आंत्वान, आंद्रे : (३१ जानेवारी १८५८—२१ ऑक्टोबर १९४३). फ्रेंच नट, नाट्यदिग्दर्शक, निर्माता व नाट्यपंडित. जन्म लिमोझ येथे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकप्रिय व दृढमूल होऊ लागलेल्या वास्तववादी नाट्यनिर्मितीचा पुरस्कार करण्याकरिता त्याने १८८७ साली थिएटर लिब्र(फ्री थिएटर) ही नाट्यसंस्था स्थापिली.

१८९० साली संस्थेच्या द्वारा इब्सेनच्या घोस्ट्स (इं. भा.) या नाटकाचा प्रयोग सादर करून, त्यातील ओस्वाल्ड ही महत्त्वाची भूमिकाही त्याने अभिनीत केली. आंत्वानचे आरंभीचे प्रयोग व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक ठरले नाहीत. १८९७ साली त्याने फिरून नव्या जोमाने आपल्या थिएटर आंत्वानया नाट्यसंस्थेची स्थापना केली. तिच्या द्वारा तो स्वतंत्र नावाने आपल्या स्वतःच्या पद्धतीची नाट्यनिर्मिती करू लागला. आंत्वानचा प्रभाव यूरोप व अमेरिका यातील रंगभूमीवरही पडला. रंगभूमीला त्याने टापटिपीच्या किंवा तंत्रात्मक नाट्यलेखनाच्या जाचातून मुक्त केले. इब्सेनच्या नाटकाचा त्याने फ्रेंच रंगभूमीला यथोचित आणि परिणामकारक परिचय करून दिला.

काळे, के. ना.