दादूदयाल : (सु. १५४४–१६०३). दादूदयाल हे दादू पंथाचे प्रवर्तक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म गुजरातमध्ये अहमदाबाद येथे झाला. त्यांच्या जन्मतिथीसंबंधी दोन मते आहेत: बडथ्वाल, परशुराम चतुर्वेदी इ. संशोधक त्यांचा जन्म १५४४ मध्ये झाला असे समजतात, तर रायकुमार वर्मा तो १६०१ मध्ये झाल्याचे मानतात. त्यांचा जन्म १५४४ मध्ये झाला, हे मत अधिक ग्राह्य वाटते. ते गुजराती नागर ब्राम्हण होते की धुनिया जातीचे होते, याविषयीही वाद आहे पण त्यांच्याच रज्जब नावाच्या शिष्याच्या साक्षीवरून ते धुनिया जातीत जन्मले असावेत, असे वाटते. ते मुसलमान होते, त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांना गरीबदास व मिस्कीनदास नावाचे दोन पुत्र होते, असे त्यांच्या पंथात मानले जाते.

दादूदयाल समाजसुधारक, धर्मसुधारक व रहस्यवादी कवी होते. १५७३ मध्ये सांभर येथे ते राहू लागले. तत्पूर्वी भारताची तीर्थयात्रा करून त्यांनी खूप अनुभव मिळवला होता. ते प्रतिभाशाली कवी होते. हळूहळू त्यांच्या अवतीभवती शिष्यसमुदाय जमू लागला. ज्या जागी हा सत्संग होत असे, त्या जागेला ‘अलख दरीबा’ म्हणत. त्यांच्या संप्रदायाला ‘ब्रह्म संप्रदाय’, ‘परब्रह्म संप्रदाय’ व नंतर ‘दादू संप्रदाय’ किंवा ‘दादू पंथ’ इ. नावे मिळाली. दादूदयालांच्या वेळी हा पंथ अतिशय लोकप्रिय होता. या पंथात रज्जब, सुंदरदास, गरीबदास, जनगोपाल, जगजीवन इ. कितीतरी प्रसिद्ध साधक होऊन गेले. सु. शंभर वर्षांनंतर या पंथाचे अनेक उपपंथ झाले. दादूदयालांनी सु. वीस हजारपर्यंत पदे व साखी लिहिल्या पण त्यांपैकी फारच थोडी रचना आज उपलब्ध आहे. त्यांची एक संकलित रचना अनभैवाणी नावाने प्रसिद्ध आहे. पुढे तिची अनेक संस्करणे झाली. त्यांचे शिष्य संतदास आणि जगन्नाथदास यांनी ‘हरडे वाणी ’ नावाचे संकलन तयार केले होते.

दादूदयालांच्या विचारांवर कबीरदासांचा मोठा प्रभाव पडल्याचे दिसते. ते मूलतः निर्गुणवादी असूनही त्यांनी ईश्वराच्या सगुण रूपाला मान्यता दिली. भक्तिमार्गावर त्यांची अढळ श्रद्धा होती. मुख्यतः त्यांची रचना व्रजभाषेत असली, तरी राजस्थानी आणि खडीबोलीचे मिश्रणही तीत आहे. त्यांची भाषा साधी, सुबोध व ओजस्वी आहे.

दादूंची वाणी कबीरांच्या वाणीइतकीच सामर्थ्यशाली आहे. त्यांच्या साधनापद्धतीत वैष्णवांची अहिंसा, योगमार्गातील चित्तवृत्तिनिरोध, सूफींची प्रेमसाधना, संतमतातील शब्दयोग या सर्वांचा समन्वय साधला आहे. गुरू आणि गोविंद यांचे ऐक्य, नाममाहात्म्य,आत्मसमर्पणाची भावना, जगन्मिथ्या सिद्धांत, मायाबद्ध जीव, परब्रह्माविषयी उत्कट विरह, उच्च नैतिक जीवनादर्श इ. विषयांवर त्यांची रचना असून कबीर मताशी तिचे खूपच साधर्म्य आहे. मात्र दादूंचे व्यक्तिमत्व कबीरांसारखे उग्र, आक्रमक नसून सरळ, विनम्र, दयाळू आणि प्रेमळ आहे. निर्गुण संप्रदायात कबीरांनंतर दादूंचेच नाव मुख्यत्वे घ्यावे लागेल.

दादूंचा मृत्यू ज्या नराने येथील गुहेत झाला (सांभरजवळ) तेथे दर वर्षी फाल्गुन महिन्यात दादू पंथातील अनुयायांचा मेळावा भरतो. दादू पंथाचे हे प्रमुख स्थान असून तेथे दादूंचे केस, वस्त्रे, खडावा आजही सुरक्षित आहेत.

संदर्भ : सिंह, दलगंजन,संपा. दादू दयालजी की वाणी, जयपूर, १९४९.

बांदिवडेकर, चंद्रकांत