तमाशा : महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार. भारताच्या विविध भागांत विविध स्वरूपाचे लोकनाट्यप्रकार आढळून येतात. उदा., उत्तर व मध्य भारतात रामलीला,रासलीला, स्वांग, नौटंकी इ. गुजरातेत भवाई, बंगाल–बिहारमध्ये जात्रा, गंभीरा, कीर्तनिया इ. व दक्षिण भारतात यक्षगान, विथिनाटकम्, कामनकोटू इत्यादी. महाराष्ट्रातील तमाशाकलावंतांच्या संचाला फड म्हणतात. फडाचा मुख्य सरदार किंवा नाईक म्हणून ओळखला जातो. पूर्वी हा सरदार बहुश्रुत, शीघ्रकवी व उत्तम संपादणी करणारा असे. ढोलकी व हलगी वाजविण्यातही तो कुशल असे. सामान्यतः १९४० पर्यंत सरदारांची ही परंपरा टिकून असल्याचे दिसते. नाच्या किंवा नाची, सोंगाड्या, ढोलकी–तुणतुणे वाजविणारे साथीदार व री ओढणारे सुरत्ये वा झीलकरी हे सर्व सरदाराचे साहाय्यक असतात. तमाशाचे खेळ बहुधा होळीसारख्या सणांत अथवा खेड्यापाड्यांतील जत्राउरूसाच्या प्रसंगी होतात. खेळाला पडद्याची किंवा नेपथ्याची गरज नसते, तर एखाद्या पिंपळाच्या पारासारख्या ऐसपैस उंच जागेवर किंवा प्रेक्षकांच्या चौफेर गराड्यात पटांगणावरही ते करण्यात येतात.

तमाशाची जडणघडण : तमाशा हा शब्द मूळचा मराठी भाषेतील नसून तो उर्दूतून मराठीत आला आहे. तेरा–चौदाव्या शतकात द. भारतात मुसलमानी अंमल सुरू झाल्यापासून मराठीत तो आढळतो. एकनाथांच्या एका भारूडात ‘बडे बडे तमासा देखे’ अशी ओळ आहे आणि ‘तमाशा’ या शब्दाचा ‘उघडा देखावा’ असा अर्थ आहे. समाजातील प्रतिष्ठित वर्गात तमाशा हा हिणकस लोकांचा आचरट कलाप्रकार अशी समजूत रूढ असल्याचे दिसते. काही लोक ‘तमाशा’ या शब्दाची ‘तम+आशा’ अशी फोड करून, ज्याच्यामुळे तमाची म्हणजे पापाचरणाची आस लागते, असा कलाप्रकार असे त्याचे वर्णन करतात. अशा समजुती असल्या, तरी महाराष्ट्रातील खेडुतांचा हा अत्यंत आवडता खेळ आहे.

वरवर पाहता तमाशा हा खेडवळांचा भडक शृंगार वाटत असला, तरी तमाशा–क्षेत्रातील सुप्रसिद्ध कवी पठ्ठे बापूराव यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘लौकर यावे सिद्ध गणेशा । आतमध्ये कीर्तन वरून तमाशा ॥’ असा त्याचा मूळचा प्रकार आहे. भक्ती व शृंगार या दोहोंच्या संयोगातून तमाशाचा जन्म झाला आहे.

तमाशा कसा निर्माण झाला हे पाहण्यासाठी मराठी राज्याच्या स्थापनेपासून या मुलखातील खेड्यापाड्यांत कोणत्या लोककला प्रचलित होत्या आणि कालांतराने त्यांत कोणकोणते फरक होत गेले, हे पाहिले पाहिजे. सतराव्या शतकाच्या मध्यावर शिवछत्रपतींनी मराठी राज्याची स्थापना केली. त्यानंतर शिवाबावनी रचणाऱ्या शाहीर भूषणाचे नाव ऐकू येते पण शिवाबावनी ही मराठी रचना म्हणता येत नाही आणि भूषणाला जरी शाहीर म्हटलेले असले, तरी ते आधुनिक अर्थाने नसून उर्दूतील ‘शायर’ म्हणजे कवी अशा अर्थाने म्हटले आहे परंतु स्वराज्यस्थापनेच्या कार्यामुळे खेड्यापाड्यांत असणाऱ्या कविकलाकारांना एक नवा विषय मिळाला. मराठी शिपाई–शिलेदार लढाईवर जाऊ लागले. शौर्य गाजवू लागले त्यांची महती गाणे, शूरांच्या कथा काव्यांतून सांगणे, हा तो नवा विषय होय. तथापि तत्पूर्वीपासून मराठी भाषिक मुलखातील खेड्यापाड्यांत गोंधळ, ⇨  लळित, दशावतारी खेऴ [→दशावतारी नाटके] अशा लोककलाप्रकारांप्रमाणेच भेदिकांचे ताफेही प्रचलित होते. महाराष्ट्र भूमीतील स्त्रीपुरुष मूळचेच धार्मिक–आध्यात्मिक वळणाचे. एकनाथसारख्या संतकवींनी लोकांच्या मनावर भावभक्तीची, भागवत धर्माची पकड अधिकच बळकट केली होती. आध्यात्म विचारातील स्थूल भेद उलगडणारे भेदिकांचे ताफे गावोगावांत होते. याच भेदिक शाहिरांनी शूरांच्या कथाही रचायला सुरुवात केली. त्यातून कीर्तिगीत म्हणून पोवाडा उदयास आला.

त्याशिवायही गाणे–बजावणे हा ज्यांच्या उदरनिर्वाहाचाही धंदा होता, अशा डौरी, डोंबारी, कोल्हाटी, महार, मांग जातीच्या कवींना आणखी एक नवा विषय मिळला. तो म्हणजे, घरदार सोडून लढाईवर बराच काळ दूर गेलेल्या शिपायाला जी एक कामबुभुक्षित वृत्ती येते, तिचा निरास करण्यासाठी भडक आणि उथळ शृंगाराची गाणी रचणे आणि ती सैनिक–शिपायांच्या तळांत गाऊन दाखवणे.


अशा प्रकारच्या गरजेतूनच मराठी भाषेत लावणीचा जन्म झाला. हीच लावणी मराठीतील तमाशाची जन्मदात्री. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला पुण्यात पेशवाई सुरू झाली. पहिला बाजीराव उत्तरेत स्वाऱ्या करू लागला, मराठी घोडी अटकेपार गेली आणि परिणामतः मराठीतील सर्वसामान्य वर्गात जन्मलेल्या कवींच्या काव्यालाही उधाण येत गेले. ‘लावणी’ या शब्दाचा संबंध काहीजण संस्कृतमधील ‘लापणिके’ शी लावतात पण पेशवाईतील शाहीर विठू परशराम याने म्हटल्याप्रमाणे ‘करीन लावणी अक्षर वेचुनी । देवा पंढरीनाथा ।’ ज्याप्रमाणे भाताची रोपलावणी असते, तशी अक्षर–शब्दांची लावणी वा जुळणी होय. नाटक लावले असे आपण म्हणतो त्याचप्रमाणे गाण्यातील शब्दांची एकापुढे एक अशी झालेली लावण, ती लावणी होय.

