वंगणे : यंत्रे, वाहने इत्यादींतील एकमेकांच्या सान्निध्यात फिरणाऱ्या किंवा सरकणाऱ्या पृष्ठभागांचे घर्षण व झीज कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या  धन, द्रव वा वायुरूप पदार्थांना वंगणे म्हणतात. घर्षणाचा अडथळा जितका कमी होईल तितके यंत्रापासून अधिक काम मिळते.

वंगण पदार्थांत काही विशेष गुणधर्म अपेक्षित असतात. वंगण पदार्थ बुळबुळीत व उष्णतेचे विकरण करणारा (घालवून देणारा) असावा. त्यात धातुपृष्ठाचे क्षरण (झीज) होईल असे अम्ल, क्षार (अल्कली) वा लवण नसावे. त्यात चिकटपणा असू नये, पण पृष्ठभागावर तो सतत राहावा. यामुळे धातूच्या पृष्ठभागांचे ⇨ ऑक्सिडीभवन होत नाही. वंगणाच्या ठिकाणी धक्के शोषून घेण्याचा व विद्युत् निरोधन हे गुणधर्म असावेत. वंगणात मिसळलेले धातूचे व धुळीचे कण पृष्ठभागावरून वाहून नेण्याइतका प्रवाहीपणा त्यात असावा. घर्षणजन्य उष्णतेने वंगण पेटू नये. काही कामांसाठी वंगण ठराविक ठिकाणी बंदिस्त राहील असे असावे. द्रवीय चालनाच्या (द्रवाच्या दाबावर वा गतीवर चालणाऱ्या ) यंत्रातील तेल शक्ती प्रेषणाला अनुकूल इतके कमीत कमी घट्ट असण्याबरोबरच वंगण म्हणून उपयुक्त असावे. विद्युत् स्फुलिंग पडणाऱ्या यंत्रात वापरण्यात येणारे तेल विद्युत् विरोधक, न पेटणारे व वंगणीय असावे. थंड प्रदेशात वापरावयाचे तसेच वातानुकूलन व प्रशीतन यंत्रणेत वापरावयाचे वंगण गोठून घट्ट होऊ नये. घर्षणजन्य उष्णतेमुळे वंगणात रासायनिक विक्रिया घडू नयेत.

वरील गुणधर्मांमुळे वंगणाच्या वापराने घर्षणाचा अडथळा कमी होण्याबरोबर कमी जास्त प्रमाणात पुढील फायदेही मिळतात : (१) घर्षणजन्य उष्णता काढून टाकून घर्षणकारी भाग थंड ठेवणे. (२) सतत फिरण्याच्या वा सरकण्याच्या विक्रियेमुळे तयार होणारे धातूंचे सूक्ष्मकण व इतर टाकाऊ पदार्थ वाहून नेणे. (आ) गंज व हवेमुळे होणारे इतर दुष्परिणाम यांच्यापासून फिरत्या भागांचे रक्षण होणे. (४) अनिष्ठ विद्युत् प्रवाहाला अडथळा होणे. (५) फिरते भाग व बाहेरील हवा यांमध्ये संरक्षक पटल निर्माण करून वंगणावरील दाब आवश्यक प्रमाणात टिकवून धरणे आणि बाहेरील कचरा व अन्य पदार्थ आत येण्यास प्रतिबंध होणे. (६) आवाज कमी होणे. (७) यंत्र चालविण्यास लागणाऱ्या ऊर्जेत व खर्चात बचत होणे.

इतिहास : वंगणे प्राचीन काळापासून वापरण्यात येत आहेत. ४,००० वर्षांपूर्वीच्या ईजिप्शियन चित्रांमध्ये जड स्मारके ओढून नेण्यात निर्माण होणारे घर्षण कमी करण्यासाठी वंगणांचा उपयोग केल्याचे दर्शविले आहे. इ. स. पू. सु. १४०० मधील चीनमधील थडग्यातील रथाच्या चाकाच्या आसावर चरबी लावलेली आढळून आली आहे. यावरून त्या काळात मानवाला वंगण वापरण्याची कल्पना होती असे वाटते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्राण्यांची वसा (चरबी) तसेच ऑलिव्ह, जवस, एरंडी, कापूस यांच्या बियांपासून काढलेली वनस्पती तेले व माशांच्या वसेपासून काढलेले तेल वंगण म्हणून वापरीत.

औद्योगिक वंगणांपैकी बहुसंख्या वंगणे आता कच्च्या खनिज तेला पासून (पेट्रोलियमपासून) तयार करण्यात येतात. त्यामुळे वंगणाच्या इतिहासाचा खनिज तेल उद्योगाशी निकटचा संबंध आहे. प्राचीन काळी ॲसिरियन व ईजिप्शियन आणि नंतर ग्रीक व रोमन लोक प्रकाशासाठी व शव टिकविण्यासाठी खनिज तेलाचा उपयोग करीत होते. अमेरिकन इंडियन लोक खनिज तेलाचा वैद्यकीय उपयोग करीत. मिठाकरिता खाणकाम करताना प्रारंभी अमेरिकेतील वसाहतवाले त्यात मिळणारे खनिज तेल निरूपयोगी म्हणून टाकून देत असत. नंतरच्या काळात मात्र पेनसिल्व्हेनिया राज्यातील खनिज तेलसाठ्याचा शोध लागल्यावर त्याचा वंगण म्हणून उपयोग करण्यात येऊ लागला. १८३३ मध्ये बीचॅम टॉवर यांना प्रयोगान्ती असे आढळून आले की, तेलात बुडवून ठेवलेल्या यंत्रभागांचे घर्षण कमी होते व तेल दाबापासून (भारापासून) अलिप्त असते आणि शीघ्र गतीला ते टिकते. १८८६ मध्ये ऑस्बर्न रेनल्ड्झ यांनी हीच गोष्ट सापेक्ष हालचाल करणाऱ्या दोन पृष्ठभागांत तेलाचे पटल सतत निर्माण करून सिद्ध केली.

त्यानंतर खनिज तेल हाच वंगणांचा प्रमुख उद्गम ठरला. अशा प्रकारे खनिज तेलाचा इंधन व वंगण म्हणून उपयोग होऊ लागल्यानेच अंतर्ज्वलन एंजिन (ज्यात इंधन आतमध्येच जाळण्यात येते असे एंजिन), मोटारगाडी, विमान, डीझेल रेल्वेगाडी, टर्बोजेट हे सर्व प्रत्यक्ष वापरात येणे शक्य झाले. त्याचप्रमाणे सुधारित वंगणांमुळेच अधिक अवघड परिस्थितीत कार्य करणा ऱ्या जास्त क्षमतेच्या व जास्त वेगाच्या उत्पादन यंत्रसामग्रीचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे शक्य झाले.

वर्गीकरण : वंगणे विविध प्रकारची असून त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे केली जाते : (१) द्रव वंगणे : खनिज तेल वंगणे, वसायुक्त (चरबीयुक्त वा स्निग्ध) तेले, कृत्रिम रासायनिक तेले, जल-तेल मिश्रणे. (२) अर्धद्रव या अर्धघन वंगणे : ग्रिजे, मेणे. (३) घन वंगणे : ग्रॅफाइट, बोरॉन नायट्राइड, मॉलिब्डेनम डायसल्फाइड. (४) मिश्र वंगणे : द्रव, अर्धद्रव व घन वंगणांची विविध मिश्रणे, (५) वायू वंगणे : हवा अगर हीलियम वायू.

वंगणांमध्ये द्रव वंगणांचा वापर सर्वांत अधिक केला जातो. ह्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत : (१) द्रव वंगणे स्वस्त व वापरण्यास सोपी असतात. (२) ही वंगणे यंत्राचे फिरते भाग थंड रहाण्यास मदत करतात. (३) त्यांची वंगण ह्या दृष्टीने कार्यक्षमता चांगली असते. द्रव वंगणे ही प्रामुख्याने कच्च्या खनिज तेलापासून मिळणारी हायड्रोकार्बन रसायने असतात. अति-उच्च वा नीच तापमानासारख्या  विशेष परिस्थितींत निवडक संश्लेषित (कृत्रिम रीत्या तयार केलेली) द्रव वंगणे वापरण्यात येतात. अतिशय उच्च तापमानात किंवा  द्रव वंगणे पुन्हा नवीन भरणे अशक्य असते अशा परिस्थितीत ग्रॅफाइट अथवा मॉलिब्डेनम डायसल्फाइड यांसारखी घन वंगणे वापरतात. अतिशय नाजूक आणि वेगाने फिरणाऱ्या यंत्रात हवेचा वंगण म्हणून उपयोग करतात. 

द्रव वंगणे : खनिज तेलजन्या वंगण तेले : कच्च्या खनिज तेलाच्या परिष्करणाद्वारे अनेक प्रकारची वंगणोपयोगी तेले तयार केली जातात.  

