लोएस: मुख्यतः गाळवटयुक्त व वातज (वाऱ्याच्या क्रियेने निर्माण झालेल्या) गाळाच्या निक्षेपाला (राशीला) लोएस म्हणतात. मात्र या संज्ञेच्या अनेक प्रकारे व्याख्या करतात आणि तेव्हा निक्षेपाच्या वर्णनात्मक गुणवैशिष्ट्यांवर भर देतात. उदा., मुळात घट्ट न झालेली (सैलसर) व थरयुक्त संरचना नसलेली कॅल्शियमयुक्त गाळवट म्हणजे लोएस होय. येथे मात्र लोएसची उत्पत्ती हा सर्वांत महत्त्वाचा घटक मानला आहे. जर्मनीतील ऱ्हाईन व डॅन्यूब नद्यांच्या किनाऱ्यांवरील सैलसर, पिवळसर करड्या लोमयुक्त गाळासाठी ही संज्ञा १८२१ साली प्रथम वापरण्यात आली. अल्सेसमधील एका गावाच्या नावावरून लोएस हे नाव आले असून यातील मूळ जर्मन शब्दाचा अर्थ सैल असा आहे. अमेरिकेतील मिडवेस्ट भागात याला ‘ॲडोब’ हे स्थानिक नाव आहे.
गुणवैशिष्ट्ये व संघटन: चांगले प्रकारीकरण (आकारमानानुसार कणांची विभागणी) झालेला हा दलिक निक्षेप असून तो घट्ट झालेला नसतो. क्वचित स्वतःच्याच वजनामुळे व त्यातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे तो काहीसा घट्ट होतो. यातील द्रव्य आकार्य (आकार देता येण्यासारखे) नसते व याची आर्द्रता १०% ते १५% असते. हा सापेक्षतः समांग, मऊ, पार्य, बाह्यात्कारी थर नसलेला आणि अतिशय सच्छिद्र (सच्छिद्रता ५०% ते ५५%) असतो. यातील गाळवटीचे (०.०५ ते ०.५ मिमी. व्यासाच्या कणांचे) प्रमाण ६०% ते ९०% असून यात ५% ते १०% मृत्तिका द्रव्ये व थोडी बारीक वाळू असते. यातील कण सामान्यतः अणकुचीदार असतात. याचा रंग मुख्यत्वे फिकट पिवळा असून करडा, गुलाबी व कधीकधी तपकिरी आणि लाल छटाही आढळतात. लोएसचे पिवळे कण व्हांग हो नदीतून वाहून नेले जातात तेव्हा ती पिवळसर दिसते म्हणून तिला पीत नदी म्हणतात. पीत समुद्र हे नावही असेच पडले आहे. लोएसची जाडी काही सेंमी.पासून ३०० मी. पर्यंत असून सरासरी जाडी १५ ते ३० मी. असते.
लोएसचे खनिज संघटन प्रदेशपरत्वे वेगवेगळे असून काही ठिकाणी यातील कॅल्शियमयुक्त घटकांचे प्रमाण ४० टक्क्यापर्यंत असते. जेव्हा पृष्ठभागावरील कॅल्शियम निघून जाते तेव्हा त्याला लोएस लोम म्हणतात. अशा तऱ्हेने खजिन संघटनानुसार याची लोएसयुक्त वाळू, वालुकामय लोएस, लोएस लोम व मृत्तिकायुकत लोएस अशी मालिका असू शकते.
क्वॉर्ट्झ हे यातील मुख्या खजिन असून कॅल्साइट, डोलोमाइट, फेल्स्पार, मृद् खनिजे. (स्मेक्टाइट, इलाइट व क्लोराइड) ही यांशिवाय अँफिबोल, ॲपेराइट, कृष्णाभ्रक, एपिडोट, गार्नेट, ग्लॉकोनाइट, पायरोक्सीन, रूटाइल, सिलिमनाइट, स्टॉरोलाइट, तोरमल्ली, झिर्कॉन इ. खनिजे यात अल्प प्रमाणात आढळतात. पुष्कळदा याच्या खालील भागात कॅल्शियम कार्बोनेटाची संधिते बनतात व वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्यांना ‘लोएस बाहुल्या’ म्हणतात. तसेच जीवाश्म (जीवांचे शिळारूप अवशेष) व गोगलगायींच्या कवचांसारखे काही जैव अवशेषही यात असतात.
