लोकविद्या : प्रायः मौखिक परंपरेतील व जनपद समुदायाचे साहित्य, ललित कला, श्रद्धा, समजुती, सुभाषिते इ. अमूर्त व अभौतिक संस्कृतीच्या विविध प्रकारांचा समावेश लोकविद्या या संकल्पनेत होतो. सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासकांच्या भूमिकेतून ‘फोकलोअर’चे स्वरूप व व्याप्ती प्रस्तूत टिपणात दिली आहे. अलीकडे ‘फोकलोअर’ ही स्वतंत्र अभ्यासशाखा स्थिर झाली आहे. तिचे साक्षेपी विवेचन ‘लोकसाहित्य’ या नोंदीतही आले आहे.

जनपद समुदायाच्या अनेक वर्षांच्या निसर्गबद्ध जीवनक्रमातून लोकविद्या साकारलेली असते. मर्यादित भौगोलिक क्षेत्रातील वसतिस्थान, समुदायाचा लहान आकार, नागरी जीवनाच्या संपर्काचा अभाव किंवा क्वचित संपर्क, कुटुंबकेंद्रित व्यवसायांचे प्राधान्य, व्यवसायांत यांत्रिकीकरणाचा वा विशेषीकरणाचा अभाव, परिणामी व्यवसायभिन्नतेमुळे निर्माण होणाऱ्या व्यक्तिजीवनाच्या भिन्नतेचा अभाव, पर्यायाने व्यक्तीचे सामान्यीकरण व अनुभवसादृश्य, एकूण सामाजिक परिवर्तनाचाच अभाव या वैशिष्ट्यांमुळे समुदाय-जीवन विशिष्ट चाकोरीत स्थिरावलेले असते. माणसा-माणसांतील संबंधांनाही निश्चित व अंतिम असे स्वरूप प्राप्त झालेले असते. परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्यांनाही समुदायाच्या जीवनात विशिष्ट असे स्थान प्राप्त झालेले असते. डोंगर, नदी, वटवृक्ष, गावालगतची एखादी टेकडी यांबद्दलच्या आख्यायिका अगर दंतकथा समुदायामध्ये प्रसृत होतात. समुदायाच्या अस्मितेमध्ये या दंतकथांना वा आख्यायिकांना विशेष स्थान प्राप्त झालेले असते. या भौगोलिक परिसराबद्दल, त्यातील विविध वैशिष्ट्यांबद्दल, समुदायातील विविध व्यावसायिकांबद्दल, त्यांच्याशी येणाऱ्या नित्य-नैमित्तिक अशा संबंधांबद्दल, अनेक आखाडे, समजुती, निश्चित झालेल्या असतात. या सर्वांचा समावेश लोकविद्या या संकल्पनेत होतो. जनपद समुदायाचा जीवनक्रम निसर्गाने व्यापलेला असतो. ऋतुचक्राच्या प्रभावाखाली व त्याला अनुसरून जनजीवनाची रहाटी चालू असते. वैयक्तिक वा सामूहिक जीवनातील सुख-दुःखे या नैसर्गिक घडामोडींशी आणि कौंटुंबिक जीवनाच्या रहाटीशी निगडित असतात. आनंदोत्सवाचे प्रसंग तथा भावना हेलावणाऱ्या इतर घटना ह्या सारख्याच असल्यामुळे त्यांबद्दलच्या सर्वांच्या भावना व प्रतिक्रियाही सारख्याच बनतात. याचा परिणाम म्हणून भावना व्यक्त करण्याकरिता जे माध्यम स्वीकारले जाईल, उदा., काव्य, चित्रकाल, शिल्पकला, नृत्य, नाट्य, संगीत इ.−त्याला समुदायाचे प्रातिनिधिक असे स्वरूप प्राप्त होते. या कलाकृतीचे वस्तुविषयही सर्वांच्या जीवनात क्रमाने घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांशी निगडित असे असतात. जन्म, मृत्यू, विवाह, लेकीची सासरी पाठवणी, सासुरवाशिणीची माहेरची ओढ, सासू-सून, भावजय-नणंद, दीर-भावजय आदी नात्यांतील भावसंबंध हे व असे प्रसंग सर्वांच्याच आयुष्यात येणारे आणि म्हणून सर्वांच्याच अनुभूतीचे, भावना हेलावणारे असल्याने जनपद समुदायाच्या लोकगीतांमध्ये व अन्य आविष्कारांत त्यांना प्राधान्य मिळते. या समुदायाचे जीवन हे उदरनिर्वाहाचे प्रमुख वा एकमेव साधन असलेल्या शेतीशी निगडित झालेले असते आणि शेती तर संपूर्णपणे निसर्गावर म्हणजे नैसर्गिक ऋतुचक्रावर अवलंबून, त्यामुळे पेरणाचे व सुगीचे दिवस उत्साहाचे व आनंदाचे असतात. शेतीला वरदान ठरणारा पावसाळा तर अनेक उत्सवपूर्ण प्रसंगांनी भरलेला असतो. पिकांची कापणी झाल्यावर उन्हाळ्यात पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत शेतकऱ्यांना मोकळीक असते. तेव्हा सर्वत्र लग्न्सराई असते. खेळ-करमणुकीकरिताही हेच दिवस निवडले जातात. पावसाळ्यात शेतीकामाचा भर असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे सामूहिक तथा कौंटुंबिक सहकार्याचे वातावरण असते. हा उत्साह व आनंद या काळातील अनेक सण-समारंभ आणि त्यांना आलेले सार्वजनिक स्वरूप यांतून व्यक्त होतो. सण-समारंभांत नृत्य, संगीत, काव्य यांचाही भरणा असतो.