रासायनिक दृष्ट्या कच्च्या खनिज तेलांचे चार प्रमुख प्रकार असतात : (१) नॅप्थीनप्रधान, (२) पॅराफीनप्रधान, (३) नॅप्थी-पॅराफीन समभाग असलेले व (४) ॲरोमॅटिक. नॅप्थीनप्रधान कच्च्या खनिज तेलापासून मिळणारी वंगण तेले पातळ आणि हलकी असून त्यात नॅप्थिनांचे प्रमाण जास्त असते. पॅराफीनप्रधान खनिज तेलापासून मिळणारी वंगण तेले दाट व जड असून त्यांमध्ये पॅराफिनांचे प्रमाण अधिक असते. मिश्र तऱ्हेच्या कच्च्या खनिज  तेलापासून मिळणाऱ्या वंगण तेलांमध्ये पातळ आणि दाट, हलकी व जड, नॅप्थीनयुक्त आणि पॅराफीनयुक्त अशा तेलांचे प्रमाण सारखेच असते. ॲरोमॅटिक कच्च्या खनिज तेलापासून मिळणाऱ्या वंगण तेलांमध्ये ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन पदार्थांचे प्रमाण अधिक असते. खनिज तेलजन्य वंगण तेले १५० ते १,००० किंवा त्याहून अधिक रेणुभाराची असतात व त्यांची श्यानता (दाटपणा) हलक्या यंत्र-तेलापासून ते जड दंतचक्र तेलापर्यंत अनेक प्रकारची असते. सर्व खनिज तेलजन्य वंगण तेलांमध्ये पॅराफिने व नॅप्थिने ह्या रसायन वर्गातील पदार्थ प्रमुख घटक असून एखाद्या वंगण तेलाचे विशिष्ट गुणधर्म त्यामधील वर निर्देश केलेल्या पदार्थांच्या परस्पर प्रमाणावर अबलंबून असतात.


 उत्पादन : खनिज तेलजन्य वंगण तेलांच्या उत्पादनाच्या क्रियाक्रमाचा तक्ता पुढील आकृतीमध्ये दिला आहे. 

प्रथम कच्च्या खनिज तेलाचे ३००° ते ४००° सं. तापमानावर वाफेच्या साहाय्याने सामान्य दाबाखाली  ⇨ ऊर्ध्वपातन करण्यात येते. त्यायोगे निरनिराळ्या तापमान कक्षांत ऊर्ध्वपातित होणारे घटक वेगळे करण्यात येतात. ऊर्ध्वपातित न झालेला शिल्लक भाग ऊर्ध्वपातन टाकीच्या खालच्या बाजूने वेगळा काढला जातो. ह्या भागाला कच्चे मिश्रण तेल असे म्हणतात. कच्च्या मिश्रण तेलाचे निर्वात वातावरणात वाफयुक्त ऊर्ध्वपातन करण्यात येऊन त्यायोगे त्याचे अधिक विभाजन करण्यात येते.

पॅराफीनप्रधान कच्च्या खनिज तेलापासून निघालेल्या कच्च्या मिश्रण तेलाच्या निर्वात वातावरणात केलेल्या वाफयुक्त ऊर्ध्वपातानाद्वारे उर्वरित ऊर्ध्वग्राही मेणयुक्त तेले पूर्णपणे वेगळी होतात व ऊर्ध्वपातन टाकीच्या तळाला राहिलेले अशुद्ध मिश्र तेल (सिलिंडर तेल) काढून घेण्यात येते. काही प्रकारच्या पॅराफीनप्रधान कच्च्या मिश्रण तेलांपासून दाट वंगण तेले ऊर्ध्वग्राही स्वरूपातही वेगळी होतात व अशा वेळी तळाला राहिलेला गाळ वंगणोपयोगी असतो. नॅप्थीनयुक्त कच्च्या खनिज तेलापासून निघालेले कञ्चे मिश्रण तेल वाफयुक्त ऊर्ध्वपातनांद्वारे  पुढील विलग करतात : (१) हलके तेल (श्यानता १० ते २० सेंटिस्टोक्स) हा अंश विभाजक स्तंभाच्या अगदी वरच्या भागातून मिळतो. (२) मध्यम तेल (श्यानता ५ ते १० सेंटिस्टोक्स) हा अंश स्तंभाच्या मघल्या भागातून मिळतो, (३) जड तेल (श्यानता १३ ते २० सेंटिस्टोक्स) हा अंश स्तंभाच्या खालच्या भागातून मिळतो, (४) अतिजड तेल हा अंश स्तंभाच्या तळ भागातून काढला जातो.

पॅराफीनप्रधान कच्च्या मिश्रण तेलापासून निघालेले मेणयुक्त ऊर्ध्वग्राही अंश, वाफयुक्त ऊर्ध्वपातानानंतर राहिलेली अशुद्ध मिश्रणे व नॅप्थीनप्रधान कच्च्या मिश्रण तेलापासून मिळणारी ऊर्ध्वग्राही शुद्ध वंगण तेले ह्यांचा उपयोग करून प्रत्यक्ष वापरास योग्य अशी अंतिम मिश्र वंगण तेले तयार केली जातात. तत्पूर्वी वेगवेगळे तेलांश खालील निरनिराळ्या क्रियांद्वारे शुद्ध करण्यात येतात.

शुद्धीकरण : (१) मेण निर्मूलन किंवा विलगीकरण : ऊर्ध्वपातित पॅराफीन वंगण तेलामध्ये बहुधा मेणाचे प्रमाण जास्त असते. हे मेण काढून टाकण्यासाठी पुढील शुद्धीकरण क्रिया वापरत्या जातात : (अ) पातळ व मध्यम तेले -२०° से. अगर त्याहीपेक्षा खालच्या तापमानापर्यंत थंड केली जातात. त्यामुळे मेण घट्ट होऊन वेगळे होते. (आ) दाट तेलांमधील मेण सूक्ष्मस्फटिकांच्या अवस्थेत असते. हे तेल व नॅप्था हा विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) ह्यांचे मिश्रण करून ते थंड (-४०° से.) करण्यात येते. त्यानंतर मेण गाळून वेगळे केले जाते. नंतर विद्रावक ऊर्ध्वपातनाने परत मिळविता येतो. (इ) मिश्रविद्रावक व कोणत्याही प्रकारचे तेल ह्यांचे मिश्रण करून ते थंड केल्याने मेण वेगळे होते. मिथिल-एथिल कीटोन, द्रव प्रोपेन, द्रव सल्फर डाय-ऑक्साइड व बेंझीन ह्यांचे मिश्रण, एथिलीन डायक्लोराइड व बेंझॉल ह्यांचे मिश्रण हे विद्रावक वापरतात. विद्रावक ऊर्ध्वपातनाने अगर वायुरूप अवस्थेत वेगळे केले जातात. (२) अम्लीय शुद्धीकरण : मेण काढून टाकलेली तेले तीव्र सल्फ्यूरिक अम्लाच्या विक्रियेने अधिक शुद्ध केली जातात. पॅराफीन प्रकारची व ॲरोमॅटिक घटकद्रव्ये अम्लामध्ये विरघळून वेगळी होतात. अम्लीय विक्रियेनंतर मूळ तेल प्रथम दाहक (कॉस्टिक) सोडा व नंतर भरपूर पाण्याने धुतल्याने बाकी राहिलेले अम्ल निघून जाते. वरील अम्लीय विक्रियेने शुद्ध केलेले तेल फेसाळत नाही. त्यात गाळ तयार होत नाही. तेलाची घनता, श्यानता व इतर रासायनिक गुणधर्म प्रमाणित होतात, तेलाचा काळपटपणा अगर रंग नाहीसा होतो व तेलातील कार्बनाचे प्रमाण कमी होते.

खनिज तेलजन्य वंगण तेलांच्या उत्पादनाचा क्रियाक्रम (एस. ए. ई.–सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह एंजिनिअर्स).

  

अम्लीय शुद्धीकरणासाठी सल्फ्यूरिक अम्लाऐवजी ॲल्युमिनियम क्लोराइडही वापरले जाते. पॅराफीन द्रव्य व ॲरोमॅटिक पदार्थ अल्प असलेल्या वंगण तेलासाठी अम्लीय शुद्धीकरण करणे आवश्यक नसते. 

(३) विशिष्ट मातीच्या साहाय्याने गाळणे : कञ्ची मिश्रण तेले व मिश्र अशुद्ध तेले शोषक गुणधर्म असलेल्या विशिष्ट मातीच्या थरातून गाळली जातात. मुलतानी माती (फुलर्स अर्थ), बॉक्साइट, बेंटोनाइट वगैरे प्रकारच्या मातींचा ह्या कामासाठी वापर करतात. रंग व टाकाऊ रासायनिक पदार्थ ह्या मातीत शोषले जाऊन शुद्ध तेल मिळते. ही क्रिया करण्यासाठी उंच अधिशोषण स्तंभ (१६-९० मेशच्या) मातीने भरण्यात येतो व वरून अशुद्ध तेल पडते. अधिशोषण स्तंभाच्या ऐवजी माती व तेल ह्यांचे मिश्रण हवाबंद स्थितीत १५०° ते २००° से. तापमानापर्यंत गरम केले जाते. त्यानंतर हे मिश्रण थंड करून गाळल्याने शुद्ध तेल मिळते. शुद्ध तेल मिळविण्यासाठी काही वेळा गाळण्याऐवजी विभाजक ऊर्ध्वपातन केले जाते.


 (४) विद्रावक निष्कर्षण : पॅराफीनप्रधान किंवा नॅप्थीनप्रधान मिश्र् वंगण तेले पूर्णपणे शुद्ध करण्यासाठी त्यांतील ऊर्वरित अनावश्यक घटकद्रव्ये काढून टाकणे जरूर असते. हे उद्दिष्ठ विद्रावक निष्कर्षणाने साध्य करतात. ऊर्ध्वपातित तेलांश व अशुद्ध मिश्र तेले ह्यांमधील अनिष्ट घटकद्रव्यांचे प्रमाण जर थोडे असेल, तर एकाच विद्रावकाचा निष्कर्षणासाठी उपयोग केला जातो. हे प्रमाण जर जास्त असेल, तर एकाच वेळी अगर एकानंतर एक अशा दोन वेगळ्या विद्रावकांच्या साहाय्याने निष्कर्षण करावे लागते. फुरफुराल, फिनॉल, नायट्रोबेंझीन, क्लोरेक्स (२, २-डायक्रोरोएथिल ईथर), द्रव सल्फर डाय-ऑक्साइड, बेंझीन, द्रव प्रोपेन वगैरे विद्रावक वापरले जातात.

