ल्यूकन : (इ. स. ३९-६५). रोमन कवी. थोरल्या सेनिकाचा नातू आणि धाकट्या सेनिकाचा पुतण्या. जन्म स्पेनमधील कार्दोव्हा येथे. त्याचे शिक्षण रोममध्ये झाले. रोमन स्टोइक तत्त्वज्ञ कॉर्न्यूटस ह्याच्याकडून त्याने काही शिक्षण घेतले. त्यानंतर अथेन्समध्येही त्याने काही विद्यार्जन केले. रोमन सम्राट नीरो ह्याची त्याच्यावर मर्जी बसली. तथापि स्वतःही एक कवी असलेल्या नीरोला ल्यूकनच्या कवित्वशक्तीबद्दल पुढे असूया वाटू लागली. ह्या असूयेपोटी नीरोने त्याला काव्यरचना करण्यास प्रतिबंध केला आणि त्यामुळे सम्राटाचा संताप येऊन सम्राटाविरुद्धच्या कटात तो सहभागी झाला, असे म्हटले जाते. रा कट उघडकीस आल्यानंतर शिक्ष म्हणून ल्यूकनला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आले.

ल्यूकनची एकच काव्यरचना आज उपलब्ध आहे आणि ती म्हणजे फार्सालिया (दहा सर्ग) हे महाकाव्य. De Bello Civili ह्या नावानेही हे महाकाव्य ओळखले जाते. ह्या महाकाव्याचे दहा खंड (दहावा अपूर्ण) उपलब्ध आहेत. सीझर आणि पाँपी ह्यांच्यातील युद्ध हा ह्या महाकाव्याचा विषय. पाँपीच्या खुनानंतर सीझरचे ईजिप्तमध्ये आगमन होते. ह्या प्रसंगापर्यंत महाकाव्यातील निवेदन आले आहे.

ल्यूकनच्या ह्या महाकाव्यावर थोर रोमन महाकवी व्हर्जिल ह्यांचा प्रभाव दिसून येतो. तथापि व्हर्जिलने मिथ्यकथात्मक भूतकाळाच्या आरशात रोमच्या वर्तमानकाळाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला होता. ल्यूकनने मात्र समकालीन इतिहास थेटपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथे तो रोमन महाकाव्याच्या पूर्वपरंपरेला चिकटून राहिला परंतु काही संदर्भात त्याने ह्या परंपरेचे पालन केलेले दिसत नाही. मानवी व्यवहारांमध्ये देवांचा हस्तक्षेप त्याने दाखविला नाही आणि येथे त्याच्या रचनेतली मौलिकता प्रत्ययास येते. त्याच्या शैलीत वक्तृत्वशीलतेचा अनेकदा अतिरेक होत असताना दिसला, तरी त्याच्या एकूण निवेदनातला जोम आणि तल्लखपणाही लपत नाही. त्याने योजिलेल्या चतुरोक्तींतूनही (एपिग्राम्स) त्याची प्रतिभा दिसून येते. गतकालीन रोमन प्रजासत्ताकाबद्दल ल्यूकनला वाटणारी आस्था ह्या महाकाव्यातून उत्कटपणे दिसते. नीरोसारख्या सम्राटाची जुलमी सत्ता आणि ल्यूकनला नीरोबद्दल वाटणारा तिरस्कार ही त्याची कारणे असावीत. मध्ययुगात ल्यूकनच्या ह्या महाकाव्याला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली होती. व्हर्जिलकृत ईनिडनंतरचे श्रेष्ठ लॅटिन महाकाव्य म्हणून हे महाकाव्य ओळखले जाते. क्विंटिल्यन आणि इटालियन महाकवी दान्ते ह्यांनी ह्या महाकाव्याची प्रशंसा केली. क्रिस्टोफर मार्लोने ह्या महाकाव्याचा पहिला खंड इंग्रजीत अनुवादिला. इंग्रज कवी निकोलस रो ह्याने केलेला ह्या महाकाव्याचा इंग्रजी अनुवाद अठराव्या शतकात प्रशंसापात्र ठरला होता. प्येअ कोर्नेय आणि सतराव्या शतकातील अन्य फ्रेंच अभिजाततावादी नाटककार ह्यांच्यावरही ल्यूकनच्या ह्या महाकाव्याचा प्रभाव होता.

कुलकर्णी, अ. र.