नो नाट्य : जपानमधील दीर्घ परंपरा असलेला एक अभिजात नाट्यप्रकार. ‘नो’ या शब्दाचा मूळचा अर्थ (संगीताचा वा नाट्याचा) प्रयोग करून दाखविणे, असा आहे. तेराव्या शतकात जपानमध्ये ‘देन्‌गाकु-नो-नो’ (ग्रामीण संगीत प्रयोग) आणि ‘सारुगाकु-नो-नो’ (मर्कट संगीत प्रयोग) ही दोन प्रकारची लोकनाट्ये प्रचलित होती. त्यांत ग्रामीण नाच, कसरत, गाणी आणि संवाद यांचा समावेश असे. महाराष्ट्रातील ⇨ तमाशा या लोकनाट्यप्रकाराशी या जपानी लोकनाट्याचे बरेच साम्य होते, असे म्हणता येईल. फरक एवढाच, की जपानमधील लोकनाट्याचे हे प्रकार जपानच्या राजदरबारी फार लोकप्रिय झाले व त्यांना राजाश्रय मिळाला. त्यामुळे त्यांना अभिजात स्वरूप प्राप्त झाले. हळूहळू देन्‌गाकु हा प्रकार मागे पडून सारुगाकु हा प्रकार नो नाट्याचा मुख्य प्रकार बनला व तोच आजतागायत टिकून राहिला.

नो नाट्याच्या एका प्रयोगात अनेक घटकांचा समावेश असला, तरी नो नाट्याचा मुख्य भाग म्हणजे एक संवाद आणि एक नाच एवढाच असतो. हा संवाद त्यानंतर येणारा नाच काय दर्शवितो, याबद्दलचा असतो. काही नो नाटकांचा हाच संवाद नाचाची पार्श्वभूमीही तयार करतो.

नो नाट्यातील मुख्य पात्र म्हणजे नृत्यकार. त्याला ‘शिते’ (कृती करणारा अर्थात नट) असे म्हणतात तर त्याच्या खालोखाल नृत्याचे वर्णन करणारा नट असून त्याला ‘वाकी’ (साहाय्यक) अशी संज्ञा आहे. या दोन्ही नटांना साहाय्यक म्हणून ‘त्सुरे’ या नावाची काही पात्रे असतात. नो नाटकातील सर्व कामे पुरुषपात्रेच करतात.

शिते हे पात्र मुख्य नाच करीत असताना वाकि हे पात्र एका बाजूला उभे असते आणि ते अधूनमधून एक-दोन वाक्ये बोलते. नाचाबरोबर गायन करण्याचे काम बाजूला एका रांगेत बसलेले दहा–बारा गायक करतात. या गाण्याबरोबर अत्यंत साधे असे बासरीवर वाजवलेले संगीत असते आणि एका ढोलक्यावर साधा ताल धरण्यात येतो.

नो नाट्याचा परंपरागत रंगमंचनो नाट्याच्या एका प्रयोगात तीन ते चार एकांकिकेवजा नाट्यरचना असू शकतात आणि दोन रचनांमध्ये ‘क्योगेन’ नावाचा एक छोटा प्रहसनात्मक विनोदी संवाद असतो. नो नाट्याचे कथानक नेहमी गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे श्रोतृवृंदाच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी क्योगेनचा उपयोग होतो. हा विनोदी संवाद नोच्या नाट्यमंचावरच होतो परंतु तो सुरू असताना मुख्य पात्रे आणि गायक-वादक रंगमंच सोडून जातात. ‘क्योगेन’ मध्ये सामान्यतः राजा आणि त्याचा विदूषक अशी दोन पात्रे असतात. विदूषक राजाला सारखा फसविण्याचा प्रयत्न करतो परंतु राजा शेवटी त्याला पकडतो आणि यथेच्छ मारतो.