फुरफुरालाचा उपयोग मुख्यतः मिश्र अशुद्ध तेले शुद्ध करण्यासाठी करतात. मेणयुक्त किंवा डांबरयुक्त ऊर्ध्वपातित तेलांशाच्या शुद्धीकरणासाठी नायट्रोबेंझीन वापरले जाते. पॅराफीनप्रधान तेले शुद्ध करण्यासाठी क्लोरेक्स उपयोगात आणतात. द्रव सल्फर डाय-ऑक्साइड व बेंझीन यांच्या उपयोगाने वंगण तेलाचा रंग, टिकाऊपणा व श्यानता सुधारते. द्रव प्रोपेनद्वारे नॅप्थिन द्रव्ये काढून टाकता येतात. जास्त नॅप्थिने व ॲरोमॅटिक द्रव्ये असलेली तेले द्रव प्रोपेन आणि फिनॉल व क्रेसॉल ह्यांचे मिश्रण (सिलेक्टो) वापरून शुद्ध केली जातात. ह्या पद्धतीला ड्यूओसॉल पद्धत असे म्हणतात.

 

विद्रावक निष्कर्षण संपन्न करण्यासाठी उंच निष्कर्षण स्तंभ वापरण्यात येतात. विद्रावकांची निवड, निष्कर्षण संयंत्र, विद्रावकाचे अगर विद्रावकांचे प्रमाण, निष्कर्षणाचे तापमान वगैरे तपशील तेलाचा प्रकार, तेलातील अशुद्धतेचे गुणधर्म, शुद्ध तेलाचे अपेक्षित गुणधर्म यांनुसार ठरवावा लागतो.

शुद्ध तेलांचे मिश्रण : वर दिलेल्या विविध शुद्धीकरण प्रक्रियांच्या द्वारे अनेक प्रकारची शुद्ध वंगण तेले तयार होतात. गुणधर्माच्या अनुषंगाने त्यांचे खालील ढोवळ वर्ग पाडले जातात. 

(अ) साधारण तेले : ही शुद्ध तेले हलकी व पातळ असून हलक्या यंत्र वंगण तेलांचे अनेक प्रकार बनविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. 

(आ) उजळ तेले : ही शुद्ध तेले जड व दाट असून मोटारगाडी-करिता लागणारी अनेक तऱ्हेची वंगण तेले बनविण्यासाठी वापरली जातात. 

(इ) सिलिंडर तेले : ही तेले अशुद्ध असून जड व दाट असतात. ती गाळून साफ केलेली असतात परंतु त्यांतील मेणे पूर्णपणे काढून टाकलेली नसतात. ही तेले वाफेच्या एंजिनांमध्ये सिलिंडरांच्या वंगणासाठी प्रामुख्याने वापरली जातात. शिवाय ह्या तेलांपासून काही शुद्ध उजळ तेलेही तयार केली जातात.

वरील तीन वर्गांतील वेगवेगळी तेले एकत्रित करून विविध उपयोगांसाठी योग्य अशा गुणधर्मांची तयार वंगण मिश्रणे बनविली जातात, ही वंगण मिश्रणे बनविताना काही प्रमाणात वसायुक्त तेले व अनेक प्रकारची समावेशक द्रव्ये ह्यांचाही उपयोग केला जातो. समावेशक द्रव्ये घातल्याने दोष काढून टाकण्यास आणि गुणवत्ता व कार्यक्षमता वाढण्यास महत्त्वाची मदत होते. मिश्रणे तयार करण्यासाठी बहुधा वाफेच्या साहाय्याने गरम करण्याची व हवेचा फवारा वापरून अगर अन्य मार्गाने ढवळण्याची सोय असलेल्या खोल टाक्या किंवा एकजीव मिश्रण करणारी मिश्रणयंत्रे वापरली जातात. पातळ मध्यम तेलांची मिश्रणे करण्यास उष्णतेची आवश्यकता नसते. पातळ मध्यम तेले व जाड उजळ तेले ह्यांची मिश्रणे ६०°-८०° से. तापमानावर केली जातात. वसायुक्त तेले व दाट तेले ह्यांची मिश्रणे करण्यासाठी २००° से. पर्यंत तापमान वापरावे लागते.

समावेशक द्रव्ये (समावेशके) : मूळ तेलाच्या वजनाच्या ०.००००१ ते १०% ह्या कक्षेत कोणत्याही प्रमाणात समावेशक द्रव्ये वापरली जातात. अभिप्रेत गुणधर्मानुसार समावेशक द्रव्यांचे खालील-प्रमाणे विभाजन करता येते.  

(१) तेलकटपणा आणणारी  समावेशके : वंगण तेलाला योग्य प्रमाणात तेलकटपणा व चिकटपणा असल्यासच ते तेल घर्षण-पृष्ठभागावर मजबूत व टिकाऊ थर निर्माण करू शकते. खनिज तेलजन्य शुद्ध वंगण तेलांना हा तेलकटपणा व चिकटपणा हे गुणधर्म पुरेशा प्रमाणात असतात. त्यासाठी वसायुक्त तेले, वसाम्ले, वसायुक्त तेले व वसाम्ले ह्यांपासून तयार केलेला साबण, वसायुक्त अल्कोहॉले आणि अकार्वनी फॉस्फाइटे हे पदार्थ वंगण तेलात घालण्यात येतात.

(२) हवेची दुष्क्रिया टाळणारी समावेशके : (प्रतिऑक्सिडीकारके). वंगण तेलावर होणारे हवेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी फिनॉल, नॅप्थॉल, ॲरोमॅटिक अमाइने, सल्फाइडे, फॉस्फाइडे व त्यांपासून तयार होणारी रसायने ह्यांचा उपयोग केला जातो.

(३) कमाल दाबशक्ती देणारी समावेशके : हे पदार्थ वंगण तेलात मिसळल्याने तेलाचा घर्षणभागावरील  थर जास्त मजबूत होतो व तो कमाल दाबाखाली टिकाव धरू शकतो. गंधक, क्लोरीन, शिसे, फॉस्फरस व त्यांची कार्बनी संयुगे हे पदार्थ ह्या कमासाठी वापरतात.

(४) गंजण्यापासून बचाव करणारी समावेशक : पाण्यात विरघळणारी वनस्पतिजन्य वसाम्ले व त्यांची काही संयुगे, खनिज तेलजन्य  सल्फॉनिक अम्ले व धातू ह्यांची काही संयुगे वगैरे पदार्थ घर्षणपृष्ठ-भागांचा गंजण्यापासून बचाव करतात.

(५) प्रवाह बिंदू कमी करणारी समावेशके : प्रवाह बिंदू म्हणजे द्रव प्रवाहित होऊ लागेल असे किमान तापमान. वंगण तेलात सूक्ष्म प्रमाणात बाकी राहिलेली मेणे व तत्सम पदार्थ कमी तापमानात वेगळे होऊन वंगण तेलाचा दाटपणा वाढवून श्यानता कमी करतात. अल्किल नॅप्थॅलिने, अल्किलेटेड पदार्थ, अल्किल अक्रिलेटांची बहुवारिके (लहान रेणूंच्या संयोगाने बनणाऱ्या प्रचंड रेणूंची संयुगे), वसाम्लांचे धातुजन्य साबण आदि पदार्थ, मेणे व तत्सम पदार्थ कमी तापमानात वेगळे होण्यापासून परावृत्त करतात.

(६) श्यानता निर्देशांक सुधारणारी समावेशके : पॉलिआयसोब्युटिलीन बहुवारिके, बहुवारिकीय ॲलिफॅटिक हायड्रोकार्बने, पॉलिस्टायरीन, अल्किल स्टायरीन  बहुवारिके, अल्किल ॲक्रिलेटांची बहुवारिके, पॉलिएस्टरे ह्यांसारखे पदार्थ वंगण तेलाची श्यानता योग्य प्रमाणात टिकविण्यासाठी मदत करतात.

(७) प्रक्षालके : वंगण तेलांच्या सतत वापरण्यामुळे कार्बनाचे सूक्ष्मकण तयार होऊन ते गाळाच्या स्वरूपात वेगळे होतात व तळाशी बसतात. हे सूक्ष्मकण परत विरघळून तेल चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे कार्य तेलात विरघळणाऱ्या फिनॉलापासून तयार केलेले धातूचे साबण, कार्‌बॉक्सिलिक अम्ले, सल्फॉनिक अम्ले इ. पदार्थ करतात.

(८) अपस्कारके : प्रक्षालक गुणधर्म देणारी बहुतेक समावेशके अपस्कारक ह्या दृष्टीने काम करतात. अपस्कारकांमुळे वंगण तेलाची घटकद्रव्ये वेगळी न होता एकत्रित रहाण्यास मदत होते. या पदार्थामुळे द्रवातील घन कण संधारित होऊन (लोंबकळत्या अवस्थेत राहून) त्यांचे पुंजके बनण्यास वा ते तळाशी बसण्यास प्रतिबंध होतो. 

(९) फेसनाशक समावेशके : वंगण तेले सतत ढवळली जाऊन त्यांचा हवेशी संपर्क येत असल्याने अनेक ठिकाणी दाट फेस जमा होतो. ह्या फेसामुले वंगण तेलाची कार्यक्षमता व टिकाऊपणा कमी होतो. सिलिकोन बहुवारिके, ग्लायकॉले, ग्लिसरॉल वगैरे पदार्थ फेसनाशक कार्य करतात.


