हेमिंग्वे, अर्नेस्ट : (२१ जुलै १८९९–२ जुलै १९६१). अमेरिकन कादंबरीकार आणि कथाकार. जन्म अमेरिकेतल्या इलिनॉय राज्यातील अर्नेस्ट हेमिंग्वेओक पार्क येथे. त्याचे वडील क्लेरन्स एडमंड्स हेमिंग्वे हे डॉक्टर होते. शिकार, मासेमारी हे त्यांचे आवडते छंद होते. त्याची आई ग्रेस हॉल हेमिंग्वे ह्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. चर्चच्या कामांत त्या उत्साहाने भाग घेत असत. त्यांनी त्याला सेल्लो हे वाद्य शिकण्यास आणि चर्चच्या गानवृंदात (क्वायर) सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हेमिंग्वेच्या आयुष्याची आरंभीची वर्षे आईच्या स्त्रैण प्रभावाशी झगडण्यात आणि वडिलांचा पुरुषी स्वभाव आत्मसात करण्यात गेली. शालेय जीवनातच तो लिहू लागला. शालेय जीवनात एक क्रीडापटू आणि जोमदार व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी म्हणून त्याने लौकिक प्राप्त केला होता. त्याला बाहेर भटकायला आवडे. घरातून तो दोनदा पळून गेला होता. १९१७ मध्ये त्याचे शालेय शिक्षण संपले तथापि उच्च शिक्षणासाठी तो महाविद्यालयात गेला नाही. कॅन्सास सिटी ह्या ठिकाणी जाऊन त्याने कॅन्सास सिटी स्टार ह्या त्यावेळच्या आघाडीच्या वृत्तपत्रात वा र्ता ह रा ची नोकरी स्वीकारली. तेथे त्याला पत्रकारितेचे उत्तम व्यावसायिक प्रशिक्षण मिळाले. १९१७ सालीच अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली, तेव्हा लष्करी सेवेत शिरण्यासाठी त्याने पुनःपुन्हा प्रयत्न करूनही, त्याच्या डोळ्यात काही दोष असल्यामुळे त्याला त्या सेवेत घेतले गेले नाही तथापि अमेरिकन रेड क्रॉसच्या रुग्ण-वाहिकेचा ड्रायव्हर म्हणून त्याने पहिल्या महायुद्धात काम मिळविले. ८ जुलै १९१८ रोजी ऑस्ट्रो-इटालियन आघाडीवर फोस्साल्ता दी प्यॉव्ही येथे तो जखमी झाला. परंतु त्या अवस्थेतही एका जखमी माणसाला पाठीवर घेऊन तो उपचारकेंद्रावर गेला. या शौर्याबद्दल त्याला गौरविले गेले. त्या वेळी तो जेमतेम १९ वर्षांचा होता. जखमी अवस्थेत मिलान येथील रुग्णालयात उपचार घेत असताना ॲग्नेस फोन कुरोव्हस्की ह्या रेड क्रॉससाठी काम करणाऱ्यार्सच्या प्रेमात तो पडला तथापि तिने त्याच्याशी विवाह करण्यास नकार दिला. ह्या अनुभवांचे विस्मरण त्याला कधीही झाले नाही. 

 

पहिले महायुद्ध संपल्यानंतर टोरोंटो स्टार ह्या नियतकालिकाचापरदेशी प्रतिनिधी म्हणून त्याने काम केले. नंतर तो मिशिगनला परतला, तेव्हाच त्याने कथा-कादंबऱ्यांचे लेखन करण्याचा निर्णय घेतला होता. यूरोपमध्ये जाण्याचीही त्याची इच्छा होती. त्याच्या अनेक प्रायोगिक कथांनी प्रभावित झालेला तत्कालीन प्रसिद्ध लेखक शर्वुड अँडरसन ह्याने त्याला स्वदेशत्याग करून फ्रान्समध्ये गेलेल्या गटर्र्ड स्टाइन आणि एझरा पाउंड ह्यांना परिचयपत्रे दिली. ती घेऊन हेमिंग्वे आणि त्याची पत्नी हेड्ली रिचर्ड्सन पॅरिसला गेली. तेथील जीवन तसे दारिद्र्याचे होते तथापि हेमिंग्वेच्या दृष्टीने ते त्याच्या आयुष्यातील सर्वांत सुखाचे दिवस होते. त्यात त्याची सर्जनशीलताही फुलून आली. 

