वनस्पतिविज्ञान : (बॉटनी). वनस्पतींची संरचना, संघटन, वाढ व विकास, त्यांच्या जीवनपद्धती, शरीरक्रिया व आनुवंशिकता, त्यांचे व्यावहारिक उपयोग इत्यादींचा सांगोपांग विचार या विज्ञानशाखेत केला जातो. सुमारे १००मी. इतक्या उंचीच्या प्रचंड वृक्षापासून तो केवळ शक्तिमान सूक्ष्मदर्शकानेच दिसू शकेल इतके लहान शरीर असणाऱ्या, तसेच गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात व भिन्न जलवायुमानाच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या) प्रदेशांतील जमिनीवर वाढणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती निसर्गात आढळतात. वनस्पति विज्ञानाचे क्षेत्र असे विस्तीर्ण व वैचित्र्यपूर्ण आहे.
खाद्य, औषधी किंवा इतरउपयोगांसाठी वनस्पतिज पदार्थांचा वापर अतिप्राचीन व इतिहासपूर्व कालापासून होत आलेला आहे. त्यापेक्षा बऱ्याच अलीकडील व प्राचीन किंवा मध्य ऐतिहासिक काळात वनस्पतींचे गुणधर्म व वर्णने देणाऱ्या संहिताही निरनिराळ्या देशांत तयार झालेल्या आढळतात परंतु आधुनिक वनस्पतिविज्ञानाचा जन्म अलीकडेच म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीस इतर विज्ञानशाखांच्या उगमाबरोबर झाला, असे म्हणता येईल. वनस्पतीच, विशेषतः त्यांच्या शरीरक्रियांचे किंवा गुणधर्मांचे अन्वेषण करण्यासाठी भौतिकी व रसायनशास्त्र या दोन विज्ञानशाखांचे अतिशय साहाय्य होते त्यामुळे भौतिक व रासायनिक प्रक्रियांसंबंधी अधिक ज्ञान झाल्यावर व सुधारलेली तंत्रे व सूक्ष्मदर्शकासारखी उपकरणे उपलब्ध झाल्यावरवनस्पतिविज्ञानाची प्रगती वेगाने होत गेली. वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान ही एकमेकांशी निगडित असल्याने ⇨शरीरक्रियाविज्ञान,⇨आनुवंशिकी, ⇨क्रमविकास (उत्क्रांती) यांसारख्या विषयासंबंधीच्या एका विज्ञानाच्या अध्ययनाचा लाभ दुसऱ्या विज्ञानाच्या अध्ययनाला होतो. सूक्ष्म वनस्पती व सूक्ष्म प्राणी यांच्याविषयीच्या अध्ययनाचा एकच स्वतंत्र विभाग [⟶ सूक्ष्मजीवविज्ञान] केला आहे. ⇨जीवाश्मांच्या (शिळारूप अवशेषांच्या) अध्ययनाने [⟶ पुरावनस्पतिविज्ञान] वनस्पतींचा इतिहास कळून घेण्यात भूविज्ञानाचे साहाय्य होते.
मुख्य विभाग : वनस्पतिविज्ञानाचे मुख्य विभाग खाली दिले आहेत.
(१) वर्गीकरणविज्ञान : व्यवस्थित वर्णनासाठी वनस्पतींच्या प्रत्येक जातीला एखादे नाव व अचूक ओळखता येईल अशी तिची लक्षणे द्यावी लागतात आणि अध्ययनाच्या सोयीसाठी वर्णन केलेल्या वनस्पतींचे वर्गीकरण करावे लागते. अशावेळी सामान्य व्यवहारातील नावे वापरणे गैरसोयीचे ठरते, म्हणून काही विशिष्ट नियमांस अनुसरून दिलेली नावेच वापरतात. ज्ञात वनस्पतींचे वर्गीकरण करून त्यांची नावे व लक्षणे देणारी जंत्री [⟶ पादपजात] तयार करणे हे या शाखेचे कार्य असते. ज्ञात जाती ओळखण्यास व नवी जाती कळून येण्यास ही जंत्री उपयुक्त असते. [⟶ वनस्पतिनाम पद्धति वनस्पतींचे वर्गीकरण, वर्गीकरणविज्ञान].
