लैंगिक वर्तन : जनावरांच्या व मानवांच्या लैंगिक प्रजोत्पादनकार्यामध्ये व त्यासाठी असलेल्या जैव-शारीरिक यंत्रणेत फारशी तफावत नाही परंतु त्यासाठी होणाऱ्या त्यांच्या लैंगिक व्यवहारांमध्ये मात्र पुष्कळच फरक आहे. जनावरांमध्ये होणाऱ्या लैंगिक वर्तनावर माद्यांचे लैंगिक अंतःस्त्राव (हॉर्मोन्स) व त्यांचा ऋतुकाळ (मेंस्ट्रएशन) यांसारख्या शारीरिक कार्याचे संपूर्ण नियंत्रण असते. मानवामध्येही स्त्रीचे अंतःस्त्राव ऋतुकाळ निसर्गनियमाप्रमाणे होतात परंतु त्यांचे लैंगिक व्यवहारावर संपर्णू नियंत्रण नाही. जनावरांमध्ये अंतःस्त्रावामुळे ऋतुकाळामध्ये मादी स्वीकारक्षम (रिसेप्टिव्ह) असल्याशिवाय नराचे कामोद्दीपन व शिश्नोत्थान होत नाही. त्यामुळे अन्य काळात संभाग अशक्य असतो. म्हणजे जनावरांमध्ये जबरी संभोग किंवा बलात्कार संभवत नाही परंतु मानवात ही जैव-शारीरिक नि यंत्रणे काम करीत नाहीत. मानवाच्या लैंगिक वर्तनामध्ये मनो-सामाजिक घटक जास्त प्रभावी असतात. मानवाचे कामेद्दीपन दृष्टी, गंध, स्पर्श, शब्द वगैरे बाह्य परिस्थितिक त्याचप्रमाणे विचार, कल्पना, इच्छा वगैरे मानसिक कारणांमुळे होऊ शकते व त्यामुळे स्त्री स्वीकारक्षम नसताना किंवा तिचे कामोद्दीपन झालेले नसतानासुद्धा तर केव्हा केव्हा तिच्या विरोधाला न जुमानता पुरुष तिच्यावर बलात्कार करू शकतो.
मानवी लैंगिक वर्तनाची दुसरी एक विशिष्टता अशी, की मानवाच्या प्रजोत्पादनयंत्रणेमागे जैव-शारीरिक घटकांबरोबर कामप्रेरणेचा मानसिक घटक पण असतो. त्याचा चांगला-वाईट प्रभाव स्त्री-पुरुषांच्या संपूर्ण जीवनावर पडू शकतो. थोडक्यात म्हणजे मानवी लैंगिकता ही मनोलैंगिकता (सायकोसेक्शुॲलिटी) आहे व मानवाच्या जीवनात तिला महत्त्वाचे स्थान आहे. जनावरांचे लैंगिक जीवन संपूर्णपणे जैव-शारीरिक घटकांद्वारा नियंत्रित असल्यामुळे, त्याचा अभ्यास करणे सोपे आहे. मानवाच्या लैंगिक किंवा कामजीवनाचा अभ्यास करण्यात पुष्कळ अडचणी येतात. एक तर सामाजिक रूढी-नियमांप्रमाणे लैंगिक जीवन ही व्यक्तीची अत्यंत खाजगी व गोपनीय बाब मानली जाते. त्यात व्यक्तीच्या अनेक नाजूक भावना गुंतलेल्याअसतात. शिवाय या जीवनाभोवती अनेक सामाजिक व धार्मिक समजुतींचे व बंधनाचे कोंडाळे पडलेले असते. त्यामुळे या विषयाची उघडपणे चर्चा करावयास किंवा स्वतःच्या लैंगिक व्यवहारांविषयी माहिती घ्यावयास माणसे धजावत नाहीत.
ऋग्वेदातील नासदीय सूक्ताने ‘कामस्तदग्रे समवर्तताधि’ म्हणून मानवजीवनात कामप्रेरणेला अग्रस्थान दिले आहे. प्राचीन भारतात आर्यांचे आगमन होण्यापूर्वीच्या आदिवासी जमातींत शिश्नदेवाची पूजा प्रचलित होती. आर्यांनी या पूजेचे शिवलिंगपूजेत परिवर्तन करून शिश्नदेवाला महादेवाच्या स्वरूपात आत्मसात केले. त्याचप्रमाणे आर्यधर्मात कामाला चार ⇨पुरुषार्थांमध्येही स्थान दिले.
जगातल्या प्राचीन व अर्वाचीन, तसेच सुधारलेल्या व आदिवासी समाजांत मनुष्याच्या लैंगिक व्यवहाराचे महत्त्व मान्य केलेले आहे व त्यावर नियंत्रण घालण्यासाठी निर्बंध, निषेध वगैरेंचा विकास झाला आहे. सर्व समाजांत या बाबतीत नैतिकता−अनैतिकता, योग्यता−अयोग्यता, मान्यता−अमान्यता ह्यांचे निर्बंध आहेत. मनोविज्ञानी मानतात, की कामप्रेरणा ही सर्व प्रेरणांत बलवान आहे व तिच्या आविष्कारावरील सामाजिक−नैतिक नियंत्रणांमुळे विकृत अथवा अप्राकृत (पर्व्हर्ट) लैंगिक वर्तनाचा विकास झाला [⟶ लैंगिक अपमार्गण]. जनावरांत अप्राकृत लैंगिक वर्तनाचा अभाव आहे. संभोगाची गुप्तता, विवाहबाह्य समागमावर निर्बंध, अगम्य आप्तसंभोगाचा (इन्सेस्ट) निषेध, तसेच अन्य नैतिक नियम वगैरे नियंत्रणंमुळे व्यक्तीच्या अबोध मनात आंतरिक, दमन केलेली, पण प्रबल कामप्रेरणा व आंतरीकृत, सामाजिक−नैतिक नियंत्रणे यांच्यामध्ये सतत संघर्ष चालू असतो. सिग्मंड फ्रॉइडच्या मनोविश्लेषण−सिद्धांतानुसार कामप्रेरणा ही मानवाची केंद्रीय जीवनप्रेरणा (लाइफ−इन्स्टिंक्ट) आहे व बहुतांश वर्तनविकृतीच्या मुळाशी दडपली गेलेली कामप्रेरणा व त्यामुळे निर्माण झालेले आंतरसंघर्ष असतात. सामाजिक−नैतिक बंधनांमुळे मनुष्य कामवासनेच्या शमनार्थ अन्य मार्ग शोधतो व विकृत अथवा अप्राकृत लैंगिक वर्तनाचा विकास होतो.