 (१०) घर्षणजन्य झीज कमी करणारी समावेशके : काही कार्बनी फॉस्फरस संयुगे (उदा., ट्रायक्रेसिल फॉस्फेट) घर्षणजन्य झीज टाळण्यासाठी उपयोगी पडतात. उष्णता व इंधनांचे ज्वलन ह्यांच्या विघटनात्मक क्रियेमुळे अनेकदा काही अम्लीय पदार्थ उत्पन्न होऊन ते घर्षण भागातील झीज वाढण्यास कारणीभूत होतात. वर सांगितलेली संयुगे व काही धातूंची फिनॉलेटे वंगण तेलात मिसळल्याने अम्ले व तत्सम हानिकारक पदार्थाचे निर्मूलन होते वा ती निष्प्रभ होतात.

गुणधर्म : खनिज तेलजन्य वंगण तेलांचे गुणधर्म व लक्षणे अजमावण्याच्या विविध पद्धती अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग मटेरिअल्स (एएसटीएम) व इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (लंडन) (आयपी) ह्या दोन संस्थांनी निश्चित केल्या आहेत. वंगण तेलाची श्यानता हा त्याचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म असतो. कोष्टक क्र. १ मध्ये विविध उपयोगाची महत्त्वाची खनिज तेलजन्य वंगण तेले व त्यांचे श्यानता निर्देशांक दिले आहेत. अमेरिकेतील सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह एंजिनिअर्स (एसएई) या संस्थेनेही वंगण तेलांची श्यानता वर्गीकरण मानक (प्रमाण) म्हणून स्वीकारली आहे. ही वर्गीकरणाची पद्धत भारतीय मानक संस्थेने (इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट, आयएसआय) भारतात मान्य केली आहे. कोष्टक क्र. २ मध्ये एसएई मानके व वंगण तेले दिलेली आहेत.

`

कोष्टक क्र. १. खनिज तेलजन्य वंगण तेले व त्यांची श्यानता (सेंटिस्टोक्समध्ये) 

प्रकार

श्यानता (२०° से)

श्यानता (१००° से)

चाती तेले 

साधारण तेले 

लाल व फिफी तेले 

उजळ तेले 

वाफेच्या सिलिंडरांची तेले

८ ते १०० 

३० ते ३०० 

५० ते १,०००

२,००० ते ५,०००

२,००० ते १०,०००

१ ते ५ 

३ ते १५ 

५ ते २५ 

२० ते ६० 

२० ते ८०

कोष्टक क्र. २. खनिज तेलजन्य तेले व एसएई मानके

एसएई मानक

श्यानता सेंटिस्टोक्स- मध्य (२५° से.तापमानावर)

उपयोग

भुजापेटी तेले (एंजिन तेले)  

 

 

१० डब्ल्यू 

६० ते ९० 

 

दट्ट्याची कडी, सिलींडर, झडपा, धारवे यांची वंगणक्रिया दट्ट्या थंड करणे धातवीय पृष्ठभागांवर थर चढण्यास प्रतिबंध करणे.

 

२० 

९० ते १८० 

३० 

१८० ते २८० 

४० 

२८० ते ४५० 

५० 

४५० ते ८०० 

आस व शक्तिप्रेषण तेले  (दंतचक्र तेले) 

 

 

८० 

१०० ते ४०० 

विविध प्रकारच्या दंतचक्रांच्या बाबतीत धातवीय संपर्क व झीज यांना प्रतिबंध करणे दंतचक्र आवरण थंड करणे.

 

९० 

४०० ते १,००० 

१४० 

१,००० ते २,२०० 

विमान एंजिनांची तेले 

२२० ते ७०० 

एंजिन तेलाप्रमाणेच 

पीडन परिवर्तक तेले 

८० ते १४० 

वंगणक्रिया शक्तिप्रेषण

द्रवीय गतिरोधक तेले 

३५ 

शक्तिप्रेषण

प्रशीतन तेले 

३० ते २६० 

संपीडक पंपाची वंगणक्रिया 

वाफेच्या टरबाइनाची तेले 

५५ ते ३०० 

वेग लघुकरण, दंतचक्रांची वंगणक्रिया व शीतन

वाफेच्या सिलिंडरांची तेले

१,५०० ते ३,३००

उच्च तापमानाच्या वाफेत वंगणक्रिया

वंगण तेलांचे महत्त्वाचे इतर गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. प्रज्वलन बिंदू : तेल पेट घेण्याच्या तापमानास प्रज्वलन बिंदू असे म्हणतात. प्रवाह बिंदू : थंड केल्यावर तेलाचा प्रावहीपणा ज्या तापमानापर्यंत टिकून राहतो त्या तापमानास प्रवाह बिंदू असे म्हणतात.  

उपयुक्ततेनुसार वर्गीकरण : (अ) भुजापेटी वंगण तेले : ही तेले एंजिनांच्या भुजापेटीमध्ये वापरली जातात. त्यांमध्ये हवेच्या दुष्क्रियेला प्रतिबंध करणारी समावेशके घालून त्यंचा टिकाऊपणा वाढविलेला असतो. त्याशिवाय प्रक्षालके व अपस्कारकेही वापरलेली असतात. त्यामुळे ह्या वंगण तेलात गाळ तयार होत नाही व घटकद्रव्ये एकजीव अवस्थेत राहतात. पेट्रोल एंजिनासाठी वापरण्यात येणारी भुजापेटी वंगण तेले एमएस, एमएम व एमएल ह्या तीन प्रकारांत विभागली जातात. डीझेल एंजिनांमध्ये वापरली जाणारी भुजापेटी वंगण तेले डीएस वन डीजी ह्या दोन प्रकारांत विभागली जातात.

(आ) दंतचक्र वंगण तेले : कुंडलित दंतचक्रासारख्या शंकू दंत चक्रासाठी [⟶ दंतचक्र] कमाल दाबशक्ती देणारी समावेशके घातलेली वंगण तेले वापरतात. ह्या वंगण तेलांत वसायुक्त तेले शिशापासून केलेला साबण, गंधक, क्लोरीन किंवा फॉस्फरस यांची संयुगे, धातूंची सल्फाइडे, फॉस्फाइडे व क्लोराइडे हे घटक असतात. दंतचक्र वंगणासाठी योग्य त्या श्यानतेचे वंगण तेल एंजिनाची फिरण्याची गती व त्यावरील कामाचा भार हे विचारात घेऊन निवडावे लागते. हलकी व पातळ तेले जलद फिरणाऱ्या व कामाचा भार कमी असलेल्या एंजिनांच्या दंतचक्रांसाठी योग्य असतात. कामाचा भार जास्त असणाऱ्या एंजिनांच्या दंतचक्रांसाठी दाट व जड तेले आवश्यक ती सर्व समावेशके घालून वापरावी लागतात.

(इ) वाफेच्या एंजिनांची वंगण तेले : कमी बाष्पनशील दाट तेले वाफेच्या संपर्कात वापरण्यासाठी योजली जातात. वाफ व पाणी ह्या दोन्हींच्या सान्निध्यात कार्य करण्याचे गुणधर्म येण्यासाठी अशा वंगण तेलांत आवश्यक ती समावेशके मिसळलेली असतात. 

(ई) वाफेच्या टरबाइनाची वंगण तेले : वाफेच्या टरबाइनांच्या धारव्यांसाठी (फिरणार्या  भागांच्या आधारकांसाठी) पातळ व हलकी वंगण तेले वापरली जातात. ह्या तेलांची धारवे थंड ठेवण्यासाठी मदत होते. स्वयंचलित गतिनियामक वाफेच्या टरबाइनामध्ये ही तेले वाफेच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचेही कार्य करतात. ह्या तेलांत हवेच्या दुष्क्रियेला व गंजण्याला प्रतिबंध करणारी समावेशके घातलेली असतात. 


 (उ) धातुकामात वापरण्याची वंगण तेले : यंत्राच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या  सर्व धातुकामांत वंगण तेले वापरली जातात. ही तेले वंगणाचे व उष्णता काढून टाकण्याचे असे दुहेरी काम करतात. धातूंचे पत्रे, कांबी व लाद्या कापण्याच्या कामात दोन प्रकारची वंगणे वापरली जातात. पहिल्या प्रकारची वंगणे पाण्याबरोबर एकत्र करून वापरण्याची असतात. दुसरा प्रकार स्वतंत्रपणे वापरण्याच्या वंगणांचा आहे. जलमिश्रित वंगणे धातूंवर हत्याराचे कार्य होण्याच्या जागेवर वापरली जातात. खनिज तेले, अपस्कारके (पाण्यात विरधळणारे साबण, अल्किल किंवा अरिल सल्फोनेटे, अल्किल सल्फेटे वगैरे) व समावेशके (ग्लायकॉले, ग्लायकॉल ईथरे) हे पदार्थ ही वंगणे तयार करण्यासाठी वापरतात. जलमिश्रित वंगणे उष्णतावहनाचे कार्य उत्तम करतात परंतु त्यांची वंगणक्रिया कमी कार्यक्षम असते. ह्या कारणासाठी जलमिश्रित तेले मुख्यत्वेकरून हलक्या कामामध्ये वापरली जातात. जलमिश्रित वंगणांचा उपयोग हवेच्या दाबावर चालणारी हत्यारे व अवजारे वापरतानाही केला जातो. स्वतंत्र वापराची वंगणे खनिज तेलजन्य शुद्ध तेले, वसायुक्त तेले, मिश्र खनिज तेले आणि दाबशक्तिदायक समावेशके ह्या घटकद्राव्यांची बनविलेली असतात.