(२) वनस्पतींचे आकारविज्ञान : वनस्पतींच्या बाह्यांगांचे आकारप्रकार [⟶ आकारविज्ञान] व त्याची अंतर्रचना [⟶ शारीर, वनस्पतींचे] यांचे अध्ययन या दोन्ही गोष्टी वनस्पतिविज्ञानाचा पाया होत. बाह्यांगाचे परीक्षण सामान्यतः कठीण नसते पण अंतर्रचनांचे मात्र सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यावरच शक्य झाले. वनस्पतींचे शरीर एक अथवा अनेक ⇨कोशिकांचे (पेशींचे) बनलेले असते म्हणजेच कोशिका ही त्यांच्या शरीराचे एकक होय. शरीरातील सर्व क्रिया कोशिकांद्वारेच होतात. क्रियांच्या प्रकारास अनुरूप अशा भिन्न कोशिका व भिन्न प्रकारच्या कोशिकांनी बनलेली ऊतके व ऊतक तंत्रे वनस्पतींच्या शरीरात सामान्यतः असतात [⟶ ऊतके, वनस्पतींतील]. कोशिकांचे अध्ययन अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याची ⇨कोशिकाविज्ञान अशी स्वतंत्र शाखाच बनली आहे. प्राकल आणि प्रकल हे कोशिकांतील महत्त्वाचे जिवंत घटक [⟶ जीवद्रव्य] असून कोशिकांच्या विभाजनाने त्यांची संख्यावाढ होते. विभाजनात आढळलेल्या प्रकलाच्या अनेक अवस्थांच्या अध्ययनाने त्यांचे महत्त्व कळले व पूर्वजांचे त्यांच्या अपत्यांत उतरणारे गुण प्रकलातील रंगसूत्रामुळे [⟶ गुणसूत्र] उतरतात, हेही स्पष्ट झाले, यामुळे आनुवंशिकीची प्रगती होण्यास महत्त्वाचे साहाय्य झाले.
(३) आनुवंशिकी : माता-पित्यांची कोणती लक्षणे अपत्यांत उतरतात व त्याची यंत्रणा काय असते याचे अन्वेषण करून⇨आनुवंशिकतेची मौलिक तत्त्वे शोधण्याचे कार्य या शाखेत केले जाते. [⟶ आनुवंशिकी]
(४) शरीरक्रियाविज्ञान : वनस्पती कशी जगते वाढते आणि तिचे निरनिराळे भाग कोणते व ते कशी कामे करतात याचे अध्ययन जिवंत वनस्पतींच्या पोषण, वाढ, श्वसन, पाणी घेणे इ. सामान्य शरीरक्रियांविषयी व बाह्य उद्दीपकांना वनस्पतींकडून कसा प्रतिसाद मिळतो यासंबंधी माहिती मिळविणे हे या शाखेचे कार्य होय. भौतिकी व रसायनशास्त्र यांच्या तत्त्वांवर आधारलेले प्रयोग करून ही माहिती मिळविली जाते. [⟶ चयापचय प्रकाशसंश्लेषण वनस्पति व पाणी वनस्पतींचे चलनवलन वृद्धि, वनस्पतींची शरीरक्रियाविज्ञान, वनस्पतींचे श्वसन, वनस्पतींचे].
(५) गर्भविज्ञान : फलन झालेल्या अंदुकाचा (प्रजोत्पादक स्त्री कोशिकेचा) विकास होऊन त्याला पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत त्यात अनुक्रमाने होणाऱ्या फरकांचे अध्ययन. [⟶ गर्भविज्ञान].
(६) परिस्थितिविज्ञान : वने, मैदाने, वाळवंटे, समुद्र, सरोवरे इ. निरनिराळी परिस्थिती असलेल्या क्षेत्रांत निरनिराळ्या प्रकारच्या वनश्रींचे नमुने आढळतात, त्यांचे अध्ययन करणे हे वनस्पतिविज्ञानाचे महत्त्वाचे अंग आहे. वनस्पतींची शरीररचना त्यांच्या अधिवासाला कशी अनुरूप असते, भिन्न भिन्न परिस्थितीस अनुरूप अशी रूपांतरे किंवा अनुयोजने वनस्पतीत कशी घडून येतात, तसेच वनस्पती व परिस्थिती यांचा एकमेकांवर परिणाम होऊन वनस्पतींचे समूह कसे बदलतात व वनस्पतींचे अनुक्रमण कसे होते यांविषयी सांगोपांग अध्ययन करणे हे या शाखेचे क्षेत्र होय. [⟶ परिस्थितिविज्ञान].