उभ्या सूक्ष्मनलिकांचे सर्वत्र आढळणारे जाळे हे लोएसचे वैशिष्ट्य आहे. या नलिका म्हणजे गवताची मुळे कुजून मागे राहिलेल्या भेगा असून गवतांच्या लागोपाठच्या पिढ्यांनी यातील कण धरून ठेवले गेल्याने याचे इतके जाड निक्षेप तयार झाले असावेत. नलिकांचे जाळे अशा गवतांच्या आधीच्या पिढ्यांचे अस्तित्व सूचित करतात. या नलिकांच्या पृष्ठभागावर कॅल्साइटाचे अस्तरासारखे पुट साचते. तसेच त्यांच्यात व अन्य भेगांत मृद् खनिजे भरली जातात. या वैशिष्ट्यांमुळे लोएसचे एक धरून ठेवले जातात व लोएसचे बळ वाढते. अणकुचीदार ओबडधोबड एक एकमेकांमध्ये गुंतले जाऊन बळ अधिक वाढते. परिणामी नैसर्गिक रीतीने झीज होऊन वा कृत्रिम रीतीने छेद घेतल्यास लोएसचा तेथील उतार तीव्र वा जवळजवळ उभा राहू शकतो व त्यामुळे त्याचे उभे कडे निर्माण होतात (उदा., चीनमध्ये १५० मी. पर्यंत उंचीचे कडे आहेत). वातावरणक्रियेने या उतारावर स्थूल अशी स्तंभाकार रचनाही निर्माण होते. यातील जुने रस्ते झिजून व उभ्या दिशेत खोल जाऊन खंदकासारखे मार्ग तयार होतात.
चीन व अमेरिकेत लोक (उदा., प्युएब्लो इंडियन) अशा उतारावर व त्याच्यातील गुहांमध्ये राहतात. मात्र अशा वस्त्या अतिशय धोकादायक ठरू शकतात. उदा., १५५६ साली चीनमध्ये या भागात भूकंप झाला. त्यामुळे मोठे भूमिपात होऊन आणि पूर येऊन सु. १० लाख लोक मरण पावले होते.
आढळ: लोएस साधारणतः खडबडीत पृष्ठभागावर चादरीसारख्या सापेक्षतः पातळ आवरणाच्या रूपात आढळते. जगातील पुष्कळ भागांतील लाखो चौ.किमी. क्षेत्रावर (जमिनीच्या सु. १०% भागावर) ते पसरलेले आहे. ते भूवैज्ञानिक कालमापनाच्या दृष्टीने अगदी अलीकडच्या काळातील (रीसेंट) निक्षेप आहेत. आशिया (मुख्यत्वे चीन, मंगोलिया), उत्तर अमेरिका, यूरोप (फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान व रशिया), दक्षिण अमेरिका (उरुग्वे, अर्जेंटिना) व न्यूझीलंड येथे लोएस आढळते. भारतात काश्मीर व पंजाब येथे काही भागांत यांचे थोडे निक्षेप आढळतात. हे निक्षेप पिवळसर करडे सूक्ष्मकणी व थररहित असून येथे हल्लीही असे निक्षेप तयार होत आहेत.
उत्पत्ती: लोएसमध्ये गौण स्वरूपाचे फेरबदल होतात व त्यावर पुन्हा अवसादन होते. या गोष्टी मूळ लोएसपासून वेगळ्या करता येत नाहीत. तसेच त्याच्यासारख्याच मिश्रडबरी व नादेय (नदी वा प्रवाहाने निर्माण झालेल्या) गाळ यांच्या थरांची लोएसमध्ये सरमिसळ झालेली असते आणि बऱ्याचदा त्यामध्ये पुरामृदाही (प्राचीन मृदाही) असतात. यामुळेच लोएसच्या उत्पत्तीविषयीचे पुष्कळ मतभेद निर्माण झाले आहेत. असे मतभेद दीर्घ काळपासून होत आलेले असले, तरी लोएसच्या वातज उत्पत्तीला आधुनिक निरीक्षणे आणि चतुर्थ कल्पातील (गेल्या सु. २० लाख वर्षां च्या काळातील) निक्षेपांचा अवसादवैज्ञानिक अभ्यास यांद्वारे पुष्टी मिळाली आहे.
