लोरेन्ट्स, कॉनरॅड झाकारियास : (७ नोव्हेंबर १९०३-२७ फेब्रुवारी १९८९). ऑस्ट्रियन प्राणिवैज्ञानिक. आधुनिक वर्तनशास्त्राचे जनक. वर्तनशास्त्रात नैसर्गिक परिस्थितीतील प्राणिवर्तनाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येतो. व्यक्तिगत व सामाजिक वर्तनरीतीसंबंधीच्या त्यांच्या शोधांबद्दल त्यांना आणि⇨कार्ल फोन फ्रिश व ⇨निकोलास टिनबर्जेन या प्राणिशास्त्रज्ञांना १९७३ चे शरीरक्रियाविज्ञानाचे वा वैद्यकाचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.
लोरेन्ट्स यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. त्यांचे वडील एक प्रसिद्ध विकलांग शस्त्रक्रियाविशारद होते. लहानपणापासून त्यांना प्राण्यांविषयी गोडी लागलेली होती. त्यांच्या आईवडिलांच्या प्रोत्साहनाने त्यांनी मासे, पक्षी, माकडे, कुत्री, मांजरेख् ससे वगैरे विविध जातींचे प्राणी पाळले होते आणि त्यांपैकी कित्येक त्यांनी स्वतःबालपणीच्या सहलींत मिळविलेले होते. त्यांनी पक्ष्यांच्या वर्तनासंबंधीच्या तपशीलवार नोंदी दैनंदिनीच्या रूपात ठेवलेल्या होत्या. १९२२ मध्ये माध्यमिक शाळेतून पदवीधर झाल्यानंतर वडिलांच्या इच्छेखातर न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात सहा महिने वैद्यकाचा अभ्यास करून ते ऑस्ट्रियाला परत आले. तेथे व्हिएन्ना विद्यापीठात अभ्यास करून त्यांनी १९२८ मध्ये एम्.डी पदवी मिळविली आणि नंतर तुलनात्मक शारीराचा (शरीररचनाशास्त्राचा) अभ्यास करून १९३३ मध्ये त्याच विद्यापीठाची प्राणिविज्ञानातील पीएच्.डी पदवी मिळविली. त्यांनी प्राण्यांवरील आपले प्रयोग त्यांच्या आल्टेनबर्ग येथील घरातच केले. १९३७-४० मध्ये ते व्हिएन्ना विद्यापीठात तुलनात्मक शारीर व प्राणी मानसशास्त्र यांचे अध्यापक होते. त्यानंतर १९४०-४२ मध्ये ते केनिग्झबर्ग (आताचे कालीनिनग्राड) येथील आल्बेर्टस विद्यापीठात प्राध्यापक व सर्वसाधारण मानसशास्त्र विभागाचे प्रमुख होते. युद्धकाळात १९४२ ते १९४४ पर्यंत त्यांनी जर्मन सैन्यात वैद्य म्हणून काम केले. १९४४ मध्ये ते युद्धकैदी म्हणून रशियात पकडले गेले. पुढे १९४८ मध्ये सुटका झाल्यावर ते ऑस्ट्रियात परत आले व आल्टेनबर्ग येथील इन्स्टिट्यूट ऑफ कंपॅरेटिव्ह इथॉलॉजी या संस्थेचे प्रमुख झाले (१९४९-५१). त्यांनी पश्चिम जर्मनीतील बुल्डेर्न येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर बिहेव्हियरल फिजिऑलॉजी या संस्थेत तुलनात्मक वर्तनशास्त्राचा विभाग स्थापन केला व १९५४ मध्ये या संस्थेचे ते सहसंचालक झाले. १९५१-६१ या काळात ते पश्चिम जर्मनीतील सिव्हिझेन येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर कंपॅरेटिव्ह फिजिऑलॉजी या संस्थेतील संशोधन विभागाचे प्रमुख होते. १९५५ मध्ये त्यांनी ई. फोन होल्स्ट व जी क्रेमर यांच्या सहकार्याने तेथे माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर बिहेव्हियरल फिजिऑलॉजी ही संस्था स्थापन केली आणि नंतर या संस्थेचे ते संचालक होते (१९६१-७३). पुढे ऑस्ट्रियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या आल्टेनबर्ग येथील इन्स्टिट्यूट फॉर कंपॅरेटिव्ह इथॉलॉजी या संस्थेतील प्राणी समाजशास्त्र विभागाचे १९७३ मध्ये ते संचालक झाले. नवीनच स्थापन झालेल्या Zeishrift fiir Tierpsychologie नियतकालिकाचे १९३७ मध्ये ते प्रमुख सहसंपादक झाले. हे नियतकालिक लवकरच वर्तनशास्त्राचे अग्रगण्य नियतकालिक बनले व लोरेन्ट्स यांनी अखेरपर्यंत याच्या संपादकपदावर काम केले.