(७) वनस्पति भूगोल : वनस्पतींच्या व त्यांच्या समूहांच्या पृथ्वीवरील वाटणीसंबंधीची विज्ञानशाखा. [⟶ वनस्पति-भूगोल].
(८) पुरावनस्पतिविज्ञान : खडकांत आढळणाऱ्या वनस्पतींच्या जीवाश्मांच्या अध्ययनाने गतकालीन वनस्पतींची माहिती मिळविणारी विज्ञानशाखा. [⟶ पुरावनस्पतिविज्ञान]
इतर विभाग : वनस्पतिविज्ञानाची प्रगती होत असताना एखाद्या विशिष्ट गटाचे विस्तारशः अध्ययन करण्याकडे प्रवृत्ती होऊ लागली व कवकविज्ञान, तृणविज्ञान, शेवाळविज्ञान, शैवलविज्ञान यांसारख्या शाखोपशाखांचा उगम झाला. व्यावहारिक उपयोगाच्या किंवा इष्टानिष्टतेच्या दृष्टीनेही अध्ययन होऊन इतर काही शाखा ओळखल्या गेल्या. आर्थिक वनस्पतिविज्ञान म्हणजे वनस्पतींचा आर्थिकरीत्या फायदेशीर उपयोग कसा करून घेता येईल याचा विचार, ही शाखा प्रमुख मानली जाते.⇨वनस्पतिरोगविज्ञान म्हणजे वनस्पतींचे रोग, त्यांची कारणे, त्यांचा प्रतिबंधक किंवा निर्मूलन इत्यादींचा विचार.⇨सूक्ष्मजंतुविज्ञान म्हणजे उपयुक्त रोगकारक व इतर सूक्ष्मजंतूंचे अध्ययन.वैद्यकीयवनस्पतिविज्ञान म्हणजे औषधी वनस्पतींचे व आरोग्य विधातक आणि आरोग्यप्रद वनस्पतींचे अध्ययन. कृषिविज्ञान (शेती), उद्यानविज्ञान व ⇨वनविद्या ही सर्व वनस्पतिविज्ञानावर आधारलेली आहेत. साध्यासुध्या प्राचीन जीवांच्या क्रमविकासाने आजचे जटिल जीव निर्माण झाले आहेत, ही कल्पना आता मान्य झालेली आहे व वनस्पतिविज्ञानात वनस्पतींच्या क्रमविकासाचे अध्ययन व अन्वेषण केले जाते. [⟶ क्रमविकास].
औषधी, व्यापारी, अन्न, औद्योगिक इ. विविध दृष्टींनी महत्त्वाच्या असलेल्या निरनिराळ्या वनस्पतींवर (उदा., कुचला, हिरडा, मात, कापूस वगैरे) तसेच त्यांपासून मिळणाऱ्या काही महत्त्वाच्या पदार्थांवर (उदा., डिंक, लाकूड, रेझिने इ.) मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. यांखेरीज वर्गीकरणविज्ञानानुसार केलेली व महत्त्वपूर्ण असलेली कुले व गण (उदा., कंपॉझिटी, पॅपॅव्हरेसी, ग्रॅमिनी, यूफोर्बिएसी, रूटेसी इ. कुले आणि मिर्टेलीझ, कॉनिफेरेलीझ, रूटेलीझ इ. गण) तसेच कवक, भूछत्रे, नेचे, शैवाक, शैवले, शेवाळी वगैरे महत्त्वाच्या वनस्पतींचे गट यांवर स्वतंत्र नोंदी आहेत. आडोल्फ एंग्लर, ऑगस्टिन कांदॉल, चार्ल्स डार्विन, ग्रेगोर मेंडेल, झां बातिस्त लामार्क, कार्ल लिनीअस, जोसेफ हूकर, पंचानन माहेश्वरी, बिरबल सहानी वगैरे वनस्पतिविज्ञांशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या शास्त्रज्ञांविषयी स्वतंत्र चरित्रपर नोंदी दिलेल्या आहेत.