ह्या विषयावर सध्या उपलब्ध असलेला वात्स्यायनाचा कामशास्त्र वा ⇨कामसूत्र हा ग्रंथ इ.स. तिसऱ्या-चौथ्या शतकात लिहिला गेला. त्याच्याही आधी उद्दालकपुत्र श्वेतकेतू, बाभ्रव्य पांचाल, दत्तकाचार्य, चारायण, सुवर्णनाभ, घोटकमुख, गोनर्दीय, गोणिका पुत्र कुचुमार ह्या पंडितांनी ह्या विषयावर ग्रंथ लिहिले होते असे दिसते परंतु ते ग्रंथ आज तरी उपलब्ध नाहीत. वात्स्यायनाच्या कामशास्त्रानंतरही ह्या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यातले काही उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे (१) कोक्कोकचा रतिरहस्य अथवा कोकशास्त्र (बाराव्या शतकापूर्वी), (२) यशोधराची कामशास्त्रावरील जयमंगला ही टीका (तेरावे शतक), (३) ज्योतिरीश्वर कविशेखरकृत पंचसायक (तेरावे वा चौदावे शतक), (४) कल्याणमल्लाचा अनंगरंग (सोळावे शतक), (५) जयदेवकृत रतिमंजिरी इ. होत. [⟶ कामशास्त्र].
या ग्रंथांमधील कामजीवनाचे विवेचन मुख्यत्वेकरून एक कला या दृष्टिकोनातून केलेले आहे व त्यामध्ये कामवासनेची तृप्ती करण्याच्या पद्धती, त्यांची साधने, वशीकरण, प्रियानुनय, शिश्नोत्थान, लिंगवृद्धी वगैरेंसाठी योजावयाचे गुप्त उपाय, युक्त्या, वेश्येच्या वर्तणुकीचे नियम अशा प्रकारच्या प्रश्नांना प्राधान्य मिळाले आहे. त्याचप्रमाणे कामजीवनाची माहिती पुष्कळशी कल्पनाप्रधान आहे. त्यात विशुद्ध, वैज्ञानिक स्वरूपाच्या माहितीचा काहीसा अभाव आहे.
पाश्चात्त्य देशांत ह्या विषयावरील संशोधनाला एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रारंभ झाला. मॅग्नस हर्शफेल्ड, हॅवलॉक एलिस, सिग्मंड फ्रॉइड, विल्हेम्स स्टेकेल वगैरे अभ्यासकांनी कामजीवनाचे वैज्ञानिक अध्ययन सुरू केले. हर्शफेल्डने बर्लिनमध्ये ह्या विषयाच्या संशोधनासाठी एक संस्था स्थापन केली होती परंतु ती नाझी सत्ताधिकाऱ्यांनी १९३३ मध्ये बंद करून टाकली. अमेरिकेत विसाव्या शतकात आर्.एल्. डिकिन्सन, के.बी. डेव्हिस, एल्.एम्. टर्मन, ए.सी. किन्से, डब्ल्यू. एच्. मास्टर्स व व्ही.ई जॉन्सन वगैरे वैज्ञानिकांनी या विषयाचे शास्त्रीय संशोधन केले. ए.सी.किन्से व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंडियाना विद्यापीठात १९३८ साली एक संशोधनकेंद्र स्थापन केले, तर मास्टर्स व जॉन्सन या द्वयीने ह्या अत्यंत गोपनीय व खाजगी समजल्या जाणाऱ्या विषयाला प्रयोगशालेय नोंदणीयंत्रांच्या आवाक्यात आणले आहे. त्यांच्या मानवी संभोगक्रियेच्या प्रयोगशालेय अभ्यासावर ह्यूमन सेक्शुअल रिस्पॉन्स हा ग्रंथ आधारलेला आहे.
विसाव्या शतकात महाराष्ट्रात डॉ. र. धों.कर्वे यांनी कामजीवनावर लेखन करण्याची व ह्या विषयाला वाहिलेले समजास्वास्थ्य नावाचे नियतकालिक चालविण्याची धिटाई दाखविली व आधुनिक कामशास्त्र नावाचे पुस्तकही लिहिले ज्यात त्यांनी भारतात प्रथमच स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांविषयी व जननयंत्रणेविषयी शास्त्रीय माहिती देऊन निरामय कामजीवन व संततिनियमनाचा जोरदार पुरस्कार केला होता व ह्या विषयासंबंधीचे समाजातील निषेधात्मक वळण व गैरसमजुती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आज लोकसंख्याविस्फोटाच्या भयामुळे ह्या विषयाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मानवजीवनात कामप्रेरणेचे महत्त्व : मनोवैज्ञानिक दृष्ट्या कामप्रेरणा ही वर्तनप्रेरणांपैकी एक असली, तरी ह्या प्रेरणेला जीवनसातत्तयाच्या दृष्टीने एक आगळेच महत्त्व आहे. ह्या प्रेरणेच्या प्रभावामुळेच जीवनाचा ओघ एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे अखंड वाहत जातो.
अनेक तत्त्ववेत्त्यांचे म्हणणे आहे, की ह्या प्रेरणेवर सुयोग्य नियंत्रण ठेवल्यास व तिचे उन्नयन केल्यास व्यक्तीच्या सांस्कृतिक जीवनास बहर येतो. सिग्मंड फ्रॉइडच्या मताप्रमाणे मानवाचे सर्व वर्तन कामप्रेरित असते. प्रेमभावना कामप्ररेणेशी निगडित असते धर्मभावनेशी-देखील कामप्रेरणेचे नाते असणे शक्य आहे कारण धार्मिक अनुभूतीच्या वर्णनात कामजीवनाची प्रतीके अनेकदा वापरलेली आढळतात. कामदेव हा आद्यजन्मा असून परमेश्वराच्या मनात प्रथम कामोत्पत्ती झाली, असे ऋग्वेदात म्हटले आहे. ‘धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ’ असे भगवदगीतेत कामप्ररेणेचे गौरवपूर्ण वर्णन केले आहे.
नर-नारी भेद : ह्या भेदाचे मूळ ‘क्ष’ अणि ‘य’ ह्या गुणसूत्रांत (क्रोमोझम्स) असलेल्या भिन्न जनुकांपोटी (जीन्स) आहे. ‘क्ष’ हे गुणसूत्र स्त्रीलिंगदायी असून ‘य’ हे गुणसूत्र पुल्लिंगदायी असते. ह्या गुणसूत्रांतील जनुकांच्या भिन्नतेमुळे नर-नारीची भिन्न शारीर वैशिष्ट्ये प्राप्त होतात व तदनुसार त्यांना प्रजोत्पत्तीच्या कार्यात भिन्न भूमिका पार पाडाव्या लागतात. भिन्न भिन्न संस्कृतींत व समाजांत नर-नारींना भिन्न प्रकारची शिकवण मिळते. भिन्न प्रकारच्या रूढी व बंधने पाळावी लागतात. ह्या सर्व जैविक, शारीरिक, सामाजिक व सांस्कृतिक कारणांचा संकलित परिणाम होऊन स्त्री-पुरुषांच्या भिन्न वार्तनिक व भावनिक प्रवृत्ती आकारतात आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमधले ढोबळ तसेच सूक्ष्म भेद प्रकट होतात.