जनपद समुदाय हा मुळातच निरक्षर असल्यामुळे निसर्गात प्रत्यही दिसून येणाऱ्या अनेक घडामोडींविषयी त्यांच्यात आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन अगर अभिक्रम दिसून येत नाही. तथापि अनुभवांच्या आधारे उपजीविकेच्या विविध साधनांच्या वापरामध्ये त्यांच्यात नकळत अनुभवजन्य ज्ञान-दृष्टी आलेली असते. शेतीकाम, पशुपालन, मासेमारी, शिकार इ. प्रसंगी ते वापरीत असलेली हत्यारे वा त्यांनी लढविलेल्या हिकमती यांच्या बुडाशी अप्रत्यक्षपणे अनुभवाने मिळविलेला शास्त्रीय दृष्टिकोनच असतो. परंतु याची जाण त्या लोकांना नसते. त्यांच्या मते त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगी त्यांना यश वा अपयश मिळणे हे विविध देवदेवतांच्या, भुताखेतांच्या अगर त्या त्या क्षेत्रात अधिष्ठित अशा विविध अतींद्रिय शक्तींच्या कृपेवर अवलंबून असते. अशा स्थितीत त्या देवदेवतांना व अतींद्रिय शक्तींना संतुष्ट करून त्यांच्या कृपादृष्टीचा लाभ व्हावा, म्हणून विविध विधिनिषेध, व्रतवैकल्ये व कर्मकांडे यांचे काटेकोर पालन व या सर्वांविषयी माहितगार व प्रशिक्षित पुरोहितवर्ग यांचाही प्रवेश समुदाय संस्कृतीत होतो आणि आचरणाचे विविध प्रकार व त्यांमागची भूमिका यांची भर लोकविद्येत पडते.

जनपद समुदायात प्रचलित असलेल्या व त्यांच्या लोकविद्येत समाविष्ट असलेल्या सर्वच कला-साहित्य प्रकारांना निसर्गक्रमाच्या जाणिवेची व अनेक वर्षांच्या चाकोरीबद्ध जीवनातून आलेल्या अनुभवजन्य शहाणपणाची पार्श्वभूमी असते. किंबहुना हे शहाणपणच त्यांच्या उक्तींतून व कृतींतून व्यक्त होत असते. निसर्गचक्र, एकजिनसी समाजजीवन, व्यक्तिजीवन व जीवनरहाटी यांबद्दलचे त्यांचे तत्त्वज्ञान व त्यांचे व्यवहारचातुर्य त्यांच्या मौखिक साहित्यामधून व्यक्त होते. या मौखिक साहित्यात लोकगीते व लोकनाट्ये येतात, त्याचप्रमाणे त्यांची अस्मिता जपणाऱ्या दंतकथा वा ⇨पुराणकथा, ऐतिहासिक मागोवा घेणाऱ्या ⇨आख्यायिका ह्याही येतात.