वनस्पतीचे महत्त्व : नैसर्गिक घडामोडीत वनस्पतींचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्राण्यांच्या पोषणासाठी आवश्यक कार्बन प्राणी स्वतः निर्माण करू शकत नाहीत. तो त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने वनस्पतींपासून मिळवावा लागतो म्हणून वनस्पती असल्याशिवाय प्राणी जगू शकत नाहीत. जीव जगण्यास अनुकूलअसे वातावरणाचे रासायनिक संघटन टिकवून ठेवण्यातही त्यांचे साहाय्य होते. नैसर्गिक⇨वनश्री ही अमोल संपत्ती असून तिचा परिणाम जीवसृष्टीवर व एकूण नैसर्गिक घडामोडींवर होत असतो, म्हणून नैसर्गिक वनश्री सुस्थितीत कशी राहील व तिला सुस्थितीत राखून तिचा अधिकात अधिक उपयोग कसा करून घेता येईल, हे ठरविण्यास वनस्पतिविज्ञानाची मदत होते.
मनुष्याच्या व्यावहारिक दृष्टीनेही वनस्पती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अन्नधान्ये, वस्त्रप्रावरणे, औषधे व इतर कित्येक वस्तूंसाठी मनुष्यप्राणी फार प्राचीन काळापासून वनस्पतीवर अवलंबून राहिलेला आहे. सुधारणेबरोबर मानवी समाजाच्या गरजा वाढत गेल्या तसतसावनस्पतिज पदार्थांचा वापरही वाढत गेलेला आहे व यापुढे तो तसाच वाढत जाईल. आवश्यक त्या वनस्पतिज पदार्थांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व फायदेशीर रीतीने करता येण्यासाठी ज्या वनस्पतींपासून त्या मिळविल्या जातात, त्यांची वाढ चांगली व वेगाने होईल आणि त्यांचे रोगांपासून रक्षण होईल असे उपाय योजावे लागतात. वनस्पतींची इष्ट वाढ होण्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती असावी लागते. परिस्थिती या संज्ञेत मृदेचे घटक, तिचे भौतिक स्वरूप, संघटन, तिच्यातील आर्द्रता, सुक्ष्मजीव व तण, वातावरणाचे संघटन व तापमान आणिवातावरणात होणारे फेरफार, सूर्यप्रकाश मिळण्याचा अवधी व त्याचे प्रमाण इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो. पाणी, खते किंवा रसायने घालून मृदा सुधारणे, रासायनिक किंवा इतर उपायांनी तणांचा नाश करणे किंवा लागवडीच्या पद्धतीत फेरफार करणे यांसारखे उपाय करून एखाद्या वनस्पतीच्या वाढीस आवश्यक तशी परिस्थिती निर्माण करणे शक्य असते व तसे करून धान्यांचे किंवा इतर पिकांचे उत्पादन वाढविण्यात आले आहे.
लवकर वाढणाऱ्या, अधिक पीक देणाऱ्या, अधिक चांगले गुणधर्म असणाऱ्या व रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता असणाऱ्या उपयुक्त वनस्पतींच्या जाती शोधून काढणे किंवा संकर घडवून आणून तशा नव्या जाती निर्माण करणे [⟶वनस्पति-प्रजनन] शक्य झालेले आहे. तशा जातींची लागवड करून पिकांचे उत्पादन पुष्कळच वाढविण्यात आलेले आहे. अधिक चवदार व टिकाऊ फळे, अधिक साखर देणाऱ्या उसाच्या जाती, अधिक बळकट किंवा लांब धाग्याचा कापूस इत्यादींचे उत्पादन आता करण्यात येत आहे.
एखाद्या उपयुक्त वनस्पतीची चांगली वाढ एखाद्या प्रदेशात का होते हे कळून आले म्हणजे दुसऱ्या एखाद्या प्रदेशातील तशीच परिस्थिती असणारे क्षेत्र शोधून काढून तिची त्या क्षेत्रात लागवड करणे शक्य असते. वनस्पतींची अशी आयात करण्याला ‘वनस्पतिप्रवेशन’ म्हणतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व रशियात याप्रकारे पुष्कळ वनस्पतींच्या लागवडी करण्यात आल्या आहेत. भारतातही अनेक वनस्पतिप्रवेशने झाली आहेत (उदा., कॉफी, मका, बटाटा, भुईमूग वगैरे).