आजवर शतकानुशतके मानण्यात येत असे, की स्त्री-पुरुषांच्या गुणधर्मांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते. पुरुषांसारखी तीव्र बुद्धिमत्ता स्त्रियांना लाभत नाही. स्त्रिया शरीराने तसेच मनानेही पुरुषांपेक्षा कमकुवत असतात परंतु आधुनिक संशोधन दाखविते, की ह्या परंपरागत समजुती चुकीच्या व अर्धसत्यावर आधारलेल्या आहेत. स्त्री-पुरुषांमध्ये जैव तत्त्वाधारित शारीरिक भेद आहेत परंतु ह्या भेदांसंबंधी ऐसपैस कल्पना मनात न बाळगता त्यांचे यथार्थ स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे.
संख्याशास्त्रीय आकडे पाहता, नर हा नारीपेक्षा अल्पायुषी दिसतो. भ्रूणावस्थेत त्याचप्रमाणे अर्भकावस्थेत मुलींपेक्षा मुलगेच अधिक दगावतात. प्रोढावस्थेतही सामान्यतः पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच दीर्घतर आयुष्य लाभलेले दिसते. जैवशासत्रीय दृष्ट्या स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक प्रतिकारक्षम आहे.
सामान्यतः प्रौढ पुरुषाचा देह प्रौढ स्त्रीच्या देहापेक्षा आकाराने मोठा व अधिक वजनदार असतो, हाडे आकाराने व वजनाने मोठी असतात. परंतु मुलग्यांपेक्षा मुली दोन-तीन वर्षे लवकर वयात येतात आणि त्यामुळे वयोवर्ष १३ ते १६ ह्या काळात त्यांची उंची व वजन समवयस्क मुलग्यांपेक्षा अधिक असते. नंतर मुलगे वयात येऊ लागले, की त्यांची उंची व वजन मुलींपेक्षा जास्त होते.
पुरुषांच्या चयापचय (मेटॅबोलिझम) प्रक्रिया स्त्रियांपेक्षा अधिक जलद गतीने होतात. त्यांच्या अंगी अधिक जोर व ताकद असते. त्यांच्या हृदयाचे ठोके अधिक जोराने पडतात. रक्तात रक्तवर्ण पेशींची संख्या अधिक असते व त्यामुळे त्यांच्या स्नायूंना व अवयवांना साखरेचा व प्राणवायूचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो व त्यांना शारीरिक कष्टाची कामे करणे अधिक सुलभ जाते. तसेच कामामुळे होणारी शरीराची व शक्तीचे झीज भरून काढण्याकरिता अधिक प्रमाणात अन्न सेवन करावे लागते.
कामप्ररेणेचे स्वरूप : कामप्रेरणा ही प्राधान्येकरून प्राण्याच्या शरीरस्थितीवर, विशेषतः लैंगिक ग्रंथींच्या अंतःस्त्रावर व रसायनांवर अवलंबून असते. ही रसायने रक्तप्रवाहातून प्राण्याच्या मेंदूपर्यंत पोहाचली, की प्राणी लैंगिक वर्तनास प्रवृत्त होतो व सजातीय भिन्नलिंगी व्यक्तीवर आकृष्ट होऊन संभोगक्रियेमध्ये परिणत होणाऱ्या प्रक्रिया त्याच्या हातून घडतात.
लैंगिक रसायनांमुळे तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलामुलींच्या देहांत अनेक आंतरिक व बाह्य बदल घडून येतात. पुरुषांमध्ये आवाज फुटणे, मिसरूड फुटणे, स्त्रि यांमध्ये स्तनांची वाढ होणे वगैरे गौण लैगिंक लक्षणे प्रकट होतात. त्याचप्रमणे बीजग्रंथींची वाढ पूर्ण होऊन पुरुषांमध्ये वीर्योत्पादन व स्त्रियांमध्ये रजोदर्शन किंवा मासिक पाळी सुरू होते. तरुण-तरुणींच्या मनात नव्या इच्छा-आकांक्षा जागृत होतात, त्यांना नवी अस्वस्थता जाणवू लागते व परस्पराकर्षणही वाटू लागते.
सामान्यतः कामप्रेरणेची तीव्रता ही शरीरातील लैंगिक रसायनांच्या प्रभावावर अवलंबून असते हे जरी खरे असले, तरी मानवाच्या लैंगिक वर्तनावर ह्या रसायनांशिवाय, व्यक्तीवर लहानपणापासून घडणारे संस्कार, तिने आत्मसात केलेल्या लैंगिक जीवनाविषयीच्या पारंपरिक कल्पना, तिचे शिक्षण, उच्च व्यक्तीच्या वर्तनाचे आदर्श, कामोद्दीपक वाङ्मयाचे वाचन, संभाषण, पहात असलेली भडक चित्रे, सिनेमा वगैरेंचा महत्त्वाचा प्रभाव पडत असतो.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कामप्रेरणेची तीव्रता वयाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये निरनिराळ्या प्रमाणात जाणवते. बाल्यावस्थेत ही प्रेरणा सौम्य प्रमाणात जाणवते. सामान्यतः तारुण्यप्राप्तिकाळात तिची तीव्रता वाढावयास लागते. प्रौढत्वप्राप्तिवेळी तिचा प्रभाव सर्वां त जास्त असतो. कामप्रेरणेची तीव्रता काटेकोरपणे मोजण्याचे कोणतेच साधन अथवा कसोटी शास्त्रज्ञांना अजून सापडलेली नाही परंतु किन्से व त्याचे सहकारी यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे, की ही कामप्रेरणा स्त्रियांपैक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. त्यांच्या मते कामविषयक कथा, अन्य प्राण्यांची मैथुनक्रिया इत्यादी गोष्टींकडे मुलींपेक्षा मुलांचेच लक्ष अधिक प्रमाणात जाते. यावरून मुलींपेक्षा मुलग्यांना लैंगिक भावना अधिक प्रमाणात जाणवते असे दिसते.वयात येण्यापूर्वीच्या कालखंडात (प्रिॲडोलिसन्स) लैंगिक चेष्टा व थट्टामस्करी करण्यात सामान्यतः मुलेच जास्त पुढाकार घेतात. तारुण्यप्राप्तिकाळात (ॲडोलिसन्स) लैंगिक चेष्ट करणाऱ्या मुलांची संख्या मुलींपेक्षा अनेक पटीने अधिक असते. समलिंगी रतिक्रीडा करण्यातही स्त्रियांपेक्षा पुरुषांचीच संख्या जास्त असते.
