होम्स, ऑलिव्हर वेंड्‌ल : (२९ ऑगस्ट १८०९ – ७ ऑक्टोबर १८९४). अमेरिकन कवी, कादंबरीकार, निबंधलेखक वप्राध्यापक. ‘फायरसाइड पोएटस्’ या कविसंप्रदायाचा सदस्य. सुप्रसिद्ध ‘ब्रेकफास्ट टेबल’ या मालिकेचा लेखक. जन्म केंब्रिज, मॅसॅचूसेट्स येथे. 

 

ऑलिव्हर वेंड्‌ल होम्स
 

होम्सने अमेरिकेतील हार्व्हर्ड महाविद्यालयातील शिक्षणानंतर कायदेविषयक शिक्षण घेण्यास सुरुवात केली. दरम्यान १८३० मध्ये कवितालेखन सुरू केले. एका वर्षात त्याने तब्बल ५० कविता लिहिल्या. त्यांपैकी २५ कविता दि कॉलेजिअन या नियतकालिकात छापून आल्या. जेव्हा होम्सने अमेरिकेची नौसेना ‘यूएस्ए कॉन्स्टिट्यूशन’ नावाचे एक ऐतिहासिक जहाज तोडणार असल्याची बातमी वाचली, तेव्हाया निर्णयाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी त्याने ‘ओल्ड आयर्नसाइडस्’ ही तीन कडव्यांची कविता प्रसिद्ध केली. ह्या देश-भक्तिपर कवितेमुळे होम्सला प्रसिद्धी मिळालीच शिवाय नौसेनेला ते ऐतिहासिक जहाज जतन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. होम्सच्या ‘दि लास्ट लीफ’ या कवितेने एडगर ॲलन पो व अब्राहम लिंकन या ऑलिव्हर वेंड्ल होम्सदोघा मातब्बरांची मने जिंकून घेतली. या वाङ्मयीन यशानंतरही होम्सने केवळ साहित्यिक म्हणून न राहता वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले व बॉस्टन शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. होम्सने या काळात बोर्डिंगहाउसच्या न्याहरी करण्याच्या मेजावरून अनुभवलेल्या जीवनावर आधारित दि ऑटोक्रॅट ऑफ दि ब्रेकफास्ट टेबल नावाने दोन निबंध लिहून ते दि न्यू इंग्लंड मॅगझीन मध्ये प्रसिद्ध केले (१८३११८३२). 

 

१८३३ मध्ये पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी होम्स पॅरिसला गेला व तेथे त्याने पारंपरिक वैद्यकीय शिक्षणाऐवजी नवीन प्रगत वैद्यकीय ज्ञान शिकून घेतले. बॉस्टनला परतल्यावर त्याने हार्व्हर्ड विद्यापीठाची १८३६ मध्ये एम्.डी. ही पदवी प्राप्त केली. १८३६ मध्ये त्याचा पोएम्स् हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. 

 

होम्सचा अमिलिआ ली जॅक्सन बरोबर १८४० मध्ये बॉस्टन शहरी विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये होती. ‘संसर्ग’ या विषयावरचे शोधनिबंध त्याने प्रसिद्ध केले. हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्याने दिलेली व्याख्याने, त्यांतील वर्णने, विश्लेषण, किस्से यांमुळे ती काव्यमय झाली होती. 

 

१८५६ मध्ये दि ॲटलांटिक मंथली ह्या नियतकालिकातून त्यानेपूर्वी लिहिलेले दोन निबंध सुधारित स्वरूपात पुन्हा प्रसिद्ध केले. या लिखाणाला लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे होम्सने ‘दि प्रोफेसर ॲटद ब्रेकफास्ट टेबल’ ही मालिकाही प्रसिद्ध केली. या मालिकेत प्रोफेसर ॲट द ब्रेकफास्ट टेबल (१८६०) खेरीज द पोएट ऑफ द ब्रेकफास्ट टेबल (१८७२) आणि ओव्हर द टीकप्स (१८९१) ह्यांचा समावेश होतो. 

 

होम्सची पहिली कादंबरी एल्झी व्हेन्नर (१८६१) दि ॲटलांटिक … या नियतकालिकात क्रमशः प्रसिद्ध झाली. लाँगफेलो या कवीने जेव्हा दान्तेच्या डिव्हाइन कॉमेडी चा अनुवाद करण्यास सुरुवात केली, तेव्हा ‘दान्ते क्लब’ तयार झाला. या क्लबचा होम्स सदस्य होता. होम्सने दि गार्डियन एंजल (१८६८) ही त्याची दुसरी कादंबरी दि ॲटलांटिक … मध्ये क्रमशः छापण्यास सुरुवात केली. १८७६ मध्ये त्याने जॉन लाथ्राप मोट्ली यांचे चरित्र प्रसिद्ध केले (१८७९). त्यानंतर त्याने वैद्यकीय शोधनिबंधांचा संग्रह (१८८३), तसेच पेजेस फ्रॉम ॲन ओल्ड व्हॉल्यूम ऑफ लाइफ हा निबंधसंग्रह प्रसिद्ध केला. 

 

१८८४ मध्ये त्याने आपला मित्र राल्फ वॉल्डो एमर्सन याच्या जीवनावरील ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर त्याची अ मॉर्ट्ल ॲटीपथी ही कादंबरी दि ॲटलांटिक … मध्ये क्रमशः प्रसिद्ध झाली. १८८४ च्या अखेरीस त्याने इंग्लंड व फ्रान्स या देशांचा दौरा केला व अमेरिकेत परतल्यावर अवर वन हंड्रेड डेज् इन यूरोप हे प्रवासवर्णन प्रसिद्ध केले. 

 

होम्सला मिळालेले मानसन्मान पुढीलप्रमाणे : केंब्रिज विद्यापीठाचीडी. लिट्. पदवी (१८८४), एडिंबरो विद्यापीठाची एल्एल्.बी. पदवी (१८८४), ऑक्सफर्ड विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट पदवी (१८८४), येल विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट पदवी (१८८६) इत्यादी.

 

केंब्रिज येथेच तो निधन पावला. 

 

संदर्भ :1. Hoyt, Edwin P. The Improper Bostonian : Dr. Oliver Wendell Holmes, 1979.

          2. Novick, Sheldon M. Honourable Justice : The Life of Oliver Wendell Holmes, 1989. 

सावंत, सुनील