वंगभंग चळवळ : बंगाल प्रांताची फाळणी करण्याच्या ब्रिटिश राजवटीच्या धोरणाविरुद्ध झालेली १९०४-१९०५ ची चळवळ, ह्या चळवळीने राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालांचा गट लोकप्रिय बनण्यास मदत झाली. ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. ब्रिटिश काळातील बंगाल प्रांत, विद्यमान पश्चिम बंगाल राज्य, बांगला देश, बिहार आणि ओरिसा एवढा भौगोलिक दृष्ट्या अवाढव्य होता. प्रशासनाच्या सोयीसाठी बंगालची फाळणी कशी करावी, यावर सुमारे दहा वर्षे चर्चा चालू होती. अखेर ही फाळणी राजकीय हितासाठी करण्याचे ठरले. व्हाइसरॉय कर्झनच्या गृहसचिवाने ‘संयुक्त बंगाल ही मोठी शक्ती आहे, बंगालच्या फाळणीने ती विभागली जाईल आणि साम्राज्यविरोधी शक्ती एकसंघ ठेवण्यापेक्षा विभागून दुर्बंल करणेच हितावह आहे’, असे नमूद करून ठेवले. डिसेंबर १९०३ च्या अधिकृत पत्रकान्वये पूर्व बंगालचे चितगाँग, मैमनसिंग व टिपेरा हे तीन जिल्हे आसामला जोडण्याची योजना सरकारच्या विचाराधीन होती. हे पत्रक निघाल्याबरोबर बंगाली लोक खवळून उठले. पुढे दीड वर्षानंतर संपूर्ण बंगालच्याच फाळणीचा निर्णय झाला. दरम्यान प्रक्षुब्ध बंगाल्यांनी सर्वत्र फाळणीविरोधी अनेक निषेध सभा घेतल्या होत्या आणि सत्तर हजार बंगाल्यांच्या सह्यांचे फाळणी निषेधाचे निवेदन लंडनमध्ये ब्रिटिश शासनाला सादर करण्यात आले. वंगभंग चळवळ सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी १९०४ मध्ये व्हाइसरॉय कर्झनने ब्रिटिश सरकारला लिहिले की, ‘बंगाल्यांच्या आरडा ओरड्याला भिऊन आपण जर कच खाल्ली, तर बंगालला खच्ची करण्याची दुसरी संधी यानंतर मिळणार नाही’. याच महिन्यात कर्झनने पूर्व बंगालचा दौरा करून अनेक मुसलमानांच्या गाठीभेटी घेतल्या व जाहीर भाषणे दिली. पूर्व बंगाल-आसामच्या नव्या प्रांतात मुसलमानांची प्रभावी बहुसंख्या असेल व ते त्यांना फायदेशीरच होईल, असे कर्झनने आवर्जून सांगितले. फाळणीविरोधी आंदोलनाला शह देण्यासाठी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली बेजार झालेल्या डाक्क्याच्या नबाबांना कर्जमुक्त करण्यासाठी नाममात्र व्याजावर दीर्घमुदतीचे चौदा लाख रूपयांचे कर्ज सरकारी तिजोरीतून देण्यात आले. याच नबाबांनी मुसलमानांमध्ये फाळणीचा जबरदस्त पुरस्कार केला पण त्याचा प्रभाव पडला नाही. बंगाली मुसलमानही वंगभंग चळवळीत हिरिरीने सहभागी झाले. शेवटी डाक्का नबाबांनी डाक्क्यालाच मुस्लिम लीगचे स्थापना अधिवेशन भरविले. १९०५ च्या ऑगस्टमध्ये फाळणीचा निर्णय घोषित करण्यात आला. या घोषणा-पत्रकात नव्या पूर्व बंगालमध्ये १ कोटी २० लाख हिंदू व १ कोटी ८० लाख मुसलमान वस्ती असेल, डाक्क्याला पुन्हा उर्जितावस्था येईल व प्रभावी मुस्लिम बहुसंख्या असलेला एक प्रांत निर्माण होईल, असे नमूद करण्यात आले होते. पूर्व बंगालमध्ये हिंदू धार्मिक अल्पसंख्याक झाले, तर नव्या (पश्चिम) बंगालमध्ये सर्व बंगाली भाषिक अल्पसंख्याक बनले. त्यांची संख्या बिहारी व ओडिया भाषिकांच्या संयुक्तसंख्येच्या निम्म्यानेसुद्धा राहिली नाही. ७ ऑगस्ट रोजी टाउन हॉलच्या परिसरात नागरिकांची प्रचंड सभा भरली. हजारो विद्यार्थी मिरवणूक काढून वंदे मातरमच्या घोषण देत सभास्थानकाकडे गेले. या विराट सभेत स्वदेशी व बहिष्काराचा कार्यक्रम सर्वामुमते संमत झाला. १६ ऑक्टोबर रोजी फाळणी अंमलात आली. त्या दिवशी प्रांतभर सुतक पाळण्यात आले. बंगाली एकजुटीचे प्रतीक म्हणून सामूहिक रक्षाबंधनाचे सोहळे साजरे झाले.