सध्या प्रचलित असलेल्या नो नाट्याचे आद्यप्रवर्तक कान्आमी कियोत्सुगू (१३३३–८४) व ⇨ झेआमी (सेआमी) मोतोकिओ (१३६३–१४४३) हे पितापुत्र होत. कान्आमी हा कासुगा या मंदिरात पुजारी असताना सारुगाकुचा प्रयोग करीत असे. त्याला योशिमित्सु या त्या काळाच्या बादशाहापेक्षाही बलाढ्य असलेल्या पंतप्रधानाचा आश्रय लाभला त्यामुळे कान्आमीने पुजाऱ्याचे काम सोडून देऊन नो नाट्यासच सगळे आयुष्य वाहिले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सेआमी याने आपल्या पित्याचे कार्य पुढे चालविले. सेआमीवर योशिमित्सुची अत्यंत मर्जी असल्यामुळे नो नाट्याला प्रचंड प्रमाणावर राजाश्रय मिळाला. सेआमीने पुढे नो नाट्यावर एक ग्रंथ लिहिला. त्यात या नाट्यप्रकाराचे अत्यंत विस्ताराने वर्णन केलेले आहे. हा ग्रंथ काही शतके गहाळ झालेला होता परंतु १९०८ साली त्याची प्रत सापडली व त्यामुळे त्याआधी नो नाट्याबद्दल प्रचलित असलेले अनेक गैरसमज दूर झाले.

सेआमीने लिहिलेल्या मुळच्या ग्रंथाला ‘क्वादेन्‌शो’ (पुष्पांजलिग्रंथ) असे म्हणतात. सेआमी हा झेन पंथाचा उपासक होता. भगवान बुद्धाने काश्यप नावाच्या शिष्याला ध्यानपुष्प दिले आणि त्याने ते पुढे झेन गुरूंना दिले. नो नाट्य एक प्रकारचे ‘ध्यानपुष्प’ आहे, असे मानले जाते.

सेआमीने लिहिलेला ग्रंथ म्हणजे आपल्या शिष्यांच्या तालमीसाठी लिहिलेले पाठ्यपुस्तक होय. त्यात त्याने रंगमंच कसा असावा, कोणत्या वेळी कोणते नाट्यप्रयोग करावे, एका प्रयोगात कोणत्या एकांकिका कराव्या, संगीत कसे असावे, अभिनय व वेशभूषा कशी असावी, रंगमंचावर व्यवस्था कशी असावी, नाट्यकथा कशा असाव्या, संवाद आणि गायन कोणत्या प्रकारे सादर करावे, नाटक कोठे करावे, नाट्यकला कोणाला आणि कशी शिकवावी इ. अनेक विषयांची अत्यंत तपशीलवार चर्चा केलेली आहे. सेआमीने घालून दिलेली ही नो नाट्याची तत्त्वे थोड्याफार फरकाने आजही पाळण्यात येतात. त्यांतील काही महत्त्वाचा भाग पुढीलप्रमाणे आहे.

रंगमंच : सेआमीने नो नाट्याचे सभागृह सर्वसाधारणपणे सु. ९१·४४ ते सु. १०६·६८ चौ. मी. असावे, असे म्हटले आहे. सभागृहात रंगमंच अगदी मध्यावर असावा आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी रंगमंचाच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना जागा असावी म्हणजे नटांचा आवाज सगळ्यांना व्यवस्थित ऐकू जातो. सेआमीच्या काळचे सभागृह गोलाकार असे, तथापि त्यात हळूहळू फेरफार होऊन ते चौकोनी झाले आणि मध्यावरील रंगमंचावर जाण्यासाठी लाकडी फळ्यांची पायवाट उभारण्याची पद्धत सुरू झाली.

नो नाट्याचा सध्याचा रंगमंच घासून गुळगुळीत केलेल्या ‘हिनोकि’ (सायप्रस) नावाच्या लाकडाचा असतो. रंगमंचाच्या मागील भागी एक लाकडी फळा असतो व त्यावर एकच सूचिपर्ण (पाईन) वृक्षाचे चित्र असते. रंगमंचाच्या इतर तीन बाजू उघड्या असतात. मंचाच्या मागच्या बाजूला आणि रंगपटाच्या खोलीला जोडणारी ‘हाशिगाकारी’ नावाची लाकडी फळ्यांची पायवाट असते. त्यावरून नट रंगमंचावर प्रवेश करतात. प्रेक्षक रंगमंचाच्या दोहो बाजूंना बसतात. रंगमंचाच्या मागच्या बाजूला पार्श्वगायक दोन रांगांत मांडी घालून बसतात आणि त्यांच्याच मागे वाद्यवृंद बसतो. गायक व वाद्यवृंद बसलेल्या जागेभोवती व हाशिगाकारी मार्गाभोवती एक कठडा असतो. हाशिगाकारीच्या कठड्यावर सूचिपर्ण वृक्षाच्या तीन डहाळ्या बांधलेल्या असतात. रंगमंचावर शिंतो मंदिराच्या शिखरासारखे एक छप्पर असते.


