नथॅन्यल हॉथॉर्नहॉथॉर्न, नथॅन्यल : (४ जुलै १८०४–१९ मे १८६४). अमेरिकन कादंबरीकार आणि कथाकार. जन्म सालेम, मॅसॅचूसेट्स येथे.सतराव्या शतकापासून हॉथॉर्नचे पूर्वज सालेम येथे राहत होते. हॉथॉर्न हा सहाव्या पिढीचा. त्याचे वडील १८०८ मध्ये निवर्तले. विधवा आईने त्याचे संगोपन केले. त्याच्या सधन मामांमुळे ब्रंझव्हिक येथील ‘बोडोइन कॉलेज ङ्खमध्ये त्याला शिक्षण घेता आले (१८२१–२५). ह्या महा-विद्यालयात त्याला हेन्री लाँगफेलो, फ्रँकलिन पीअर्स असे सहाध्यायी लाभले. तिथे अभिजात साहित्य- कृतींचा – विशेषतः लॅटिन भाषेचा – अभ्यास त्याने केला. पदवी घेतल्यानंतर तो सालेमला येऊन राहिला (१८२५ –३७). वाङ्मयाच्या क्षेत्रात त्याच्या उमेदवारीचा हा काळ होता. ह्याच काळात त्याने काही कथा लिहिल्या आणि शब्दचित्रे रेखाटली.

 

हॉथॉर्नच्या आरंभीच्या बहुतेक कथा अनामिकपणे प्रसिद्ध झालेल्या आहेत. ट्वाइस-टोल्ड टेल्स (१८३७) ह्या कथासंग्रहाने हा अनामिक-पणा दूर झाला. ह्या संग्रहाची विस्तारित आवृत्ती १८४२ मध्ये प्रसिद्ध झाली. ह्या संग्रहात ३९ कथा आहेत. ज्या कालखंडात ह्या कथा लिहिल्या गेल्या तो कालखंड त्याने एकाकीपणात घालविलेला असला, तरी ह्या कथा एकाकी माणसाच्या वाटत नाहीत. त्यांतून जगाशी संवाद साधण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. ह्या कथासंग्रहानंतर त्याचे मॉसेस फ्रॉम ॲन ओल्ड मॅन्स (१८४६) आणि द स्नो-इमेज (१८५१) हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्याच्या कथांना हळूहळू समीक्षकांचा अनुग्रह लाभला आणि त्याच्या काही कथांचा समावेश अभिजात कथांमध्ये झाला. त्याचा विवाह सालेममध्येच राहणाऱ्या सॉफिया पीबॉडी हिच्याशी झाला (१८४२). काँकॉर्ड येथे राल्फ वॉल्डो एमर्सन, हेन्री डेव्हिड थोरो अशा विचारवंतांशी त्याचा संपर्क राहिला.

 