वनस्पतींच्या शरीरात काही हॉर्मोने व वृद्धी हॉर्मोने म्हणून ओळखली जाणारी द्रव्य असून त्यांचे शरीरक्रियांवर महत्त्वाचे परिणाम होतात. असा आश्चर्यकारक शोध अलीकडे लागलेला आहे. या द्रव्यांचा उपयोग कृत्रिम रीत्या करून वनस्पतींना बहर आणणे पानांची, फुलांची किंवा फळांची गळती थांबविणे, साठवणीच्या बटाट्यांना मोड येण्याचे थांबविणे, कलमांना मुळे फुटण्यास चेतना देणे इ. अनेक उपयुक्त गोष्टी करता येतात. [⟶ हॉर्मोने, वनस्पतीतील].
⇨कवकांच्या व सूक्ष्मजंतूच्या [⟶ सूक्ष्मजंतुविज्ञान] अध्ययनाचा उपयोग वनस्पतींच्या व प्राण्यांच्या कित्येक रोगांचे निवारण किंवा नियंत्रण करण्याच्या कामी होतो. जिवंत वनस्पतीप्रमाणेच त्यांपासून मिळणारे खाद्य व इतर पदार्थ सुरक्षित राखणे जरूर असते. तसेच आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने कित्येक वनस्पती उपयुक्त, कित्येक विषारी किंवा उपद्रवी व काही निरुपद्रवी असतात. ⇨तणासारख्या किंवा इतर हानिकारक [⟶ जीवोपजीवन] व उपद्रवी वनस्पतींचे निर्मूलन किंवा नियंत्रण करावे लागते. तसेच ज्ञात वनस्पतींच्या गुणधर्माचे सविस्तर परीक्षण करून त्यांच्यापैकी कोणत्या जाती अन्नासाठी किंवा पूरक अन्नासाठी किंवा इतर कामासाठी वापरता येतील, तसेच त्यांच्यात काही उपयुक्त किंवा विषारी घटक आहेत किंवा कसे यांविषयीचे अन्वेषण मानवाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे व त्यामध्ये वनस्पतिविज्ञानाची पुष्कळ मदत होते.
वातावरणात कृत्रिम बदल घडवून आणून वनस्पतींची इष्ट वाढ करता येईल की काय याविषयीही प्रयोग चालू आहेत. एखाद्या वनस्पतीला फुले व फळे येण्याला किती प्रकाश किंवा केवढे तापमान आवश्यक असते याचे प्रथम मापन केले जाते व तेवढा प्रकाश किंवा तेवढे तापमान होण्याइतकी उष्णता वनस्पतींना किंवा अंकुरणापूर्वी बीजांना कृत्रिमरीत्या देऊन वनस्पतीवर कोणते परिणाम होतात. याचे अन्वेषण प्रगत देशांत केले जात आहे. [⟶ अंकुरण प्रसुतावस्था].
पृथ्वीवरील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. मागासलेल्या समाजांची कमीअधिक गतीने सुधारणा होत आहे. अन्नधान्ये व इतर वनस्पतिज पदार्थाचा उपयोग व खप उत्तरोत्तर वाढतच जाईल. वनस्पतिविज्ञानाच्या साहाय्याने योग्य ते उपाय योजून मनुष्यसमाजास आवश्यक असणाऱ्या वनस्पतिज पदार्थांचे उत्पादन वाढविणे व आंतरराष्ट्रीय सहकार्य करून सर्व मानवजातीला, त्याचे योग्य असे वाटप करणे, हे शक्य झाल्यास सर्व मानवजातीचे कल्याण साधले जाईल.
आपटे, वि. वि.
वनस्पतिविज्ञानाचा इतिहास : वनस्पतिविज्ञानासंबंधी अतिप्राचीन अशी ऐतिहासिक माहिती आज फारशी उपलब्ध नाही, तरी साधारणपणे ८ते १०हजार वर्षांपूर्वी वनस्पतींची लागवड करणे व गुरे पाळणे हे उद्योग मानव करीत असे, याला आधार सापडतो. अन्न, वस्त्र, निवारा व इंधन या मानवाच्या प्राथमिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने तो वनस्पतींचा अभ्यास नकळतच करू लागला. जुने लिखाण, शिलालेख असलेली थडगी, गुरांच्या शिंगावर कोरलेली वनस्तींची चित्रे ही त्या त्या वेळी मानवाने केलेल्या वनस्पतींच्या अभ्यासाची साक्ष देतात.
