थर्बर, जेम्स ग्रोव्हर : (८ डिसेंबर १८९४–२ नोव्हेंबर १९६१). अमेरिकन विनोदकार. जन्म आणि शिक्षण ओहायाे येथे. १९२७ पासून द न्यूयॉर्कर ह्या नियतकालिकात तो विनोदी लेखन करू लागला. त्याच्या ह्या विनोदी लेखनाच्या अनुषंगाने त्याने स्वतः काढलेली रेखाचित्रेही मार्मिक असत. द औल इन द ॲटिक अँड अदर पर्‌प्‍लेक्सिटीज (१९३१), द सील इन द बेडरुम अँड अदर प्रेडिकॅमेंट्स (१९३२), माय लाइफ अँड हार्ड टाइम्स (१९३३), मेन, विमेन अँड डॉग्ज (१९४३), द थर्बर कारनिव्हल (१९४५) आणि थर्बर कंट्री (१९५३) हे त्याचे काही उल्लेखनीय लेखसंग्रह. त्याचा विनोद सौम्य व प्रसन्न आहे. भावनांचा उपशम झाल्यानंतरच विनोद अवतरतो प्रत्यक्षातील पुष्कळशा दुःखकारक घटना नंतर आठवल्या की हास्यास्पद वाटू लागतात अतिपरिचयाच्या गोष्टींतूनच विनोदनिर्मिती होते दुसऱ्याबद्दल तुच्छता वाटून नव्हे, तर स्वतःबद्दल कीव वाटून माणूस हसतो, असे त्याचे विनोदाचे तत्त्वज्ञान आहे. अनुभवाच्या तळाशी असणाऱ्या दुःखांची आच त्याच्या विनोदातून जाणवते. यंत्रयुगातील हळव्या व्यक्तींचे हाल, जीवघेणे मनोविश्लेषण व वाढत्या स्त्रीस्वातंत्र्याने केलेला पुरुषाचा कोंडमारा हे त्याचे काही आवडते विषय. न्यूयॉर्क शहरी तो निवर्तला. 

 संदर्भ : Bernstein, Burton, Thurber, A Biography, New York, 1975. 

 नाईक, म. कृ.