 

१९२३ मध्ये थ्री स्टोरीज अँड टेन पोएम्स हे त्याचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यातल्या कविता फारशा महत्त्वपूर्ण नव्हत्या पण त्याच्या कथांतून त्याच्या प्रतिभेची चुणूक दिसून येत होती. १९२५ मध्ये इन अवर टाइम हा त्याचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला (पॅरिसमध्ये १९२४ मध्ये) .ह्या संग्रहातील कथांसाठी मिशिगनमधल्या त्याच्या अनुभवांचा त्यानेवापर करून घेतला. त्याचप्रमाणे दुःख आणि हिंसा ह्यांच्या जगात प्रवेश करणाऱ्या तरुण निक अडॅम्सची व्यक्तिरेखा त्याने उभी केली. हेमिंग्वेने पुढे निर्माण केलेल्या नायकांचे आदिरूप निक अडॅम्समध्ये आढळते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या द सन ऑल्सो रायझिस (१९२६) ह्या कादंबरीने त्याला फार मोठी लोकप्रियता प्राप्त करून दिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात शारीरिक, तसेच भावनिक दृष्ट्या दुःख सोसलेल्या आणि स्वदेशत्याग केलेल्या इंग्रज आणि अमेरिकन व्यक्तींचा समूह ह्या कादंबरीत दाखवलेला आहे. एका संपूर्ण पिढीचे दिशाहीन अस्तित्व, मानसिक दिवाळखोरी आणि ढासळलेली नैतिकता ही कादंबरी प्रभावीपणे व्यक्त करते. 

 

१९२७ मध्ये मेन विदाउट विमेन हा त्याचा दुसरा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. ह्या कथासंग्रहामुळे कथालेखनावर विलक्षण हुकमत असलेला लेखक म्हणून तो मान्यता पावला. ज्याला ठार करण्यासाठी एक गुन्हेगारी टोळी उभी राहिलेली आहे, तिला भिऊन पलायन करण्यास खंबीरपणे नकार देणारा ओल अँडरसन (‘द किलर्स’), नुकताच रुग्णालयातून बाहेर आलेला आणि तरीही बैलाशी युद्ध करणारा मान्वेल गार्सिआ (‘द अनडिफिटेड’), वेश्या आणि समलिंगी कामुकतेच्या जगाशी अकाली परिचय झालेला निक अँडरसन (‘द लाइट ऑफ द वर्ल्ड’) ह्यांसारख्या व्यक्तिरेखांच्या कथा या संग्रहात आहेत.

 

१९२९ साली फेअरवेल टू आर्म्स ही त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली. एक अमेरिकन सैनिक आणि एक इंग्रज नर्स ह्यांच्यातील अयशस्वी प्रेमाची ही दुःखद कहाणी आहे. पण हेमिंग्वेच्या स्थितप्रज्ञवत सोशिकतेचा तात्त्विक आविष्कार येथे आढळतो. हेमिंग्वेला स्पेनबद्दल प्रेम होते आणि तेथील ⇨बैल झोंबीच्या खेळाबद्दल तर त्याच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. डेथ इन द आफ्टरनून (१९३२) ह्या विवेचनात्मक लेखनात त्याने ह्या बैल झोंबीकडे एक क्रीडाप्रकार म्हणून पाहण्यापेक्षा एक शोकात्म दर्शन म्हणून पाहिले आहे. ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका (१९३५) मध्ये शिकारींचा – विशेषतः मासेमारीचा – वृत्तांत आहे. फ्लॉरिडाच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात असलेल्या की वेस्ट ह्या ठिकाणी त्याने घर घेतले. मासेमारीसाठी एक नौका घेतली. टू हॅव अँड हॅव नॉट (१९३७) ही त्याची कादंबरी त्याने आर्थिक मंदीच्या काळात लिहिली. सामाजिक प्रश्नांबद्दल तो आता विचार करू लागला. 