भारतात शेतीच्या विकासाबरोबरच वनस्पतिविज्ञानाची सुरुवात फार प्राचीन काळी झाली. इ. स. पू. २०००-८००या वेदकालात गहु, सातु इ. काही शुकधान्ये आणी खजूर, भाज्या, कापूस, टरबुजे यांची लागवड होत असून त्यासाठी आवश्यक ते वनस्पतींच्या शरिरक्रियाविज्ञानाचे व अंतर्बाह्य भागांचे ज्ञान अवगत होते. तसेच जमीन सुधारण्यास खते व पिकांची फेरपालट यांचाही उपयोग केला जात असावा. अथर्ववेदात औषधी वनस्पती व निरनिराळ्या रोगांवरील चिकित्सा यासंबंधी बराच तपशील आढळतो. पराशर या ऋषींनी ख्रिस्तपूर्वकाळी वृक्षायुर्वेद या ग्रंथात वनस्पतींविषयी शास्त्रीय माहिती संकलित केल्याचे दिसून आले आहे. या ग्रंथातील आठ प्रकरणांतून वनस्पतींच्या भिन्न अवयवांची संरचना व आकार, जमिनींचे प्रकार व गुणधर्म, भारतातील चौदा प्रकारच्या वनांतील वनस्पतींची नावे, वर्णन व प्रसार आणि वनस्पतींच्या अवयवांच्या आकारप्रकारांचा अभ्यास केल्याचे दिसून येते. त्यातल्या काही वर्णनांवरून पराशरांनी कोणते तरी बृहद्दर्शक उपकरण वापरले असावे, असे वाटते. त्यांच्या मते पानांच्या अंतर्रचनेत असंख्य कोशिका (रसकोश) असून त्यांमध्ये जमिनीतून शोषलेली सर्व द्रव्ये असतात, भूमीतील द्रावण मुळांपासून वाहकतंत्रातून पानांपर्यंत नेले जाऊन (स्पंदनी) तेथे हरितद्रव्याच्या (रंजकेन पच्यमानत्) साहाय्याने त्याचे पोषक आनुषंगिक पदार्थात रूपांतर होते. वनस्पतींच्या शरीरांच्या तौलनिक अभ्यासावर आधारलेली वर्गीकरणाची पद्धत या ग्रंथात दिली असून ती यूरोपातील अठराव्या शतकापूर्वीच्या कोणत्याही पद्धतीपेक्षा अधिक प्रगत होती. यातील काही कुले (गण) आजही त्याच अर्थाने परंतु निराळ्या नावाने प्रसिद्ध आहेत. उदा., स्वस्तिकगण्यम्, [⟶ क्रुसीफेरी], त्रिपुसागण्यम् [⟶ कुकर्बिटेसी] वगैरे.
चीनमध्ये वनस्पतींचा अभ्यास पाश्चात्त्य देशांच्या मानाने बराच जुना असून शेतीचा विकास व वनस्पतींचा औषधी उपयोग तेथे प्राचीन काळापासून चालत आलेला दिसतो. तथापि त्यांचे वनस्पतिविषयक ग्रंथ (हर्बल्स) ११०८, १२७५, १४५०व १५९०सालांत प्रसिद्ध झाले होते.