हॉथॉर्न पुढे कादंबरीलेखनाकडे वळला. द स्कारलेट लेटर (१८५०) ही त्याची पहिली कादंबरी. प्यूरिटन पंथाच्या कर्मठ वृत्तीचा तीतून प्रत्यय येतो. एका वयस्क विद्वानाची तरुण पत्नी हेस्टर हिची ही कथा.हा विद्वान हेस्टरला तिचे आणि त्याचे घर उभे करण्यासाठी बॉस्टनला पाठवतो. दोन वर्षानंतर तो जेव्हा बॉस्टनला परत येतो, तेव्हा आपल्या पत्नीला कोणापासून तरी संतती झाल्याच्या आरोपावरून तिला एका लाकडी खांबाशी जखडल्याचे त्याला दिसून येते. त्या माणसापासून तिला झालेली मुलगी तिच्या हातात असते. चौकशीत हेस्टर तिचा प्रियकर कोण हे सांगण्याचे स्पष्टपणे नाकारते. शिक्षा म्हणून ‘A’ (Adultress) म्हणजेच व्यभिचारिणी हे लख्ख लाल रंगातले अक्षर ती परिधान करील त्या वस्त्रावर ठळकपणे दिसेल असे रेखावे, असे सांगण्यातयेते. हेस्टरचा नवरा तिथे आपली ओळख देत नाही परंतु आपले नाव बदलून हेस्टरच्या प्रियकराचा शोध घेत राहतो. हेस्टर खंबीर आणि स्वतंत्र स्वभावाची स्त्री असते. शिक्षा जाहीर झाल्यानंतरच्या बहिष्कृत अवस्थेत ती इतर अभागी स्त्रियांसाठी सहानुभूतीने काम करते. हळूहळू तिच्या शेजाऱ्यांना तिच्याबद्दल आदर वाटू लागतो. दरम्यान आपल्या पत्नीचा प्रियकर एक तरुण रेव्हरंड (धर्मोपदेशक) आहे, हे हेस्टरच्या पतीलासमजते. हा रेव्हरंड अनेक वर्षे अपराधी भावनेने जळत असतो. त्याचेमन यातनाग्रस्त झालेले असते. गुप्तपणे तो काही प्रायश्चित्त घेत असला, तरी आपल्या कृत्याची कबुली देण्याआड त्याचा अहंकार येत असतो. अखेरीस तो ती कबुली देतो आणि ज्या खांबाला पूर्वी हेस्टर जखड-लेली असते, त्याच खांबाला तोही जखडला जातो. तेथेच तो हेस्टरच्या करपाशात प्राण सोडतो. एका अपराधी माणसाला निष्ठुरपणे शोधत राहणे, हेच आयुष्याचे उद्दिष्ट झाल्यामुळे हेस्टरच्या नवऱ्याचे आयुष्यही उद्ध्वस्त होते. त्याचे नैतिक अधःपतन झालेले असते. यूरोपात जाऊन मुलीच्या सुखासाठी हेस्टर जगत राहते. तसेच अनेक दुःखितांना मदत करीत राहते. द स्कारलेट लेटर ही हॉथॉर्नची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानलीजाते. ह्या कादंबरीला वाचकांचा आणि समीक्षकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला. ह्या यशाने उत्साहित होऊन त्याने द हाउस ऑफ सेव्हन गेबल्स (१८५१) आणि ब्लिथडेल रोमान्स (१८५२) ह्या कादंबऱ्या लिहिल्या. द हाउस ऑफ … ही कादंबरी प्यूरिटन पंथाच्या र्‍हासाचे दर्शन घडविते. द स्कारलेट लेटर ही कादंबरी म्हणजे सतराव्या शतकाच्या मध्याला, प्यूरिटन पंथाच्या प्रभावाखाली बॉस्टनमध्ये घडलेली कथा आहे पण ब्लिथडेल रोमान्समध्ये तो समकालीन वातावरणाकडे वळला आहे. हॉर्थार्नने लहान मुलांकरिताही लिहिले. ए वंडर बुक (१८५२) आणि टँगलवुड टेल्स (१८५३) हे त्याने मुलांकरिता केलेले लेखन. ह्यादोन्ही पुस्तकांत त्याने मिथ्यकथा सांगितल्या आहेत. १८५० मध्ये हॉथॉर्न दांपत्य बर्कशर हिल्समधील लेनॉक्स येथील ‘रेड हाउस’ ह्या ठिकाणी राहिले होते. तेथील वास्तव्यात मोबी डिक ह्या गाजलेल्या कादंबरीचा लेखक हर्मन मेल्‌व्हिल् ह्याच्याशी त्यांची मैत्री झाली.

 

हॉथॉर्नचा मित्र फ्रँकलिन पीअर्स हा १८५२ मध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. त्याने लिव्हरपूल (इंग्लंड) येथे अमेरिकेचा वाणिज्य दूत म्हणून हॉथॉर्नची नियुक्ती केली (१८५३–५७). अवर ओल्ड होम (१८६३) हे त्याचे पुस्तक म्हणजे इंग्लंडमधील त्याच्या वास्तव्याचे फलित होय. १८५७ मध्ये इंग्लंड सोडल्यावर तो सपत्नीक इटलीला गेला. मुख्यतः रोम आणि फ्लॉरेन्समध्ये ते राहिले. इंग्लंडमध्ये परतल्यानंतर त्याने त्याची द मार्बल फॉन ही अखेरची कादंबरी लिहिली (१८६०).

 

हॉथॉर्नच्या समग्र साहित्याच्या १२ खंडांत (१९०४) आणि पुढे १४ खंडांत (१९६३–८०) अशा दोन आवृत्त्या निघालेल्या आहेत.

 

प्लिमथ एन्. एच्. येथे तो निधन पावला.

 

संदर्भ : 1. Budford, Jones, A Checklist of Hawthorne Criticism, 1951-1966, 1967.

            2. Clark, Frazer C.E. Jr. Nathaniel Hawthorne: A Descriptive Biography, 1978.

           3. Pearson, N. H. Ed. The Complete Novels and Selected Tales of Nathaniel Hawthorne, 1937.

           4. Turner, Arlin, Nathaniel Hawthorne: A Biography, 1980.

कुलकर्णी, अ. र.