वनस्पतिसंग्रह : (हर्बेरियम). शास्त्रीय अभ्यासासाठी वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांची निरीक्षणे करावी लागतात. पृथ्वीवरील सर्व वनस्पती एकाच बागेत असणे शक्य नाही. शिवाय वर्षातील सर्व ऋतूं त वनस्पतीचे पाने, फुले, फळे इ. सर्व भाग मिळतातच असे नाही म्हणून निरीक्षणाच्या वेळी वनस्पतीचा कोणताही भाग उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचा संग्रह करून ठेवावा लागतो. अनेक ठिकाणांहून वेळोवेळी येणाऱ्या संदिग्ध वनस्पतींची निश्चिती करण्याकरिता त्यांची ज्ञात वनस्पतींशी तुलना करून त्यांची ओळख पटवून घेणे, न पटल्यास त्या नवीन आहेत हे निश्चित ठरविणे व त्यांची नोंद करून त्या परिरक्षित करणे (जपून ठेवणे) या महत्त्वाच्या गोष्टींकरिता अशा संग्रहाची फार आवश्यकता असते. 

अठराव्या शतकाच्या मध्यास स्वीडनमध्ये⇨कार्ल लिनीअस ह्या श्रेष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञांनी वनस्पतिसंग्रहाचा उपयोग वनस्पतींचे वर्गीकरण व त्यांची शास्त्रीय नावे निश्चित करण्याकरिता अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन करून ह्या कल्पनेस मूर्त स्वरूप दिले, त्यांच्या शिष्यवर्गाने जगातील बऱ्याच भागांतून वनस्पतींचे असंख्य नमुने वाळवून स्वीडनला पाठविले. अशाच वनस्पतिसंग्रहाचाच्या साहाय्याने प्रत्येक वनस्पतीस शास्त्रीय नाव दिले गेले व त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. लिनीअस यांच्या नंतर थोड्याच काळात वनस्पतिसंग्रहाचे महत्त्व पटून यूरोपातील अनेक देशांत वनस्पतिसंग्रह स्थापन करण्यात आले व त्यांचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. ब्रिटनमधील ब्रिटिशम्युझियम व क्यू शास्त्रीय उद्यानातील वनस्पतिसंग्रह ह्या संस्था प्रसिद्ध आहेत.  

ब्रिटिश म्युझियममध्ये⇨सर जोसेफ बँक्स व⇨रॉबर्ट ब्राऊन यांच्या ऑस्ट्रेलियातील वनस्पतींचा समावेश होतो. क्यू येथील जगप्रसिद्ध वनस्पतिसंग्रहाची स्थापना १७५९मध्ये झाली. पुढे त्याची प्रचंड वाढ⇨सर विल्यम जॅक्सन हूकर व ⇨सर जोसेफ डाल्टन हकर यांनी केली. ह्या संग्रहात जगातील जवळजवळ प्रत्येक वनस्पतीच्या नमुन्यांचा संग्रह केला आहे. एकंदर नमुन्यांचा संग्रह जवळजवळ ६५लाखांच्या आसापास आहे. दरवर्षी ५०,०००ते ८०,०००नमुन्यांची त्यात भर पडत असते. येथील उष्ण कटीबंधीय ऑर्किडे व नेचे, रसाळ वनस्पती आणि आस्ट्रेलियातील वनस्पती यांचा संग्रह उत्कृष्ट आहे. येथे वस्पतिविज्ञानाच्या प्रत्येक शाखेत मान्यताप्राप्त शास्त्रज्ञ काम करतात. येथे वनस्पति-आनुवंशिकी व वर्गीकरणविज्ञान यांकरिता स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. येथील वनस्पतिविषयक निर्णय फार महत्त्वाचे मानले जातात, म्हणून क्यू वनस्पतिसंग्रह जगातील वनस्पती ओळखण्याचा मानदंड समजला जातो. क्यू शास्त्रीय उद्यानातर्फे क्यू बुलेटीनइंडेक्स क्यूएन्सीस यांचे प्रकाशन होते आणि दर पाच वर्षांनी त्यांच्या पुरवण्या प्रसिद्ध करण्यात येतात. लिनीअस यांच्या काळापासूनच्या सर्व उच्च दर्जाच्या वनस्पतींची नोंद येथे करण्यात आलेली आहे. एडिंबरो येथील वनस्पतिसंग्रहात२०लाख नमुने असून त्यांत चीन व तिबेटमधील वनस्पतीही आहेत. स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथील वनस्पतिसंग्रहात भूमध्यसामुद्रिक व मध्य आशियातील वनस्पतींचा समावेश होतो.⇨ ऑगस्टीन पीराम दे कांदॉल यांची वनस्पति विषय ग्रंथमाला येथेच रचली गेली. जर्मनीमध्ये गटिंगेन व बर्लिन येथील वनस्पतिसंग्रह प्रसिद्ध आहेत. बर्लिनमधील संग्रह अद्ययावत असून सुप्रसिद्ध वनस्पतिवैज्ञानिक ⇨आडोल्फ एंग्लर यांनी जमविलेल्या वनस्पतींचे अनेक दुर्मिळ नमुने येथे आहेत. एंग्लर यांची वनस्पतीच्या वर्गीकरणविषयक जगप्रसिद्ध ग्रंथांची माला येथूनच प्रसिद्ध झाली. ह्याशिवाय यूरोपमध्ये व्हिएन्ना, कोपनहेगन, लेनिनग्राड व अप्साला येथील वनस्पतिसंग्रह प्रसिद्ध आहेत. ह्या वनस्पतिसंग्रहातील काही भाग दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाला व तो परत भरून काढण्याचे बऱ्याच देशांनी प्रयत्न चालविले आहेत. 