पाश्चात्त्य देशांत वनस्पतींचा अभ्यास ॲरिस्टॉटल (इ.स. पू. ३८४-३२२) व त्यांचे शिष्य थीओफ्रॅस्टस (इ.स.पू. ३७२-२८७) या ग्रीक शास्त्रज्ञांनी सुरू केला. वनस्पतींच्या निरनिराळ्या लक्षणांचा थीओफ्रॅस्टस यांनी वर्गीकरणाकडे उपयोग करून वनस्पतींच्या आकार मानावरून त्यांचे ⇨औषधी, ⇨क्षुप व ⇨वृक्ष असे वर्गीकरण केले त्यांनी मुळे, पाने, फुले, रोपे, खोड वगैरे भागांवर वर्णनात्मक लिखाणही केले होते. वनस्पतिविषयक ग्रंथ (हर्बल्स) सोळाव्या व सतराव्या शतकांत जेरोम बोक, ओटो ब्रुनफेल्स, लेओनहार्ट फुक्स, गास्पार बौहीन वगैरे शास्त्रज्ञांनी आकृत्यांसह वर्णने करून तयार केलेले होते. जर्मनीतून प्रसिद्ध झालेल्या एका अशा ग्रंथात बदलते हवामान व जमिनीनुसार वनश्रीत होत गेलेला बदल नोंदण्यात आला होता. या वनस्पतिविषयक ग्रंथांमधून काही ठिकाणी मात्र ‘फुलांपासून फुलपाखरे तयार होणे, पाणे पाण्यात पडल्यास मासे व जमिनीवर पडल्यास पक्षी होणे’ अशा विचित्र कल्पना व खोट्या समजुतीही तितक्याच प्रामुख्याने चित्रांद्वारे प्रकाशित केलेल्या दिसून येतात. हळूहळू निरनिराळ्या देशांतून वनस्पतिविषयक शास्त्रीय ग्रंथ प्रकाशित होऊ लागले व मध्ययुगीन विलक्षण कल्पना, गैरसमज, चुका कमी होऊन विशाल दृष्टिकोन व प्रायोगिक अभ्यास यांच्याद्वारे अधिक तर्कशुद्ध व शास्त्रशुद्ध ग्रंथ निर्माण होऊ लागले.
⇨रॉबर्ट हुक यांचा मायकोग्राफिया हा सूक्ष्मदर्शकाखाली ⇨त्वक्षा, ⇨भेंड, काष्ठ वगैरे ऊतकांची पाहणी करून वर्णन करणारा ग्रंथ १६६५मध्ये प्रसिद्ध झाला. पुढे ⇨निहेमिया यू या शास्त्रज्ञांनी ॲनॅटमी ऑफ प्लँट्स हा वनस्पतींच्या शारीरासंबंधीचा ग्रंथ चार खंडात १६८२ मध्ये प्रसिद्ध केला व ⇨मार्चेल्लो मालपीगी (१६२८-९४) या इटालीतील शास्त्रज्ञांनी त्यात बरेच संशोधन करून शारीरविज्ञान या शाखेचा पाया घातला.
स्टीव्हेन हेल्स या शास्त्रज्ञांनी १७२७मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात वनस्पतीतील रसारोह व बाष्पोच्छ्वास [⟶ वनस्पति व पाणी] या प्रक्रियांचा उल्लेख केला, तर १७७९मध्ये जे. इंगेनहाऊस यांनी असे अनुमान काढले की, सूर्यप्रकाशात वनस्पती हवा स्वच्छ करतात व काळोखात ती दूषित करतात.
कार्ल लिनीअस या शास्त्रज्ञांनी १७५३मध्ये प्राणी व वनस्पतींसाठी द्विपदनामपद्धती मांडून प्रत्येक वनस्पतीचे शास्त्रीय नाव हे त्याची प्रजाती (वंश) व जाती अशा दोन लॅटिन शब्दांनी बनलेले असावे असे ठरविले. ⇨ वर्गीकरणविज्ञानात यामुळे हळूहळू प्रगती होत जाऊन ए.एल्. द झ्यूस्य या शास्त्रज्ञांनी १७८९ मध्ये व नंतर ऑगस्टीन व आल्फोन्स द कांदॉल या पिता-पुत्रांनी वर्गीकरणविज्ञानाचा पाया जास्त विशाल केला.
एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या चार दशकांत ऊतके व कोशिका यांवर बरेच संशोधन झाले व रॉबर्ट ब्राऊन यांनी १८३१मध्ये प्रत्येक कोशिकेत असलेल्या प्रकलाविषयी संशोधन केले. त्यानंतर १८३८-३९ मध्ये एम्. जे. श्लायडेन व टेओडोर श्व्हान यांनी ‘कोशिकासिद्धांत’ मांडला [⟶ कोशिका].
