राइस, एल्मर : (२८ सप्टेंबर १८९२—८ मे १९६७). अमेरिकन नाटककार. मूळ नाव एल्मर रायझेन्स्टाइन. न्यूयॉर्क शहरी जन्मला. न्यूयॉर्क लॉ स्कूलमधून त्याने कायद्याची पदवी घेतली (१९१२). १९१४ साली ऑन ट्रायल ही त्याची पहिली नाट्यकृती रंगभूमीवर आली. त्यानंतर काही वर्षे कोलंबिया विद्यापीठात त्याने नाट्यलेखनाचा अभ्यास केला. त्याच्या अन्य नाट्यकृतीत द ॲडिंग मशिन (१९२२), स्ट्रीट सीन (१९२८), काउन्सेलर-अँट-लॉ (१९३१), वी, द पीपल (१९३३), जजमेंट डे (१९३४), अमेरिकन लँडस्केप (१९३९) आणि ड्रीम गर्ल (१९४५) ह्यांचा समावेश होतो. त्याने काही एकांकिकाही लिहिल्या आहेत.

एल्मरचे द अँडिंग मशिन हे नाटक अभिव्यक्तिवादी तंत्राने लिहिलेले असून आधुनिक जगात मानवाचे झालेले अवमानवीकरण हा त्याचा विषय आहे. स्ट्रीट सीन हे त्याचे विशेष गाजलेले नाटक. न्यूयॉर्क शहरातील झोपडपट्टीमधले जीवन त्यात त्याने रंगविलेले आहे. ह्या नाटकास १९२९ चे पुलिट्झर पारितोषिक मिळाले. काउन्सेलर-ॲट-लॉ हे वकिली व्यवसायावरील एक वास्तववादी नाटक, तर वी, द पीपल हे महामंदीवरील. युद्धाला आणि नाझी तत्त्वज्ञानाला विरोध करण्यासाठी जजमेंट डे लिहिले गेले आणि अमेरिकन लँडस्केपमध्ये ऐतिहासिक संदर्भाचा वापर करून वंशद्वेष आणि आर्थिक विषमता यांवर टीका केली आहे. ड्रीम गर्ल ही एका स्वप्नाळू तरुण मुलीची नाट्यरूप कहाणी.

सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची कल्पना राइसच्या नाट्यकृतींतून अनेकदा व्यक्त होताना दिसते. नवे शोधण्याची प्रयोगशील वृत्ती ठेवून त्याने आपले नाट्यलेखन केले. आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीच्या उत्तरकाळात राइस हा मनोविश्लेषणावर विशेष भर देऊ लागलेला दिसतो. मायनॉरिटी रिपोर्ट हे त्याचे आत्मचरित्र १९६३ मध्ये प्रसिद्ध झाले. राइसचे निधन इंग्लंडमध्ये, साउथॅम्प्टन येथे झाले.

संदर्भ : 1. Durham, F. Elmer Rice, New York, 1970.

2. Hogan, R. The Independence of Elmer Rice, Carbondale, III. 1965.

3. Palmieri, A Elmer Rice : A Playwright’s Vision of America, Madison, N. J. 1960.

नाईक, म. कृ.