मुलींपेक्षा मुलांना आपल्या कामप्रेरणेची जाणीव काहीशी लवकरच होते. आपल्या जननेंद्रियाच्या प्रक्रियांकडे मुलग्याचे लक्ष साहजिकच जाते व या प्रक्रियांनी आपल्याला सुखसंवेदना होतात, ही गोष्टीही त्याच्या ध्यानात अगोदर येते. शिवाय वयात आल्यावर त्याला स्वप्नावस्थेचाही अनुभव येतो. स्वप्नावस्थेचा अनुभव सामान्यतः सर्व पुरुषांना येतो परंतु असा अनुभव व स्वप्नावस्थेत संतृप्तीचा अनुभव कमी प्रमाणात व कमी स्त्रियांना येतो, असे किन्से यांच्या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर त्यांना असेही आढळून आले आहे, की सामान्यतः लैंगिक अनुभव सातत्याने मिळविण्याकडे पुरुषांची प्रवृत्ती असते व त्यात दीर्घकाळ खंड पडलेला त्यांना सहन होत नाही उलट स्त्रियांना अशा प्रकारचा पडलेला खंड सहज सहन करता येतो. दूरच्या ठिकाणची नोकरी, घटस्फोट किंवा अन्य कारणांमुळे पतीपासून दुरावलेली स्त्री स्वतःच्या लैंगिक वासनांवर चांगले नियंत्रण ठेवू शकते परंतु अशा परिस्थितीत सापडलेल्या पुरुषाला तसे नियंत्रण ठेवणे जड जाते.
तिशीच्या आसपास असताना पुरुषांची कामप्रेरणा सर्वांत प्रबळ असते, तर स्त्रियांची कामप्रेरणा तिशीत प्रवेश केल्यानंतर सावकाश तीव्र होत जाते व एकदा ती तीव्र झाल्यानंतर तिची तीव्रता बरीच वर्षे टिकून राहते. ऋतुसमाप्ती (मेनोपॉझ) मुळे स्त्रियांच्या कामप्रेरणेत फार मोठा बदल घडून येतो असे दिसत नाही पण वाढत्या वयोमानानुसार तिच्या सहचाऱ्याचे कामवर्तन जसे घटत जाईल, तसतसे तिचेही कामवर्तन घटत जाते, इतकेच.
सामान्यतः वृद्धावस्थेच्या आगमनाबरोबर कामप्रेरणेची तीव्रता ओसरत जाते परंतु ह्या बाबतीत व्यक्तिव्यक्तींमध्ये पुष्कळ तफावत आढळून येते. काही व्यक्तींच्या कामप्रेरणा उतार वयातही प्रबळ राहाते. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही पुरुषाला मूल झाल्याची उदाहरणे आहेत. अनेक स्त्रियांची कामप्रेरणा त्यांच्या तारुण्यकाळापेक्षा प्रौढावस्थेतच अधिक तीव्र होते. काही व्यक्तींची कामप्रेरणा त्यांच्या सर्व वर्तनव्यापाराचे केंद्र असते. त्यांना कामविचाराखेरीज अन्य काही सुचतच नाही. उलट काही व्यक्ती अशा असतात, की त्यांना कामप्रेरणेची बाधा यत्किंचितही जाणवत नाही आणि ते आजन्म सुखेनैव ब्रह्मचर्यावस्थेत राहू शकतात.
अन्य प्रेरणांप्रमाणेच कामप्रेरणा शरीरात व मनात तणाव उत्पन्न करते व या अवस्थेचे विसर्जन केले, की ती प्रेरणा शांत होते. ही तणावाची अवस्था कमी करणे, तिचे शमन करणे हेच लैंगिक वर्तनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. सामान्यतः सजातीय भिन्नलिंगी व्यक्तींशी शरीरसंबंध किंवा संभोग केल्याने या कामप्रेरणेचे शमन होते परंतु ह्या बाबतीतही व्यक्तिव्यक्तींमध्ये बरेच वर्तनवैचित्र्य आढळते.
स्त्रियांची कामभावना सावकाशीने उत्तेजित होते आणि त्यांना संतृप्ती येण्यासही पुरुषापेक्षा जास्त वेळ लागतो, ही गोष्ट कामशास्त्रज्ञांस प्राचीन काळापासून ज्ञात आहे. शिवाय असे, की पुरुषांना अनेक स्त्रियांशी समागम करण्याचा मोह होतो, तर स्त्रीला एकाच जोडीदाराशी दीर्घ काळ संबंध ठेवावासा वाटतो. ह्या फरकाच्या मुळाशी केवळ शरीरिक भिन्नताच आहे असे नाही, तर त्यात सामाजिक व सांस्कृतिक शिकवणीचाही बराच भाग असतो. पुरुषांच्या मनावर समोरील भिन्नलिंगी व्यक्तीचे तारुण्य, सौंदर्य, पोषाख, आदी बाह्य उद्दीपकांचा त्वरित परिणाम होऊन त्यांचा कामविचार सहज चाळवला जातो. स्त्रीच्या मनावर बाह्य उद्दीपकांचा इतका त्वरित परिणाम होत नाही.
प्रजोत्पादनाच्या दृष्टीने नर व मादी यांचा संभोग हा लैंगिक कामशमनाचा एकमेव प्राकृत मार्ग आहे. फक्त अशा संभोगामुळेच प्रजोत्पादन शक्य होते. मानवासहित सर्व प्राण्यांच्या बाबतीत हे खरे आहे परंतु आधुनिक शास्त्रज्ञांनी कृत्रिम वीर्यसेचन (आर्टिफिशिअल इन्सेमिनेशन) शक्य केले आहे व त्याचा गायी, म्हशी वगैरे पाळीव जनावरांवर सर्रास उपयोग करून संभोगाची आवश्यकता नष्ट केली आहे. सुप्रजननशास्त्राच्या दृष्टीने हा एक उपकारक प्रयोग आहे. आता मानवी सुप्रजननासाठी तसेच संभोगात येणाऱ्या काही शारीरिक अडचणींवर मात करण्याच्या हेतूनेही मानवावरही त्याचा उपयोग करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु नैतिकतेच्या दृष्टीने यावर काही शंका घेण्यात येतात. त्याचप्रमाणे याचा दुरुपयोग होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येते. यामुळे आज तरी मैथुनाशिवाय प्रजोत्पादनाचे व कामशमनाचे अन्य अनैसर्गिक, अनैतिक व विकृत समजण्यात येतात.