या लावणीचेही पेशवाईतच अनेक प्रकार प्रचलित असल्याचे दिसून येते. शाहिरी लावणी ही पोवाडे रचणारे शाहीर डफतुणतुण्यावर फडात गाऊन दाखवीत. तीत बहुतेक शूरवीरांच्या शृंगारकथा असत. बैठकीची लावणी ही बहुतेक कलावंतिणी स्त्रिया दिवाणखान्यात बसून तबलासारंगीवर म्हणत. विरहिणी स्त्रियांची स्थिती हा बहुधा वर्णनाचा विषय. तंबोरीवरची लावणी कीर्तनकारसुद्धा म्हणत. तिचा विषय भक्ती, नीती हा असे. पण या सर्वांहून एक वेगळी अशी लावणी होती, असे म्हटले पाहिजे ती म्हणजे महारी लावणी. महारमांग कंबरेला ढोलके बांधून, डफाऐवजी त्याच्यासारखेच हलगी हे वाद्य, तुणतुणे, झांज इत्यादींच्या साथीने लांब हरळी देऊन एका वेगळ्याच ढबेने लावणी गात. आधी दोघांनी म्हटल्यावर, त्याची ‘री’ किंवा ‘झील’ मागे दोघांनी ओढायची अशी भेदिकासारखी पण अधिक कडक सुरावटीचीही महारी लावणी होती. ह्या महारी लावणीतूनच तमाशाचा जन्म घडत गेला आहे.

पेशवाईत अनेक शाहीर झाले. प्रभाकर, परशरामरामजोशी, अनंत फंदी, सगनभाऊ, होनाजी बाळा अशी त्यावेळच्या शाहीरकवींची नावे प्रसिद्ध आहेत. पण यांपैकी कुणी, कलावंतांना आसरा देणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारात तमाशा करून दाखविला असा उल्लेख नाही. पेशवे दरबारात रामजोशीचा गौरव झाला, पण त्याची ‘बया’ नावाची बाई तमाशात कधीच नाचलेली नाही. ‘होन्या गवळी’ यास बिदागी दिल्याचा उल्लेख आहे, पण त्याने रंगपंचमीला दरबारात लावण्यांचा फड उभा केला होता. त्याला तमाशासारखे स्वरूप होते, असे म्हणता येत नाही. शिवाय यातील बहुतेक कवींनी शृंगाराइतक्याच भक्तिपर रचना केलेल्या आहेत. रामजोशींची तर संस्कृत भाषेतही एक लावणी आहे. दुसरा बाजीराव लावण्या, नाचगाणी यांचा खूप शौकीन होता परंतु एखाद्या अंत्यज किंवा इतरही कुणा तमासगिराला आणवून ‘तमाशा’ करविल्याचा उल्लेख दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत मिळत नाही. तसा तो मिळणेही दुरापास्तच आहे. कारण पेशवाईत लावणी–शाहीरांचे फक्त फड होते. त्यांत नाचणारी, लोकनाट्याचे कथानक या गोष्टी पेशवाईनंतर १८६० च्या सुमाराला मराठी नाटकांची सुरुवात झाल्यानंतर आलेल्या आहेत. किंबहुना तमाशाचा मूळ गाभा जो वग, तोच मुळी १८६० नंतर जन्माला आला आहे. पेशवाईतील शाहीरकवींनी लावण्या, कटाव, फटके लिहिले, पण त्यांनी तमाशा करण्यासाठी आवश्यक असलेले वग रचल्याचे दिसत नाही. यावरून पेशवाईच्या अखेरीस या कवींचे भेदिकांच्या ताफ्यासारखेच ताफे असत, हे स्पष्ट होते.

मात्र पेशवाईत अशा ताफ्यांतून तमाशाचा उदय होण्यास अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली. पेशवे गणपतीचे भक्त. कोणत्याही कामाचा आरंभ गणपतीच्या नमनानेच  करण्याची पुराणप्रथा होती परंतु गणपतीच्या आराधनेसाठी स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण काव्य करण्याची पद्धत वरील ताफ्यांतून पेशवाईत सुरू झाली. त्याचप्रमाणे शृंगार दाखवायचा पण त्यातसुद्धा हरिनाम पाहिजे, म्हणून जुन्याच गौळणीचे लावणीच्या सुखसंवादात रूपांतर होऊ लागले.

अशा रीतीने तमाशाची गणगौळण पेशवाईतच तयार झाली तर वगाचे लोकनाट्य पेशवाईनंतर त्यात मिसळले. मराठी नाटकांचे फार्स पाहूनच ‘फार्सा’ किंवा ‘रंगबाजी’ हेही एक तमाशांचे अंग एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच तयार झाले. फार्सा या नावातच इंग्रजी फार्स मराठी रंगभूमीवर आल्यानंतर खेडूत कलावंतांनी तो उचललेला नवा नमुना आहे, हे सिद्ध होते. थोडक्यात, खेड्यापाड्यांतील महारमांग कवींची महारी लावणी, तिने पेशवाईतील कवींकडून उचललेली गणगौळण, मराठी नाटके होऊ लागलेली पाहून निर्माण केलेले वगाचे लोकनाट्य आणि इंग्रजी नाटकावरून मराठी रूपात तयार केलेला ‘फार्सा’ किंवा ‘रंगबाजी’ या साऱ्यांनी तमाशाची अंगोपांगे रूपास आणल्याचे दिसून येते.


या खेळाला निदान १८९८ पर्यंत तमाशा म्हणूनच संबोधत असत, असे म्हणता येत नाही. कारण १८९० च्या सुमारास नाटकाच्या जाहिरातीसुद्धा ‘अमुक नाटकाचा तमाशा–अमुक ठिकाणी होईल’ अशा असत. यावरून सर्वांना खुल्या असलेल्या कोणत्याही खेळाला तमाशा म्हणण्याची पद्धत त्यावेळपर्यंत होती, असे दिसून येते. तमाशाच्या खेळांना त्यावेळी ‘गंमत’ म्हणत असत, हे १८९८ सालाच्या जून महिन्यातील एका जाहिरातीवरून दिसून येईल. नागपूरकडे अशा ताफ्यांच्या कार्यक्रमाला गंमत असेच म्हणण्याची पद्धत आहे.

येथवर तमाशाची अंगोपांगे कशी बनत गेली हे स्पष्ट झाले आहे परंतु प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर तमाशा कसा सादर केला जाई हे पाहणेही उद्‌बोधक ठरते. ‘कलगी तुरा’ हे तमाशाच्या प्रत्यक्ष प्रयोगाचे महत्त्वाचे अंग होते. या लोककलेचा तो जणू प्राणच होय. पेशवाईच्याही पूर्वी जे भेदिकांचे ताफे असत त्यांतील काही कलगी पक्षाचे होते, तर काही तुरा पक्षाचे असत. कलगी आणि तुरा म्हणजे अध्यात्मातील अनुक्रमे माया आणि ब्रह्म होय. या मायाब्रह्मवादालाच खेड्यातील गुरुमार्गी विचारसरणीत शिव आणि शक्ती असे म्हणत. शिव थोर की शक्ती? माया आधी की ब्रह्म? असा हा पुरुषप्रकृतीचा झगडा भेदिकांतून परंपरेने चालत आला होता. गावागावांतील चौकात कलगीवाले आणि तुरेवाले यांचे सामने–म्हणजे बाऱ्या–होत आणि त्यांतून हारजीत केली जात असे. तीच हारजीत तमासगिरांत मोठ्या ईर्षेने लावली जाई.

तमाशाक्षेत्रात १९०० नंतर प्रसिद्ध झालेला तमासगीर पठ्ठे बापूराव कलगीपक्षाचा होता आणि गावागावांत तुरेवाल्यांशी झालेल्या बाऱ्यांतून तो प्रसिद्धीला आला. आपल्या अनेक काव्यांतून आपण कलगीवाले असल्याचा दाखला त्याने पुनःपुन्हा दिला आहे.

अशा कलगीतुऱ्यांच्या बाऱ्या लढतच तमाशात तमासगिरांनी नवनवी काव्ये आणि लावण्या, नवे वग, नवीनच करणी इतकेच नव्हे, तर चोहोकडून आणलेल्या बालेघाटी, जुन्नरी, छक्कड, पक्कड अशा नव्या चालींचीही भर घातली.

