लोकार्नो करार : पहिल्या महायुद्धानंतर यूरोपातील काही राष्ट्रांनी भावी सुरक्षितेतेसाठी परस्परांत केलेले करार. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर १९१९ मध्ये व्हर्सायचा ऐतिहासिक तह झाला व तद्नुसार जागतिक शांततेच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना झाली तथापि यूरोपातील काही राष्ट्रांना आपल्या सुरक्षिततेबद्दल भीती वाटू लागली. त्याच्या संदर्भात १९२५ मध्ये स्वित्झर्लंडमधील लोकार्नो शहरी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम, चेकोस्कोव्हाकिया व पोलंड ह्या यूरोपीय राष्ट्रांची परिषद   भरली.त्यातील निर्णयानुसार एकमेकांस सुरक्षिततेची हमी देणारे व आवश्यक तेथे लवादामार्फत निवाडा करण्यास संमती देणारे, अनेक करार निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये झाले. ह्या सर्व करारांना ‘लोकार्नो करार’ असे संबोधण्यात येते.

लोकार्नो करारांपैकी मुख्य करारात परिषदेत भाग घेणाऱ्या सर्व राष्ट्रांनी व्यक्तिशः, तसेच सामुदायिक रीत्या व्हर्सायच्या तहान्वये बेल्जियम, फ्रान्स आणि जर्मनी ह्यांच्या ज्या सीमा निश्चित केल्या, त्या पाळल्या जातील, अशी हमी दिली. तसेच जर्मनीने पोलंड आणि  चेकोस्लोव्हाकिया ह्या राष्ट्रांशी स्वतंत्र करार करून आपसांतील सीमेचे प्रश्न लवादामार्फत सोडविण्यात येतील अशी हमी दिली. त्याच वेळी फ्रान्स व पोलंड आणि फ्रान्स व चेकोस्लोव्हाकिया ह्यांच्यात स्वतंत्र करार होऊन परकीय आक्रमण झाल्यास एकमेकांस साह्य करण्याचे अभिवचन देण्यात आले. अशा रीतीने यूरोपातील भावी प्रश्न शांततेच्या मार्गानेच सोडविण्याची जर्मनीने हमी दिल्यामुळे त्या राष्ट्रास राष्ट्रसंघाचे सभासद करून घेण्याचे ठरले व १० सप्टेंबर १९२६ मध्ये जर्मनीस सभासदत्व देण्यात आले. ह्या करारामुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सद्‌भावना यांचे युग निर्माण होईल, अशी आशा निर्माण झाली.

ही आशा अर्थातच फलद्रूप झाली नाही. जर्मनी हे करार कायमचे पाळील, ही आशा हिटलर अधिकारारुढ झाल्यावर लोप पावू लागली व १९३६ साली फ्रान्सने सोव्हिएट रशियाशी तह करून लोकार्नो कराराचा भंग केला, अशी सबब काढून जर्मनीने हे करार निरर्थक आहेत असे जाहीर केले. नंतर ऱ्हाईनलँडमध्ये लष्कर पाठवून व्हर्सायचा तह मोडण्यास सुरुवात केली. मात्र ह्या करारांमुळे यूरोपात काही काळ सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आणि परस्परसंशय व युद्धाची भीती कमी होऊ शकली. ह्या करारांमुळे यूरोपातील सत्तासमतोल आपल्याला अनुकूल राखणे इंग्लंडला काही काळ शक्य झाले.  

नरवणे, द. ना.