हेन्री वॉड्‌सवर्थ लाँगफेलोलाँगफेलो, हेन्री वॉड्‌सवर्थ : (२७ फेब्रुवारी १८०७-२४ मार्च १८८२). विख्यात अमेरिकन कवी. पोर्टलंड मेन येथे एका सुसंस्कृत कुटुंबात जन्मला. आरंभीचे काही शिक्षण पोर्टलंड येथे घेतल्यानंतर ब्रंझाविक येथील बोडन कॉलेजात त्याने प्रवेश घेतला. पोर्टलंड येथे असतानाच तेथील एका नियतकालिकातून त्याच्या कविता प्रसिद्ध होत असत तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी असतानाही अमेरिकन मंथ्‌ली मॅगझीन  आणि युनायटेड स्टेट्‌स लिटररी गॅझेट  ह्यांसारख्या नियतकालिकांतून त्याच्या कविता आणि निबंध प्रसिद्ध होत होते. महाविद्यालयात असताना सर वॉल्टर स्कॉट आणि वॉशिंग्टन आर्व्हिंग हे त्याचे आवडते लेखक होते. १८२५ मध्ये तो पदवीधर झाला. त्यानंतर आधुनिक भाषांचा प्राध्यापक म्हणून त्याला त्याच्याच बोडन कॉलेजात बोलविण्यात आले. तथापि त्याआधी त्याने यूरोपात जाऊन काही काळ अभ्यास करावा, अशी अट घालण्यात आली होती. त्यानुसार १८२६ ते १८२९ ह्या कालखंडात फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनी ह्या देशांत त्याने वास्तव्य केले आणि तेथील भाषांचा अभ्यास केला. अमेरिकेस परतल्यानंतर बोडन कॉलेजात प्राध्यापक आणि ग्रंथपाल म्हणून तो काम करू लागला.  फ्रेंच, स्पॅनिश आणि इटालियन साहित्यांवर त्याने निबंध लिहिले. बोडन कॉलेजातील त्याच्या यशस्वी कामगिरीमुळे हार्व्हर्ड विद्यापीठातून त्याला बोलावणे आले. त्या निमित्ताने त्याला भाषाभ्यासासाठी यूरोपला पुन्हा एकदा जाण्याची संधी मिळाली. परंतु पत्नीच्या निधनामुळे त्याला ही युरोपभेट लवकरच आवरती घ्यावी लागली. १८३६ पासून तो हार्व्हर्ड विद्यापीठात शिकवू लागला आणि तेथे १८५४ पर्यंत त्याने प्राध्यापकी केली. त्यानंतर त्याने स्वतःला लेखनास वाहून घेतले.

लाँगफेलो हा मुख्यतः कवी असला, तरी आउटर-मेर : अ पिलग्रिमेज बियाँड द सी  हे त्याचे लेखन गद्य असून ते वॉशिंग्टन आर्व्हिंगच्या स्केच बुकचे स्मरण करून देणारे आहे. लाँगफेलोच्या प्रवासातली निरीक्षणे त्यात अंतर्भूत आहेत. हाय्‌पिरिअन   ही त्याची काहीशी आत्मचरित्रात्मक कादंबरी आणि व्हॉइसिझ ऑफ द नाइट  हा त्याचा पहिला काव्यसंग्रह १८३९  साली प्रसिद्ध झाला. ‘द साम ऑफ लाइफ’ आणि ‘द लाइट ऑफ द स्टार्स’ ह्या त्याच्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या कविता व्हॉइसिझ… मध्येच अंतर्भूत होत्या. व्हॉइसिझनंतर त्याचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. बॅलड्‌‌स अँड अदर पोएम्स (१८४२), द बेल्फ्राय ऑफ ब्रूजेस अँड अदर अकेडी (१८४७), द कोर्टशिप ऑफ माइल्स स्टँडिश (१८५८), टेल्स ऑफ अ वेसाइड इन (१८६३) ह्यांचा त्यात अंतर्भाव होतो. इन द हार्बर (१८८२) हा त्याचा अखेरचा काव्यसंग्रह. द साँग ऑफ हायावाथा (१८५५) ही त्याची विशेष गाजलेली काव्यकृती. प्रसिद्ध फिनिश महाकाव्य ⇨कालेवाला ह्याच्याशी निकटचे नाते सांगणारे हे कथाकाव्य आहे. आपल्या उत्तरायुष्यात लाँगफेलोने दान्तेच्या डिव्हाइन कॉमेडीचे (इं. भा.) भाषांतर केले.

कवी म्हणून त्याला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर इंग्लंड आणि अन्य यूरोपीय देशांत त्याने काव्य आवडीने वाचले जात होते. भावकाव्ये, कथाकाव्ये, सुनीते, महाकाव्य असे विविध काव्यप्रकार त्याने हाताळले. यूरोपीय साहित्यातील विचारप्रवाह त्याने अमेरिकन साहित्यात आणले. विसाव्या शतकात त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली लोकप्रियता ओसरली. पहिल्या दर्जाचा कवी म्हणून त्याला आज मान्यता नसली, तर साध्या, सोप्या आणि सुश्लिष्ट शैलीचा आणि साँग ऑफ हायावाथासारखे काव्य लिहिणारा कवी म्हणून त्याचा लौकिक अद्याप टिकून आहे. 

त्याने १८६८-६९ मध्ये यूरोपचा दौरा केला, तेव्हा ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्याला सन्मानित केले. केंब्रिज (मॅसॅचूसेट्‌स) येथे तो निधन पावला. त्याच्या निधनानंतर वेस्टमिन्स्टर ॲबेमधील प्रसिद्ध कविकोपऱ्यात (पोएट्‌स कॉर्नर) त्याचा पुतळा उभारण्यात आला. असा मान मिळणारा तो पहिला अमेरिकन होय. त्याचा भाऊ सॅम्युएल लाँगफेलो ह्याने त्याचे साहित्य १४ खंडांत संकलित केले आहे (१८८६-९१) तसेच त्याचे चरित्रही लिहिले आहे.

संदर्भ :  1. Arvin, Newton, Longfellow : His Life and Work, Boston, 1963.  

            2. Osborn, C. S. Osborn, Stella B. Schoolcraft, Longfellow and Hiawatha, New York, 1942.

            3. Thompson, Lawrance R. Young Longfellow, 1807-1843, New York, 1969. 

            4. Wagenknecht, Edward C. Henry Wadsworth Longfellow : Portrait of an American Humanist, oxford, 1966.        

                                   कळमकर, य. शं.