लोरँथेसी : (बंदाक कुल). फुलझाडां पैकी [⟶वनस्पति आवृतबीज उपविभाग] एका कुलाचे नाव. याचा अंतर्भाव ए.ग्लर व के. प्रांट्ल यांनी सँटॅलेलीझमध्ये (चंदन गणात) केला असूनसँटॅलेसी अथवा चंदन कुलातील वनस्पतींप्रमाणे ह्यातील वनस्पती अर्धजीवोपजीवी [पाणी व खनिजे दुसऱ्या स्वावलंबी आश्रय वनस्पतींपासून घेणाऱ्या ⟶जीवोपजीवन] झुडपे वओषधी आहेत. त्या एकूण सु. ३०  प्रजातींतील १,०५०  जातींत (जे.सी. विलिस : सु. ३६ प्रजाती व १,३००  जाती) समाविष्ट केल्या आहेत. त्यांचा प्रसार मुख्यतःउष्ण प्रदेशांत असून थोड्या प्रमाणात समशीतोष्ण कटिबंधात आढळतात. ऑस्ट्रेलियातील नुट्सिया प्रजातीतील जमिनीत वाढणारी झाडे जीवोपजीवी असतात, याबद्दल मतभेद आढळतात. इतर सर्व वनस्पती अन्य स्वोपजीवी (स्वतंत्र) वनस्पतींवर आधार व अंशमात्र पोषण यांकरिता अवलंबून असतात. त्याकरिता विशिष्ट प्रकारच्या शोषकांचा (शोषण करणाऱ्या मुळासारख्या पण रूपांतरित लहान अवयवांचा) त्या वापर करतात. काही जाती विशिष्ट आश्रय वनस्पतींवरच वाढतात, तर काही अनेकींवर वाढतात.

या कुलातील वनस्पतींचे खोड संयुतपद [अनेक अक्षांचे बनलेले ⟶खोड], फांद्या द्विपद कुंठित (पुनःपुन्हा दोनदा पण मर्यादित वाढ असलेल्या) व पाने हिरवी, सामान्यतः समोरासमोर, साधी अखंड, चिवट, चिरकालिक (दीर्घकाल राहणारी) आणि अनूपपर्ण (तळाशी लहान उपांगे नसलेली) पण कधी कधी जुळलेल्या खवल्यासारखी असतात, कधी ती नसतात. फुले नियमित द्विलिंगी किंवा एकलिंगी आणि अपिकिंज (इतर पुष्पदले स्त्री-केसरांच्या वरच्या पातळीवर असलेली) व सच्छद (तळाशी लहान उपांगे असलेली) असून फुलोरा पानांच्या बगलेत द्विशाख वल्लरी [⟶पुष्पबंध] असतो. कधी फुले एकेकटीच किंवा कणिश प्रकारच्या फुलोऱ्यांत खोडावर कांडी व पेरी यांवर येतात. परिदल मंडल सहा दले असलेल्या एका मंडलाचे अथवा २-३   भागी अशा दोन मंडलांचे, सुटे किंवा नलिकेप्रमाणे जुळलेले पण अनेकदा एका बाजूस चिरलेले असते. पुष्पासन (फुलातील अवयवांचा आधारभूत भाग) पेल्याप्रमाणे असून परिदल मंडल त्याच्या आतील बाजूस पण काठाजवळच वाढलेले असते व त्याखाली एक वलय काहींत (उदा., लोरँथस प्रजाती) आढळते. केसरदले (पुं-केसर) परिदलांसमोर व संख्येने तितकीच असून कधी परस्परांस चिकटून असतात. अनेकदा परागकण अनेक कप्प्यांत तयार होतात परंतु नंतर ते एकाच सलग कोटरात असतात. किंजदले (स्त्री-केसर) ३-४ आणि जुळलेली असतात. किंजपुट (स्त्री-केसराचा तळभाग) अधःस्थ, एका कप्प्याचा असून [⟶फूल] चंदन कुलातल्याप्रमाणे बहुधा एकच बीजक शेवटी पूर्णत्वास येते. ते सपुष्क (दलिकाबाहेरील अन्नांश असलेले) बीजावरणहीन असते. या दोन्ही कुलांत गर्भकोश सारखाच असतो. छद्मफल [⟶फळ] मांसल पुष्पासनाने वेढलेले मृदुफळ किंवा अश्मगर्भी (आठळी फळ) असते. वारा, पक्षी किंवा कीटक यांच्या साहाय्याने याचेपरागण (परागकणांचे स्त्री-केसरांवर नेले जाणे) होते. बहुतेक जातींत बीजके व बीजकाधानी स्पष्ट नसतात. बीजुकजनक कोशिका आढळतात [⟶बीज] त्यांच्यापासून अनेक गर्भकोश बनतात व त्यांपासून पुढे बहुधा एक, पण कधी दोन किंवा तीन बीजे बनतात. बीजाभोवती चिकट पदार्थ असतो. त्यामुळे बीजे पक्ष्यांच्या चोचींना चिकटतात व त्यांचा इतर आश्रय वनस्पतींवर प्रसार होतो. बीज रुजताना अधराक्ष (दलिकांच्या खालचा अक्षाचा भाग) बाहेर येऊन दुसऱ्या झाडाच्या सालीत चिकटतो व त्यात वाढत जाऊन तेथील ऊतकांशी (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांशी) संपर्क साधतो, तेथून पुरेसे अन्न घेत राहून पुढील वाढ होते. प्रथम शोषक चांगला वाढतो. तो वाढत असताना आदिकोरकाची पहिली पाने थोडा वेळच राहतात. त्यानंतर शोषकाने घेतलेल्या अन्नाद्वारे नवीन हिरवी पाने येतात. ती अधराक्षाच्या दुसऱ्या टोकास (बाहेरच्या बाजूस) येतात. बीजाच्याअंकुरणाची ही प्रक्रिया इतर स्वावलंबी वनस्पतींहून भिन्न आहे, तसेच बीजकाच्या निर्मितीतही फरक आढळतो. हाडमोडी व बांडगुळे ज्या इतर झाडांवर वाढतात त्यांची हानी होते व पुढे ती झाडे मरतात. म्हणून वेळीच त्यांचा नाश करावा लागतो.

पहा : बांडगूळ, हाडमोडी.

संदर्भ : Rendle, A.B. The Classification of Flowering Plants, Vol.II, Cambridge, 1963 .

पाटील, शा.दा. परांडेकर, शं.आ.