सप्टेंबरपासून बहिष्काराचा कार्यक्रम इतका यशस्वी झाला, की ब्रिटिश गिरण्याही बंद पडू लागल्या. सप्टेंबरमध्येच गो. कृ. गोखले इंग्लंडला गेले. त्यांनी तेथे नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, अनेक सभांतून भाषणे दिली व फाळणी रद्द व्हावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढे ब्रिटिश निवडणुकात हुजूर पक्षाचा पराभव होऊन उदारमतवादी सरकार सत्तेवर आले पण नव्या सरकारनेही फाळणीचा निर्णय रद्द केला नाही. फेब्रुवारी १९०६ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलताना भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांनी लोकांच्या भावनेची कदर न करता फाळणी करण्यात आली आहे, हे मान्य करूनही फाळणीचा निर्णय ही काळ्या दगडवरची रेघ आहे, असे जाहीर केले. सहा महिन्यांनी गोखले पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी अनेक वेळा मोर्ले यांच्याशी वाटाघाटी केल्या पण जोपर्यंत आपल्यावर वृत्तपत्रातून जहरी टीका चालू आहे आणि बंगालमध्ये व इतरत्र आंदोलन चालू आहे, तोवर काहीही करण्यास आपण असमर्थ असल्याचे स्पष्ट करून मोर्लेनी गोखल्यांची हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीबद्दल कानउघडणी केली आणि प्रथम वातावरण शांत करा असा सल्ला दिला. वंगभंग चळवळीने जोर घेतला, तसे सरकारने देशभर दडपशाही सुरू केली. यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली. सर्व जहाल नेत्यांना जागोजागी कडक शिक्षा ठोठावण्यात आल्या. जहाल वृत्तपत्रे आता उघडउघड क्रांतीचा प्रचार करू लागली. त्यांच्या संपादकांना जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या. देशातल्या इतर जहाल वृत्तपत्रांच्या संपादकांनाही याप्रमाणे दीर्घ मुदतीच्या तुरुंगवासाच्या शिक्षा फर्माविण्यात आल्या. वृत्तपत्र संपादकांना जबर शिक्षा ठोठोवणारे कलकत्त्याचे मॅजेस्ट्रेट किंग्जफर्ड यांच्यावर क्रांतीकारकांचा विशेष राग होता. ३० एप्रिल १९०८ च्या रात्री किंग्जफर्ड वापरीत असलेल्या गाडीसारखी गाडी त्यांच्या बंगल्याच्या दिशेने जात असताना तिच्यावर बाँब फेकण्यात आले परंतु गाडीत किंग्जफर्डऐवजी बॅरिस्टर केनेडी कुंटुंबीय जात होते. त्यांपैकी दोघीजणी मृत्युमुखी पडल्या. या घटनेसाठी खुदिराम बोसला फाशीची शिक्षा झाली. त्याचा सहकारी प्रफुल्ल चाकी याने धरपकडीच्या वेळी स्वःवर पिस्तुल चालवून आत्मबलिदान केले. काही प्रमाणावर पंजाब आणि महाराष्ट्रातही क्रांतिकार्य चालू झाले. बहिष्काराचा कार्यक्रम बंगालपुरताच मर्यादित ठेवा, असा आग्रह धरणारे मवाळ नेते निष्प्रभ झाले. त्यांनी जरी सुरत काँग्रेसच्या वेळी जहालांची हकालपट्टी करून संघटना आपल्याकडे ठेवली असली, तरी सुरत क्राँग्रेसच्या वेळी जहालांची हकालपट्टी करून संघटना आपल्याकडे ठेवली असली, तरी त्यांची क्राँग्रेस आता निस्तेज बनली होती.

जून १९०८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदुस्थानच्या परिस्थितीवर चर्चा झाली. तेव्हा बंगाल फाळणीमुळेच भारतात असंतोष दीर्घकाळ भडकत राहिला आहे बंगालची फाळणी करण्याऐवजी बिहार आणि ओरिसा वेगळे केले असते, तर लोकांचा रोष पतकरावा लागला नसता, असे अनेक सभासदांनी स्ष्टपणे बोलून दाखविले. १९११ मध्ये आपल्या भारतभेटीच्या वेळी नूतन बादशाहा पंचम जॉर्ज यांनी हिंदुस्थानात आणि लॉर्ड मोर्ले यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये फाळणी रद्द केल्याचे घोषित केले.

संदर्भ : 1. Mukherjee, Haridas Mukherjee, Uma, India’s Fight for Freedom OR The Swadeshi Movement 1905-1906, Calcutta, 1958.

            2. Tara Chand, History of the Freedom Movement in India, Vol. III, New Delhi, 1972.

            ३. नगरकर, वसंत, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, पुणे, १९७६.

नगरकर, व. वि.