प्राकृत समागमाविषयी एक समस्या उभी राहू शकते. ती ही, की संभोगक्रियेतील व्यक्तीला अपेक्षित प्रतिक्रिया करता न येणे. त्यामुळे ह्या संबंधात भाग घेणाऱ्या एका किंवा दोन्ही व्यक्तींना जोडीदाराची तृप्ती करता येत नाही व त्या कारणाने स्वतःतच काही वैगुण्य अथवा न्यून आहे, अशी भावना (न्यूनगंड) निर्माण होते किंवा अपराधभावना (गिल्ट फीलिंग) निर्माण होते. फ्रॉइडच्या मनोविश्लेषण सिद्धांताप्रमाणे अशा व्यक्तीला अपराधभावना आणिन्यूनगंड त्राही भगवान करून सोडतात व त्याचा प्रभाव व्यक्तीच्या सामान्य जीवनावर पडून आंतरसंघर्ष आंतरसंघर्ष उद् भवतो त्यामुळे ती व्यक्ती नैसर्गिक आनंदाला मुकते व तिच्यात मनोविकृती संभवतात. अनेक स्त्री-पुरुष असे असतात, की त्यांना मनोविकृती नसते परंतु त्यांना पूर्ण संभोगसुख घेता अगर देता येत नाही. मास्टर्स व जॉन्सन यांच्या संशोधनामुळे अशा लोकांची लैंगिक अपर्याप्ता शोधून त्यावर इलाज करता येणे शक्य झाले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समागमामध्ये शरीरिक मैथुनक्रियेपेक्षा अधिक काही अभिप्रेत आहे व त्यात सहभाग स्त्री-पुरुषांच्या शरीरांबरोबर त्यांच्या मनांचाही घनिष्ठ संबंध आहे. समागमक्रियेस शृंगारचेष्टा किंवा रतिक्रीडेने सुरुवात होते. तिचा हेतू जोडीदाराची कामेच्छा जागृत करणे व त्याला संभोगास प्रवृत्त करणे हा असतो. ही समागमक्रिया केव्हा केव्हा मैथुनक्रिया पूर्ण झाल्यावरीही समाप्त होत नाही. समागमात भाग घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींची मने त्यात भाग घेत असतात. समागमात रत्युत्कटता किंवा संतृप्ती (ऑर् गॅझम) महत्त्वाची मानली गेली आहे. तिचा अनुभव केवळ वीर्योत्सर्जनाने पूर्ण मिळत नाही. पुरुषांप्रमाणे स्त्रीलादेखील संतृप्तीचा अनुभव येतो परंतु पुरुषामधील वीर्योत्सर्जनाप्रमाणे स्त्रीच्या बाबतीत ह्या संतृप्तीचे काही दृश्य किंवा शारीरिक लक्षण दिसत नाही. स्त्री ही संतृत्पी फक्त मानसिक दृष्ट्याच अनुभवू शकते. तिचा हा अनुभव पुरुषाच्या वीर्योत्सर्जनाबरोबरच येतो असे नाही. केव्हा केव्हा तो अगोदरसुद्धा येतो, तर केव्हा केव्हा मैथुनक्रिया पूर्ण होऊनही हा अनुभव येत नाही. मात्र हा अनुभव आल्यानंतर स्त्रीला पुढच्या मैथुनक्रियेत रस राहत नाही. सहसा समागमप्रसंगी पुरुषाला एकदा संतृप्ती अनुभवास येते व त्यानंतर त्याचे इंद्रिय शिथिल होऊन तो ही क्रिया पुढे चालू ठेवू शकत नाही. कित्येक स्त्रियांना समागम करताना संतृप्ती अनुभवासच येत नाही किंवा एकाच समागमप्रसंगात दोनदा किंवा अधिक वेळासुद्धा तिचा संतृप्तीचा अनुभव येऊ शकतो. संतृप्तीच्या अनुभवात पुरुषाला जाणवणाऱ्या सुखसंवेदना मुख्यत्वेकरून जननेंद्रियाच्या आसपास केंद्रित असतात परंतु स्त्रीच्या संतृप्ती अनुभवाच्या सुखसंवेदना कोठे एकाच ठिकाणी केंद्रित झालेल्या नसतात, तर त्या सर्व शरीरभर विखुरलेल्या असतात व त्यात तिच्या मनाचा मोठा भाग असतो. ह्या कारणाने स्त्रीने समागम स्वेच्छेने केलेला नसल्यास तिला संतृप्तीचा अनुभव येत नाही.
मानवी लैंगिक प्रतिक्रियायंत्रणेत दोन प्रमुख घटक आहेत : (१) जैव-शारीरिक (बायो-फिजिकल) घटक. हा शारीरिक यंत्रणेवर व सांवेदनिक उद्दीपनावर अवलंबून असतो व (२) मनो-सामाजिक (सायको-सोशल) घटक. हा सामाजिक-नैतिक नियमांद्वारा नियंत्रित मनोवृत्तींवर अवलंबून असतो. जैव-शारीरिक यंत्रणा जनावरे व मानवामध्ये सारखीच आहे परंतु मनो-सामाजिक घटक ही मानवाची विशिष्टता आहे. सामान्यतः सर्व स्त्री-पुरुष त्यांची जैव-शारीरिक यंत्रणा योग्य काम करीत असेल आणि योग्य सांवेदनिक उद्दीपन झाले असेल व भीती, चिंता, मानसिक तणाव, घृणा वगैरे प्रकारचा मनो-सामाजिक अडथळा नसेल, तर प्राकृत लैंगिक प्रतिक्रिया करू शकतात परंतु अतिचिंताग्रस्तता, काळजी, भय वगैरे कारणाने मनोवृत्ती अनुकूल नसेल, तर अन्य सर्व गोष्टी अनुकूल असूनसुद्धा प्राकृत लैंगिक प्रतिक्रिया करू शकत नाहीत. आदर्श समागमसुखासाठी दोन्ही जोडीदारांचे परस्परप्रेम व समागमाला अनुकूल मनोवृत्ती आवश्यक असते.