अमेरिकेत हार्व्हर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ ⇨ॲसाग्रे ह्यांचा मोठा संग्रह आहे. सरकारी वनस्पतिसंग्रह वॉशिंग्टन येथे आहे. ह्याशिवाय न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डन, मिसूरी बोटॅनिकल गार्डन येथे प्रसिद्ध वनस्पतिसंग्रह आहेत. जगातील इतर भागांत देखील प्रत्येक वनस्पतिविषयक केंद्रास अशी संग्रहालये जोडलेली आहेत.   

भारतातील सर्वात मोठा व जुना वनस्पतिसंग्रह कलकत्ता येथे आहे. १७८७मध्ये विल्यम जोन्स यांनी सुरुवात केलेल्या शाही संग्रहालयाचा छोटा भाग म्हणून या वनस्पतिसंग्रहाची सुरुवात झाली. पुढे १८१४ मध्ये नाथानिएल वालिंच यांच्या खटपटीने वनस्पतिसंग्रहाची झपाट्याने वाढ झाली. आता ह्या संग्रहाच्या पाच मजली इमारतीत वनस्पतींचे जवळजवळ १५लाख नमुने असून भारतातील व आग्नेय आशियाई देशांतील वनस्पतींचा त्यांत समावेश होतो. शिवाय जगातील बहुतेक वनस्पतींचे नमुने येथे आढळतात. ह्याशिवाय अनेक दुर्मिळ पुस्तके, अद्ययावत ग्रंथालय व भारतातील व आग्नेय आशियाई देशांतील वनस्पतींचा त्यांत समावेश होतो. शिवाय जगातील बहुतेक वनस्पतींचे नमुने येथे आढळतात. ह्याशिवाय अनेक दुर्मिळ पुस्तके, अद्ययावत ग्रंथालय व भारतातील प्रसिद्ध⇨शास्त्रीय उद्यान ह्या संग्रहाशी संलग्न केलेली आहेत. भारतातील वनस्पतिविषयक समस्यांचा निर्णय येथून दिला जातो. हल्ली हा संग्रह ⇨ भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या कक्षेत येतो. डेहराडून येथे जंगलविषयक महत्त्वाच्या वनस्पतींचा संग्रह असून त्यात मुख्यत्वेकरून हिमालयातील वनस्पतींचा समावेश होतो. शिलाँग येथे आसाम व मणिपूर येथील वनस्पतींचे संग्रह आहेत. पुणे येथे पश्चिम घाट, मराठवाडा, गुजरात व कर्नाटक येथील वनस्पतींचा संग्रह आहे. कोईमतूर येथे दक्षिण भारतातील वनस्पतींचा संग्रह आहे. भारतातील प्रत्येक विद्यापीठाच्या वनस्पतिविषयक शाखेत वनस्पतिसंग्रहांची वाढ होत आहे. मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजचा संग्रह अद्ययावत असून दक्षिण भारतातील वनस्पतींनी परिपूर्ण आहे. भारतातील प्रसिद्ध वनस्पतिवैज्ञानिक इ. ब्लॅटर, जे. एफ्‌. आर्‌. आल्मेईदा व एच्‌. सांतापाव यांनी येथेच काम केले.  

वनस्पतिसंकलन : वनस्पतिसंग्रहामध्ये प्रत्येक वनस्पतीचे संकलन करणे फार महत्त्वाचे आहे. या संकलनाचे मूलतः सहा भाग पडतात : (अ) वनस्पती गोळा करण्याकरिता लागणारे साहित्य, (आ) वनस्पतींची निवड, (इ) नोंदवहीचा उपयोग, (ई)वनस्पती सुकविणे,  (उ) सुकलेल्या वनस्पतींवरील इतर संस्कार व (ऊ) आरोपणपत्राचा उपयोग. 