लोरेन्ट्स यांनी प्राण्यांसंबंधीचे सर्वात महत्त्वाचे कार्य १९२७-३८ या काळात केले. वैद्यकीय विद्यार्थी असताना त्यांनी प्राणिवर्तनासंबंधीची सविस्तर निरीक्षणे चालू ठेवली होती. चोरकावळा (जॅकडॉ) या पक्ष्यासंबंधीची त्यांची दैनंदिनी Journal fiir Ornithologieया प्रतिष्ठित नियतकालिकात १९२७ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी ग्रेलॅग हंस, मॅलार्ड बदक व संबंधित जाती यांविषयी कार्य केले. त्यांच्या वैज्ञानिक कार्याला मिळालेल्या स्पष्ट प्रतिसादामुळे उत्साहित होऊन त्यांनी चोरकावळा व ग्रेलॅग हंस यांसारख्या पक्ष्यांच्या वसाहती स्थापन केल्या आणि केलेल्या निरीक्षणांच्या आधारे संशोधन निबंध प्रसिद्ध केले. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. याच काळात त्यांनी स्मृतीत बिंबविण्याच्या प्रक्रियेची संकल्पना विकसित केली. या प्रक्रियेत एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला (सामान्यतः त्याच्या आईला) ओळखू लागतो. ही प्रक्रिया सापेक्षतः अपरावर्तनीय असून ती प्राण्याच्या आयुष्याच्या प्रारंभीच्या आनुवंशिकीय निर्धारित पर्याप्त काळात घडून येते. १९३५ मध्ये त्यांनी बदकांच्या व हंसांच्या पिलांतील शिकण्याच्या वर्तनाचे वर्णन केले. अंड्यांतून बाहेर पडल्यावर लवकरच एका विशिष्ट क्रांतिक टप्प्यात पिले आईच्या आवाजाच्या पाठीमागून जाण्यास शिकतात. या स्मृतीत बिंबविण्याच्या प्रक्रियेत मातापितरांच्यापासून येणाऱ्या दृक् व भाव्य उद्दीपकांचा समावेश होतो. या उद्दीपकांमुळे पिलांकडून पाठीमागून जाण्याचा प्रतिसाद मिळून त्याचा त्यांच्या पुढील प्रौढ वर्तनावर निश्चित परिणाम होतो. ही बिंबविण्याची प्रक्रिया जर माणसाने बदकाच्या आवाजाची नक्कल केली, तर त्याच्याकडे संक्रामित करता येते, असा लोरेन्ट्स यांना शोध लागला. स्मृतीत बिंबविण्याच्या प्रक्रियेची कळ प्राण्याच्या तंत्रिका तंत्रातील (मज्जासंस्थेतील) अंगभूत विमोचन यंत्रणेत असून ती विशिष्ट आदेश घटनेला प्रतिसाद देते, असे त्यांनी दाखविले. ही यंत्रणा आनुवंशिक रीत्या निर्धारित होते, असेही त्यांनी प्रतिपादन केले.