लैंगिक अपर्याप्तता (सेक्शुअल इनॲडिक्वसी) स्त्री व पुरुष दोघांमध्ये असू शकते. पुरुषांमध्ये अपर्याप्ततेचे दोन प्रकार आहेत :(१) शिश्नोत्थान न होणे व (२) शिश्नोत्थान होऊनसुद्धा वीयोत्सर्जन न होणे किंवा अकाली वीर्योत्सर्जन होणे. शिश्नोत्थान न होण्याची कारणे शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारची असू शकतात. शिश्नोत्थानाची शारीरिक यंत्रणा दोषपूर्ण असल्यास त्यावर उपचार होऊ शकत नाही. परंतु आधुनिक शोधांमुळे अशा पुरुषांच्या वीर्याचा उपयोग करून स्त्रीत कृत्रिम रीत्या गर्भधारणा करता येते. मानसिक कारणे अनेक आहेत परंतु त्यावर मानसोपचार करून लैंगिक पर्याप्तता प्राप्त करून देता येते. वीर्योत्सर्जन-अभाव किंवा अकाली वीर्योत्सर्जन होणे ह्याची करणे सर्वस्वी मानसिक असतात आणि त्यांवर मानसोपचार करता येतात. नपुसंकत्व ही याहून निराळी समस्या आहे पण लोक गैरसमजामुळे लैंगिक अपर्याप्ततेसच नपुसंकत्व मानतात व लैंगिक जीवनानंदास मुकतात. वैद्यकीय तपासणीत ह्या दोन्हींमधील फरक दिसून येतो.
संभोगक्रियेसाठी शिश्नोत्थान आवश्यक असल्यामुळे संभोग शक्य करण्याची जबाबदारी पुरुषावर पडते. समाजही पुरुषाचे लैंगिक निर्वर्तन (परफॉर्मन्स) व पौरुषत्व ह्यांचे समीकरण करतो. त्यामुळे पौरुषत्वहीनतेची किंवा नपुंसकत्वाची भीती ही त्याच्या आत्मप्रतिष्ठेस मारक ठरते. संभोग करण्याची शक्ती हा पुरुषार्थ मानला जातो व आपल्या पुरुषप्रभावित संस्कृतीत केव्हा केव्हा पत्नीसुद्धा आपल्या नपुंसकत्व स्वीकारावयास तयार नसते. अशी अनेक जोडपी आढळतात, की ज्यांना मूल होत नसल्यास पती-पत्नींची शारीरिक तपासणी करून न घेता, पत्नी स्वतःकडेच वांझपणाचा दोष घेऊन पतीला दुसरे लग्न करण्याचा केवळ सल्लाच देत नाही, तर केव्हा केव्हा आग्रह पण धरते.
नैराश्य, अतिचिंताग्रस्तता, जीवनाच्या अन्य क्षेत्रांमधील विफलता व हतोत्साह वगैरे अनेक कारणांमुळे संभोग-अक्षमता निर्माण होते. कित्येक वेळेला पुरुषाला असेही काही अनुभव येतात, की ज्यामुळे संभोगक्रियेविषयी घृणा उत्पन्न होऊन लैंगिक अपर्याप्तता येते. स्त्रीमध्ये पण गारठून जाण्याची (फ्रिजिडिटी) समस्या निर्माण होऊ शकते. ह्या सर्व लैंगिक अपर्याप्ततेच्या समस्या मानसोपचाराने सोडवता येतात.
आत्मप्रतिष्ठा हा पुरुषमनाचा केंद्रबिंदू आहे पण कित्येक वेळेला ती त्याची दुर्बलता ठरते. त्याच्या पौरुषाची शंका घेतली जाणे त्याला अपमानास्पद वाटते व त्याच्यावर मानसिक आघात होतो. फ्रॉइडच्या मते मनुष्याच्या जीवनात लैंगिकतेला केंद्रीय महत्त्वाचे स्थान आहे व त्याच्या मानसिक दु:खात व रोगात कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा लैंगिक असंतोष हा प्रमुख घटक असतो. फ्रॉइड व त्याचे अनुयायी मानवी-वर्तन-व्यवहारात कामप्रेरणेस सर्वव्यापी महत्त्व देतात.
लैंगिक वर्तन, समाज व संसकृती : लैंगिक स्वैराचार हा समाजाच्या सुस्थितीस घातक असल्याने व्यक्तीच्या कामवर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी घातक असल्याने व्यक्तीच्या कामवर्तनावर नियंत्रण ठेवण्या साठी प्रत्येक समाजात कायदे केले आहेत नीतिनियम व रूढी घालून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे कामवर्तनाच्या संबंधी भिन्न भिन्न समाजांत भिन्न भिन्न विविधनिषेध रूढ आहेत. अर्थात ही समाजिक बंधने जर अतिशय कडक असली, तर ती व्यक्तीला जाचक व क्लेशकारक होतात. कामप्रेरणेची योग्य प्रमाणात तृप्ती झाली, तरच व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.
स्त्री-पुरुषांमधील लैंगिक संबंध नियंत्रित करण्यासाठी विवाहाची पद्धत सर्वत्र प्रचलित आहे. दुसऱ्या व्यक्तीशी बळजबरीने संभोग करणे हे सर्वत्र निषिद्ध मानले गेले आहे. तो कायद्याने शिक्षापात्र गुन्हाही ठरतो. त्याचप्रमाणे एकाच कुटुंबातील जवळचे, रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तींचा विवाह किंवा लैंगिक संबंध नैतिकतेच्या दृष्टीने निषिद्ध मानला गेला आहे. हा निषेध तोडणे हा गंभर नैतिक गुन्हा समजला जातो. यालाच ⇨अगम्य आप्तसंभोग−निषेध (इन्सेस्ट ताबू) म्हणतात. अर्थात कोणकोणत्या आप्तांमधला लैंगिक संबंध निषिद्ध आहे, ह्या बाबतीत निरनिराळ्या समाजांत रूढिभिन्नता आढळते. बहुतेक सर्व धर्मां त व संस्कृतींत माता-पुत्र, पिता-पुत्री व भाऊ-बहीण यांच्यामधील लैंगिक संबंध निरपवाद निषिद्ध मानला गेल आहे. ख्रिस्ती व मुस्लिम समाजांत चुलत भाऊ-बहिणींचा विवाह संमत आहे पण हिंदू समाजात तो मान्य नाही. कित्येक समाजांत यापेक्षाही दूरची नाती वैवाहिक संबंधासाठी निषिद्ध मानली जातात. कित्येक आदिवासी टोळ्यांमध्ये एका टोळीतील मुलग्याचे किंवा मुलीचे लग्न त्याच टोळीतील मुलगी किंवा मुलग्याबरोबर होऊ शकत नाही. हिंदू धर्मातील ब्राह्मण व कित्येक क्षत्रिय जातींमध्ये सगोत्र विवाह निषिद्ध मानला गेला आहे. अशा निर्बंधांव्यतिरिक्त प्रत्येक समाजात लैंगिक वर्तनाविषयी नीतीअनीतीच्या विशिष्ट कल्पना व निर्बंध आहेत. व्यक्तीच्या लैंगिक वर्तनाला किती प्रमाणात सूट (पर्मिसिव्हनेस) द्यावयाची, या संबंधात लक्ष्मणरेषा असावी, ह्या बाबतीत सर्व धर्मांत व जमातींत एकमत आहे. परंतु ही लक्ष्मणरेषा कोठे असावी, ह्या बाबतीत मात्र एकवाक्यता नाही. जनावरांप्रमाणे अनिर्बंध लैंगिक स्वेच्छाचार कोठेच मान्य नाही. सर्वत्र विवाहांतर्गत लैंगिक संबंधच स्वीकार्य आहे परंतु विवाहबाह्य किंवा विवाहपूर्ण लैंगिक संबंधाविषयी मतभेद आहे. काही लोकगट कोणत्याही प्रकारचा विवाहबाह्य लैंगिक संबंध अनैतिक समजतात, तर काही जमातींत अमुक प्रकारचे विवाहबाह्य संबंध अनैतिक मानत नाहीत. मात्र विवाह-संबंधाला सामाजिक मान्यता असणे, हे सर्वत्र आवश्यक आहे. बहुतेक सर्व समाजांत वैवाहिक संबंध जोडण्यासाठी व तो विधिवत् करण्यासाठी धर्मगुरू किंवा पुरोहित अथवा ह्याविषयी अधिकार असलेली व्यक्ती आवश्यक असते. सामोआच्या आदिवासी समाजांत मुलामुलींना तारुण्यप्राप्तिकाळामध्ये एकत्र मिसळण्यास संपूर्ण मुभा असते व त्यांच्या लैंगिक व्यवहारावर कोणतेच नियंत्रण नसते. गावाच्या सीमेवरील मोठ्या झोपडीत सर्व मुलगे व मुली एकत्र राहतात परंतु एकदा विधिवत् विवाह झाल्यानंतर पती-पत्नींच्या समागमावर व बोलण्याचालण्यावर कडक निर्बंध असतात. अन्य अनेक असंस्कृत समाजांमध्ये विवाहपूर्ण संबंध गैर मानले जात नाहीत पण विवाह झाल्यानंतर मात्र पती-पत्नीव्यतिरिक्त अन्य व्यक्तीशी संबंध अनैतिक मानले जातात [⟶ विवाहसंस्था].