(अ) वनस्पती व आनुषंगिक माहिती गोळा करण्याकरिता लागणारे साहित्य : (१) वनस्पतिसंग्राहक पेटिका, (२) शिकारी चाकू,  (३) बृहदर्शकभिंग, (४) नोंदवही व पेन्सिल, (५) काठी, (६) वनस्पती कापण्याची हत्यारे, (७) होकायंत्र, नकाशा, उंचीदशर्क, (८) कॅमेरा,  (९) वनस्पतिदाबक, (१०) वनस्पति-क्रमांक पुस्तक (११) पोलादी टेप, फूटपट्टी, रंगदर्शक सुया, दाढीचे पाते, (१२) प्रथमोपचार पेटी, वैयक्तिक कपडे आणि सामान.  


आ. १. (अ) वनस्पतिसंग्राहक पेटिका (आ) वनस्पतिदाबक.(आ) वनस्पतींची निवड : प्रत्येक वनस्पतीचे निदान सहा नमुने गोळा करावे, गवतासारखी वनस्पती मुळासकट घ्यावी, वृक्ष, झुडपे, औषधी इत्यादींच्या फांद्यांचे नमुने आरोपणपत्रावर बसतील (४०×२७सेंमी.) इतपतच असावेत, फुलांना वर्गीकरणामध्ये फार महत्त्व असल्याने नमुन्यात हा भाग अवश्य असावा. 

(इ)नोंदवही व क्रमांकवही : यांचा उपयोग गोळा केलेल्या वनस्पतींना क्रमांक देणे व त्यांचा तपशील लिहून काढणे हा असतो. तपशिलात वनस्पतीचे स्थानिक नाव, वनस्पतीचा प्रकार व प्रमाण, जमिनीचा प्रकार, फुलांचा रंग, फळ व बीजाबद्दल माहिती व त्यांचा बहर असल्यास त्याची नोंद, स्थानिक उपयोग व वनस्पती गोळा केल्याचा दिनांक अवश्य नमूद करावा.

(ई)वनस्पती सुकविणे : वनस्पतीचे मूळ स्वरूप बदलू न देता तिचे निर्जलीकरण करणे. टीपकागदात किंवा वर्तमानपत्रात वनस्पती ठेवून त्या वनस्पतिदाबकात ठेवतात व दिवसातून कमीतकमी दोन वेळा कागद बदलतात. हा क्रम वनस्पती उकळत्या पाण्यात काही मिनिटे ठेवून नंतर वाळवतात. जलवनस्पतीकरिता टीपकागद व जाळी यांचा उपयोग करतात. प्रथम ती वनस्पती पाण्यात टीपकागदावर व्यवस्थित पसरून नंतर जाळीने बाहेर काढून वाळवितात.  

(उ)वनस्पतींवरील इतर संस्कार : वनस्पती सुकल्यानंतर तिला कीड लागू नये म्हणून तिच्यावर मर्क्युरिक क्वोराइडचा विषारी द्राव लावतात किंवा वायुकोठीमध्ये काही काळ ठेवतात. दर १०वर्षांनी ही क्रिया करावी लागते.  

(ऊ)आरोपणपत्राचा उपयोग : ह्या कागदाचे सर्वमान्य आकारमान ४०× २७सेंमी. असते, ह्या कागदावर वनस्पती सरसाने चिकटवितात व दोऱ्याने शिवतात. आरोपणपत्राच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात त्या वनस्पतीचा तपशील देतात. असा पूर्ण झालेला नमुना मग संग्रहालयात वर्गीकरण करून ठेवला जातो.  

याशिवाय वनस्पतीचे अवजड भाग किंवा सुकविताना बिघडणारे भाग परिरक्षक द्रवात घालून त्यांवर त्या वनस्पतीचा तपशील लावून काचेच्या मोठ्या पात्रात ठेवतात.

वनस्पतीचे नाव ज्या एका विशिष्ट नमुन्यावरून ठरविले जाते ती नमुनापत्रिका फार महत्त्वाची असते व तिची विशेष काळजी घेतली जाते. अशा नमुन्यांच्या संख्येवरून त्या त्या संग्रहाची श्रेष्ठता ठरविली जाते.  

प्रत्येक वनस्पतिसंग्रहात वनस्पतिपत्रके भरलेली असतात. त्यांवरून एखादी विशिष्ट वनस्पती कोठे किती प्रमाणात सापडेल, फुले, फळे येण्याचा काळ व संग्राहकाची नोंदवही, क्रमांक इ. माहिती चटकन समजते. या पत्रकात त्या वनस्पतीविषयी इतर संदर्भही दिलेले असतात, त्यांवरून वनस्पतिसंकलन कमी श्रमात करता येते.   

वर्तक, वा. द.