(ऊ) धातूंची तार काढण्यासाठी वंगण तेले : ह्या वंगणांचे कार्य वंगणक्रिया करणे व उष्णता काढून टाकणे असे दुहेरी असते. जलमिश्रित व स्वतंत्रपणे वापरण्याची वर निर्दिष्ट केलेली अनेक प्रकारची वंगणे ह्या कामासाठी वापरली जातात. 

(ए) चाती तेले व सर्वसाधारण यंत्र तेले : कापडाच्या गिरण्यांतील सूत काढण्याच्या यंत्रामधील चात्यांना वंगण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्यात अनेक प्रकारच्या तेलांना चाती वंगणे असे संबोधितात. पातळ व हलकी खनिज तेलजन्य वंगण तेले व हवेच्या दुष्क्रियेला प्रतिबंध करणारी समावेशके हे त्यांचे प्रमुख घटक असतात. यंत्राच्या सर्वसाधारण वंगणासाठी जड व दाट शुद्ध खनिज तेलजन्य वंगण तेले वापरली जातात. विशेष वंगणासाठी कधीकधी जलमिश्रित वंगणेही वापरली जातात. 

(ऐ) इतर वगंण तेले : प्रशीतन यंत्रसामग्रीसाठी कमी तापमानातही प्रवाही राहणाऱ्या गुणधर्माची वंगण तेले वापरावी लागतात. निर्वात वातावरण तयार करणाऱ्या पंपासाठी व इतर तत्सम यंत्रसामग्रीसाठी कमी दाबात कोरडी न पडणारी अगर बाष्पीभवन न होणारी खास तेले वापरावी लागतात. 

संश्लेषित वंगण तेले : काही प्रकारच्या कामांमध्ये खनिज तेलजन्य वंगणे वापरणे शक्य नसते. उदा., अतिशय उच्च तापमान, तीव्र विक्रियाक्षम रसायनांचे सान्निध्य वगैरे. अशा परिस्थितीत संश्लेषित वंगणे वापरली जातात. संश्लेषित वंगणे ही मूलतः कार्बनी रसायने असून पुढील दोन प्रमुख वर्गांत विभागली जातात : (१) ॲलिफॅटिक ओलेफिनांची बहुवारिक हायड्रोकार्बने व (२) डायएस्टरे, पॉलिअल्किलीन ऑक्साइड बहुवारिके, सिलिकोने, फ्ल्युओरिनेटेड हायड्रोकार्बने व कार्बनी क्लोरीन संयुगे.

(१) ॲलिफॅटिक  ओलेफिनांची बहुबारिक हायड्रोकार्बने : ही हायड्रोकार्बन वंगणे २५० ते ५०,००० पर्यंत रेणुभारांची असून त्यांचे बहुतेक गुणधर्म त्याच रेणुभारकक्षेतील खनिज तेलजन्य वंगणासारखेच असतात. ही वंगणे दाट असून खनिज तेलजन्य वंगणांपेक्षा हवेच्या प्रक्रियेला (ऑक्सिडीभवन होण्याला) कमी टिकाऊ असतात. ह्या वंगणांचा वापर प्रमुख्याने उच्च तापमानासाठी केला जातो.

(२) (अ) पॉलिअल्किलीन ग्लायकॉले व तत्सम वंगण रसायने : ही रसायने अल्कोहॉले व बहुवारिकित एथिलीन व प्रोपिलीन ग्लायकॉल ह्यांच्या संयोगाने बनविली जातात. ही वंगणे ‘युकॉन’ ह्या व्यापारी नावाने ओळखली जातात. युकॉनांचे चार प्रकार असून त्यांतील दोन पाण्यात विरघळणारे तर बाकीचे दोन पाण्यात न विरघळणारे आहेत. ही वंगणे सर्व प्रकारच्या श्यानतेची मिळू शकतात व काहींमध्ये हवेची दुष्क्रिया थांबवणारी समावेशके घातलेली असतात. जास्त रेणुभाराची पॉलिअल्किलीन ऑक्साइडे, पॉलिप्रोपिलीन ऑक्साइडे व पॉलिथायोग्लायकॉले ह्या वंगण रसायनांचा गोठणबिंदू कमी असून त्यांचा प्रवाहीपणा तापमानाबरोबर सम प्रमाणात बदलतो. कमी तापमानात ही वंगणे पातळपणा व हलकेपणा टिकवून ठेऊ शकतात व हवेच्या प्रक्रियेला चांगला प्रतिबंध करतात. ह्या वंगण तेलांचा टिकाऊपणा समावेशकांच्या साहाय्याने आवश्यक प्रमाणात वाढविता येतो.

(आ) पॉलिएस्टर वंगण तेले : ही वंगणे ग्लायकॉले अगर ॲलिफॅटिक  वा ॲरोमॅटिक डायबेसिक अम्ले ह्यांची डायएस्टरे किंवा फॉस्फोरिक अम्लाची ट्रायएस्टरे असतात. ह्या वंगणांचे खनिज वंगण तेलांच्या गुणधर्माशी बरेच साघर्म्य असून ती खनिज वंगण तेलांशी चांगल्या प्रकारे मिसळू शकतात. डायएस्टरे व खनिज तेलजन्य वंगण तेले ह्यांची मिश्रणेही वंगणांसाठी वापरली जातात. डायएस्टर वंगणे खनिज तेलजन्य वंगण तेलांपेक्षा, अम्ले, क्षार (अल्कली) व वाफ ह्यांच्या सान्निध्यात कमी टिकाऊ असतात. सेबॅसिक अम्लाची डायएस्टरे व तर सेबॅकेटे ह्यांचा झोत (जेट) एंजिने व क्षेपणास्त्रातील यंत्रे ह्यांच्या वंगणासाठी बराच उपयोग केला जातो. पेंटाएरिथ्रिटॉलावर आधारित संश्लेषित वंगणेही झोत एंजिनांच्या वगंणासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. उच्च तापमानात (२००° से.) ही चांगला टिकाव धरतात व झोत एंजिनांची कार्यक्षमता वाढण्यास चांगली मदत करतात. बदलत्या तापमानात (-६०° ते + २०९° से.) वापरण्यासाठी ऑर्थोसिलिकेट व सिलिकेट एस्टरे ही संश्लेषित तेले चांगले काम देतात.

(इ) सिलिकोन वंगणे : ही वंगणे डायअल्किल डायक्लोरोसिलिकोनांपासून तयार केली जातात. हवेच्या प्रक्रियेविरुद्ध व जास्त तापमानात (२००° से.) ही वंगणे चांगला टिकाव धरू शकतात. ही वंगणे न सुकणारी, कमी तापमानात न गोठणारी, जास्त तापमानात दाटपणा व श्यानता टिकवून धरणारी व खनिज तेलजन्य वंगण तेलांबरोबर न मिसळणारी असतात. सिलिकोन तेले जास्त दाबाच्या यंत्रांमध्ये माध्यम म्हणूनही उत्तम काम देतात. द्रव विद्युत अपारक म्हणूनही सिलिकोन तेलांचा उपयोग होतो. खास उपयोगाची सिलिकोन ग्रिजेही सिलिकोनांपासून बनविली जातात.

(ई) फल्युओरिनेटेड हायड्रोकार्बने : ही संश्लेषित वंगण तेले द्रव हायड्रोकार्बने आणि सिल्व्हर फ्ल्युओराइड ह्यांच्या संयोगाने तयार केली जातात. ही वंगणे रासायनिक दृष्ट्या चांगली अक्रिय असून ती परमावधीच्या तापमानांत व ऑक्सिडीभवनात स्थिर राहतात. उच्च तापमात वापरण्यास ती योग्य आहेत परंतु त्यांचा श्यानता-तापमान गुणांक उच्च असल्याने ती तापमानाच्या विस्तृत कक्षेकरिता वापरता येत नाहीत. ही वंगण तेले खनिज तेलजन्य वंगण तेलांशी मिसळत नाहीत.

(उ) कार्बनी क्लोरीन संयुगे: क्लोरोडायफिनिले, क्लोरोनॅप्थॅलिने, क्लोरोडायफिनिल ऑक्साइडे व क्लोरिनेटेड पॅराफीन मेणे ही दाट तेलकट द्रव वंगणे म्हणून वापरण्यात येणाऱ्या कार्बनी क्लोरीन संयुगांची उदाहरणे आहेत. त्यांचे श्यानता निर्देशांक फार कमी आहेत व त्यांच्या श्यानतेत तापमानाबरोबर मोठे बदल होतात. ही संयुगे ज्वलनरोधी व अज्वालाग्राही असून पाण्याच्या संपर्कात ती स्थिर राहतात. ही वंगणे यंत्रातील साच्यांच्या वंगणक्रियेसाठी वापरली जातात. खनिज तेलजन्य तेलांचे पटल-बल वाढविण्यासाठी वा त्यांत उच्च दाब गुणधर्म आणण्यासाठी त्यांमध्ये ही संयुगे अल्प प्रमाणात घालण्यात येतात.


 वसायुक्त तेले : प्राणिज वसा व तेलबियांपासून मिळणारी वनस्पती तेले व त्यांपासून तयार केलेले पदार्थ ह्यांचा सीमावर्तित वंगणक्रियेच्या दृष्टिने महत्त्वाचा उपयोग होतो. ह्या वसायुक्त तेलांचे अत्यंत उपयुक्त गुणधर्म म्हणजे चिकटपणा व तेलकटपणा. ह्या गुणधर्मामुळे ही तेले धातूंच्या पृष्ठभागावर मजबूत पातळ थर धरू शकतात. हे गुणधर्म खनिज तेलजन्य वंगण तेलांमध्ये नसतात, हा त्यांचा एक दोष आहे. वसायुक्त तेलांवर हवेची प्रक्रिया जलद होते व जास्त तापमानांत त्यांचे अपघटन होते (घटक द्रव्ये अलग होतात). समावेशके घालून त्यांचा टिकाऊपणा वाढविता येतो.

