वझीरीस्तान:पाकिस्तानच्या वायव्य सरहद प्रांतातील अफगाणिस्तानच्या सरहद्दीलगतच्या भूप्रदेश. पठाण (पख्तुन) जमातीतील ‘वझीरी’ या उपजमातीवरून त्यास हे नाव पडले. त्याच्या उत्तरेस कुर्रम नदी, पश्चिमेस अफगाणिस्तान, पूर्वेस कोहाट आणि बन्नू जिल्हे, दक्षिणेस गुमल नदी आणि बलुचिस्तान यांनी तो सीमित झाला आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी २५० किमी. असून पूर्व-पश्चिम रूंदी १०० किमी. आहे. क्षेत्रफळ ११,५८५ चौ.किमी., लोकसंख्या ५,४३,००० (१९८१). भौगोलिक व शासकीय दृष्ट्या १९५५ पासून त्याचे उत्तर वझीरीस्तान आणि दक्षिण वझीरीस्तान असे दोन जिल्हे करण्यात आले आहेत. कुर्रम, कैटू, दौर आणि खैसोरा या नद्यांची खोरी आणि टोची नदीकडील वझीरी टेकड्या यांनी उत्तर वझीरीस्तानचा प्रदेश बनला आहे. या पट्ट्यात मका, तांदूळ, गहू, साखर, कडधान्ये इ. प्रमुख पिके येतात. यांशिवाय पशुपालन हाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. लोकरविणकाम हा या भागातील प्रमुख व्यवसाय आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान शासनाने मेंढपाळीस उत्तेजन दिले असून पशुवैद्यकीय सेवाही उपलब्ध केली आहे. उत्तर वझीरीस्तानातील मीरमशाह हे प्रमुख शहर व जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

दक्षिण वझीरीस्तानचा भूभाग सुलेमान पर्वतक्षेणीने व्यापला असून त्यात ३०० मी. पेक्षा उंच अशी पीर घाल, नोमिन आणि सरवार गुलही शिखरे आढळतात. हा प्रदेश डोंगराळ व रूक्ष आहे. त्यातून फक्त पशुपालन हा धंदा चालतो. काही ठिकाणी दाट जंगल असून जंगलात पाइन वृक्ष विपूल आहेत. त्यातून इमारती व जळाऊ लाकूड उपलब्ध होते. दक्षिणेकडे गुमल नदीचे खोरे आहे. त्यावर खजुरीकच्छ या ठिकाणी धरण बांधण्यात आले असून ६६,४०० हे. जमीन ओलिताखाली आली आहे. तीतून गहू, तांदूळ, मका, सातू, यांची पिके घेतली जातात. याशिवाय विद्युतनिर्मिती करण्यात आली आहे. वान हे या जिल्ह्याचे मुख्यालय असून त्या ठिकाणी व्यवसायशिक्षण दिले जाते.

या प्रदेशाचा फारसा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि या प्रदेशात बझीरी नावाचे आदिम पठाण (पख्तुन) लोक राहत असत. ते पुश्तू भाषा बोलतात. त्यांचे दोन प्रमुख पोटभेद असून एकास ‘दरवेश खेल’ म्हणतात. त्यातही आणखी उत्मंजी व अहमदजी असे दोन पोटभेद आढळतात. हे ब्रिटिश हद्दीत नेहमी घुसून लुटालुट करीत. त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने उत्तर वझीरीस्तानात आहे. हे अधिक सुधारलेले आणि व्यवसाय करणारे आहेत. दक्षिण वझीरीस्तानातील पठाण ‘महसूद’या शाखेचे असून ते भटके जीवन जगतात. ते सुरुवातीस फार क्रूर व लुटालूट करणारे होते. जंगलातील झोपड्यांमधून ते राहत. जळाऊ लाकूड, कातडी. तूप, लोखंड इ. शेजारील प्रदेशात विकून ते लोक साखर, कापड वगैरे पदार्थ खरेदी करीत. याशिवाय टोची दरीत दौर पठाणांपैकी काही लोक राहतात. या भूभागाला सामान्यतः टोळ्यांचा भूभाग म्हणतात. या टोळ्या कोणचेही दडपण न मानणाऱ्या व स्वातंत्र्यप्रिय आहेत. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश आणि अफगानिस्तानचा अमीर या दोघांनी त्यांवर वर्चस्व स्थापण्याचे प्रयत्न केले तथापि या टोळ्यांनी जमातप्रमुखाची सत्ता आणि पंचायत यांनुसार अलिखित पारंपारिक कायदा श्रेष्ठ मानून आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले. ब्रिटिशांनी हा सर्व टापू आपल्या वर्चस्वाखाली असावा, म्हणून १८५८ नंतर अनेक मोहिमा काढल्या. येथील टोळ्यांना खंडणी देऊन वश करण्याचे प्रयत्न केले तथापि टोळीवाल्यांनी दाद दिली नाही. अफगाणिस्तानचा राजा अब्दुल रहमान आणि ब्रिटिशांकित हिंदुस्थानचे प्रतिनिधी सर मॉर्टिमर ड्युरँड यांनी १३ नोव्हेंबर १८९३ रोजी केलेल्या करारानुसार जी सीमारेषा (पुढे ड्युरँड रेषा म्हणून प्रसिद्ध झाली) मान्य केली, तीमुळे वझीरीस्तान हे ड्युरँड रेषा आणि ब्रिटिश सत्ता यांपासून अलग असलेले स्वायत्त भूक्षेत्र ठरेल. पुढे पहिल्या महायुद्धानंतर या प्रदेशास १९१९ पासून सरहद गांधी अब्दूल गफारखानांचे नतृत्व लाभले आणि येथील लोकांच्या जीवनात स्वातंत्र्याची ऊर्मी जागृत झाली पठाणांना काही सवलती मिळू लागल्या. हिंदूस्थानची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर (१९४७) वझीरीस्तान हा पाकिस्तानचा एक भाग बनला. १९५५ पर्यंत हा प्रदेश डेरा इस्माइलखानच्या आयुक्ताच्या अंमलाखाली होता. पुढे इस्लामी एकतेच्या नावाखाली पाकिस्तानची घटना बदलून वायव्य सरहद्द प्रांत हे घटक राज्य बनविण्यात आले आणि वझीरीस्तानचे दोन जिल्हे डेरा इस्माइलखान प्रशासकीय विभागात समाविष्ट करण्यात आले. स्वतंत्र पख्तुनिस्तानाची निर्मिती करून वझीरीस्तानसह पश्चिम पाकिस्तानातील सर्व पठाणांना त्यात समाविष्ट करावे, असे अफगानिस्तानने पाकिस्तानला सुचविले आहे. या कल्पनेतूनच पठाण टोळीवाल्यांनी स्वतंत्र पख्युनिस्तानाची मागणी केली आहे. ईप्रच्या फकिराच्या नेतृत्वाखाली पठणांना स्वतंत्र पख्तुनिस्तानच्या चळवळीसाठी अफगाणिस्तान शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. त्यामुळे ड्युरँड रेषा व पख्युनिस्तान हे आजही वादाचे विषय झाले आहेत.

पहा: पख्तुन.

संदर्भ : Dichter. David, The North-West frontier of West Pakistan, Oxford. 1968.

देशपांडे, सु. र.