लोकविद्या ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, तेव्हा शास्त्रज्ञांची प्राथमिक अवस्थेतील अगर आदिवासी लोकांच्या मौखिक परंपरेबद्दलची जिज्ञासा वरील विषयांपुरतीच मर्यादित होती. ‘लोकविद्या’ ह्या संकल्पनेची निर्देश अगदी प्रथम विल्यम जॉन टॉमस (१८०३−८५) ह्या इंग्रज प्राचीन वस्तुशोधकाने ‘ॲम्ब्रोस मर्टन’ या टोपणनावाखाली लंडनच्या द ॲथेनीयम या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या पत्रात केला (१८४६). ‘लोकविद्या’ या संज्ञेखाली जुन्या काळच्या चालीरीती, रूढी, विधिनिषेध, लोकश्रद्धा, पोवाडे, सुभाषिते इत्यादींची नोंद व्हावी, म्हणजे नामशेष होत चाललेल्या लोकसाहित्याच्या अवशेषांचा पुढील अभ्यासकांना उपयोग होईल, असे त्याने आग्रहाचे प्रतिपादन केले. लोकविद्येची व्याप्ती नंतरच्या काळात अधिकच विस्तारत गेली. १८८८ मध्ये ‘अमेरिकन फोकलोअर सोसायटी’ नावाची लोकविद्याविषयक संस्था अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत स्थापन झाली. सुरूवातीच्या काळात केवळ अप्रगत अगर प्राथमिक अवस्थेत असलेल्या जमातींमधील लोककथा, आख्यायिका, लोकश्रद्धेचे प्राबल्य दाखविणारी विविध कर्मकांडे, औषधोपचाराच्या पद्धती, जादू व अभिचाराचे प्रकार, भुताखेतांबद्दलच्या समजुती, अतींद्रिय शक्तींच्या कल्पना व उपासना इ. संस्कृति-वैचित्र्य दाखविणारी माहिती संकलित करून तिची संगतवार मांडणी करून प्रसिद्ध करणे, एवढ्यापुरतीच लोकविद्येविषयीची आस्था मर्यादित होती. संकलनात  आलेल्या संस्कृतिविशेषांचा अर्थ लावणे अगर त्याचे स्पष्टीकरण देणे, याचे फारसे महत्त्व सुरूवातीच्या काळात वाटत नव्हते. आदिम अगर प्राथमिक अवस्थेतील जमातींची संस्कृती ही निकृष्टच असणार, अशा पूर्वग्रहातून संकलित माहितीचा अर्थ लावला जात असे. एकोणिसाव्या शतकांच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीस होऊन गेलेले लोकविद्येचे दोन प्रमुख संकलक मानवशास्त्रज्ञ म्हणजे ⇨जेम्स जॉर्ज फ्रेझर (१८५४−१९४१) आणि ⇨फ्रंट्‌स बोॲस (१८५८−१९४२) हे होत. फ्रेझर ह्यांनी १८९० मध्ये द गोल्डन बाऊ नावाचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहून त्यात धर्म आणि विज्ञान यांतून उत्क्रांत होत गेलेल्या मानवी विचारांचा आढावा घेतला. बोॲस यांनी कॅनडामधील आदिवासी जमातींचा अभ्यास केला असून दंतकथा व लोककथा यांच्यासंबंधी विवेचन केले आहे. सुरूवातीच्या सामाजिक अगर सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांचे अभ्यासविषय हे धर्म श्रद्धा−समजुती, लोककथा, दंतकथा, आख्यायिका, कर्मकांडे म्हणजे लोकवद्येत मोडणारेच विषय होत. त्यांतही धर्म आणि पुरोहित, भगत [⟶ शामान] वा वैदू व ते पीडा निवारण्याकरिता अगर रोग निवारण्याकरिता आचरीत असलेली जादूटोणा, मंत्रतंत्र इ. अघोरी वा सौम्य कर्मकांडे, पाप−पुण्यांच्या कल्पना इ. विषयांबद्दलची जिज्ञासा अधिक तीव्रतेने जाणवते. याखालोखाल विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था, पतिपत्नीसंबंध त्यानंतर जमातीतील छोट्या-मोठ्या गटांची रचना, त्यांचे परस्परसंबंध, त्यांचे हक्क व कर्तव्ये इ. समाजसंघटनेचे विषय येतात.