चतुर्थ कल्पात ज्या प्रदेशांत हिमानी क्रिया झाली होती त्या प्रदेशांत आणि त्या-त्या लगतच्या भागांत सामान्यतः लोएस आढळते आणि अशा बहुतेक निक्षेपांचा हिमानी क्रियेशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध असल्याचे दिसून येते. या काळात बर्फ वितळून त्याचे पाणी बनते. हे पाणी वाहत जाऊन दऱ्या निर्माण झाल्या आणि अशा दऱ्यांलगतच्या भागांत विशेष जाड लोएस निर्माण झाले. उदा., यूरोप व अमेरिकेच्या मध्यभागात असे लोएस आढळते. तेथे दरीपासून दूर जाताना त्याची जाडी आणि लोएस निर्माण आढळते. येथे दरीपासून दूर जाताना त्याची जाडी आणि कणांचे आकारमान पद्धतशीरपणे कमी होत गेलेली आढळतात. लोएस निर्मितीच्या या प्रमुख क्षेत्रांशिवाय अमेरिकेत व यूरोपातही परिहिमनदीय (बर्फाच्या सीमावर्ती) भागांत बहुतेक लोएस निक्षेप आढळतात. येथे गाळवटीच्या आकारमानाचे कण निर्माण होण्यास हिमानी अपघर्षण हा मुख्य कारक कारणीभूत होता असे दिसते. यूरोप व अमेरिकेतील लोएस हिमकालात बफाच्या पाण्याने गाळवटी द्रव्य वाहून नेले जाऊन प्रथम साचले आणि नंतर ते वाऱ्याने दूरवरपर्यंत वाहून नेले असावे. कधीकधी अशा तऱ्हेने ते सरोवरातही गेले आहे.
वाळवंटी प्रदेशांपासूनही वाऱ्याच्या क्रियेने लोएस निर्माण झाले असावेत, असे एक मत आहे. या बाबतीत गाळवटी कण हे वातावरणक्रियेतील विविध प्रक्रियांनी अथवा वातज अपघर्षणाने बनले असावेत. आशियातील लोएस पूर्णतया वाऱ्याच्या क्रियेद्वारे बनल्याचे मानतात. कदाचित यांच्यातील धूलिकण हे मध्य आशियातील वाळवंटातून आले असावेत. फोन रिख्टहोफेन यांनी चीनमधील लोएसचा अभ्यास करून या मता ला पुष्टी दिली आहे. वाऱ्याने साचलेले बहुतेक लोएस बहुतकरून तृणसंघात (स्टेप) व टंड्रा परिस्थितींत साचले असावेत.
उपयुक्तता : लोएसपासून बहुधा खोल व सुपीक मृदा निर्माण होते. अशा जमिनीला पावसाने व सिंचनाद्वारे पुरेसे पाणी मिळाले, तर तेथे उत्तम पीक घेता येते. चीन व यूरोप येथे लोएस उबदार जलवायुमानातील (दीर्घकालीन सरासरी हवामानातील) पुरामृदा यांचे एका आड पट्ट आढळतात. गेल्या सु. ७ लाख ३० हजार वर्षांतील अवसादांवरून पूर्वीचे जलवायुमान कसे होते, याविषयी अंदाज बांधता येतात. या जलवायुमानाच्या चक्राशी लोएस निक्षेपांचा परस्परसंबंध जोडता येऊ शकतो. चीमधील लोएसमध्ये विविध प्रकारचे प्राणी व आदिमानव यांची वस्ती होती. यामुळे तेथे हिमकालातील प्राण्यांच्या कालानुक्रमाचा पुरावा मिळतो. तसेच आदिमानवाची काही हत्यारे त्यांत आढळतात. यावरून मानवी संस्कृतीचा मागोवा घेता येतो म्हणून इतिहासपूर्व कालमापनाच्या दृष्टीने लोएस उपयुक्त ठरतात.
ठाकूर, अ. ना.
“