (१९३६) ही सामाजिक कादंबरी म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीने दिपून गेलेल्या तरुणाच्या व्यथेची कथा आहे. टेढे-मेढे रास्ते (१९४७) या राजकीय-सामाजिक पार्श्वभूमीवर आधारलेल्या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध विचारसरणी (सामंतवाद, गांधीवाद, दहशतवाद, साम्यवाद, क्रांती इ.) व त्यांचे संघर्ष चित्रित केले आहेत. आखिरी दाँव (१९५०) ही कादंबरी एका जुगारी परंतु माणुसकीचा उमाळा असलेल्या प्रेमिकाची शोकांतिका आहे. भूले-बिसरे चित्र (१९५९) मध्ये देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील तीन पिढ्यांचे चित्रण आहे. या कादंबरीत वस्तुतः समाजाचे व्यापक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या सर्व कादंबरीवाङ्मयात ही श्रेष्ठ कृती मानली जाते. अपने खिलौने (१९५७) या कादंबरीत दिल्लीतील अत्याधुनिक समाजावर व्यंगात्मक औपरोधिक भाष्य आहे. एकांकिकाकार व नाटककार म्हणूनही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. बुझता दीपक (१९५०) हा एकांकिका-संग्रह रुपया तुम्हे खा गया (१९५५) हे नाटक महाकाल, कर्ण व द्रौपदी या नमोनाट्यांचा एकत्रित संग्रह-त्रिपथगा (१९५६) वासवदत्ता ही चित्रपटकथा व ये सात और हम ही साहित्यिकांची व्यक्तिचित्रे या त्यांच्या इतर उल्लेखनीय साहित्यकृती होत. इन्स्टॉलमेंट (१९३६), दो बाँके (१९४१), राख और चिनगारी (१९५३), मोर्चाबंदी (१९७६) हे त्यांचे कथासंग्रह आहेत. लखनौमधील वातावरणावरील ‘दो बाँके’ ही त्यांची कथा व समाजातील धार्मिक कर्मकांड व त्यात लपलेल्या स्वार्थी वृत्तीवर प्रकाश टाकणारी ‘प्रायश्चित्त’ ही गोष्ट ह्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक मानसन्मान लाभले : त्यांच्या भूले बिसरे चित्र या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९६१) लाभला. राज्यसभेचे सन्माननीय सदस्य (१९७८), तसेच आकाशवाणीचे हिंदी सल्लागार म्हणूनही त्यांनी कार्य केले. त्यांना ‘पद्मभूषण’ किताबही (१९७१-७२) लाभला. प्रेमचंदांच्या नंतर समाजातील स्थित्यंतरांचे साहित्याच्या माध्यमातून इतके प्रभावी व प्रत्ययकारी चित्रण भगवतीबाबूंनीच केले. उपरोधप्रचुर, व्यंग्यात्म चित्रण हे त्यांच्या शैलीचे बलस्थान होय. सूक्ष्म परिहासपूर्ण विनोद, सामाजिक राजकीय जीवनाचे वास्तव चित्रण, सूचक आदर्श ही वैशिष्ट्ये वर्माजींच्या गद्य कृतींत दिसून येतात. एक दिन (१९४०), हमारी उलझन (१९४७) हे त्यांचे निबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत. धुप्पल या छोट्या आत्मवृत्तात त्यांनी आपल्या प्रदीर्घ, संघर्षमय, सक्रिय जीवनाचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
दुबे, चंदुलाल द्रविड, व्यं. वि.
“