बहुतेक सर्व लोकांत समलिंगी व्यक्तीशी लैंगिक संबंध (होमासेक्शुॲलिटी) धर्माच्या, नीतीच्या व सामाजिक योग्यायोग्यतेच्या दृष्टीने अयोग्य समजला जातो परंतु तरीसुद्धा प्रत्येक समाजामध्ये समलिंगी लैंगिक व्यवहार करणारे लोक आहेतच. किन्से व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अमेरिकन लोकांच्या लैंगिक व्यवहाराच्या सर्वेक्षणात अशा समलिंगी लैंगिक व्यवहार करणाऱ्या पुरुषांची व स्त्रियांची संख्या विश्वास बसणार नाही इतकी मोठी आढळून आली.
लैंगिक वर्तनावर नियंत्रणे असूनसुद्धा त्यांचा अंमल सर्व समाजात सारख्या प्रमाणात होत नाही. स्त्री व पुरुषांच्या बाबतीत, समाजातल्या निरनिराळ्या स्तरांतील लोकांना दुहेरी कसोट्या (डबल-स्टँडर्ड्स) लावण्यात येतात. ज्या लैंगिक व्यवहाराबद्दल गरीब समाजातील व्यक्तीला समाज शिक्षा करील, त्याच प्रकारचा व्यवहार श्रीमंत माणूस निर्भयपणे करू शकतो. हिंदू धर्मातील काही जातींत विधवा स्त्री दुसरे लग्न करू शकते पण ब्राह्मण समाजात तशा परवानगीसाठी अनेक समाजसुधारकांना झगडावे लागते. काही वर्तनप्रकार पुरुषांनी केलेले चालवून घेतले जातात, पण स्त्रियांनी ते करणे गैर व अनैतिक मानले जाते. श्रीमंत व जमीनदार पुरुष उजळ माथ्याने रखेली किंवा अंगवस्त्र ठेवू शकतो. कोणत्या समाजाने स्त्रीला तसे स्वातंत्र्य दिले आहे? पुरुष पत्नीशी एकनिष्ठ राहिला नाही, तरी समाज त्याकडे काणाडोळा करतो परंतु स्त्रीने मात्र तिच्या पतीशी एकनिष्ठ राहिलेच पाहिजे, या बाबतीत समाज डोळ्यात तेल घालून जागरूक असतो. पुरुषांमधली समलिंगी जवळीक घृणास्पद मानली जाते, परंतु स्त्रियांमधल्या समलिंगी जवळिकीविषयी तितकीशी तीव्र नापसंती दाखविली जात नाही.
सर्वसाधारणपणे समाजाच्या वरच्या थरातल्या किंवा अधिक शिक्षण घेतलेल्या अथवा प्रतिष्ठित नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांत प्रेमानुनयाची चेष्ट, रतिक्रीडा (फोअर प्ले), भिन्नलिंगी व्यक्तीशी केलेली शारीरिक चेष्टा (पेरिंग), हस्तमैथुन, नग्नतेची त्याचप्रमाणे विविध संभोगा सनांची आवड वगैरे अधिक प्रमाणात दिसून येतात, तर अल्पशिक्षित, शारीरिक श्रमाची नोकरी-व्यवसाय करणाऱ्या वर्गात विवाहपूर्व समागम, वेश्यागमन, अनेक व्यक्तींशी शरीरसंबंध (प्रॉमिस्क्यूइटी) इ. विशेष प्रमाणात आढळून येतात.
स्त्री-पुरुषांसाठी समागमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संभोगासने, त्याचप्रमाणे शरीराच्या हालचाली वगैरेंचे मार्गदर्शन अनेक देशांच्या प्राचीन साहित्यात मिळते. भारतात वात्स्यायनाचे कामसूत्र, कोक्कोकाचे रतिरहस्य वगैरे ग्रंथांत कामसुखाच्या वृद्धीसाठी संभोगासने, आलिंगनप्रकार वगैरे अनेक प्रकारच्या सूचना आहेत. खजुराहो, मोढेरा, कोनारक, वेरूळ येथील मंदिरात विविध संभोगासने दाखविणारी शिल्पे आहेत. इटलीमधील प्राचीन पाँपेई शहरात वेश्यांच्या रंगमहालांच्या भिंतीवर विविध संभोगासने दाखविणारी भित्तिचित्रे रंगविलेली असत. सोळाव्या शतकातील चित्रकार जूल्यो रोमानो याची त्याचप्रमाणे इतर अनेक चित्रकारांची मैथुनाच्या आसनांची चित्रे इटलीत व ग्रीसमध्ये उपलब्ध आहेत. जपानमधील अठराव्या शतकातील काही चित्रे व लाकडावरील कोरीव शिल्पे शृंगारिक व कामोसंभोगसनांचा उपयोग केल्याने, समागमसुखात विविधता, हेतुपूर्णता व अर्थपूर्णता येते. शिवाय त्यासाठी समागमात भाग घेणाऱ्या व्यक्तींना परस्परविचारविनिमय करून समगमसुखाचा परमोच्च बिंदू गाठण्याचे प्रयत्न करता येतात. [⟶ कामशिल्प].
