लोकदैवते : जगातील प्रस्थापित अशा प्रमुख धर्मांशी साक्षात संबंध नसलेली, पण विशिष्ट लोकसमूहाने श्रद्धेने आपली मानलेली दैवते म्हणजेच लोकदैवते होत. निरनिराळ्या लोकसमूहांची निरनिराळी दैवते असतात. हे लोकसमूह मुळात जगातल्या प्रस्थापित अशा प्रमुख धर्मांपैकी एखाद्या धर्माचे अनुयायी असू शकतात पण निरनिराळ्या कारणांमुळे त्या धर्मांच्या छत्राखालील विविध लोकसमूहांत त्यांची वेगवेगळी लोकदैवते निर्माण झालेली असतात. अर्थात, सर्वच समाजांचा आदिधर्म हा लोकधर्मच असतो आणि माणसांच्या निसर्गाशी होणाऱ्या संवादसंघर्षांतून तो स्वाभाविकपणे निर्माण झालेला असतो.   

प्रस्थापित धर्मांपैकी काही धर्म बहुदेवतावादी, तर काही एकेश्वरवादी आहेत. बहुदेवतावादी धर्मांच्या अनुयायांबद्दल म्हणावयाचे, तर दैवतीकरणाच्या मानसिक प्रक्रियेला अनुकूल अशी त्यांची मनोभूमी पिढ्यान्‌पिढ्या स्वीकारलेल्या बहुदेवतावादी धर्माचारांमुळे तयार झालेली असते. त्यामुळे बहुदेवतावादी लोकसमूहांमध्ये नवनवीन दैवते निर्माण होऊ शकतात. परंतु एकेश्वरी धर्माचे अनुयायी असलेल लोकसमूहही कळत-नकळत काही लोकदैवतांची आराधना करताना दिसतात. काही लोकसमूह वा जमाती जगातल्या कोणत्याही प्रस्थापित धर्माच्या अनुयायी नसतात. त्यांचे जग बंदिस्त असते आणि त्या बंदिस्त जगातच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्यांचा धर्म असतो दैवतेही असतात. नागरीकरणाकडे प्रवास करणाऱ्या जगातील काही आदिम जमाती ह्या प्रकरणात मोडतील.

जे लोहसमूह आदिम नाहीत, पण ज्यांच्यात लोकदैवते आकाराला येतात, ते बहुधा ग्रामभागांत राहणारे, नागरीकरणाचे तसेच औद्योगिकीकरणाचे संस्कार मनांवर न झालेले, असे असतात. अशा लोकसमूहांत जी लोकदैवते आकाराला येतात, ती हळूहळू त्या लोकसमूहापुरती प्रस्थापित आणि प्रतिष्ठित होतात. त्यानंतर त्या लोकसमूहावर वा त्या समूहापैकी काही व्यक्तींवर काळाच्या ओघात नागरी संस्कार झाले, तरी त्याने पूर्वापार घडविलेल्या आणि पूजिलेल्या लोकदैवतांबद्दल त्याला वाटणारी श्रद्धा आणि आदर सहसा नष्ट होत नाही. परंपरेने त्या देवता त्याच्या जीवनजाणिवांत खोलवर मूरून गेलेल्या असतात. अनेक लोकदैवते ही उदात्तीकृत स्वरूपात उच्च प्रस्थापित धर्मात सामावलीही जातात. त्यांच्या उपासनापद्धतीही थोडाफार फरक पडतो. तथापि त्यांच्या मूळ लोकधर्मीय प्रकृतीच्या खुणा त्या दैवतांच्या उदात्तीकृत अवस्थेतही टिकून राहतात. हिंदू दैवतमंडळात ह्याची अनेक उदाहरणे दाखवता येतील. उदा., मुळात भू-देवी आणि रक्षक देवता म्हणून लोकमानसात स्थिर झालेली  आणि मातृदेवता असलेली लोकदेवता पुढे अंबाबाई (अंब = आई) होते.

ग्रामभागांत राहणाऱ्या लोकांचे जीवन हे प्रायः कृषिजीवन असते. त्या जीवनाशी ते निरनिराळ्या नात्यांनी संबंधित असतात. कृषीची संकल्पना ही निव्वळ पिके काढण्यापुरती मर्यादित नसून पशुपालन, कोंबड्या, बदके ह्यांच्यासारख्या पक्ष्यांचे, तसेच मधमाशांचे पालनसंवर्धन, रेशमी किडे पोसणे अशा अनेक उद्योगांचा तीत अंतर्भाव होतो. ह्या कृषीतून जे उत्पादन होते, ते खरेदी करणारे विस्तृत समाज ह्या ग्रामभागांपलीकडे पसरलेले असतात. तथापि हे ग्रामभाग आणि तेथील कृषिजीवन हे तसे वेगळे, निसर्गसंवादी राहिलेले असते. त्या जीवनाच्या भौतिक आणि भावनिक गरजांनुसार तेथील लोकदैवते आकाराला येतात आणि त्या लोकदैवतांच्या आधाराने एक लोकधर्मही उभा राहतो. वर म्हटल्याप्रमाणे आपला मूळ धर्म सांभाळूनही हे लोकसमूह त्यांच्या मनात आकारलेल्या लोकदैवतांचे आणि लोकधर्माचे पालन करीत असतात.