सांस्कृतिक वैशिष्ट्यांची आणि वैचित्र्यांची संगतवार नोंद करण्याचा उत्साह ओसरल्यानंतर त्याच धर्मसमजुती आणि कर्मकांडे यांचा स्पष्टीकरणात्मक अभ्यास करण्याकडे शास्त्रज्ञांचा कल दिसू लागला. विज्ञाननिष्ठ भूमिकेतून समजल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि त्यांतही जादू, अभिचार आणि चेटूक या परस्परसंबद्ध विषयांकडे काहींचे लक्ष गेले. बहुतेक वन्य जमातींमध्ये या चमत्कार-त्रिकूटाचे अस्तित्व दिसून येते. ⇨एडवर्ड एव्हान एव्हान्झप्रिचर्ड या नामवंत ब्रिटिश मानवशास्त्रज्ञाने  या त्रिकूटाच्या स्पष्टीकरणाकरिता अझांडे जमातीचा १९३७ मध्ये अभ्यास केला. ⇨बॉनीस्ला कास्पेर मॅलिनोस्की (१८८४−१९४२) या प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञाने मॅजिक सायन्स अँड रिलिजन अँड अदर एसेज नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला (१९१६). वन्य जमातींतील संस्कृति−वैचित्र्यांचे स्पष्टीकरण कार्यात्मक विश्लेषणाद्वारे देणाऱ्यांमध्ये हे अग्रगण्य होत. सांप्रत सु. ६२ विद्यापीठांमध्ये लोकविद्येचा अभ्यास आणि संशोधन चालू आहे. भारतातील मद्रास विद्यापीठामध्ये ‘लोकविद्या’हा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा स्वतंत्र विषय बनला आहे.

अशा लोकपरंपरेतील श्रद्धांवर आधारित कर्मकांडांबरोबरच लोकवाङमयाचा (लोककथा, दंतकथा, लोकगीते इ.) अभ्यासही तितक्याच आस्थेने केला जात आहे. काही लोककथा सर्व भूप्रदेशांत प्रचलित आहेत. लोककथा अगर दंतकथा ह्या केवळ वाङ्‌मयीन कृती आहेत, म्हणून चालणार नाही तर त्यांत त्या त्या जमातींच्या संस्कृतीचे वर्णन आढळते. फ्रँट्स बोॲस यांनी उत्तर अमेरिकेतील त्सिमशीअन इंडियन नावाच्या जमातीमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांचा अभ्यास करून त्यांची भौतिक संस्कृती, अर्थव्यवस्था, सामाजिक संघटना, धार्मिक श्रद्धा, व्यक्तिजीवनचक्र, त्यांच्यातील गुप्तसंघटना, त्यांची नीतिमत्ता आणि त्यांचे भावजीवन यांविषयी माहिती उपलब्ध होत असल्याचे दाखवून दिले आहे. लोकवाङ्‌मय म्हणजे संबंधित जमातीचे आत्मवृत्तच होय, असे बोॲस यांनी प्रतिपादले आहे. दंतकथांचा अभ्यास त्या त्या जमातीचा इतिहास, मूल्ये, आशा-आकांक्षा, आदर्श इ. माहितीकरिता आवश्यक वाटतो. त्याचप्रमाणे ठराविक अगर एकच लोककथा भिन्न प्रदेशांतील लोकांमध्ये प्रचलित असलेली दिसूनआल्यास, तिच्या अभ्यासातून त्या लोकसमूहांच्या परस्परसंपर्कावर, त्यांच्या पूर्वनिवासस्थानांवर तसेच त्यांच्या स्थलांतरावर प्रकाश पडू शकतो.

