वंग : बंग. फाळणीपूर्व भारतातील एक प्राचीन देश. बांगला देशातील दक्षिणेकडचा त्रिभुज प्रदेश पूर्वी वंग देश या नावाने ओळखला जात होता. दक्षिणेस बंगलाच्या उपसागरापासून उत्तरेस ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत व वायव्येस जमुना आणि पूर्वेस मेघना नद्यांदरम्यान याचा विस्तार असल्याचा पुराणांत व बौद्ध ग्रंथांत उल्लेख आढळतो. सुंदरबनचा पूर्व भाग आणि उत्तरेकडील मैमनसिंग जिल्ह्याचा निम्मा भाग यांचा या देशात समावेश होत होता. फरीदपूर व मदारीपूर ही शहरे याच्या केंद्रस्थानी होती, असे उल्लेख आढळतात. इतिहास संशोधक डॉ. भाऊ दाजी यांच्या मतानुसार ब्रह्मपुत्रा व पद्मा नद्यांदरम्यानचा प्रदेश म्हणजे ‘वंग देश’ होय.
महाभारतात तसेच बौद्ध ग्रंथांत या देशाविषयी अनेक कथा आहेत. पांडवांपैकी भीमाने वंग देशावर स्वारी केल्याचा तसेच श्रीकृष्णाने एकदा हा देश जिंकून घेतल्याचा महाभारतातील सभापर्वात व द्रोणपर्वात उल्लेख आहे. येथील राजांनी कलिंग देशाशी वैवाहिक संबंध जोडल्याचेही अनेक उल्लेख आहेत. महावंस ग्रंथात वंग जनपदाच्या सीहबाहू (सिंहबाहू) राजाचा उल्लेख असून त्याच्या मुलाने लंकेत राज्यस्थापना केल्याचे वर्णन आहे. कौटिलीय अर्थशास्त्रात वंग देशातील कापडउद्योगाविषयीचे वर्णन आलेले असून नावांतून या देशाशी व्यापार चालत असल्याचा उल्लेख मिलिदपञ्ह या पाली ग्रंथात आहे.
याच्या नामव्युत्पत्तीबाबत मतांतरे आहेत. येथील वंग लोकसमूहाच्या वास्तव्यावरून या प्रदेशास वंग देश हे नाव पडले असावे. ऐतरेय आरण्यकात या लोकांविषयीचा उल्लेख आढळतो. पूर्वी मूळच्या बंगाली भाषिक प्रदेशाचे दोन सारखे भाग होते. त्यांपैकी पश्चिमेकडचा गौड देश व पूर्वेकडील बंग देश या नावांनी ते ओळखले जात होते. इ. स. आठव्या शतकापर्यंत ही दोन्ही राज्ये भिन्न होती. काही मुस्लिम इतिहासकार या संपूर्ण प्रदेशाला गौड-वंग अथवा गौड-बंगाल म्हणत असत. वंगाल अथवा बंगाल हे वंग देशातील बुकरगंज भागाचे मूळचे नाव. या प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी बांधलेल्या उंचवट्यांना ‘आल’ असे म्हणत असत. त्यावरून ‘वंगाल’ > बंगाल हे नाव आले असावे. नंतर ते संपूर्ण वंग देशाला अथवा पूर्व बंगालला व त्यानंतर संपूर्ण बंगाली भाषिक प्रदेशाला उद्देशून वापरले जाऊ लागले. अलीकडील काळात मात्र बंगाली भाषिक मोठ्या प्रदेशाला सरसकट गौड, वंग किंवा बंगाल > गौडबंगाल > बंगाल असे म्हणण्याचा प्रघात पडला.
पहा : बंगाल बांगला देश.
चौंडे, मा. ल.