वर्मा, धीरेंद्र : (१७ मे १८९७-?-१९७३). भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक आणि हिंदी भाषेचे विद्वान प्राध्यापक. यांचा जन्म बरेलीमध्ये मोठ्या जमीनदार घराण्यात झाला. लहानपणी त्यांचे वडील खानचंद यांच्या धीरेंद्र वर्मासंस्कारांतून आर्यसमाजी वातावरणाचा व भारतीय संस्कृतीचा मोठाच प्रभाव त्यांच्यावर पडला. १९२१ मध्ये ते ‘म्यूर सेंट्रल कॉलेज’, अलाहाबाद येथून संस्कृत घेऊन एम्. ए. झाले. १९३४ मध्ये ते पॅरिसला गेले व प्रख्यात फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ झ्यूल ब्‍लॉक यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रज भाषा या विषयावर शोधप्रबंध (१९३५) लिहून त्यांनी डी.लिट्. पदवी मिळविली. अलाहाबाद विश्वविद्यालयात हिंदीचे पहिले अध्यापक म्हणून नेमणूक झाली (१९२४). नंतर तेथेच प्राध्यापक व हिंदी विभागप्रमुख म्हणून ते काम पाहू लागले व तेथूनच निवृत्त झाले. त्यानंतर सागर विद्यापीठात भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९२७ पासून ते ‘हिंदुस्थानी ॲकेडमी’ या संस्थेचे सदस्य म्हणून व नंतर चिटणीस म्हणून काम पहात होते. १९५८-५९ मध्ये ‘लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेचे ते अध्यक्ष होते. ते जबलपूर विद्यापीठाचे उपकुलगुरू होते.

हिंदी साहित्यातील संशोधनकार्यात त्यांचे स्थान विशेष महत्‍त्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक संशोधकांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. विद्यापीठातून हिंदी भाषा व साहित्य यांचा अभ्यास योग्य तऱ्हेने व्हावा, यासाठी त्यांचे प्रयत्‍न बऱ्याच प्रमाणात कारणीभूत झाले. त्यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली तयार झालेला हिंदी साहित्य कोश (भाग २ १९५८ व १९६३) हे हिंदी भाषा-साहित्याच्या क्षेत्रातील एक अत्यंत मौलिक व संस्मरणीय कार्य आहे. त्यांचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ पुढीलप्रमाणे : हिंदी भाषा का इतिहास (१९३३), ब्रज भाषा व्याकरण (१९३७), अष्टछाप (१९३८), सूरसागर-सार (सूरदासाच्या निवडक ८१७ पदांचे संकलन-संपादन १९५४), ब्रज भाषा (मूळ फ्रेंच प्रबंधाचे हिंदी रूपांतर १९५७), हिंदी साहित्य (संपादन, १९५९), ग्रामीण हिंदी, हिंदी राष्ट्र, विचारधारा हा निबंधसंग्रह इत्यादी. यांखेरीज महाविद्यालयीन विद्यार्थिदशेतील १९१७ ते १९२३ या कालावधीत लिहिलेली मेरी कालिज डायरी (१९५४) भारतीय संस्कृतीसंबंधी व्याख्यानांचा मध्यदेश हा ग्रंथ (१९५५) कंपनीके पत्र (संपादन, १९५९) यूरोपके पत्र हा यूरोपहून पाठविलेल्या पत्रांचा संग्रह हे त्यांचे विविध विषयांवरील उल्लेखनीय ग्रंथ होत.

दुबे, चंदुलाल द्रविड, व्यं. वि.