अशा या तमाशाच्या खेळाला कमीत कमी आठ ते दहा माणसे लागतात. तमाशाचा मुख्य फडमालक हा डफकरी असतो. डफाऐवजी तमाशात अधूनमधून शेकवून चढ्या कडक स्वरात वाजेल, अशी हलगी असते. ती गोल कड्यावर बांधलेली असते. हलगी कड्याची म्हणूनच या मुख्य माणसाला कडेकरी म्हणण्याची प्रथा आहे. तमासगीर आपल्या या नायकाला सरदार म्हणतात. पुरुषपात्रांपैकी दुसरे महत्त्वाचे पात्र म्हणजे सोंगाड्या. पुष्कळदा सोंगाड्या हाच तामाशातील नायक ठरतो. तमाशातून हास्य आणि शृंगार या दोन्हींची अपेक्षा असते. त्यातील हास्यरसाची सारी मदार सोंगाड्यावर असते. सोंगाड्या हजरजबाबी, कोणत्याही गोष्टीचा भलताच विपर्यास करणारा आणि नावाप्रमाणेच क्षणात सोंग बदलणारा असतो. ग्रामीण मराठीतील त्याचा विनोद पुष्कळ वेळा सभ्यतेच्या मर्यादा सोडून अश्लील होतो. उमाजी आणि तात्या सावळजकर, पठ्ठे बापूराव, भाऊ बापू नारायणगावकर या तमाशा–क्षेत्रात गाजलेल्या सरदारांप्रमाणेच दगडू साळी तांबे शिरोलीकर, दादू इंदुरीकर, दत्ता महाडिक, सावळा औरंगपूरकर असे कित्येक पट्टीचे सोंगाडे प्रसिद्ध आहेत. तिसरा ढोलकीवाला. ढोलकीचे बोलच काही वेगळे आणि रानवट गोड असतात. अत्यंत वाकबगारीने ढोलकी वाजविणारे गणपा येळावीकर, शंकर अवसरीकर असे ढोलके उल्लेखनीय आहेत. त्यांच्यामागे दोन सुरत्यांची जोडी असते. त्यांपैकी एकाच्या हातात तुणतुणे आणि दुसऱ्याच्या हातात झांज ही वाद्ये असतात. ‘अरे माझ्या रा ऽऽ मा, अग नारी तू ग ऽऽ, री री री री, दाजी जी जी जी’ अशा शब्दांच्या आधाराने ते लांब हरळी देऊन पुढील ‘म्हणणी’ ला मागून ‘टाकणी’ देतात. अधूनमधून जी बोली भाषा व्हायची, तिला ‘सपातनी’ म्हणतात. सपातनी हा शब्द संपादणी या शब्दाचे ग्रामीण रूप आहे. तमाशांतील मुख्य आकर्षण म्हणजे नाची. तिचा ढंग वेगळाच असतो. पूर्वी ती मराठमोळा पद्धतीचे लुगडे, तंग चोळी या पेहरावात असे, तिला नाची, नाचणारीण अशीच तमासगिरांत नावे आहेत. जुन्या काळच्या तमाशात नाचीऐवजी नाचे पोऱ्ये असत. त्यांच्या नावाचा ढंग खास मराठी स्त्रियांच्या हालचाली व लकबी उचललेला असे. ताक घुसळताना, राहाटाने पाणी शेंदताना, झिम्मा फुगडी खेळताना ज्या शारीरिक हालचाली होतात, त्या हालचाली आणि साधे तत्‌कार यांवर तमाशातील मुळचा नाच अधिष्ठित होता. पदर शिडासारखा दोन्ही हातांनी वर धरून उलटे येणे, छडीदार पदर धरून नुसते चपळाईने चालल्यागत पण मोठे नखरेपणे हात हालवणे–असा तमाशातील नाचीचा नाच आहे. पठ्ठे बापूरावांची पवळा नाची, तर कंठ्या नाच्या तमाशाक्षेत्रात नाव गाजवून गेलेली माणसे होत.


अशा रीतीने कमीत कमी पाच ते सहा पुरुष आणि एक किंवा दोन नाच्या एवढ्या मंडळीत प्रथम गण, नंतर गौळण, त्यानंतर एखादा रंगबाजीचा फार्स आणि मग मध्यरात्रभर वगाचे लोकनाट्य असा मराठी तमाशाचा एकंदर साज संजोग असे. पूर्वी जवळजवळ प्रत्येक गावात लहानमोठा तमाशा फड असे. जत्रा–उरुसांच्या हंगामात नामवंत तमासगिरांना लांबलांबच्या सुपाऱ्या येत आणि महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांतील गावे हलगी–ढोलकीच्या कडकडाटाने, सुरत्यांच्या किनऱ्या लांब हाळीने निनादून उठत.

व्हटकर, नामदेव

तमाशातील काही प्रसिद्ध कलावंत डावीकडून अनुक्रमे पहिली ओळ-भाऊ (मांग) नारायणगावकर : गाजजेले तमासगीर, पठ्ठे बापूरावांचे शिष्य. बापू (मांग) नारायणगावकर : पठ्ठे बापूरावांचे शिष्य, भूतपूर्व राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्याकडून गौरव. उषा चव्हाण : तमाशा, लोकनाट्य व चित्रपट या क्षेत्रांतील कलावंत. शाहीर साबळे : मुक्तनाट्याचे प्रणेते. दादू इंदुरीकर : ढोलकी तमाशातील सोंगाड्या, राष्ट्रपती पारितोषिक विजेता. दुसरी ओळ - संभाजी सातू (खाडे) कौलापूरकर : नावाजलेला ढोलकी तमासगीर. शिवा सातू (खाडे) कौलापूरकर : स्वत:चा तमाशाफड, यांचीच मुले काळू बाळू वग गाजवीत आहेत. भिकुबाई चंदणकर : खानदेशी लावणी–गायिका. किसन कुसगावकर : उत्कृष्ट सोंगाड्या, स्वत:चा तमाशाफड, पठ्ठे बापूरावांचा शिष्य. बाबुराव मारुती (मोकाशी) पुणेकर : मेळे व कलापथके यांत नाच्या पोऱ्या म्हणून उत्कृष्ट काम, दोनशेच्या वर वग लिहिले, स्वत:चा फड. तिसरी ओळ–पांडुरंग आबाजी कुरकुंभकर : प्रसिद्ध तमासगीर, हजरजबाबी सरदार, कवी, स्वत:चा तमाशाफड. दादू तुळापूरकर : नावाजलेला तमासगीर : बकुळा तथा चंचला इस्लामपूरकर : तमाशा व चित्रपट यांतील उत्कृष्ट लावणी-गायिका, शासनाकडून गौरव. रामा संपूजी (कुंभार) वर्धनगडकर : उत्कृष्ट देखणा सरदार, उत्तम गायक, स्वत:चा तमाशाफड, मुंबई राज्य तमाशा परिषदेचे अध्यक्ष (१९५९). कोंडू रामजी पाटील : प्रसिद्ध खानदेशी तमासगीर, स्वत:चा तमाशाफड. चौथी ओळ : कलावती येवलेकर - संगीतबारीतील लावणी-गायिका. बबन काळे : तमाशातील प्रसिद्ध ढोलकीपटू. बाबुराव कुरणकर : पठ्ठे बापूरावांचे शिष्य, स्वत:चा तमाशाफड, पहाडी आवाजातील भेदिक लावणी-गायक व मिठ्ठाराणी वगाचे सादरकर्ते. दगडोबा बापूजी गरुड : तमाशातील नृत्य व लावण्यांचे शिक्षक. लीलाबाई येवलेकर : तंबोरीवर मंद लयीतील लावणीगायनासाठी व शास्त्रशुद्ध रागदारीसाठी प्रसिद्ध.