आ. २. उष्णदाबकवनस्पतिसंग्रहातील वर वर्णन केलेल्या पारंपरिक पद्धतीने बनविलेले नमुने मूळच्या स्वरूपात टिकून न राहता कालांतराने त्यांत हवामानादी भौतिक व रासायनिक घटकांमुळे आणि तसेच कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व कीटक यांसारख्या काही सजीवांमुळे बरेच फरक पडत जातात व त्यामुळे मूळची वनस्पती ओळखणे कठीण जाते. ही अडचण दूर करून मूळचे स्वरूप टिकवून ठेवता येईल असे तंत्र शोधून काढण्याचे बरेच प्रयत्न कित्येक पाश्चात्त्य व भारतीय शास्त्रज्ञांनी केले. त्यामध्ये श्यामला डी. चितळे व डी. व्ही. चितळे ह्या भारतीय शास्त्रज्ञ दांपत्याने १९६६मध्ये शोधून काढलेल्या तंत्राची रुपरेखा पुढे दिली आहे. पाने व फुले असलेली फुलझाडाची फांदी किंवा मुळांसह लहान रोपटे प्रथम स्वच्छ करून ते चार पाच मिनिटे पुढील टॅनीन-मिश्रणात बुडवून काढावे. ५००मिलि. पाण्यात ५-१०ग्रॅ. टॅनीन पूड घालून अगंज (स्टेनलेस) पोलादाच्या भांड्यात एक उकळी येईतो गरम करून व वस्त्रगाळ करून काचेच्या अगर दुसऱ्या अंगज पोलादाच्या पात्रात हे मिश्रण झाकून ठेवून वापरावयाचे असते. असे बुडविणे न जमल्यास वनस्पतीचा नमुना स्वच्छ कागदावर पसरून त्यावर हे मिश्रण शिंपडावे व त्यानंतर चार पाच मिनिटांनी तो नमुना टीपकागदात पसरून दाबाखाली ठेवावा. एरंडेल व केरोसीन समभाग मिसळून एक लिटर मिश्रण बनवावे व त्यात १०ग्रॅ. कापराचा चुरा व १०ग्रॅ. मेंथॉल घालून ते सर्व एकजीव होऊ द्यावे. नंतर हे मिश्रण ब्रशाने पांढऱ्या कागदावर फासून त्यावर वरचा संस्कारित नमुना ठेवावावहे दुसरे मिश्रण त्यावर घालावे व दुसरा पांढरा कागद त्यावर ठेवावा. ह्यावर नंतर गरम इस्त्री फिरवून ती वनस्पती कोरडी झाल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर तो नमुना कापडाच्या घडीत ठेवून पुन्हा इस्त्री फिरवावी, ह्या प्रक्रियेने निर्जलीकरण चांगले होते. नमुन्यावर फार मिश्रण राहू देऊ नये. त्यानंतर जरूरतितक्या जाडीच्या पॉलिथिनाच्या दोन तुकड्यांत तो नुमना ठेवून व खालीवर कापड ठेवून त्यावर गरम इस्त्री दाबून फिरवावी. यामुळे ते तुकडे परस्परांस चिकटतील व नमुना त्यात बंदिस्त होऊन सुरक्षित राहील. ही प्रक्रिया करण्यास आ. २मध्ये दर्शविलेल्या प्रकारचा ‘उष्ण दाबक’ (हॉट प्रेस) वापरणे योग्य ठरते. या पद्धतीने नमुन्याचे रंग चांगले टिकतात तथापि रंगबदल टाळण्यास आवश्यक, तर टॅनिनाशिवाय सायट्रिक अम्ल वापरावे लागते. निर्जलीकरणापूर्वी लाल फुलांवर (उदा., जास्वंद) लिंबाचा रस टाकल्यास रंग टिकून राहतो. या पद्धतीत वापरलेल्या तेलामुळे तो नमुना तेल शोषून घेतो व तो अधिक पारदर्शक बनतो आणि त्यामुळे त्याची संरचना स्पष्ट दिसते, नमुन्यावर असलेल्या तेलाच्या थरामुळे त्याचे कीड व कवकांपासून संरक्षण होते. नमुना लवचिक झाल्यामुळे त्याचे तुकडे होत नाहीत, निरीक्षणात त्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट दिसतात. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अपारदर्शक नमुना अधिक चांगला तपासून बिनचूक निष्कर्ष काढणे सोपे जाते.  

संदर्भ :  1. Chitaley, S. D. Chitaley, D. V. Herbarium Specimens in Colour and Slide Invention Intelligence Vol. 2, Oct. 1966, No. 3 PP. 5-7.

            2. Raizda, M. B., Hints for Botanical Collectors, Delhi, 1941.

            3. Santapau, H. Botanical Collectors Manual, Delhi, 1955. 

            ४. वर्तक, वा. द. वनस्पति-संकलन पुणे, १९६१.

परांडेकर, शं. आ.