लोरेन्ट्स यांचे प्रारंभीचे कार्य सहज प्रेरित वर्तन कृत्यांच्या स्वरूपासंबंधी होते. विशेषतःअशी कृत्ये कशी घडून येतात आणि ती पार पाडण्यासाठी लागणारा तंत्रिका ऊर्जेचा उद् गम यासंबंधीचे हे कार्य होते. एखाद्या प्राण्यातील एकाच वेळी सक्रियित होणाऱ्या दोन अगर अधिक मूलभूत प्रचोदनांमुळे (तीव्र चालनांमुळे) वर्तन कसे निष्पन्न होते याचाही त्यांनी अभ्यास केला. टिनबर्जेन यांच्याबरोबर १९३७ मध्ये काम करून लोरेन्ट्स यांनी वर्तनाच्या विविध रूपांचा एकाच क्रिया मालिकेने मेळ घातला जातो, असे दाखविले. ग्रेलॅग हंसांचे निरीक्षण करताना त्यांना असे दिसून आले की, मादी आपले अंडे उभ्या दिशेतील वर-खाली हालणे व स्थिर करणारी आडव्या दिशेतील गती अशा दोन वैशिष्ट्यपूर्ण गतींनी घरट्याकडे लोटते. जर हंस घरट्यापर्यंत पोहोचण्याच्या आत अंडे काढून घेतले. तर फक्त उभ्या दिशेतील गती पुढे चालू राहते. यावरून लोरेन्ट्स यांनी असा निष्कर्ष काढला की, या दोन गती म्हणजे निरनिराळे घटक असून एक स्वाभाविक किंवा अंगभूत (वर खाली होणारी गती) व दुसरा परिसरीय उद्दीपनावर अवलंबून असतो. या निरीक्षणांवरून त्यांनी वर्तनरीतींच्या संरचनेतील वर्तन एककांचे स्पष्टीकरण करण्यासाठी वर्तन जनुके (जीन) ही संकल्पना मांडली.
लोरेन्ट्स यांच्या संकल्पनांमुळे प्राणिजातींमध्ये वर्तनरीती अशा विकसित झाल्या आणि विशेषतःजाती टिकून राहण्यातील परिस्थितिवैज्ञानिक घटकांचे व वर्तनाच्या अनुकूलन (परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी होणारे बदल) मूल्याचे कार्य संबंधीच्या आकलनात प्रगती झाली. प्राणिजाती टिकून राहण्यासाठी विशिष्ट प्रकारची माहिती शिकण्याच्या दृष्टीने जातीची आनुवंशिकीय रीत्या रचना झालेली असते, असे त्यांनी सुचविले. त्यांच्या कल्पनांमुळे व्यक्तिगत सजीवांच्या आयुष्यात वर्तनरीती कशा विकसित व परिपक्व होतात, हे समजण्यास मदत झाली.