तमाशाची विविध अंगे : तमाशाची विविध अंगे पुढीलप्रमाणे आहेत.

गण : गण म्हणजे गणपतिस्तवन. तमाशामध्ये या गणपतीचे स्वरूप उपनिषदातील ॐकारापासून, तर पुराणातील शिवसुतापर्यंत वर्णिलेले आढळते. उत्तर पेशवाईतील गण गाणाऱ्या शाहिरांत दोन प्रकारचे आध्यात्मिक विचारप्रवाह होते. एक शिव किंवा ब्रह्म मानणारे तुरेवाले आणि दुसरे शक्ती किंवा माया मानणारे कलगीवाले. कलगीवाले व तुरेवाले आपापल्या दैवताचे स्तवन या गणात करीत असत. सांप्रदायिक तमाशात अजूनही ही प्रथा सुरू आहे. बहुतेक शाहिरांनी गण स्वतःच रचले आहेत. पठ्ठे बापूराव हेही स्वतः गण रचीत असत. त्यांनी रचलेल्या गणाचा हा एक नमुना :

श्रीगणराया यावे रंगणी ॥धृ.॥ 

रंगणी या अंगणी या तुरा भंगुणी । 

गिरवावी माझी कंगणी॥

 सहस्र अठ्ठ्यायशी मुनीश्वर जमले चंद्रसूर्य दोन्ही ।

पाची पांडव सहावी द्रौपदी कृष्ण सारंगपाणी ॥

छप्पन्न कोटी कात्यायनी आणि त्रेपन्न कोटी जोगिनी ।

साडेचवदाशे योगिनी जमल्यामहावीर हनुमानी ॥

आणिमा गरिमा ऋद्धि सिद्धि चराचर अठरा शहाणी ।

एक लक्ष ऐशी सहस्र पीर पैगंबर मौनी॥

सात शंखिणी पाच पद्मिनी नऊ नागिणी एक राणी ।

पठ्ठे बापूराव कविची कहाणी कलगी तुऱ्याची वडिलभगिनी ॥

 गौळणी : गणानंतर गौळणी म्हणण्यात येतात. यांमध्ये गोपीकृष्णाच्या प्रेमलीलांचे खुमासदार वर्णन केलेले असते. संतांच्याही गौळणींचे पडसाद अशा गौळणींतून उमटलेले दिसतात. परंतु त्यांच्या शृंगारवर्णनात भडकपणा आहे. तमाशामध्ये या गौळणी साभिनय सादर करण्यात येतात, प्रसंग असतो मथुरेच्या बाजाराचा. दहीदुधाचे हंडे घेऊन व्रजबाला मथुरेच्या बाजाराला निघालेल्या असतात पण वाटेत कृष्ण व त्याचे सवंगडी त्यांना अडवितात. दहीदुधाचे दान मागतात. त्यांना छेडतात. मग व्रजबालांतील राधेची प्रतिनिधी मावशीबाई व कृष्ण–सवंगड्यांचा प्रतिनिधी पेंद्या यांच्यात मनोरंजक प्रश्नोत्तरे होतात. त्यांत कित्येक वेळा अध्यात्म, तर कित्येक वेळा विनोद असतो. हा एक भाऊ फक्कडच्या गौळणीचा नमुना असा :


 बाजार मोठा । लवकर गाठा

मथुरेच्या हाटा । चला निघा निघा

वरल्या आळीच्या । चंद्रावळीच्या

फळीला जाऊन ।। सांगा सांगा

यमुना नदीला । येईल भरती

नक्षत्र वरती । रोहिणी मघा

बाजाराला । विलंब झाला

सूर्यबिंब वर । आले बघा

धीटपणाने । माठ सांभाळुनी

घाट यमुनेचा । वेंघा वेंघा

रोकड अनुभवी । अवघड लाघवी

फक्कड भाऊची कवी । मागा मागा

लावण्या : गौळणीनंतरचा भाग लावण्यांचा असतो. प्रारंभीच्या तमाशात नाच्या पोऱ्याकडेच हे काम असे. यानंतर मात्र नाच्यापोराऐवजी नाची रंगमंचावर आली. गण गाताना सुरत्ये आपल्या सुरांनी वातावरण भारून टाकतात, मग काही वेळ नुसती ढोलकीच खणखणते. मग कडे–ढोलकीचा झगडा सुरू होतो. सवालाला जबाब मिळू लागतो. हळूहळू लय वाढू लागते. एवढ्यातच हा झगडा थांबून एकाएकी नाचीच्या पायांतील चाळांची छुमछुम सुरू होते. त्या छुमछुमाच्या नादातच ती मग आपला पदर उंच धरून पाठमोरी नाचत नाचत पुढे येते व पदराआडील आपल्या मुखवट्याने प्रेक्षकांचे कुतूहल चाळवीत एकदम वळून प्रेक्षकसन्मुख उभी राहते. याच वेळी ती आपला पदर कमरेला खोवते आणि डावा हात कमरेवर ठेवून व उजवा हात वर उभारून मंडलाकार नृत्य करते. नंतर पुन्हा उलट्या क्रिया करून दोन्ही हात कमरेवर ठेवून कमरेत लवून, हातांचे पंजे एकमेकांत अडकवून ते उलट–सुलट फिरवून, हवेत टाळी पिटून व उंच उडी मारून आपले नृत्य सादर करते. त्यानंतर तिचा तमाशातील रंगेल गड्याशी संवाद सुरू होतो. या संवादातूनच लावणीला प्रारंभ होतो.

तमाशा–लावणी ही वाद्य व नृत्य यांच्या साथीने गायिली गेल्यामुळे तिच्यात सुरुवातीपासूनच रंग भरत जातो. त्यातही लावणीच्या आशयानुसार ढोलकीचा किंवा कड्याचा नाद व ताल, नृत्याची लय आणि ढंग, नृत्यातील मुद्रा, बतावणी (सपातनी), ठाण, नुपूरांचा झंकार व नर्तकीच्या मानेचा खटका व कमरेचा लचका यांमुळे तमाशात जिवंतपणा येतो. वाद्य, नृत्य व अभिनय या गुणांची खुलावट होऊ शकेल अशा लावण्या रचण्याकडे शाहिरांचा कल त्यामुळेच होऊ लागला. पेशवाईच्या काळात अशा लावण्या रचण्यात रामजोशी, होनाजी बाळा, सगनभाऊ इ. तर त्यानंतर पठ्ठे बापूराव, लहरी हैदर इ. अग्रेसर आहेत. शाहीर रामजोशीच्या


 ‘उरि कंचुकी घट तटतटी’ या ओळीतील ‘ट’ च्या प्रासानुसार ढोलकी वा कड्यातून उमटणारे ध्वनी खूपच रंगत भरतात, तर

सुंदरा मनामधि भरलि जरा नाहि ठरलि हवेलित शिरली

                                                                        मोत्याचा भांग 

रे गड्या हौस नाहि पुरली म्हणोनी विरली पुन्हा नाहि फिरली 

                                                                        कुणाची सांग 

 या लावणीतील यमकबंधाचे सौंदर्य नर्तकीच्या मानेतील खळक्यामुळे खुलते आणि

 लग्न लागते माझे 

   बहुले अंगणी साजे 

  दारी चौघडा वाजे

 डंका छान छान छान 

 

या पठ्ठे बापूरावांच्या लावणीतून ‘छान छान छान’ चौघडा वाजण्याचा प्रतिसाद मिळतो, तो नर्तकीच्या नूपुरांतून [⟶लावणी].

