स्टाइन, गर्ट्रूड : (३ फेब्रुवारी १८७४–२७ जुलै १९४६). अमेरिकन लेखिका. जन्म अमेरिकेतील ॲलगेनी येथे. तिचे बालपण व्हिएन्ना आणि पॅरिस येथे गेले. कॅलिफोर्निया राज्यातील ऑक्लंड येथेही नंतर तिचे काही काळ वास्तव्य होते. १८९३ मध्ये तिने रॅडक्लिफ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून मानसशास्त्राचा अभ्यास केला. विख्यात मानसशास्त्रज्ञ ⇨ विल्यम जेम्स (१८४२–१९१०) ह्यांच्याशी तिचा परिचय झाला. पुढे ‘जॉन हॉपकिंझ मेडिकल स्कूल’मध्ये काही वर्षे तिने वैद्यकाचा अभ्यास केला; तथापि रॅडक्लिफ कॉलेजमधून आणि ‘जॉन हॉपकिंझ मेडिकल स्कूल’मधून तिने पदवी मिळविली नाही. १९०३ साली आपला भाऊ लीओ ह्याच्यासह ती पॅरिसला गेली. लीओने कलासमीक्षक म्हणून कीर्ती मिळवली. १९०३ ते १९१२ पर्यंत ती आपल्या ह्या भावाबरोबर राहत होती; तथापि १९१२ मध्ये लीओबरोबरचे तिचे संबंध कायमचे दुरावले. त्यानंतर ॲलिस बी. टॉक्लस ही १९०७ मध्ये तिला भेटलेली युवती तिची सहचरी आणि सचिव म्हणून राहू लागली आणि तिने तिला कायम साथ दिली.

गर्टूड स्टाइन

पॅरिसमध्ये आल्यानंतर तिने तिच्या संपत्तीचा विनियोग तरुण कलावंतांना मदत करण्यासाठी केला. अनेक प्रतिभावंत चित्रकारांबरोबर तिचे स्नेहसंबंध निर्माण झाले. त्यांत ⇨ पाब्लो पिकासो (१८८१–१९७३), ⇨ आंरी मातीस (१८६९–१९५४), झॉर्झ ब्राक अशांचा समावेश होता. पिकासोने १९०६ साली तिचे एक व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट) काढलेले आहे. अशा स्नेहसंबंधांमुळे पॅरिसमधले तिचे घर सर्जनशील कलावंतांसाठी एक दरबारच ठरले. शेरवुड अँडरसन आणि अर्नेस्ट हेमिंग्वे ह्यांच्यासारखे अमेरिकन साहित्यिक तेथे येत असत. व्हर्जिल टॉमससारखे अमेरिकन संगीतकार, लिटन स्ट्रॅची, इडिथ सिटवेल ह्यांच्यासारखे ब्रिटिश साहित्यिक यांचीही हजेरी असे. गर्टूडची कला-साहित्यविषयक मते आदरपूर्वक मानली जात. तिने एखाद्या लेखक-कलावंताबद्दल सहजपणे केलेल्या विधानांमुळेही संबंधित व्यक्तीच्या कीर्तीवर अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होऊ शकत असे, असे म्हटले जात असे.

थ्री लाइव्ह्ज (१९०९) हे तिचे पहिले पुस्तक. ह्यातील तीन शोकात्म कथांतून विषय आणि शैली ह्यांकडे पाहण्याचा तिचा प्रायोगिक दृष्टिकोण प्रत्ययास येतो. तीन स्त्रियांच्या ह्या कथा असून त्यांची अभिव्यक्ती तिच्या कलाविषयक भूमिकेशी सुसंगत अशी आहे. तिच्या मते प्रत्यक्ष वर्तमानात पूर्णपणे असणे, हे कलेचे काम आहे आणि हे साधण्यासाठी ती वापरीत असलेल्या तंत्राची तुलना तिने चित्रपटाशी केली आहे. चलत्चित्रपटात एकामागून एक पुढे सरकणाऱ्या दोन चित्रप्रतिमा (फ्रेम्स) अगदी एकसारख्या अशा कधीच नसतात. तरीही त्यांचा क्रम एका वाहत्या सातत्याचा अनुभव देतो. त्याचप्रमाणे वाक्ये अंशतः पुनरावृत्त करून अशा प्रत्येक वाक्याबरोबर निवेदनाचा विषय अंशतः पुढे नेता येतो आणि त्यांच्या अखंड मालिकेतून पाहणारा एक जिवंत क्षण असंदिग्धपणे आणि सुव्यवस्थित आकारात आपण अनुभवतो आहोत असे वाटते. हे तंत्र थ्री लाइव्ह्जमध्ये आपल्याला दिसते. तिच्या द मेकिंग ऑफ अमेरिकन्स (१९२५) मध्येही ते दिसते. ह्या पुस्तकात मानसशास्त्र आणि अमेरिकनांची मानसिक घडण ह्या विषयांबद्दलची तिची ओढ दिसून येते. मात्र सर्वसामान्य वाचकांना दुर्बोध वाटावे, असे हे लेखन आहे. चित्रकलेत कलावंताला जे स्वातंत्र्य घेता येते, ते सहित्यिकाला त्याच्या निर्मितीत घेता आले पाहिजे, असे तिला वाटे. टेंडर बटन्स (१९१५) मध्ये असे स्वातंत्र्य घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. घनवादी चित्रकारांच्या शैलीने शाब्दिक व्यक्तिचित्रे घडविण्याची तिची धडपड आहे. टेंडर बटन्सवर अतिवास्तववादी अभिव्यक्तिपद्धतीचाही प्रभाव आहे.

ऑटोबायॉग्राफी ऑफ ॲलिस बी टॉक्लस (१९३३) हे स्वतः गर्ट्रूडचेच आत्मचरित्र असले, तरी ते तिने सचिव ॲलिस हिचे आत्मचरित्र असल्याचे दाखविले आहे. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

गर्ट्रूडचे अन्य काही ग्रंथ असे : काँपोझिशन ॲज एक्स्प्लनेशन (१९२६, आपल्या लेखनप्रणालीबद्दल तिने ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांत दिलेली व्याख्याने), फोर सेंट्स इन थ्री ॲक्ट्स (१९३४, संगीतिका हिचे संगीत व्हर्जिल टॉमसने दिलेले आहे.), एव्ह्‌रीबडीज ऑटोबायॉग्राफी (१९३७, अमेरिकेतील तिच्या व्याख्यान दौऱ्यांचा वृत्तांत), पिकासो (१९३९), वॉर्स आय हॅव सीन (१९४५, दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी फ्रान्स व्यापला, त्या काळातील तिच्या फ्रान्समधील जीवनाचा वृत्तांत), ब्रूसी अँड विली (१९४६, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रान्समध्ये असलेल्या अमेरिकन सैनिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक प्रश्‍नांविषयी).

पॅरिस शहरी ती निधन पावली.

संदर्भ : 1. Bridgman, Richard, Gertrude Stein in Pieces, 1971.

2. Brinnin, Malcome, The Third Rose : Gertrude Stein and Her World, 1959.

3. Mellow, James R. Charmed Circle : Gertrude Stein and Company, 1974 reissued, 1982.

4. Neuman, Shirly Nadel, Ira B., Ed. Gertrude Stein and the Making of Literature, 1987.

5. Stewart, Allegra, Gertrude Stein and the Present, 1967.

6. Sutherland, Donald, Gertrude Stein : A Biography of her work, 1951.

7. Weinstein, Norman, Gertrude Stein and Literature of the Modern Consciousness, 1970.

कुलकर्णी, अ. र.