मॅक्‌ब्राइड, शॉन : (२६ जानेवारी १९०४ – ). आयर्लंड प्रजासत्ताकातील एक प्रसिद्ध मुत्सद्दी, विधिज्ञ व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकारी. त्याचा जन्म लष्करी घरण्यात पॅरिस (फ्रान्स) येथे झाला. वडील मेजर जॉन मॅक्‌ब्राइड व आई मॉड गॉन. दोघेही स्वातंत्र्य लढ्यात होते. जॉन मॅक्‌ब्राइड याला १९१६ च्या ईस्टर उठावात भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी फाशी दिली. पुढे दोन वर्षानंतर त्याच्या आईला आयरिश स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल लंडन येथे तुरुंगात डांबण्यात आले. शॉनने प्राथमिक शिक्षण सेंट लूई द गोंझग (पॅरिस) विद्यालयात घेतले आणि डब्लितनच्या माउंट सेंट बेनिडिक्ट नॅशनल विद्यापीठातून त्याने पदवी मिळवली. त्यानंतर भूसेनेत तो दाखल झाला आणि पुढे आयर्लंडच्या प्रजासत्ताक भूसेनेचा प्रमुख झाला (१९२८–३३). पुढे त्याने वकिलीची परीक्षा दिली (१९३७). तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्याने काटालिना बुलफिन या युवतीशी विवाह केला (१९२६). त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

विद्यार्थिदशेतच आयर्लंडच्या स्वातंत्र्य लढ्यात तो सामील झाला. या त्याच्या कृतीमुळे त्याला अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. वकिलीच्या व्यवसायात असतानाच राजकारणाकडे तो आकृष्ट झाला (१९४३). आणि पुढे त्याने आयरिश रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली (१९४६). या पक्षातर्फे तो आयर्लंडच्या संसदेवर (डेल आयरिन) अनेक वेळा निवडून आला (१९४७, १९५१, १९५४ व १९५७). १९४८–५१ मधील आयर्लंडच्या संमिश्र मंत्रिमंडळात त्याच्याकडे परराष्ट्र खात्याचे मंत्रिपद होते. त्याच सुमारास आयर्लंडला पूर्ण स्वातंत्र्य मिळून प्रजासत्ताकाचा दर्जा प्राप्त झाला (१९४९). पुढे तो कौन्सिल ऑफ यूरोपचा अध्यक्षही झाला (१९५०). याशिवाय यूरोपीय आर्थिक समूह, सकल यूरोपीय संघ, यूरोपीय आर्थिक संघ या संस्थांचा सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष इत्यादी होण्याचा मान त्यास मिळाला आणि त्याची आंतरराष्ट्रीय न्यायाधीश आयोगाच्या प्रमुख सचिवपदी नियुक्ती झाली (१९६३–७०). आंतरराष्ट्रीय सर्वक्षमा मंडळाच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय शांतता संघ (ब्यूरो) व मानवी हक्कांची संरक्षण करणारी अशासकीय विशेष समिती (जिनीव्हा) यांचे अध्यक्षपदही त्यास देण्यात घेऊन त्याची संयुक्त राष्ट्रे या संघटनेचा सहाय्यक सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. या संस्थेच्या सुरक्षा समितीने त्याची स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या नामिबिया प्रदेशात (द. आफ्रिका) संयुक्त राष्ट्रांचा आयुक्त म्हणूने नेमणूक केली (१९७३–७६). नंतर त्याची यूनेस्कोतर्फे जागतिक दळणवळणासंबंधीच्या विविध समस्या हाताळण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदीही नेमणूक करण्यात आली (१९७७). लेबानन-इझ्राएल युद्धाच्या वेळी इझ्रेएलने लेबाननवर अतिक्रमण करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले. त्या तथाकथित आरोपाची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चौकशी समितीचा अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती झाली (१९८२ ).

विविध शांततावादी संस्थांचा अध्यक्ष, सदस्य इ. नात्यांनी मानवी हक्कांचे जतन व संरक्षण व्हावे, म्हणून त्याने केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. विशेषतः त्याने नामिबियाला दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या वर्णविद्वेषी धोरणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नांतची पराकाष्ठा केली. त्या कार्याची प्रत्याभिज्ञा म्हणून त्यास जपानच्या ⇨ इसाकू साटोबरोबर शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९७४). यांशिवाय त्यास लेनिन शांतता पारितोषिक (१९७७), अमेरिकन मेडल ऑफ जस्टिस (१९७८), यूनेस्को रौप्यपदक (१९८०) इ. प्रतिष्ठेचे बहुमान व पुरस्कार लाभले.

त्याचे स्फुटेलेखन विपुल आहे. तसेच आपल्या कार्यबाहुल्यातून थोडी उसंत मिळताच त्याने ग्रंथलेखनही केले. त्याच्या ग्रंथांपैकी सीव्हिल लिबर्टी (१९४८) आणि आवर पीपल–आवर मनी (१९५१) ही महत्त्वाची होत.

दोन्ही आयर्लंडचे ऐक्य, आधुनिक राजकारणातील शारीरिक व मानसिक छळ अशा काही त्याच्या राजकीय मतांबाबत मतभेद असण्याची शक्यता आहे तथापि त्याचे व्याक्तिमत्त्व, मानवी हक्कांबद्दलची तळमळ आणि शांततावादी कार्य यांबद्दल सर्वत्र आदरभाव दिसून येतो.

शेख, रुक्साना