 दौलतज्यादा : दौलतज्यादा हा प्रकार लावणी गायनाच्या वेळी चालू असतो. पेशवाईनंतर तमाशा लोकाश्रयी झाला. परिणामतः तमासगीर मंडळी गावकऱ्यांना त्यांनी दिलेल्या आश्रयाबद्दल दुवा देऊ लागली. दौलतज्यादा म्हणजे दुवा देणारांची दौलत जादा होवो असा अर्थ. याचे मूळ लळितामधील चोपदारात आढळते ते असे :

 दौलतज्यादा, दौलतज्यादा । 

 दशरथनंदन रामचंद्र महाराज । गरीबनिवाज ।। 

पुढे मात्र तमाशात या दौलतज्यादाला अनिष्ट वळण लागले. कोणीही उठावे व नर्तकीशी सलगी करीत, लोचटपणाने तिच्या अंगाला स्पर्श करावा व त्याबद्दल त्याने तिला एखादी पावली अधेली द्यावी, अशा प्रकारचे किळसवाणे स्वरूप प्राप्त झाले. त्यातच पुन्हा फर्माइशचीही भर पडली. लावणी तोडण्याचाही प्रकार सुरू झाला. विशेषतः संगीतबाऱ्यांमध्ये हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून येतो.

 मेदिक कवने : शिवपक्षाचे तुरेवाले व शक्तीपक्षाचे कलगीवाले यांच्यात चुरस असे. अशी चुरस जेव्हा दोन फड एकत्र येत तेव्हा खूपच रंगत असे. हैबतीच्या [⟶शाहीर हैबती] वेळी (१७९४–१८५४) हे सवालजबाबांचे प्रस्थ फार होते. हैबती स्वतः कलगीवाला म्हणजे मायावादी होता. एका कलगीतुऱ्याच्या भांडणात तुरेवाला हैबतीला विचारतो

 अध: ऊर्ध्व शून्य चतुर महाशून्यापासून ।

 शून्यामधि निजले नारायण ।

 निरंजनाच्या इच्छेमधी शक्ति झाली उत्पन्न ।। 


 त्यावर हैबती मायावादाला धरून उत्तर देतो– 

ब्रह्मचतुर्दश मिळून त्यास एक आवरण माया ।

मायेपोटी ब्रह्म कसे ते ऐका मूळ पाया ।।

ब्रह्म सुने जर म्हणाल, तर ते निःशब्द जाणावे ।

ते नपुंसक ऐसे वेदान्त मत पाहावे ।।

ब्रह्मनाम ते नरनारी चिन्ही शोधावे ।

ऐस असता ब्रह्म शिव म्हणून का बोलावे ।।

त्या ब्रह्माशी वेष्टण मायेचे आगळी माया ।

प्रजापति इंद्रासी सांगे ऐका कविराया ।।

मुजरा : मुजऱ्यामध्ये निरनिराळ्या शाहिरांना तसेच साधू, संत, अवलिये, बैरागी यांनाही वंदन केलेले असते. हा नाटकातील भरतवाक्याप्रमाणे तमाशाच्या शेवटी गाण्यात येतो. अलीकडे हा प्रकार बहुधा बंद झालेला दिसतो. तथापि १९२० नंतर या मुजऱ्यावर नाटकातील नांदीचा प्रभाव पडून तो तमाशाच्या प्रारंभी म्हणायला सुरुवात झाली. त्यामुळे प्रथम गण व नंतर मानकऱ्यांना मानाचा मुजरा करण्याची प्रथा रूढ झाली.

रंगबाजी : यामध्ये आशुक–माशुकांच्या उत्तान शृंगारचेष्टांचे वर्णन करणारी गाणी गाऊन व तद्‌नुरूप उघड संपादणी करून तमाशाला रंग भरण्याचे काम करण्यात येते. यात मुख्यतः नाची व सोंगाड्या यांचा खटकेबाज संवाद चालतो. त्यातच पुन्हा विरोध व खटका निर्माण करण्यासाठी झगडा, लावणी, ठुमरी, कव्वाली, छक्कड, साकी, टोणपा, बांगडी, कटाव व छंद इ. ढंगबाज चालींची गाणी म्हणण्यात येतात.

 छक्कड : छक्कड म्हणजे आशुक–माशुकांमधील पद्यमय संवाद. पठ्ठे बापूरावांनी छक्कड रचना बरीच केली आहे. या प्रकाराची परिणामकारकता अभिनय व म्हणण्याची शैली यांवर अवलंबून असते.

 फार्स : फार्स हा तसा रंगभूमीवरील प्रकार परंतु त्यातील विनोद व सामाजिक व्यंगदर्शन यांमुळे तमाशातही त्याचा शिरकाव झाला. उदा., तंबाखूचा फार्स, पटक्याचा फार्स इत्यादी.

वग : वग हा शब्द ‘ओघ’ या शब्दावरून आला असावा, असे म्हटले जाते. ओघ म्हणजे कथानकाचा ओघ. म्हणजेच वगाचे स्वरूप हे सामान्यतः आधुनिक नाट्यसंहितेसारखे असते. अलीकडे वगनाट्य हे तमाशातील कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग बनला आहे. निवेदक आपल्या स्वयंस्फूर्त भाषणाने कथानकातील दुवे जोडतो, हीच बतावणी किंवा सपातनी (संपादणी). पुष्कळदा वगाच्या प्रारंभीची भूमिका विशद करण्यासाठी खास लावणीही रचलेली असते.


या वगनाट्याचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असून १८६५ मध्ये उमा सावळजकर या तमासगिराने आपला सहकारी बाबा मांग याच्या साह्याने मोहना बटाव हा वग रचला आणि तोच पहिला मराठी वग ठरला. त्यानंतर पठ्ठे बापूरावांनी बरीच वगरचना केली. त्यांचा मिठ्ठाराणी हा वग प्रसिद्ध आहे. त्यांच्यानंतर अर्जुना वाघोलीकर, दगडू साळी तांबे शिरोलीकर, भाऊ फक्कड हे प. महाराष्ट्रातील आणि विदर्भातील वीर उत्तमराव मोहिते अशा विविध कविकलावंतांनी या क्षेत्रात वगरचना करून नाव घेण्याजोगी कामगिरी पार पाडली. अलीकडच्या काळातील शाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे यांनीही वगरचना केली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात वगनाट्याला मुक्तनाट्याचे स्वरूप लाभले असून पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, वसंत बापट, वसंत सबनीस इ. मान्यवर साहित्यिकांनीही वगनाट्ये लिहिली आहेत [⟶ वग].

संगीतबारी : १९३० नंतरच्या काळात उत्तर हिंदुस्थानी जलशाच्या पद्धतीचा एक नवाच प्रकार विदर्भ–मराठवाड्यातून येऊन तमाशात मिसळला. ‘संगीतबारी’ असे या नव्या प्रकाराचे नाव. संगीतबारी हा मुळात तमाशा नसून तो डोंबारणी–कोल्हाटणी यांचा नाच होय. तबला, पेटी, सळीचा त्रिकोण या वाद्यांच्या साथीवर जुन्यानव्या लावण्या, पदे आणि अलीकडे हिंदी–मराठी चित्रपटांतील गाणी उगीच इकडून तिकडे पळत गेल्यागत नाचून म्हणणे, असे या संगीतबारीचे मूळचे स्वरूप आहे. ढोलकीबारीमध्ये वग आणि नाट्य महत्त्वाचे असते, तर संगीतबारीमध्ये डोळे दिपवून टाकणारी नृत्ये व मादक लावणीगायनाला महत्त्व असते. ढोलकीबारीत साथीला स्वरवाद्य म्हणजे तुणतुणे व ढोलकी आणि रंगभरणीला झांज असते, तर संगीतबारीत बाजाची पेटी किंवा पायपेटी, तबला व रंगभरणीला सळीचा नादमधुर त्रिकोण असतो. यातील नर्तकीचे रूप, नाट्यातील नखरा, तिचा कर्णमधुर आवाज व गायनकला यांवर आणि सोंगड्याच्या संभाषणचातुर्यावर संगीतबारीचे यश अवलंबून असते. ढोलकीबारीची प्रथा ही महाराष्ट्रातील परंपरागत ढोलकीबारीशी निगडित असल्यामुळे ती पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांत विशेषत्वाने दिसून येते, तर संगीतबारीचे मूळ उत्तर हिंदुस्थानातील दरबारी नर्तिकेच्या प्रथेमध्ये असल्यामुळे तिची लोकप्रियता विदर्भ–मराठवाड्यात विशेष आहे. संगीतबारीला तिकडे ‘संगीत जलसा’ या नावानेही संबोधतात. कौसल्या कोपरगावकर, लीला व कला येवलेकर, हिरा सातारकर, शेवंती जेजुरीकर, यमुना वाईकर, अनुसया कवठेकर, छबू नगरकर, कमल व सुलोचना पातुर्डेकर अशा अनेकांच्या संगीतबाऱ्यांनी बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.