चार्ल्स डार्विन यांचा ओरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ १८५९मध्ये प्रसिद्ध होऊन नैसर्गिक निवडीमुळे जीवांचा साध्या अवस्थेतून कसा विकास झाला याचे विवरण त्यात केले आहे. ह्युगो द व्ह्रीस यांनी क्रमविकासाने वनस्पतीत होत गेलेल्या बदलांचे निरीक्षण करून ते आनुवंशिक उत्परिवर्तनाने होतात, असे उत्परिवर्तन सिद्धांत मांडून सिद्ध केले. [⟶ उत्परिवर्तन क्रमविकास].
ग्रेगोर योहान मेंडेल या धर्मोपदेशकांनी १८६६मध्ये वाटाण्याच्या निरनिराळ्या जातींमध्ये संकर करून व त्यांच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करून स्वतःचे असे काही अनुहरण -सिद्धांत मांडले परंतु त्यावेळी त्यांची कोणीच दखल घेतली नाही. पुढे के.ई. कॉरेन्स, इ. चेर्माक व ह्यूगो द व्ह्रीस यांनी १९००मध्ये एकाच वेळी या प्रकारे काम करून मेंडेल यांचे कार्य प्रकाशात आणले. तेव्हापासून या शाखेत खूपच प्रगती झाली आहे. [⟶आनुवंशिकी].
वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या निरनिराळ्या सुधारलेल्या पद्धती हळूहळू पुढे येऊ लागल्या व इंग्लंडचे जी, बेंथॅम व जे.डी. हुकर आणि जर्मनीचे ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांनी वनस्पतीच्या निरनिराळ्या भागांचे साम्य व भेद लक्षात घेऊन १८८७ते १९१५या काळात वनस्पतींचे भिन्न गट तयार करून त्यांच्या मांडणीच्या योजना बनविल्या. अमेरिकेत याच दरम्यान जॉन टोरी, ॲसा ग्रे., बी. नाथानिएल, पी.सी. बेली वगैरे शास्त्रज्ञांनीही वर्गीकरण पद्धती तयार केल्या.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या व विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये ओ. टिप्पो व एच्.सी.बोल्ड यांनी वर्गीकरणाचा, व्हिल्हेम होफमाइस्टर, के. गोबेल व एफ्. ओ. बॉवर यांनी शरीररचनेचा, इ. श्ट्रासबुर्गर यांनी कोशिकाविज्ञानाचा आणि जे. फोन झाक्स व व्हिल्हेल्म प्फेफर यांनी शरीरक्रियाविज्ञानाचा अभ्यास करून आपल्या संशोधनाद्वारे या निरनिराळ्या शाखांमधून मौलिक कार्याची भर घातली [⟶वनस्पतींचे वर्गीकरण].
विसाव्या शतकाच्या मध्यात व नंतर वनस्पतीविज्ञानाची खूप प्रगती झाली असून त्यातील अनेक शाखांतील संशोधनाद्वारे सतत भर पडत आहे. वनस्पतिविज्ञानाच्या अभ्यासाचा आजचा कल हा रसायनशास्त्र, भौतिक व गणित या इतर शास्त्रांना आधारून व रेणवीय स्तरावरील अध्ययनावर भर देणारा आहे. या नव्या दृष्टिकोनातून झालेला वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यास अत्यंत उपयोगी ठरेल.
पहा : उतक संवर्धन जीवविज्ञान क्रमविकास नेचे पुर्नजनन मृद्हीन कृषि रेणवीय जीवविज्ञान वनस्पति-२ वनस्पति, औषधी वनस्पति-प्रजनन वनस्पति, विषारी शास्त्रीय उद्याने शेवाळी शैवले शैवाक.
संदर्भ : 1. Bower F. O. Botany of the Living Plants, London, 1961.
2. Core, E. L. Plant Taxonomy, Englewood Cliffs, N.J., 1962.
4. Hawks, E. Boulger, G. S. Pioneers of Plant Study, Freeport, N.Y., 1969.
5. Lawrence, G. H. M. Taxonony of Vascular Plants, New York, 19965.
6. Sinnot, E. W. Wilson, K. S. Botany : Principles and Problems, New York, 1962.
7. Thimann, K. V., Ed., The Plant Sciences Now and in the Coming Decade, Washington, 1966.
8. Weisz P. B. Fuller, M. S. The Science of botany, New York, 1963.
9. Wilson, C. L. Loomis, W. E. Botany, New York, 1957.
सप्रे, अ.व.
“