वसायुक्त तेलांचा वंगणे ह्या दृष्टीने मर्यादित प्रमाणांवर उपयोग केला जातो. हलकी व नाजूक यंत्रे (उदा., घड्याळे, शास्त्रीय उपकरणे, शिवणयंत्रे, सूत काढण्याची व कापड विणण्याची छोटी यंत्रे वगैरे) ह्यांच्या वंगणांसाठी ही तोले प्रामुख्याने वापरली जातात. वसायुक्त तेलांचा सर्वांत महत्त्वाचा वंगणोपयोग खनिज तेलजन्य वंगण तेलांमध्ये समावेशके ह्या दृष्टीने होतो. ग्रिजे व तयार खनिज तेलजन्य मिश्र वंगण ह्यांच्या अनेक प्रकारांत वसायुक्त तेले वापरलेली असतात.

वनस्पतिज तेलांमध्ये एरंडेल तेल, रेपसीड तेल, ऑलिव्ह तेल व खोबरेल तेल आणि प्राणिज तेलांपैकी लार्ड (डुकरापासून), टॅलो (मेंढीपासून), पॉरपॉइज व डॉल्फिन तेले, स्पर्म तेल (देवमाशापासून) आणि जनावरांचे खूर व हाडे उकळून मिळविलेले तेल नीट्स-फूट तेल) ही वसायुक्त तेले स्वतंत्रपणे अगर समावेशके म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. द्रवीय गतिरोधक, अवजड यंत्राचे धारवे, धातुकामातील वंगणे, वाफेच्या एंजिनांसाठी सिलिंडर वंगणे वगैरे महत्त्वाच्या उपयोगाच्या वंगण तेलांमध्ये वसायुक्त तेले वापरली जातात. वसाम्ले व त्यांच्यापासून बनविलेले पदार्थ (उदा., क्लोरीनीकरण व सल्फोनीकरण केलेली एस्टरे, फॉस्फरसयुक्त पदार्थ) व खनिज तेले ह्यांची मिश्रणे अवजड यंत्रांच्या वंगणासाठी वापरली जातात. वसायुक्त तेलामुळे धातुपृष्ठभागांचा गंजण्यापासून बचाव होतो. रेपसीड तेल, स्पर्म तेल वगैरे तेलांवर विजेची खास प्रक्रिया करून ती खनिज तेलांशी ५ ते १५% प्रमाणात एकत्र करून विमानांतील यंत्रसामग्रीसाठी वापरली जातात.

अर्धद्रव वा अर्धघन वंगणे (ग्रिजे) : ही अर्धद्रव वंगणे असून द्रव वंगणे दाट करून तयार करण्यात येतात दाटपणामुळे ग्रिजे घर्षण पृष्ठभागावरून गुरूत्वाकर्षणाने गळून पडत नाहीत किंवा त्याच्या फिरण्याच्या क्रियेमुळे फेकली जात नाहीत. त्याचप्रमाणे जास्त दाबामुळे ती घर्षण पृष्ठभागापासून विलग होत नाहीत. ज्या ठिकाणी वंगण तेलांचा वापर करणे यांत्रिक अभिकल्पाच्या (आराखड्याच्या) मर्यादांमुळे शक्य नसते किंवा कठीण असते अशा ठिकाणी ग्रिजांचा उपयोग केला जातो. वंगणक्रिया त्यातील दाटपणा निर्माण करणाऱ्या पदार्थाच्या (सामान्यतः साबण) तंतुमय वा कणमय संरचनेत अधिशोषणाने वा केशाकर्षणाने धरून ठेवलेल्या तेलामुळे होते. 

ग्रिजे अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध असून त्यांचे गुणधर्म व घट्टपणा ह्यांची कक्षा विस्तृत असते. ग्रिजांचा घट्टपणा मोजण्याची पद्धत एएसटीएम ह्या संस्थेने निश्चित केली असून ती पुढीलप्रमाणे अंमलात आणण्यात येते. एका प्रमाणित आकारमानाच्या ग्रिजाच्या गोळ्यात एक प्रमाणित आकारमानाची व वजनाची पट्टी, प्रमाणित प्रेरणेने घुसविल्यास ती ग्रिजात किती खोल जाते ते ०.१ मिमी. ह्या एककात मोजून मिळालेला आकडा त्या ग्रिजाच्या घट्टपणाचा गुणक समजावा. नॅशनल ल्युब्रिकेटिंग ग्रीज इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका (एनएलजीआय) ह्या संस्थेने ग्रिजांचा घट्टपणा निर्देशित करणारे कोष्टक तयार केले असून त्यानुसार ० क्रमांक सर्वांत मऊ व ६ क्रमांक सर्वात घट्ट ग्रीज दर्शवितात. एएसटीएम पद्धतीप्रमाणे वरील क्रमांकाच्या ग्रिजांची भेदन मूल्ये अनुक्रमे ३५५-३८५ व ८५-११५ असतात. ग्रिजांचे गळण्याचे तापमान हाही महत्त्वाचा गुणधर्म आहे. गळण्याचे तापमान म्हणजे तळाशी भोक असलेल्या एका भांड्यातून ज्या तापमानावर ग्रीज वितळून खाली पडू लागते ते तापमान होय. गळण्याच्या तापमानावरून एखादे ग्रीज किती वजनापर्यंत धारव्याच्या वंगणासाठी वापरता येईल, हे निश्चित करता येते.

ग्रिजांमधील सर्वांत महत्त्वाचा व प्रमुख घटक त्यांमध्ये वापरलेली खनिज वंगण तेले हा असून त्यांचे प्रमाण ५० ते ९०% असते. पातळ व हलक्या चाती वंगण तेलांपासून दाट व जड सिलिंडर वंगण तेलांपर्यंत विविध प्रकारची तेले ग्रिजे बनविण्यासाठी वापरली जातात. ग्रिजामध्ये वापरलेल्या वंगण तेलाच्या श्यानतेवर ते ग्रीज किती किमान तापमानापर्यंत काम देऊ शकेल हे ठरते. आत्यंतिक कमी किंवा कमाल उच्च तापमानावर वापरण्यासाठी विशेष गुणधर्माची संश्लेषित वंगण तेले (उदा., ॲलिफॅटिक डायएस्टरे, पॉलिअल्किलीन रसायने, सिलिकोने व फ्ल्युओरिनेटेड हायड्रोकार्बने) वापरून बनविलेली ग्रिजे वापरण्यात येतात.

ग्रिजामधील दुसरा प्रमुख घटक म्हणजे साबण होय. साबणामुळे तेल दाट होऊन त्याचे ग्रीज बनते. वसायुक्त तेले किंवा वसाम्ले आणि कॅल्शियम, सोडियम, लिथियम, ॲल्युमिनियम व बेरियम ह्यांपैकी एकाचे हायड्रॉक्साइड ह्यांच्या संयोगाने हा साबण बनविला जातो. संश्लेषित वंगण तेलापासून बनविलेली ग्रिजे प्रायः लिथियमाचा साबण वापरून केलेली असतात. साबणाव्यतिरिक्त इतर दाटपणा आणणारे पदार्थही काही वेळा ग्रिजे बनविण्यासाठी वापरले जातात. ते पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत: काही प्रकारची अरिलयुरिया, सिलिका जेल, काजळी, बेंटोनाइट, मुलतानी माती, थॅलोसायनीन रंगद्रव्ये (विशेषतः तांब्याची संयुगे) वगैरे.

ग्रिजांमधील इतर दुय्यम घटक द्रव्ये म्हणजे विविध गुणधर्मांसाठी घातलेली समावेशके होत. ग्रिजाच्या अंतर्गत संरचनेत बदल घडवून आणणारी समावेशके (पाणी, उच्च अल्कोहॉले, वसाम्ले, ग्लायकॉले, कमी रेणुभागाच्या अम्लांची लवणे), हवेची प्रक्रिया थांबविणारी समावेशके, गंजण्याची व क्षरण होण्याची क्रिया रोखणारी समावेशके, आवाज कमी करणारी समावेशके वगैरे प्रकारची समावेशके बहुधा वापरली जातात. धातुपृष्ठभागावरील ग्रिजाची पकड मजबूत करून घर्षणाने होणारी झीज कमी करण्यासाठी काही धातूंच्या लवणांचा ग्रिजांमध्ये अंतर्भाव केल्यास चांगला फायदा होतो. ग्रॅफाइट, ॲस्बेस्टस, तंतू, संगजिरे, अभ्रक, धातूंची पूड वा शकले, धातूंची ऑक्साइडे, धातूंची कार्बोनेटे, धातूंची सल्फाइडे वगैरेंपैकी काही समावेशके घातल्याने ग्रिजाच्या अंतर्भागातील पोकळी भरून येऊन त्यास मजबुती येते.