तमाशाची आर्थिक बाजू : अगदी सुरुवातीच्या काळात एका तमाशाफडात एक नाच्या पोऱ्या आणि दहा–बारा तमासगीर असत. खेड्यातील जत्रेच्या वेळी गावकरी त्यांच्याकडून रात्रभर तमाशा करून घेत व त्याबद्दल त्यांना पायली–दोन पायली दाणे देत असत. हेच त्यांचे मानधन. ही प्रथा साधारणपणे १९२० पर्यंत होती. पुढे १९२५ पासून तमाशामध्ये नाच्या पोऱ्याऐवजी कोल्हाटणी आणि इतर स्त्रिया आल्या. त्या काळी एका ढोलकीफडात पंधरा ते वीस तमासगीर व संगीतबारीत दहा ते बारा माणसे असत. त्यांचे खेळ तमाशागृहात (थिएटर) होत. तमाशागृहाच्या मालकाकडून वा ठेकेदाराकडून संगीतबारीला रोज पाच ते दहा रुपये आणि ढोलकीतमाशा–फडाला दहा ते पंधरा रुपये शिधा मिळे, त्यानंतर मात्र ही बिदागी अनुक्रमे पंधरा ते चाळीस व पंचवीस ते साठ रुपयांपर्यंत वाढत गेली.

पुढे १९५० नंतर बरेच तमासगीर आपापले स्वतंत्र फड गावोगावी नेऊन कनातीतून तमाशाचे खेळ करू लागले. त्यांच्या फडात आठ-दहा नाचणाऱ्या स्त्रिया, सोंगाड्या, चार ढोलकीवाले, हलगीवाले व इतर कामासाठी गडीमाणसे असा मोठा ताफा आणि तंबू, राहुट्या, लाईट, जनरेटर इ. सरंजाम असे. त्यामुळे या सर्वांचा मिळून त्यांना बराच खर्च येई. ते जत्रा-उरूस प्रसंगी गावकऱ्यांकडून सुपाऱ्या घेत. त्यात त्यांना एकावेळी पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंत बिदागी मिळे. आज हा आकडा बाराशे ते तीन हजारांवर गेला आहे. या फडातील काही कलावंत रोजंदारीवर, तर काही मासिक पगारावर असतात. सामान्यतः या कलावंतांना सु. सहाशे  व गडयांना सु. तीनशे रुपये महिना देण्यात येतो.

ढोलकीतमाशा किंवा संगीतबारी यांच्या लढती पूर्वीच्या काळी मुंबई–पुण्यासारख्या शहरी मोठ्या प्रमाणावर चालत असत. त्यासाठी मुंबईला १९४० पर्यंत दहा व पुण्याला सात तमाशागृहे होती. त्यानंतर मात्र ही संख्या बरीच कमी झाली. आज तर मुंबईला लालबागचे हनुमान थिएटर आणि पुण्याला आर्यभूषण थिएटर असे एकेकच स्थायी स्वरूपाचे तमाशागृह अस्तित्वात आहे. यांखेरीज सांगली येथे गोकुळ थिएटर, जळगावला हैदरी थिएटर, बार्शीला महालक्ष्मी तमाशा थिएटर, सोलापूरला छाया थिएटर व कोल्हापूरला लक्ष्मी थिएटर ही स्थायी स्वरूपाची तमाशागृहे असून जालना, परळी वैजनाथ, परभणी व बीड या गावी अस्थायी स्वरूपाची बंदिस्त तमाशागृहे आहेत. तमाशागृहांतून किंवा स्वतंत्र कनातींतून होणाऱ्या खेळांच्या तिकीटांचे दर पूर्वीच्या काळी दोन आण्यांपासून तीन–चार आण्यांपर्यंत (१८९८) व पुढे एक आण्यापासून सात–आठ आण्यांपर्यंत (१९२७) असत. आज हे प्रमाण एक रुपयापासून दोन रुपयांपर्यंत असल्याचे आढळते.


 महाराष्ट्रातील बहुतेक खेड्यापाड्यांतून नित्यनैमित्तिक स्वरूपाचे जत्रा–उरूस भरतात. त्यांत सर्वत्र तमाशाचे खेळ होतात. अशा काही प्रसिद्ध जत्रा–उरूसांची स्थळे खालीलप्रमाणे आहेत : कुलाबा जिल्ह्यातील टाकाई (साजगाव) येथे बोंबल्या विठोबाची यात्रा कार्तिक शुद्ध ११ ते वद्य ११ पर्यंत भरत असून ती लाखाच्या वर असते. तेथे ५–७ तमाशाफड आणि संगीतबाऱ्यांचे २० च्या वर कार्यक्रम होतात. हे खेळ झाडाखालीच होत असतात. नासिक जिल्ह्यातील वणी (ता. कळवण) येथे सप्तशृंगीची यात्रा प्रसिद्ध असून ती चैत्र शुद्ध ९ ते वद्य ४ आणि आश्विन शुद्ध १ ते १५ या तिथींना भरते. या यात्रेत तमाशाचे ५–६ तंबू असतात. वणी कसबे (ता. दिंडोरी) येथेही सप्तशृंगी देवीचीच यात्रा चैत्र महिनाभर भरत असून तेथे सामान्यतः लाखाच्यावर यात्रेकरू असतात. तेथेही तमाशाचे अनेक कार्यक्रम तंबूंमधून होतात. पुणे येथीलही चतुःशृंगीची यात्रा आश्विन शुद्ध १ ते १५ या तिथीला भरत असून तेथेही तंबूंमधून तमाशाचे खेळ होतात.

यांखेरीज ठाणे जिल्ह्यात म्हसे, अंबरनाथ नासिक जिल्ह्यात पारधडी, नासिक, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, धुळे जिल्ह्यात तळोदा, जळगाव अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, श्रीरामपूर, टोका, प्रवरासंगम, बोधेगाव, मढी पुणे जिल्ह्यात आळंदी, पुणे, जेजुरी, करंजे (सोमया), वीर सातारा जिल्ह्यात वाई, शिंगणापूर, म्हसवड, पाली सांगली जिल्ह्यात चिंचवीवांगी, रेणावी, जत, सांगली सोलापूर जिल्ह्यात वैराग, पंढरपूर, वडवळ, सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, त्रिंबोली, कोल्हापूर औरंगाबाद जिल्ह्यात नालनी खुर्द, जालना, देऊळगाव राजा, पैठण परभणी जिल्ह्यात हिंगोली, औंढा, सेलू, परभणी बीड जिल्ह्यात तलवडा, बीड, परळी वैजनाथ नांदेड जिल्ह्यात माहूर, मालेगाव उस्मानाबाद जिल्ह्यात तेर, लातूर, तुळजापूर,येरमाळा बुलढाणा जिल्ह्यात धानोरा, देऊळगाव राजा अकोला जिल्ह्यात लोणी बुद्रुक अमरावती जिल्ह्यात कारंजा, शेवगाव, कौंडिण्यपूर यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस, वणी वर्धा जिल्ह्यात ढगा, कोटेश्वर नागपूर जिल्ह्यात रामटेक इ. आणि पाटण तालुक्यातील १६१ यात्रा तसेच माण तालुक्यातील ४५ यात्रा या तमाशाफडाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या विविध यात्राक्षेत्रांतून तमाशाचे अनेक फड आपले कार्यक्रम करतात आणि त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होऊन तमाशाफडांना वर्षाकाठी सु. वीस लाख रुपयांचा व्यवहार करण्याची संधी मिळते.