नाट्यकार्यक्रम : सध्या नो नाट्याचे प्रयोग रात्री ९ ते पहाटे ३ वाजेपर्यंत करण्याची प्रथा आहे. सेआमीच्या काळी दिवसाही प्रयोग करण्याची प्रथा होती. रंगमंचावर प्रकाश पाडण्यासाठी पूर्वी दिवट्या वापरत असत परंतु आधुनिक काळात विजेचे दिवे वापरतात.

पूर्वीच्या काळी एका नाट्यप्रयोगात पाच वा सहा छोट्या एकांकिकेवजा नाट्यरचना असत. प्रयोग किती काळ चालावा हे यजमान ठरवीत असे परंतु सोळाव्या शतकात एका ठराविक तऱ्हेचा कार्यक्रम कायम झाला. त्यात प्रथम प्रार्थनावजा नाट्यरचना, नंतर युद्धावर आधारलेली एकांकिका (तिच्यात योद्धा हा जिवंत माणूस नसून त्याचे भूत असे), त्यानंतर स्त्रीची मुख्य भूमिका असलेली एकांकिका, तिच्यानंतर राक्षसाची मुख्य भूमिका असलेली एकांकिका आणि शेवटी दया, धर्म, प्रज्ञा इ. मूल्यांचे चित्रण करणारी एकांकिका अशा क्रमाने एकंदरीत पाच एकांकिका असत. काही महत्त्वाच्या प्रसंगी मान्यवर व्यक्तीचे अभिनंदन करण्यासाठी सहावी खास एकांकिकाही अंतर्भूत केली जात असे. क्वचित प्रसंगी नाट्याचे प्रयोग लागोपाठ दोन-तीन दिवस चालत व त्यासाठी खास कार्यक्रम तयार करण्यात येई.

संगीत : नो नाट्यातील संगीताला स्वतंत्र स्थान नाही. फक्त नाट्यप्रयोगातच पार्श्वसंगीत म्हणून त्याचा उपयोग आहे. त्यात एक बासरी, दोन टिमकीवजा तालवाद्ये आणि एक ढोल इतकीच वाद्ये असतात. बासरीवादकाचे मुख्य काम एकांकिकेच्या सुरुवातीला आणि शेवटी असते तर तालवाद्यांचे मुख्य काम प्रेक्षकांचे लक्ष वेधणे व त्यांची उत्कंठा जागृत ठेवणे हे असते.

पात्रे : सेआमीने सर्वसाधारणपणे चार व जास्तीत जास्त पाच पात्रे रंगमंचावर असावीत, असा दंडक घातलेला होता. तथापि आधुनिक प्रयोगात आठ-नऊ पात्रेसुद्धा असू शकतात. प्रयोगात सर्व पुरुष नटच असतात. स्त्रीपात्रांची कामे स्त्रियांनीच करण्याची प्रथा आढळत नाही.

पूर्वीच्या काळी सारुगाकु या प्रकारात नट नृत्य करताना गात असत परंतु शारीरिक हालचालीमुळे नटाला नीट गाता येत नसे. या कारणास्तव नंतरच्या काळात नटाचे गाणे पार्श्वगायकांनी गाण्याची प्रथा पाडली व ती आधुनिक काळातही पाळली जाते. सर्वसाधारण प्रयोगात ८ किंवा १२ पार्श्वगायक असतात.

नो नाट्यातील मुख्य नट (शिते) आणि त्याचा साहाय्यक नट (त्सुरे किंवा तोमो) हेच फक्त मुखवटे घालून काम करतात. दुय्यम नट (वाकि) आणि त्याचे साहाय्यक मुखवटे वापरीत नाहीत. शिते हा स्त्रीपात्राचे किंवा वृद्ध माणसाचे काम करीत असताना मुखवटा वापरतो परंतु त्याने तरुण योद्ध्याच्या किंवा लहान मुलाच्या कामासाठी मुखवटा वापरण्याची पद्धत नाही. हे मुखवटे लाकडाचे केलेले असतात आणि ते अत्यंत जपून वापरण्यात येतात. काही मुखवटे तर दोनतीनशे वर्षांपूर्वीचेही आढळतात.