उत्पादन : वसा, क्षाराचा विद्राव किंवा राळा व वंगण तेलाचा काही भाग एका किटलीमध्ये ढवळत ठेवून तापविले जातात. साबण तयार होण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर त्यात आवश्यक ती समावेशके घालून एकजीव करण्यात येतात. कॅल्शियम साबणापासून बनविलेल्या ग्रिजामध्ये थोडे पाणीसुद्धा बंधकद्रव्य म्हणून घातले जाते. घट्ट झालेले ग्रीज दोन फिरत्या दाबरूळांच्या फटीतून दाबून काढण्यात येते. साबणविरहित ग्रिजे बनविताना दाटपणा आणणारे द्रव्य बारीक पुडीच्या स्वरूपात वंगण तेलाशी एकजीव करण्यात येते. उष्णता व सतत ढवळण्याने सर्व घटकद्रव्यांचे वाटप सम प्रमाण होऊन ती द्रव्ये एकजीव हेण्यास मदत होते. दाबरूळांतून दाबून काढल्यावर त्यांतील गुठळ्या मोडून ते एकसंघ बनते.


प्रकार : कॅल्शियम ग्रिजे: ही ग्रिजे सर्वात स्वस्त असून ती सर्वांत अधिक प्रमाणावर वापरली जातात. मध्यम तेलांपासून बनविलेली कॅल्शियम ग्रिजे ‘कप ग्रिजे ’ म्हणून व दाट तेलांपासून बनविलेली कॅल्शियम ग्रिजे ‘जास्त दाबाची ग्रिजे’म्हणून ओळखली जातात. कॅल्शियम ग्रिजांमध्ये ०.५ ते १% प्रमाणात पाणी घातलेले असल्याने २३˚ सें. पेक्षा जास्त तापमानावर त्यांचा वापर करता येत नाही. पाण्याऐवजी त्यापेक्षा जास्त उकळबिंदू असलेली द्रव रसायने वापरून बनविलेली कॅल्शियम ग्रिजे जास्त तापमानावर वापरण्यात येतात. चुनायुक्त कॅल्शियम ग्रिजे यंत्रांचे धारवे व दंड ह्यांच्या सर्वसाधारण वंगणासाठी वापरतात. पाण्याऐवजी इतर द्रव रसायनांचा उपयोग करून स्थिर बनविलेली कॅल्शियम ग्रिजे मोटारगाड्यांच्या गोलक, लाटणी व इतर धारव्यांसाठी वंगण म्हणून वापरली जातात. कॅल्शियम रेझिनेटापासून केलेली ग्रिजे अवजड यंत्रांचे कमी वेगाने फिरणारे भाग व त्याचे धारवे ह्यांच्या वंगणासाठी वापरली जातात.

सोडियम ग्रिजे : ह्या ग्रिजांच्या वितळण्याचा बिंदू उच्च असल्याने ही जास्त तापमानात (२३˚ ते ५२˚ से.) वापरण्यास योग्य असतात. ही ग्रिजे पाण्याची धुलाईसारखी क्रिया होते तेथे वापरण्यात येत नाहीत. ह्या ग्रिजांचा उपयोग मोटारगाड्या व अवजड वाहनांच्या चाकांचे धारवे, वाफेच्या एंजिनांचे फिरते भाग व वाहनांचे तळगाडे ह्यांच्या वंगणासाठी केला जातो.

ॲल्युमिनियम ग्रिजे : ही ग्रिजे पारदर्शक असून ६५˚ से. पेक्षा अधिक तापमानावर त्यांचा उपयोग होत नाही. ही ग्रिजे कर्तन प्रेरणेच्या बाबतीत कमी स्थिर असतात व त्यांचे गळण्याचे तापमान कमी असते. ती घर्षणभागावर चांगली पकड घेतात. वाहनांचे तळगाडे, गोलक व लाटणी धारवे व कप वंगणासाठी ही ग्रिजे उपयोगी पडतात. यांचे काही प्रकार विमानांच्या यंत्रसामग्रीच्या वंगणांसाठीही वापरतात.

लिथियम ग्रिजे :ही ग्रिजे बहु-उपयोगी असून ती जास्त तापमान व जलसंपर्क ह्या दोनही अवस्थांत चांगले काम देतात. संश्लेषित वंगण तेलांपासून बनविलेली लिथियम ग्रिज विमानांच्या यंत्रसामग्रीच्या वंगणासाठी वापरतात. 

शिशाची ग्रिजे: अधिक तापमान व पाण्याचे सान्निध्य ह्या अवस्थांत ही ग्रिजे अत्यंत समाधानकारक काम देतात. अतिशय उच्च दाबाला ती टिकू शकतात व पाण्यात विरघळत नाहीत अथवा त्यांचे पायसीकरण होत नाही. 

जस्ताची ग्रिजे: ही ग्रिजे जल-अपसारक असून पाण्याच्या दाबावर चालणाऱ्या लिफ्टच्या दट्ट्यांच्या व पाण्याच्या पंपाच्या दट्ट्यांच्या वंगणासाठी तसेच पाण्याखालील तारदोरांचा गंजण्यापासून बचाव करण्यासाठी वापरली जातात. 

साबणविरहित ग्रिजे: कार्बनी संयुगांचे आकर्षण असलेल्या बेंटोनाइट मातीने युक्त असलेली बेंटोन ग्रिजे व थॅलोसायनीन रंगद्रव्ये दाटपणा आणण्यासाठी वापरलेली ग्रिजे यांचा अतिशय उच्च तापमानात उपयोग करण्यात येतो. यांत अतिशय उच्च दाब सहन करू शकणारी समावेशक द्रव्ये अंतर्भूत केलेली असतात. 

प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोगाच्या सोयीच्या दृष्टीने ग्रिजांते पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते: कप ग्रिजे (कॅल्शियम ग्रिजे), तंतू व स्पंज ग्रिजे (सोडियम ग्रिजे), गोलक व लाटणी धारव्यांची ग्रिजे, आसाची ग्रिजे, द्रवीय दाब ग्रिजे, थंड व गरम गळ्याची ग्रिजे, दंतचक्र ग्रिजे, रेल्वे एंजिनांची चालन पेटी व दंड खीळ यांची ग्रिजे, सर्वगामी जोडाची [⟶ धातू व अधातूंचे जोडकाम] ग्रिजे वगैरे.  

घन वंगणे : ज्या ठिकाणी द्रव अगर अर्धद्रव वंगणे वापरणे शक्य नसते अगर सोयीचे नसते अशा ठिकाणी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. ही घन वंगणे चूर्णाच्या स्वरूपात किंवा ग्रिजे, खनिज तेले, पाणी, ग्लिसरीन व इतर द्रव पदार्थ ह्यांच्याशी एकत्र करून वापरली जातात. ही वंगणे पुढील गुणधर्मांची असणे आवश्यक असतेः ताण सहन करण्याची क्षमता, धातूंच्या घर्षणभागावर चांगली पकड, उष्णता संवहन, रासायनिक दृष्ट्या निर्धोक, वितळबिंदू उच्च व जास्त उष्णतेत टिकाऊपणा, सर्व पृष्ठभागावर पसरणे, अपघर्षक अपद्रव्यांपासून मुक्त.

सर्वात महत्त्वाची घन वंगणे म्हणजे ग्रॅफाइट, मॉलिब्डेनम डायसल्फाइड, अभ्रकाचे चूर्ण, संगजिऱ्याची पूड व बोरॉन नायट्राइड ही होत. शुल्क चूर्णाच्या स्वरूपातील ग्रॅफाइट चॉकोलेट व कँडी तयार करणाऱ्या यंत्रांसाठी, पोचण्यास अवघड असलेले अथवा कमी वेगाने कार्य करणारे यंत्रांचे धारवे व भाग यांच्यासाठी वंगण म्हणून वापरले जात. साबण, वसा, वसाम्ले व मेणे हे पदार्थसुद्धा काही प्रसंगी सर्वसाधारण तापमानाला घन वंगणे म्हणून वापरले जातात.

घन पटल वंगणे : उच्च तापमानातील उपयोगाकरिता तसेच निर्वात, अणुकेंद्रीय प्रारण (तरंगरूपी ऊर्जा), विमान व अवकाशयान यांतील प्रयुक्ती आणि वंगण तेले व ग्रिजे यांचा उपयोग करणे शक्य नाही अशा इतर परिस्थितीत घन वंगणांचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे. अशा उपयोगात घन द्रव्य पटलाच्या रूपात दोन गतिमान पृष्ठभागांच्या मध्ये घालण्यात येते.

ग्रॅफाइट व मॉलिब्डेनम डायसल्फाइड या अकार्बनी द्रव्यांचा वर उल्लेख केलेला आहेच. झिजणाऱ्या पृष्ठभागावर घन वंगण पातळ पटलाच्या रूपात झिलई करून देता येते तथापि आसंजक (चिकट) बंधकद्रव्यांचा उपयोग केल्यास बाष्पनशील विद्रावकातील सूक्ष्म कणांच्या रूपातील घन वंगणांचा थर फवारा उडवून, बूडवून अथवा ब्रशाने लावून पृष्ठभागावर देता येतो. यात मृत्तिका, पॉलिइमाइड वगैरे बंधक द्रव्यांचा उपयोग करतात. मऊ धातूंचाही पटलरूपात वंगण म्हणून उपयोग करतात. गॅलियम, इंडियम, शिसे, सोने व चांदी या धातूंचा या दृष्टीने चांगला उपयोग होण्याची शक्यता दिसून आली आहे. या धातूंचे पटल विद्युत विलेपनाने अथवा बाष्पीभवन, तडतडविणे यांसारख्या निर्वात प्रक्रियांनी [⟶ धातूंचे मुलामे] देता येते. 

विशेष परिस्थितीत वापरावयाची वंगणे : खालील वंगणे तापमान, दाब, वेग इत्यादींच्या दृष्टीने परमावधीच्या असलेल्या विशेष परिस्थितीत वापरतात.