काही प्रसिद्ध तमाशा - कलावंत डावीकडून अनुक्रमे पहिली ओळ - लीला गांधी : लोकनाट्यांत व चित्रपटांत गायन-नर्तन, उत्कृष्ट नर्तिका. यमुनाबाई वाईकर : ज. १९२१. उत्कृष्ट शृंगारिक विनोदी लावणी - गायिका, स्वत:ची संगीतबारी, सुवर्णपदकाचा सन्मान. यशोदाबाई वाईकर : रागदारीची सुस्वर लावणी - गायिका. कौसल्याबाई कोपरगावकर : पिढीजात तमाशा कलावंतीण, शास्त्रोक्त पद्धतीच्या नाचगाण्यात प्रवीण, कव्वालीगायनासाठी प्रसिद्ध. राधाबाई बुधगावकर : तमाशा कलावंतीण, स्वत:ची उत्तम संगीतबारी. विठाबाई नारायणगावकर : स्वत:चा तमाशाफड व अभिनयनैपुण्याबद्दल प्रसिद्ध. दुसरी ओळ - हिराबाई सासवडकर : स्वत:चा फड, जुनी पहाडी लावणी - गायिका. सुशीला मोरे : नाची. सरस्वतीबाई कोल्हापूरकर : स्वत:चा फड, उत्कृष्ट गौळणी व लावणी - गायिका. ताराबाई कलेढोणकर : पिढीजात तमाशा कलावंतीण, ढंगदार लावणी - गायिका व नर्तिका. विमल जळगावकर. उत्कृष्ट नाचकाम, कव्वाली व गझल - गायनासाठी प्रसिद्ध. तिसरी ओळ - गोदावरी पुणेकर : बालेघाटी लावण्यांसाठी प्रसिद्ध, महाराष्ट्र शासनाकडून गौरव. मृ. १९७०. बापूसाहेब जिंतीकर : पठ्ठे बापूरावांचे पट्टशिष्य, तमाशाफड-संचालक, तमाशा साहित्याचे प्रकाशक. पठ्ठे बापूराव : ज. ११ नोव्हेंबर १८६८ - मृ २२ डिसेंबर १९४५. शीघ्रकवी, शृंगारिक व भेदिक लावण्या रचण्यात प्रसिद्ध, स्वत:चा तमाशाफड, अनेक तमासगिरांचे गुरू. नामचंद पवळ : ज. १८८१ - मृ. १९३४. पठ्ठे बापूरावांच्या फडातील स्वरूपसुंदर नाची. कस्तुरबाई कडूसकर : ढंगदार जुनी लावणी - गायिका. चौथी ओळ - जोहराबाई जळगावकर : विदर्भ - खानदेशातील सुप्रसिद्ध तमाशा कलावंतीण व संगीत जलसाकार, रामजोशी - सगनभाऊंच्या लावण्या गाण्यात हातखंडा. रोशन सातारकर : प्रसिद्ध लावणी - गायिका. सुगंधा सिन्नरकर : जुन्या लावण्या, विशेषत: कव्वाली - गायिका, तरुणपणी मृत्यू. अनुसयाबाई जेजुरीकर : जुनी लावणी - गायिका. लीलाबाई मांजरीकर : संगीबारीतील उत्तम गायिका.


 तमाशातील स्थित्यंतरे : उत्तर पेशवाई आणि पुढे १८८० ते १९३० हा त्यानंतरचा काळही तमाशाच्या भरभराटीचा काळ होता. याच काळात पठ्ठे बापूराव, तात्या सावळजकर, शिवा संभा कौलापूरकर, दगडू तांबे शिरोलीकर, भाऊ बापू (मांग) नारायणगावकर, भाऊ फक्कड, गुणी हरिभाऊ, खानदेशातील राजधरबुवा महानुभाव, विदर्भातील भारतीबुवा झाडीवाले, बेंड्या तमासगीर, चांदभाई मुसलमान, भिकाभाई तमासगीर आणि गुलाबराव तमासगीर असे अनेक तमाशाकलावंत उदयाला आले.

पुढे १९३०–३५ नंतर मात्र तमाशाला पुन्हा अवकळा प्राप्त झाली. स्वातंत्र्योत्तर काळात तर तमाशातील अश्लीलतेमुळे दारूबंदीप्रमाणेच तमाशाबंदीही करण्यात आली होती. तथापि या खास मराठी लोकनाट्यातील गोडवा व सामर्थ्य लक्षात घेऊन १९४८ मध्ये शासनाने एक ‘तमाशा सुधार समिती’ नेमली व तिच्या द्वारे तमाशातील अश्लील प्रकारांना आळा घालून त्यात सुधारणा घडवून आणण्याचे ठरविले. या समितीने दिलेल्या प्रमुख सूचना म्हणजे तमाशातील नटनटींना जाहिरातीसाठी तंबूबाहेर बसविण्यात येऊ नये तमाशात अश्लील पदे व संवाद नसावेत आणि दौलतज्यादा करताना कोणीही नर्तकीच्या अंगाला हस्तस्पर्श करू नये, या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र तमाशा परिषद (१९५५) ही संस्थाही स्थापन झाली. तिने तमाशाचे लोकाभिमुख स्वरूप कायम ठेवून तिच्यातील अनिष्ट प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. तमाशाचा उपयोग सामाजिक व राजकीय प्रचारासाठी करण्यात आला. कलापथके ही त्याचीच एक परिणत अवस्था आहे. दरवर्षी तमाशामहोत्सव भरवून शासनाने तमाशा कलावंतांना चांगले प्रोत्साहनही दिले. त्यामुळे लोकनाट्याच्या स्वरूपात तो रंगमंचावर अवतीर्ण होऊ लागला. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे मुंबईची केळेवाली, व्यंकटेश माडगूळकरांचे पती गेले ग काठेवाडी, दादू इंदुरीकरांचे गाढवाचं लग्न, दादा कोंडक्यांचे विच्छा माझी पुरी करा, शाहीर साबळ्यांचे कशी काय वाट चुकला व इ. मा. मिरासदारांचे सोकाजीराव टांगमारे ही वगनाट्ये सर्व थरांतील प्रेक्षकही आवडीने व निःसंकोचपणे पाहतात.