 

स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर पत्रकार म्हणून तो स्पेनमध्ये गेला. तेथे स्पॅनिश प्रजासत्ताकासाठी निधी जमवण्यात त्याने ते युद्ध संपेपर्यंत (१९३९) भाग घेतला. १९३७ मध्ये द स्पॅनिश अर्थह्या माहितीपटाच्या निर्मितीत तो सहभागी होता. द फिफ्थ कॉलम हेनाटक (१९३८) ही ह्या काळातली त्याची एकमेव साहित्यकृती. १९४० मध्ये न्यूयॉर्कमध्ये ह्या नाटकाचा प्रयोग झाला. माद्रिदला वेढा पडल्यानंतरच्या परिस्थितीचे चित्रण त्याने ह्या नाटकात केले होते तथापि त्याचे हे नाटक फारसे प्रभावी ठरले नाही. 

 

१९४० मध्ये फॉर हुम द बेल टोल्स ही त्याची अत्यंत महत्त्वाकांक्षी कादंबरी प्रसिद्ध झाली. स्पॅनिश यादवी युद्धात प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ असलेल्या गनिमी टोळीत सहभागी झालेला एक अमेरिकन प्राध्यापक आणि एका स्पॅनिश मुलीबरोबर त्याचे असलेले आदर्श प्रेमसंबंध ह्या कादंबरीत त्याने दाखविलेले आहेत. त्याच्या पूर्वीच्या लेखनाच्या तुलनेत ह्या कादंबरीतल्या गद्यात भावगेयता कमी असून नाट्यात्मकता अधिक आहे. ह्या कादंबरीच्या लेखनानंतर एका पूर्ण दशकाच्या कालावधीत हेमिंग्वेने काही लिहिले नाही. १९३९ साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत त्याच्या ऊर्जेवर पडलेला ताण, यूरोपमध्ये त्याने प्रत्यक्ष पाहिलेली रक्तपाताची दृश्ये ह्यांचा हा परिणाम होता. शिवाय अधिकृतपणे नव्हे, पण व्यक्तिगत पातळीवर त्याने काही सैन्य स्वतःच्या नेतृत्वाखाली उभारले होते. ह्याच वेळी त्याच्या वाङ्मयीन आणि लष्करी चाहत्यांकडून त्याला ‘पपा’ हे प्रेमळ नाव मिळाले. 

 

१९४४ मध्ये तो लंडनमध्ये असताना वार्ताहर मेरी वेल्श हिच्याशी त्याने विवाह केला. त्याआधी त्याची तीन लग्ने झाली होती तथापि त्यांची अखेर घटस्फोटांत झाली होती. 

 

१९५२ मध्ये द ओल्ड मॅन अँड द सी ही त्याची उत्कृष्ट कादंबरी प्रसिद्ध झाली. क्यूबाचा एक वयस्क, थकलेला कोळी आणि एक प्रचंड मासा ह्यांची लढाई ह्या कादंबरीत त्याने दाखवली आहे. पु. ल. देशपांडे ह्यांनी एका कोळियाने ह्या नावाने ह्या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. १९५३ मध्ये ह्या कादंबरीला पुलिट्झर पारितोषिक देण्यात आले. १९५४ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार देऊन जागतिक पातळीवर त्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली आणि मनःस्थितीही ठीक राहीनाशी झाली. त्यानंतर एका विमान अपघातात तो जखमी झाला. त्यातून तो कधीच पूर्णपणे बरा झाला नाही. क्यूबामध्ये हेमिंग्वे दांपत्याने एक घर घेतले होते तथापि फिडेल कास्ट्रोच्या क्रांतिकारक सरकारने त्यांना क्यूबा सोडण्याची सक्ती केली. क्यूबा सोडल्यानंतर अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील केचम ह्या गावी त्यांनी नवे घर घेतले, पण त्यानंतर काही महिन्यांतच अतिरक्तदाब आणि विषण्णता ह्यांवर उपचार करण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ह्या अवस्थेत त्याला अपमानित झाल्यासारखे वाटे. त्याच्या साहित्यनिर्मितीवरही प्रतिकूल परिणाम झालेला होता. उद्विग्न अवस्थेत स्वतःला गोळी झाडून केचम येथे त्याने आपले जीवन संपवले. 

 

संदर्भ : 1. Baker, Carlos, Ernest Hemingway, Scribner, 1969.

           2. Meyers, Jeffrey, Hemingway : A Biography, Blackwell, 1986.

           3. Weber, Ronald, Hemingway’s Art of Nonfiction, 1990.

कुलकर्णी, अ. र.