वायू वंगणे : प्रारण रोध, उच्च वेग प्राप्त होणे, परमावधीच्या तापमानांत उपयोग करता येणे, उच्च वेगात कमी घर्षण व यंत्रातील कार्यकारी द्रायूचाच (वायूचाच) वंगण उपयोग करता येणे या गुणधर्मांमुळे वायू वंगणांचा धारव्यांसाठी उपयोग करण्यात येत आहे. तथापि वायूंच्या श्यानता वंगण तेलांच्या केवळ एक हजारांश असल्याने त्यांच्या उपयोगावर फार मर्यादा पडतात. धारव्यांच्या वंगणक्रियेसाठी हायड्रोजन, हीलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, युरेनियम हेक्झाफ्ल्युओराइड, हवा, कार्बन डाय-ऑक्साइड व आर्गॉन यांचा उपयोग करण्यात आलेला आहे.


द्रवरूप धातू : जर कार्यकारी तापमान २५०° ते ३००° से. च्या वर वाढले, तर अनेक वंगणांतील कार्बनी द्रवाचे अपघटन होते व पाण्याचा बाष्पदाब उच्च होतो. अशा परिस्थितीत द्रवरूप धातू वंगणे म्हणून वापरता येतात. उदा., पारा टरबाइनांमध्ये मर्यादित उपयोगासाठी सोडियम [विशेषतः त्याचे पोटॅशियमाबरोबरील कमी वितळबिंदू असलेले द्रवणक्रांतिक ⟶ द्रवणक्रांतिक] द्रवीय दाबावर चालणाऱ्या यंत्रातील द्रव म्हणून व अणुकेंद्रीय विक्रियकात (भट्टीत) शीतक द्रव्य म्हणून पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम व गॅलियम काही विशेष उपयोगांसाठी.

नीच तापमानातील वंगणे : द्रव ऑक्सिजन, हायड्रोजन वा नायट्रोजन यांसारख्या नीच तापमानातील द्रायूचा द्रव रॉकेट प्रचालन प्रणालीत, द्रवीकरण व प्रशीतन प्रक्रियांत टरबाइन विस्तारक म्हणून व द्रवीभूत वायूंचे मोठ्या प्रमाणावर दुसरीकडे स्थानांतर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपांत वंगण म्हणून उपयोग करण्यात येतो.

क्षेपणास्त्र प्रणालींसाठी वंगणे : क्षेपणास्त्रांत द्रव इंधने व ऑक्सिडीकारक प्रचालन प्रणाली म्हणून वापरण्यात येत असल्याने त्यांत नीच तापमानातील वंगण गरजांच्या पलीकडील एक खास गरज निर्माण होते. ही गरज म्हणजे इंधने व ऑक्सिडीकारक या दोन्हींच्या बाबतीत वंगण अक्रिय (अविद्राव्य व विक्रिया न होणारे) असले पाहिजे. सामान्यतः घन-पटल वंगणे शृंखला यंत्रणांवर, पॉलिटेट्राफ्ल्युओरोएथिलीन (पीटीएफई) अस्तरे दिशादर्शी घूर्णीतील [⟶ घूर्णी] आधार कड्यांसाठी व गोलक धारव्यांसाठी तसेच स्वयंवंगणी पटले वापरण्यात येतात. 

अणुकेंद्रीय प्रारण परिणाम : अणुकेंद्रीय विक्रियकापासून अतिवेगवाने न्यूट्रॉन, मंद (वा ऊष्मीय) न्यूट्रॉन व भेदक किरण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या उत्सर्जित होतात. त्यांच्या भडिमाराचा दुय्यम परिणाम म्हणून होणाऱ्या वंगणाच्या रेणूंच्या आयनीकरणाचा (विद्युत भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण होण्याचा) मुख्यतः अणुकेंद्रीय संयंत्रातील खनिज तेलजन्य वंगण तेले व ग्रिजे यांच्यावर तेले व ग्रिजे यांच्यावर हानिकारक परिणाम होतो. प्रारणरोधी तेले व स्थिर दाटपणा देणारे पदार्थ (उदा., पॉलियूरिया, कॉपर थॅलोसायनीन, सोडियम ॲमेट, कॅल्शियम जटिल साबण, इंडान्थ्रीन रंजकद्रव्ये, मृत्तिका कण) यांनी युक्त असलेली काही ग्रिजे १० रॅड किरणोत्सर्ग शोषण मात्रेला [⟶ किरणोत्सर्ग] प्रतिरोध करू शकतात आणि त्यांचा दाटपणा वंगण म्हणून उपयोगी पडण्याइतका समाधानकारक राहतो, असे दिसून आले आहे.

काच वंगण : मृदुकारक काचेचा उपयोग पोलाद व निकेलाच्या मिश्रधातू यांच्या बहिःसारण, धातुरूपण आणि इतर उष्ण प्रक्रिया सु. १,०००° से. तापमानात करण्यासाठी, टिटॅनियमाचे बहिःसारण आणि घडाई यंसाठी तसेच कमी प्रमाणात तांब्याच्या मिश्रधातूंच्या बहिःसारणाकरिता वंगण म्हणून करण्यात येतो. याकरिता वापरण्यात येणाऱ्या काच प्रकारांत शुद्ध वितळलेली सिलिका, ९६% सिलिका, सोडालाईम काच, शिसे-क्षार सिलिकेटे, बोरोसिलिकेटे व ॲल्युमिनोसिलिकेटे यांचा मुख्यत्त्वे अंतर्भाव होतो.

धातुकामात वापराण्यात येणारी वंगणे : धातुकामात सामान्यतः कर्तन वा यंत्रण आणि न वितळता अथवा कापता आकार बदलण्यासाठी विरूपण यांपैकी एका प्रक्रियेचा उपयोग करण्यात येतो. उच्च वेगांकरिता जेथे शीतन ही मुख्य गरज असते तेथ वंगणक्रिया सुधारण्यासाठी, गंजरोधनासाठी व चांगला ओलावा येण्यासाठी सामान्यतः ५% वा अधिक समावेशके घातलेले जलयुक्त द्रव वापरतात. कमी कर्तन वेगांकरिता गतिमान धातूपृष्ठभागांवरील उचंवट्यांचे स्थानिक वितळजोड होणे ही मुख्य समस्या असल्याने गंधक व क्लोरीनयुक्त समावेशके असलेली तेले जास्त करून वापरतात. लाटण. तार काढणे व इतर धातुरूपणकामांत वसाम्ले व काही घन वंगणे या दोहोंशी संयोग केलेली अनेक प्रकारची तेल-जल पायसे व खनिज तेले वापरतात. कर्तन व रूपण यांची हत्यारे व मुद्रा यांचे आयुर्मान वाढावे आणि अधिक जास्त प्रक्रिया वेग वापरता यावेत म्हणून त्यांच्यावर घन वंगण पटले वाढत्या प्रमाणात वापरण्यात येत आहेत.

भारतीय उद्योग : भारतात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. या सरकारी कंपनीची इंडियन ब्लेंडिंग लि. या दुय्यम कंपनीत निरनिराळ्या वंगणांची संमिश्रणे तयार करण्यात येतात. बामर लॉरी अँड कंपनी ही दुय्यम कंपनी ग्रिजांचे उत्पादन करते. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. ही कंपनी विविध वंगणांचे व संमिश्रणांचे उत्पादन करते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. ही कंपनी मोटारगाड्यांची वंगण तेले, गतिरोधक द्रव, धक्काशोषक तेले, रेल्वे गाड्यांसाठी लागणारी वंगण तेले, धातुकामात कर्तन व लाटण यांसाठी लागणारी तेले, गंजप्रतिबंधक द्रव्ये, द्रुतशीतन तेले, मोटारगाड्या, रेल्वे गाड्या व जहाजे यांच्या तसेच औद्योगिक उपयोगाची ग्रिजे वगैरे विविध वंगणांचे उत्पादन करते. या कंपनीचे फरीदाबाद (हरयाणा) येथे संशोधन व विकास केंद्र असून तेथे सुविकसित वंगण तेले तयार करण्यासंबंधी संशोधन करण्यात येते. अमेरिकेतील ल्युब्रिझॉल कॉर्पोरेशन व भारत सरकार यांच्यातील करारानुसार १९६६ मध्ये ल्युब्रिझॉल इंडिया लि. या कंपनीची स्थापना झाली. ह्या कंपनीत खनिज तेलजन्य वंगणांकरिता रासायनिक समावेशक द्रव्ये तयार करण्यात येतात.

भारतीय मानक संस्थेने विविध वंगण तेलांसाठी मानके तयार केलेली आहेत. (उदा., आयएस १०१२ वाफ टरबाइनसाठी, आयएस ४९६ अंतर्ज्वलन एंजिनांसाठी, आयएस १११८ व २८९७ दंतचक्रांसाठी वगैरे).

पहा: खनिज तेल वंगणक्रिया.

संदर्भ : 1. Boner, C. J. Modern Lubricating Greases, 1976.

            2. Braithwait, E. R. Solid Lubricants and Surfaces, New York, 1963.

            3. Braithwait, E. R. Ed. Lubrication and Lubricants,  Amsterdam, 1967.

            4. C. S. I. R. The Wealth of India,  Industrial Products, PartV, New Delhi, 1960.

            5. Evans E. A. Lubricating and Allied Oils,  London, 1963.

            6. Freeman, P. Lubrication and Friction, New York, 1962.

            7. Gunderson, R. C., Hart, A. W. Eds., Synthetic Lubricants, New York, 1962.

            8. O’Connor, J. J. and other, Eds., Standard Handbook of Lubrication Engineering, New York, 1968.

लवाटे, वा. वि. भदे, व. ग.