सध्या महाराष्ट्रात तमाशाफडांची संख्या सु. चारशेपर्यंत आहे. तथापि स्वतःचा सरंजाम बाळगून फिरतीवर जाणारे असे सु. वीस तरी फड आहेत. ढोलकी तमाशाफडाप्रमाणेच काही संगीतबाऱ्याही गावोगावी तंबूतून आपले कार्यक्रम करीत असतात. ही मंडळी वर्षातून तीनशे दिवस तरी फिरतीवरच असते. एका बाजाराला किंवा जत्रेला त्यांची प्राप्ती रु. आठशेपासून एक हजारापर्यंतही जाते परंतु आजच्या संगीतबारीच्या कार्यक्रमातून मात्र तमाशाचा मूळचा अस्सल बाज फारसा आढळत नाही. त्यात बराच नाटकीपणा आला आहे. एवढेच नव्हे, तर चित्रपटगीतांची छाप त्यांच्यातील लावण्यांवर पडलेली दिसते. काही पांढरपेशा शाहिरांनी कलापथके काढली व पोवाड्याच्या साहाय्याने राजकीय व सामाजिक प्रचाराचे कार्यही केले आहे. याच कलावंतांनी १९५५ च्या आसपास लोकनाट्याचा बाज सुरू केला. त्यात एक नाची, एक गाणारी, ढोलकी वादक, सोंगाड्या व जातकथेतील एखादे कथानक एवढेच असते. त्यातून खऱ्या तमाशाचे दर्शन घडत नाही. ढंगदार लावण्यांचा किंवा जुन्या वगनाट्याचा त्यात मागमूसही आढळत नाही. अशा संगीतबारीचा खर्च साधारणपणे हजार ते बाराशे रुपयांपर्यंत जातो. पूर्वीचा तमाशा रात्री दोन वाजता उभा राही व दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत चाले परंतु हे आधुनिक लोकनाट्य मात्र अवघे तीन तास चालते. त्यात पूर्वीच्या सोंगाड्याचा हजरजबाबीपणा दिसत नाही, किंवा बारा बलुतेदारांनी उभ्या केलेल्या ‘सोंगा’ चे स्वरूपही त्यात आढळत नाही. अशा रीतीने तमाशा हा दिवसेंदिवस आपल्या मूळच्या अस्सल बाजापासून दूर जाऊन आज तो मुक्तनाट्याच्या स्वरूपात दिसू लागला आहे.

मराठी तमाशा परिषद : तमाशामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने १९४८ साली शासनाने दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली एक तमाशा सुधारणा समिती स्थापन केली होती. पुढे १९५४ मध्ये तमाशा अभ्यवेक्षण मंडळ अस्तित्वात आले परंतु तमाशातील हे वगसाहित्य सामान्यतः उत्स्फूर्त असल्याने ते लिखित स्वरूपात या मंडळाकडे पाठविणे तमासगिरांना त्रासदायक ठरले. यातून मार्ग काढण्यासाठी पुण्याचे एक तमाशा–ठेकेदार अहमदशेठ तांबे यांनी तमासगिरांची एक सभा बोलाविली. या सभेत ठरल्याप्रमाणे २५–२६ जून १९५५ या दिवशी पुणे येथे महाराष्ट्र तमाशा परिषदेचे पहिले अधिवेशन भरले. त्याचे अध्यक्षस्थान केशवराव जेधे यांनी स्वीकारले होते. या अधिवेशनात एकूण १४ ठराव संमत करण्यात आले. यानंतर दुसरे अधिवेशन १९५६, तिसरे १९५७ आणि चौथे १९५८ याप्रमाणे परिषदेची अधिवेशने दरवर्षी निरनिराळ्या गावी होत गेली परंतु १९५८ मध्ये मुंबईच्या काही तमाशाफड मालकांनी आपली एक वेगळीच संघटना उभी करून रामा कुंभार वर्धनगडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई राज्य तमाशा परिषद स्थापन केली. या दोन्ही परिषदांचे ध्येय व उद्देश एकच होता. तेव्हा एकाच राज्यात एकाच ध्येयाच्या व एकाच उद्देशाच्या दोन परिषदा असणे इष्ट नव्हे, या विचाराने तत्कालीन मंत्रीमहोदय नाशिकराव तिरपुडे यांनी दोन्ही परिषदांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणले व मराठी तमाशा परिषदेची स्थापना करण्यात आली. त्या परिषदेचे पहिले अधिवेशन कोल्हापूरला ग. ल. ठोकळ यांच्या अध्यक्षतेखाली १९५९ साली झाले. त्यानंतर पुढे जळगाव, बीड, सांगली, औरंगाबाद व पुणे येथे या परिषदेची अधिवेशने झाली. या विविध अधिवेशनांतून परिषदेने तमाशा कलावंतांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून वेळोवेळी अनेक ठराव संमत केले. परिणामतः राज्य शासनने १९५७ सालापासून मुंबई राज्य तमाशा महोत्सव सुरू करून तमाशा स्पर्धाही आयोजित केल्या. तमाशामहोत्सव परिषदेवर तमासगिरांचे प्रतिनिधी घेण्यात आले. अभ्यवेक्षण मंडळाने दहाऐवजी तीनच चोपड्या तपासणीसाठी आवश्यक ठेवल्या. तमाशाच्या खेळासाठी ‘बी’ थिएटर चालविण्याचे परवाने देण्यात आले. तमाशाच्या खेळावरील करमणूक कर माफ करण्यात आला. नावाजलेल्या तमाशा कलावंतांना राष्ट्रपतिपदक देऊन गौरविण्यात आले. हा मान भाऊ बापू (मांग) नारायणगावकर व दादू इंदुरीकर यांना अनुक्रमे १९६१ व १९७४ साली मिळाला होता. दरवर्षी शासनातर्फे तमाशा कलावंतांना मानधनही देण्यात येऊ लागले. आकाशवाणीवरून लोकनाट्ये व लावण्या यांचे कार्यक्रमही ध्वनिक्षेपित होऊ लागले. विविध तमासगीर कलावंतांचे खास कार्यक्रम आकाशवाणीवर सुरू झाले. भारतीय खादी ग्रामोद्योगासारख्या संस्थांतर्फे आणि शेतकी प्रदर्शनासारख्या विशेष प्रसंगी तमाशाचे फड उभारण्याची प्रथा चालू झाली. तसेच राज्य शासनाने तमाशाचे स्वतंत्र खातेही सुरू केले. अलीकडे महाराष्ट्र शासनातर्फे तमाशा प्रशिक्षण शिबीर भरविण्यात येत असून तमाशा कलावंतांच्या मुलामुलींच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. यांखेरीज इतरही अनेक योजना शासनाच्या विचाराधीन आहेत.


पहा : लोकनाट्य.

जोशी,चंद्रहास थिटे, राजाभाऊ

संदर्भ : १. जोशी, वि. कृ. लोकनाट्याची परंपरा, पुणे, १९६१.  

           २. बाबर, सरोजिनी, तमाशा, पुणे, १९७१. 

           ३. मांडे, प्र. भा. मराठवाड्यातील कलगी–तुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी, औरंगाबाद, १९६५.

           ४. व्हटकर, नामदेव, मराठीचे लोकनाट्य–तमाशा–कला आणि साहित्य, कोल्हापूर, १९७५. 

           ५. सहस्रबुद्धे, म. ना. मराठी शाहिरी वाङ्‌मय, पुणे.

 तमाशा

नाचीचा एक पवित्रा

नाचीच्या पायांतील चाळ

तमाशातील नाची

संगीतबारीतील नर्तिका, सळईत्रिकोणवादक व ढोलकीबहाद्दर


'जावळीवर फडकला भगवा झेंडा' वगातील दृश्य

'लड्डूसिंग' वगातील सोंगाड्या व नायिका

गण गाणारे हलगीवाले

ढोलकी फडातील झीलकरी

'लड्डूसिंग' वगनाट्यातील दरबार

ढोलकी तमाशातील गौळणी


तमाशाची एक जुनी जाहिरात

खेळाची तिकीटविक्री

खेळाचा तंबू

आधुनिक तमाशा : प्रसिद्धीफलक.

तमाशापथकाचे वाहनआर्यभूषण : पुण्यातील तमाशाचे प्रसिद्ध थिएटर.

खेळापूर्वीचे सौंदर्यप्रसाधन

तमाशा-कलावंताचे कुटुंबदृश्य


तमाशाफडाचा तंबू

तमाशा अधिवेशनातील महिला कलावंत, पुणे १९५७.

तमाशाचा प्रेक्षकवर्ग