चैतन्यमय व नियंत्रक अशा शक्तींची भावनात्मक प्रतिक्रियेतून कल्पना करणे आणि त्यांना अनेकदा प्रतिकात्मक व्यक्तिरूपही देणे ही प्रवृत्ती विविध देवतांच्या निर्मितीमागे असते. लोकदैवतांची निर्मितीही ह्याच प्रक्रियेतून होत असते. लोकदैवते निर्मिणारे लोकसमूह काही एका परिसरव्यवस्थेवर (एकोसिस्टिम) अवलंबून असतात. ह्या परिसरव्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी विविध प्रकारच्या निसर्गचक्रांचे निरीक्षण ते करीत असतात. उदा., रात्र आणि दिवस, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत व अमावस्येपासून पुन्हा पौर्णिमेपर्यंत बदलत राहणाऱ्या चंद्राच्या कला, विविध वनस्पती आणि प्राणी ह्यांची जीवनचक्रे इत्यादींचे अतोनात महत्त्व त्यांना वाटत असते. संपातकाल, पिकांची लावणी, अंकुरण, सुगी इत्यादींशी संबंधित अनेक विधी आणि कर्मकांडे कृषक संस्कृतीत दिसतात. विविध ठिकाणचा निसर्ग आणि तेथील हवामान ह्यांत बराच फरक असू शकतो. त्यामुळे त्या त्या ठिकाणचे लोक आपापल्या वसतिस्थानांना अनुरूप अशी पवित्र स्थाने, दैवते निर्माण करतात. निर्झर, गुहा, पर्वतशिखरे, नदीचे काठ, काही विशिष्ट झाडे ह्यांना देवत्व दिले जाते व त्यांची आराधना केली जाते.

वर म्हटल्याप्रमाणे सर्वच समाजांचा आदिधर्म असलेला लोकधर्म माणसांच्या निसर्गाशी होणाऱ्या, संवाद-संघर्षांतून स्वाभाविकपणे निर्माण झालेला असतो. अतिप्राचीन काळापासून माणूस हा निसर्गाशी संवाद- संघर्ष करीत आला आहे. निसर्गातील वास्तव हे अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारचे असते. अनुकूल निसर्गतत्त्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकमानस त्यांचे दैवतीकरण आणि यथाशक्य मूर्तीकरणही करते. ही अनुकूलता कायम राहावी, म्हणून त्यांची आराधना करते. प्रतिकूल निसर्गतत्त्वे ही कोप करणारी उग्र दैवते म्हणून साकार होतात. त्यांना अनुकूल करून घेण्यासाठी मानवी मन त्यांची उपासना करते.

निसर्गरूपांखेरीज काही अव्यक्त, अमूर्त शक्ती अनुकूल वा प्रतिकूल कार्य करतात, ह्या श्रद्धेतूनही त्या शक्तींचे दैवतीकरण होते. लहानमुलांना होणारे रोग किंवा आकस्मिक आजार ह्यांचे वैज्ञानिक कार्यकारणसंबंध माहीत नसताना तेव्हा उपर्युक्त अव्यक्त, अमूर्त शक्तीच हे आजार आणतात अशा समजुतीतून त्या शक्ती उग्र देवता म्हणून जनमानसात आकार घेतात. ‘पटकीची साथ आणणारी’ म्हणून मानली गेलेली मरीआई हे अशा देवतेचे उदाहरण होय. ह्याच्या उलट जिवती ही जीवनरक्षक लोकदेवता होय. श्रावण महि न्यात महाराष्ट्रातील अनेक स्त्रिया आपल्या घरात तिचे चित्र चिकटवून तिची पूजा करतात.

  लोकदैवतांपैकी स्त्रीदेवता ह्या कुलस्वामिनी म्हणून मान्यता पावलेल्या असतात. त्यांचे अनघड तांदळे ‘स्वयंभूमूर्ती’ म्हणून जनमानसात स्थिर झालेल्या असतात. त्यांच्या उपासना पिढ्यान्‌पिढ्या चालू असतात. अनेकदा जनसमूहांचे स्थलांतर झाले, तरी मूळ कुलदेवतेची ठाणी स्थलांतरित भूप्रदेशात नव्याने निर्माण केली जातात.

 

ह्या देवतांशी असलेले श्रद्धेचे नाते संबंधित लोकसमूहांच्या एकतेचा एक बळकट धागाही बनतो. मालमत्तेचा वारसा, शेतांच्या हद्दी, पाण्यावरचा हक्क, चराऊ रानांवरचा हक्क इ. बाबतींत संघर्ष निर्माण होतात, त्या वेळी ते मिटवून न्याय्य तोडगा काढवण्याच्या दृष्टीनेही ह्या समान श्रद्धेवर आधारलेले नाते उपयुक्त ठरू शकते. भारतासारख्या निसर्गसंपन्न देशात कित्येक निसर्गवस्तूंना लोकदैवतांचे स्थान मिळालेले असले, तरी त्यांचेच प्रतीकात्मक मूर्तिकरण होऊन त्यांना मानवी रूपही दिले जाते. माणसांचे दैवतीकरण करणे आणि देवतांना मनुष्यरूप देणे, त्यांचे मानुषीकरण करणे ही मानवांमधील प्रवृत्तीच लोकदेवतांना मनुष्यरूप देते.

 

निरनिराळ्या गावांच्या संरक्षक देवता असतात. त्या ग्रामदैवतेम्हणून ओळखल्या जातात. ती दैवतेही लोकदैवते होत.

कुलकर्णी, अ. र. भवाळकर, तारा