अलीकडे दंतकथांच्या अभ्यासाच्या संदर्भात एक वेगळाच अभिक्रम फ्रान्समधील प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ ⇨क्लो द लेव्ही-खाऊस यांनी १९६३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या स्ट्रक्चरल अँथपॉलॉजी या ग्रंथामध्ये प्रतिपादिला आहे. या अभिक्रमास ‘संरचनावाद’ असे म्हटले जाते.सामाजिक घटनांचे अगर प्रक्रियांचे विश्लेषण करून त्यांची कारणमीमांसा देण्यामागे सामाजिक मानवशास्त्रज्ञांमध्ये नेहमी ऐतिहासिक व तुलनात्मक अशा दोन अभिक्रमांचे द्वंद आपणास पहावयास मिळते. लेव्ही-स्त्राऊस यांच्यापूर्वी सामाजिक मानवशास्त्रज्ञ हे दंतकथांचा अर्थ संबंधित जमातीच्या ऐतिहासिक, संघटनात्मक संदर्भातच लावीत असत परंतु लेव्ही−स्त्राऊस यांनी अनेक जमातींमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांच्या संरचना−म्हणजे कथांची चौकट अगर मांडणीयांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यांना त्यांत विलक्षण साम्य दिसले. म्हणून त्यांनी दंतकथांचे मूळ मानवी मनाच्या क्रियाप्रक्रियांमध्ये आहे, असे प्रतिपादिले. दंतकथांच्या संरचनेच्या अभ्यासाच्या आधारे हा निष्कर्ष काढलेला असतो, म्हणून या अभिक्रमास ‘संरचनावाद’ असे म्हटले जात असावे. लेव्ही-स्त्राऊस यांच्याही आधी ल्यूसँ लेव्ही-ब्र्यूल याने प्रतिपादिलेल्या आदिम मानसशास्त्र म्हणजेच तर्कपूर्व (तर्कविरहित-तर्कशून्य) मनोरचना या सिद्धांतास इतर अनेकांप्रमाणे लेव्ही-स्त्राऊस यांनीही मान्यता दिलेली नाही. लोकसाहित्याचा अभ्यास मानवशास्त्रज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञ ह्यांनी एका वेगळ्या अभिक्रमातून केला आहे. समाजशास्त्र आणि सामाजिक मानवशास्त्र यांमध्ये संरचना आणि कार्य हा अभिक्रम अलीकडे अधिक लोकप्रिय झालेला दिसतो. लोकसाहित्यासही हा अभिक्रम लागू केला, तर व्याकरण आणि वाक्यरचना यांना फारसे महत्त्व न देता त्यातून व्यक्त होणारा अर्थ, विदित होणारा संदेश याला महत्त्व देण्यात येऊ लागले. यालाच ‘शब्दार्थविद्या’ असे नाव देण्यात आले. शब्दार्थाला, वाक्याच्या उच्चारपद्धतीला सामाजिक संदर्भ असतो. शब्दाला कोणत्या संदर्भात कोणता अर्थ प्राप्त होतो, हे वाक्यरचनेवरून सांगता येत नाही, तर ते समजून घेण्याकरिता सामाजिक संदर्भ समजून घेणे, उच्चारलेल्या वाक्याचे कार्य कोणते, हे समजून घेणे आवश्यक ठरते.

लोकविद्या ही सीमित प्रदेशातील जनसमुदायामध्ये मौखिक परंपरेने आलेल्या लोकवाङ्‌मय, लोकसंगीत, लोकनृत्य, श्रद्धा-समजुती, विविध कर्मकांडे या स्वरूपात असली, तरी व्यापक बृहद्-समाजाचाच तो एक अविभाज्य भाग असतो. बृहत्‌परंपरेची ती एक छोटी प्रतिकृती असते. अशा रीतीने सीमित जनसमुदायाची लोकविद्या आणि बृहद्‌समाजाची बृहद्‌संस्कृति-परंपरा यांत साधर्म्य असते, असे अलीकडे प्रतिपादिले गेले आहे.

पहा : लोककथा लोककला लोकगीते लोकनाट्य लोकनृत्ये लोकवाद्ये लोकसंगीत लोकसाहित्य.

संदर्भ : 1. Carvalho-Neto, Paulo de, Trans. Wilson, Jacques M. Concept of Folklore, London, 1971.

           2. Coffin, T. P. Cohen,Hennig, Folklore from the Working Folk of America, New York, 1973.

           3. Daniels, C. L. Stevans. C.M. Ed. Encyclopedia of Superstitions. Folklore and the Occult Sciences of the World, London, 1971.

           4. Dorson, R. M. America in Legend, New York, 1974.

           5. Dorson, R. M. Ed. Folklore and Folklife  : An Introduction, Chicago, 1972.

           6. Emrich, Duncan, Folklore on the American Land, London, 1972.

           7. Ward, Donald, Ed. &amp Trans., The German Legends of the Brothers Grimm, 2 Vols.,

                Philadelphia, 1981.

कुलकर्णी. मा. गु.