समागम सुखावह होण्यासाठी व त्यात रसप्रदता आणण्यासाठी त्यात भाग घेणाऱ्या व्यक्तींची संभोगेच्छा जागृत झाली पाहिजे. कामसूत्र, रसितशास्त्र,कोकशासत्रवगैरे ग्रंथांत जोडीदाराची कामवासना जागृत करण्यासाठी, संभोगेच्छा उत्कट करण्यासाठी, शब्द, स्पर्श, रस, गंध, वगैरेंद्वारा उद्दीपन करावे, कामोद्दीपनासाठी संभाषण कसे करावे, शरीराला कोणती सुवासिक उटणी लावावीत, जोडीदाराच्या शरीराच्या निरनिराळ्या कामोत्तेजक (इरोजिनिअस) भागांस स्पर्श करणे, कुरवाळणे, हाताळणे, चेपणे, घर्षण करणे, चुंबन घेणे वगैरे रतिक्रीडेचे अनेक प्रकार वर्णन केले आहेत. त्याचप्रमाणे समागमसुखाची मात्रा वाढविण्यासाठी व त्यात विविधता येण्यासाठी आलिंगने, संभोगासने वगैरेंचेही वर्णन केले आहे. शरीरस्पर्श, आलिंगन वगैरे बाबतींत स्त्रिया जास्त संवेदनाक्षम असतात. मनोवैज्ञानिकांच्या मते रतिक्रीडा ही परस्परउद्दीपनाची यांत्रिक बाब नाही. त्यात मानसिकतेचा घटक इतका प्रभावी असतो, की व्यक्ती समागमसुखासाठी आसुसलेली असेल, तर तिच्यासाठी रतिक्रीडेची जरूरच राहत नाही. उलट व्यक्तीची मानसिक तयारी नसेल किंवा अनिच्छा असेल, तर नको असलेल्या व्यक्तीकडून होणारे कामोद्दीपन व संभोगक्रिया अनाकर्षक व तिरस्कारजनक (रिपल्सिव्ह), तसेच वेदनाकारक व काममारक ठरते. मानवाच्या लैंगिक वर्तनात केवळ कामशमन किंवा समागमसुख मिळविणे एवढाच उद्देश नसतो. त्यात अपत्यप्राप्तीची, आत्मस्थापनाची (सेल्फ-ॲसर्शन), सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याची इच्छा यांसारखे अन्य हेतूही मिसळलेले असतात. त्याचप्रमाणे समोरील व्यक्तीविषयी वाटणारे प्रेम अथवा जिव्हाळा व्यक्त करणे, त्या व्यक्तीला आपल्या पुरुषत्वाचा वा स्त्रीत्वाचा प्रत्यय घडवून आणणे, तिला आपल्या जरबेत ठेवणे, परपीडनाचा गंड शमविणे, समोरील व्यक्तीबद्दल वाटणारा आदर किंवा तुच्छता दर्शविणे, अशा विविध स्वरूपांची उद्दिष्टे उघड अथवा प्रच्छन्नपणे समाविष्ट झालेली असतात. त्याचबरोबर आपणावर कोणीतरी प्रेम करावे, किंवा आपण कोणाच्या तरी आधीन असावे, आपल्याला कोणीतरी छळावे, दुखवावे, सुखवावे, आपले स्त्रीत्व किंवा पुरुषत्व कसे अव्यंग आहे ते दाखवावे इ. विविध इच्छा-अकांक्षांनी मानवी लैंगिक वर्तन-प्रेरित होत असते.
सारांश, मानवी लैंगिक वर्तन किंवा कामजीवन अत्यंत गुंतागुंतीचे आहे. त्यावरचा गोपनयीतेचा बुरखा उघडायला लागून अजून शंभर वर्षेसुद्धा झालेली नाहीत व त्यामुळे लैंगिक वर्तनाचा अभ्यास अजून बाल्यावस्थेतच आहे असे म्हणावयास हरकत नाही. त्याचे कित्येक पैलू अजून नीट समजले गेले नाहीत. लैंगिक जीवनाच्या अज्ञानापायी माणसाच्या वाट्याला आजवर अनेक दुः खे आली आहेत. अज्ञान हे नेहमी हानीकारकच असते. ह्या विषयावर जसजसे अधिकाधिक संशोधन होत जाईल, तसतसे मानवाला निरामय लैंगिक जीवनाच्या दृष्टीने पुढे पुढे प्रगती करता येईल.
पहा : आत्मरति ईडिपस गंड उन्माद किशोरावस्था गंड चिंता निरोधन न्यूनगंड परपीडन व स्वपीडन विकृति प्रणयाराधन प्रदर्शन-प्रवृत्ति प्रेम मनोविश्लेषण मानसचिकित्सा लैंगिक अपमार्गण लैंगिक शिक्षण वैफल्यभावना संघर्ष समलिंगी कामुकता स्वप्न.
संदर्भ : 1. Ellis, Elbert Aberbenal, Albert, Ed. The Encylopaedia of Sexual Behaviour, 2 Vols., New York, 1961
2. Ellis, Havelock, Studies in the Psychology of Sex, 4 Vols., New York, 1936
3. Ford, C. S. Beach, F. A. Patterns of Sexual Behaviour, New York, 1951
4. Green, Richard Money, John, Ed. Transsexualism and Sex Reassignment, Baltimore, 1970.
5. Kinsey, A. C. and others, Sexual Behavioiur in the Human Female, Philadelphia, 1953
6. Kinsey, A. C. and othes, Sexual Behavious in the Human Male, Philadelphia, 1948.
7. Marshall, D. S. Suggs, R. C. Ed. Human Sexual Behaviour : Variations in the Ethnographic Spectrum. New York, 1971.
8. Masters, W. H. Johnson, Virginia, The Human Sexual Response, Boston, 1966.
9. McCary, J. L. Human Sexuality, New Jersey, 1967
10. Sagarin, Edward McNamara Donal, E. J. Problems of Sex Behaviour, New York, 1969
11. Stoller, R. J. Sex and Gender : On the Development of Masculinity and Femininity, New York, 1968.
12. Upadhyaya, S. C. Trans., Kamasutra of Vatsyayana, Bombau, 1863.
१३. चौखंवा संस्कृत सीरिज, कामसुत्रम् (जयमंगला टीकेसह),बनारस, १९१२.
भोपटकर, चिं. त्र्यं.
“