वेशभूषा : नो नाट्याचा रंगमंच अत्यंत साधा असतो उलट नटांची वेशभूषा मात्र अत्यंत भडक आणि रंगीबेरंगी असते. प्रत्येक भूमिकेची वेशभूषा कशी असावी, याचे नियम आहेत व त्यांचे काटेकोर पालन करण्यात येते. प्रत्येक नटाजवळ एक घडीचा पंखा असतो व त्याचा उपयोग कट्यार किंवा लेखणी म्हणूनही प्रतीकरूपाने केला जातो. मात्र धनुष्यबाण, तरवार, भाला अशी शस्त्रे खऱ्या स्वरूपात वापरली जातात.

अभिनय : नो नाट्यातील अभिनय नृत्यवजा असतो. मात्र हे नृत्य धीम्या पावलांनी केलेली हालचाल आणि हस्तमुद्रा यांचे मिश्रण असते. मुख्य नट व त्याचा साहाय्यक हे अधूनमधून तालावर एक पाऊल आपटतात एवढीच या नृत्यातील तालबद्धता होय.

नाट्यकथांचे स्वरूप : नो नाट्यातील एकांकिकांत गद्य (कोतोवा) आणि पद्य (उताई) या दोहोंचा समावेश असतो व त्यांची भाषाशैली चौदाव्या शतकातली भारदस्त राजदरबारी स्वरूपाची असते. या तऱ्हेची भाषाशैली आधुनिक जपानमध्ये कागदोपत्री वापरली जात असल्यामुळे सुशिक्षित वर्गाला ती समजण्यास फारशी अडचण पडत नाही.

रंगमंचाच्या मागील बाजूस बसलेले पार्श्वगायक हे गद्य आणि पद्य दोन्ही ऐकवितात. गद्यसुद्धा एका विशिष्ट तऱ्हेने सुरावर म्हणण्याची पद्धत असल्यामुळे त्याचे पद्यांत रूपांतर केव्हा होते, हे कित्येक वेळी लक्षातही येत नाही. पद्यगायनसुद्धा कवितावाचनासारखेच असते त्यात गाण्याची चाल अशी क्वचित ऐकू येते. पद्याला अगदी साधा ताल असतो आणि त्यात शाब्दिक कोट्या विपुल प्रमाणात असतात.

एकांकिकेच्या कथा काही प्रसिद्ध कवितांभोवती किंवा बौद्ध धर्मातील प्रार्थनेभोवती रचलेल्या असतात. या कथांत गोष्टीचे बीज, त्या बीजाची वाढ आणि शेवट असे तीन भाग असतात. या घटकांचे प्रमाण १ : ३ : १ असे असते. प्रथम भागात वाकीचे काम, मध्यम भागांत शितेचे काम आणि शेवटी नृत्य असते.

एकांकिकांच्या कथांना उताई-बोन म्हणतात व त्यांचे अनेक संग्रह उपलब्ध आहेत. नो नाट्यकार्यक्रम करणाऱ्या प्रत्येक नाट्यमंडळीचा स्वतःचा एक आवडता संहिताग्रंथ असतो. त्यातील एकांकिका ते करून दाखवितात. उपलब्ध असलेल्या सर्व संहिताग्रंथांत सु. २५० कथा आहेत. त्यांतील बहुतांशी कथा सोळाव्या शतकापूर्वीच्या आहेत. तथापि काही कथा आधुनिक काळातही लिहिल्या गेल्या आहेत.

नो नाट्याचे आकर्षण पाश्चात्त्यांनाही वाटू लागले आहे. व्हेनिस येथील १९५४ च्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात आणि १९५७ मध्ये पॅरिस येथेही नो नाट्याचे प्रयोग झाले होते.

संदर्भ : 1. Bowers, Faubion, Theatre in The East, New York, 1956.

   2. Cheney, Seldon, The Theatre : Three Thousand Years of Drama, Acting  and Stagecraft, London, 1959.

   3. Nicoll, Allardyce, World Drama, London, 1959.

जोशी, चंद्रहास देशिंगकर, गि. द.