सिंक्लेअर ल्यूइसल्यूइस, सिंक्लेअर : (७ फेब्रुवारी १८८४–१० जानेवरी १९५१). श्रेष्ठ अमेरिकन कादंबरीकार. संपूर्ण नाव हॅरी सिंक्लेअर ल्यूइस. अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील सॉक सेंटर येथे तो जन्मला. १९०७ साली तो येल विद्यापीठातून पदवीधर झाला. विख्यात समाजवादी अमेरिकन कादंबरीकार⇨अप्टन सिंक्लेअर आणि अमेरिकन समाजावर कठोर टीका करणारा पत्रकार, समीक्षक आणि निबंधकार हेन्री ल्यूइस मेंकेन (१८८०-१९५६) ह्यांचा बराच प्रभाव त्याच्यावर पडला. काही वर्षे त्याने पत्रकार म्हणून काम केले. न्यूयॉर्कमधील काही प्रकाशनसंस्थांत नोकरी केली. ल्यूइसने विसांहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. अवर मिस्टर रेन ही त्याची पहिली कादंबरी १९१४ साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर द ट्रेल ऑफ द हॉक (१९१५), द इनोसंट्स (१९१७), द जॉब (१९१७) ह्यांसारख्या काही कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. तथापि मेन स्ट्रीट (१९२०) ही त्याची पहिली यशस्वी कादंबरी. ह्या कादंबरीत मिनेसोटातील एका गावात कॅरल मिलफर्ड ह्या तरुणीची होणारी कुचंबणा त्याने प्रत्ययकारीपणे मांडली आणि अशा छोट्या गावांसंबंधी अमेरिकन मनात असलेल्या आदर्श कल्पनांना धक्का दिला. आधुनिक अमेरिकन समाजातील विविध समस्यांचे वास्तववादी आणि औपरोधिक चित्रण त्याने आपल्या अनेक कादंबऱ्यांतून केले. उदा., व्यापारी वृत्ती (बॅबिट्, १९२२), वैद्यकीय व्यवसायातल्या अपप्रवृत्ती (ॲरोस्मिथ, १९२५), धर्माच्या क्षेत्रातील ढोंगीपणा (एल्मर गॅट्री, १९२७), अमेरिकेतील श्रीमंतांचे जग आणि त्यातील रितेपणा (डॉड्सवर्थ, १९२९) असे विविध विषय त्याने आपल्या कादंबऱ्यांतून हाताळले. वर्ल्ड सो वाइल्ड (१९५१) ही त्याची अखेरची कादंबरी त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाली.

आपल्या कादंबऱ्यातील समाजचित्रण त्याने सविस्तर आणि साक्षेपाने केले आहे. हाताळलेल्या समस्यांचा सांगोपांग अभ्यास करून तो आपल्या कादंबऱ्या लिहीत असे. जिवंत व्यक्तिचित्रण मात्र त्याला साधले नाही. रचनेतील शिथिलता हा त्याचा आणखी एक दोष. शिवाय अमेरिकन मध्यमवर्गाचा तो प्रभावी टीकाकार असला, तरी या वर्गाच्या जीवनदृष्टीतील गुणदोषांचे प्रतिनिधित्वही तो करतो हे जाणवते.

 

नोबेल पारितोषिक देऊन १९३० साली त्याच्या साहित्यसेवेचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळविणारा तो पहिला अमेरिकन साहित्यिक. 

रोम येथे तो निधन पावला.  

संदर्भ : 1. Dooley, David J. The Art of Sinclaire Lewis, Canada, 1967.

            2. Grebstein, Sheldon N. Sinclaire Lewis, New York, 1962.

            3. Lewis, Grace Hegger, With Love From Gracle, New York, 1955.

            4. Schorer, Mark, Ed. Sinclaire Lewis : A Collection of Critical Essays, Englewood Cliffs. (N. J.), 1962.

            5. Schorer, Mark, Sinclarie Lewis : An American Life, London, 1961.

नाईक, म. कृ.