लोरेन्ट्स यांचे वरील सर्व शोध १९३५-५० या काळात निबंध मालिकेद्वारे प्रसिद्ध झाले. या कालावधीत प्रादेशिकत्व (नर प्राण्याच्या प्रदेशाच्या संरक्षणाशी संबंधित असलेली वर्तनरीती) व आक्रमण यांसारख्या व्यापक वर्तनरीतीसंबंधी त्यांनी परिकल्पना मांडण्यास प्रारंभ केला आणि या वर्तनरीतींचा त्यांनी कार्यक्रमित प्रतिसादांशी संबंध जोडला. आक्रमक वर्तनाचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी एका जलविज्ञानीय प्रतिकृतीचा प्रस्ताव मांडला. कोणताही निर्गम मार्ग नसेल, तर जलाशय फुटून जाईल. प्राण्यांना आक्रमण ऊर्जा मुक्त करण्यासाठी निरुपद्रवी निर्गम मार्ग पुरविलेले आहेत परंतु मानवामध्ये असलेच तर असे फारच थोडे नैसर्गिक निर्गम मार्ग असतात व त्यामुळे आक्रमणाची परिणती हिंसात्मक संघर्षात होते. हा मूलभूत सिद्धांत व्यापक व लोकप्रिय स्वरूपात त्यांनी Das Sogenannte Bose (१९६३ इं.भा.ऑन ॲग्रेशन, १९६६) या वादग्रस्त तात्त्विक व समाजशास्त्रीय मतितार्थ असणाऱ्या ग्रंथांत मांडला. या ग्रंथात त्यांनी गुन्हेगारी, युद्ध व इतर हिंसात्मक आक्रमण कृत्ये ही आक्रमण ऊर्जांना निरुपद्रवी निर्गम मार्ग उपलब्ध करून देण्यात समाजाला अपयश आल्याने उद्भवतात, असे प्रतिपादन केले. अशा प्रकारे त्यांनी आक्रमण प्रवृत्ती निर्माण करण्यातील सामाजिक परिस्थितीचा भाग नाकारला आणि या ‘सहज प्रवृत्तींना’ दिशा देण्यासाठी योग्य मार्ग निवडण्याचा जरूरीचा पुरस्कार केला. खालच्या दर्जाच्या प्राण्यांत टिकून राहण्याच्या दृष्टीने लढाऊ वृत्तीचे निश्चित कार्य (उदा., स्पर्धकांना पांगविण्याचे व प्रदेश ताब्यात ठेवण्याचे) आहे. याचप्रमाणे मानवातील युद्धासारख्या प्रवृत्ती सामाजिक दृष्ट्या उपयुक्त अशा वर्तनरीतींमध्ये संस्कारित करता येतील, असे त्यांचे म्हणणे होते. Die Riick Seite des Spiegels : Versuch einer Naturgeschlckte menschlichen Evkenners (१९७३ इं.भा. बिहाइंड द मिरर : ए सर्च फॉर ए नॅचरल हिस्टरी ऑफ ह्युमन नॉलेज, १९७७) या दुसऱ्या ग्रंथात लोरेन्ट्स यांनी मानवी विचार व बुद्धिमत्ता यांच्या स्वरूपाचे चिकित्सक परीक्षण केले आहे आणि आधुनिक संस्कृतीच्या समस्यांचा संबंध अध्ययन व ज्ञान यांच्या सहजशक्तींच्या त्यांना जाणवलेल्या मर्यादांशी अधिकांशाने असल्याचे प्रतिपादन केले आहे.
वर उल्लेखिलेल्या ग्रंथांखेरीज Er redete mit dem Vieh, den Vogeln und den Fischen (१९४९ इं.भा.किंग सॉलोमन्स रिंग, १९५२) So kam der Mensch auf den Hund (१९५० इं.भा. मॅन मिट्स डॉग, १९५४) Uber Tiersches and menschliches Verhalten (१९६५ इं.भा. स्टडीज इन ॲनिमल अँड ह्यूमन बिहेव्हियर, २ खंड, १९७० -७१) Dar Jahr des Graugans (१९७९ इं.भा. इयर ऑफ द ग्रेलॅग गूज) Vergleichende Verhaltenforschung (१९७८ इं.भा. द फाउंडेशन्स ऑफ इथॉलॉजी, १९८१) हे लोरेन्ट्स यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहे त. सिव्हिलाइझड मॅन्स एट डेडली सिन्स (१९७३) या इंग्रजी शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला त्यांचा ग्रंथही लोकप्रिय झाला.
नोबेल पारितोषिकाखेरीज लोरेन्ट्स यांना युनेस्कोचे कलिंग पारितोषिक (१९७०), आंतरराष्ट्रीय पर्यावरण पारितोषिक (१९८०) वगैरे अनेक सन्मान मिळाले. येल, लॉयोला, लीड्स, बाझेल व ऑक्सफर्ड या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. ते ऑस्ट्रियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी, अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस वगैरे अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य होते. ते आल्टेनबर्ग येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज.वि.
“