लैंगिक निवड: चार्ल्‌स डार्विन (१८०९−८२) या शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या क्रमविकासाविषयी (उत्क्रांतीविषयी) एक सिद्धांत १८५८ मध्ये मांडला. या सिद्धांताची आल्फ्रेड रसेल वॉलिस (१८२३−१९१३) या शास्त्रज्ञांच्या विचारांचीही भर पडली आणि डार्विन यांचेनैसर्गिक निवड हे तत्त्व बहुमान्य झाले. डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पीशीज या आपल्या ग्रंथात पुरातन काळातील प्राण्यांच्या अनेक जातींचा व पोटजातींचा उगम आणि क्रमविकास होण्यास साहाय्यभूत ठरणाऱ्या गोष्टी यांविषयी विवेचन केलेले आहे. या पृथ्वीतलावर कोणत्याही काळी प्रचलित असलेल्या प्राणिमात्रांनी निर्माण केलेली अमाप संतती अमर्यादपणे वाढली, तरथोड्याच कालावधीत सर्वांना अन्न व निवारा मिळणे दुरापास्त होईल. स्वाभाविकपणेच तग धरून राहण्यासाठी त्यांचा आपापसांत संघर्ष सुरू होऊन अधिक कार्यक्षम व प्रभावी गुण असणारे प्राणीच टिकतात, तर इतर प्राणी नाश पावतात व त्यांची संख्या विशिष्ट पातळीवर राहाते. याचाच अर्थ असा की, निसर्गात ज्यांच्यापाशी अधिक योग्य अथवा पात्रताधारक आनुवंशिक गुण आहेत अशांचीच निवड होते, तर अपात्र प्राणी तग धरू शकत नाहीत. 

याच सिद्धांताबद्दल विचार करीत असताना स्वतः डार्विन यांना प्रजोत्पादनाशी संबंध असलेल्या काही विशिष्ट शारीरिक गुणांबद्दल योग्य असा खुलासा करणे जमेना. त्यांच्या बाबतीत अधिक स्पष्टीकरण करण्याच्या प्रयत्नांत डार्विन यांनी ‘लैंगिक निवड’ या नावाखाली एक वेगळे विवेचन मांडले. 

प्राणिसृष्टीत पुष्कळ वेळा नर हे अधिक बलशाली असतात आणि कित्येक प्रकारची शारीरिक स्वभाववैशिष्ट्ये त्यांच्या ठायी दिसून येतात. यामुळे नर−मादी भेद जास्तीत जास्त स्पष्ट होतात. उदा., मोराचा डौलदार विविध रंगी पिसारा आणि त्याची विशिष्ट हालचालीची पद्धत (नाचणे) ही लांडोरीच्या समोर उठावदार ठरते. तसेच काळविटाच्या  शिंगांचा डौल, सिंहाची भरगच्च आयाळ, अनेक पक्ष्यांचे सुस्वर आवाज, बेडकांचे ओरडणे यांवरूनही नर−मादी भेद स्पष्ट होतात. या व अशाच अनेक गुणधर्मांचा उपयोग त्या त्या प्राण्यांना मादीशी संयोग साधून प्रजोत्पादन करण्यास होतो. डार्विन यांना असेही आढळून आले की, सामान्यतः नरांची संख्या अधिक असते व त्यांच्यात मादी मिळविण्यासाठी पुष्कळ वेळा चुरस लागते. अशा चुरशी काही प्रसंगी प्राणघातकही ठरतात. या संघर्षात विजयी होणारे नर मादीशी संपर्क प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरतात. या प्रकारच्या संघर्षामुळे एक प्रकारची निवड उद्‌भवते व यावरूनच डार्विन यांनी लैंगिक निवड असा वेगळ्या स्वरूपाचा सिद्धांत मांडला. ज्याप्रमाणे नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार तग धरून राहण्यासाठी आवश्यक असलेले परिस्थितीनुरूप गुणधर्म उपजत असतील त्यांची जोपासना होते व बाकीचे उपेक्षित होतात, त्याप्रमाणेच लैंगिक निवड या सिद्धांतानुसार नरांमधील प्रजोत्पादनास पूरक अशा आनुवंशिक गुणांची जपणूक होऊन ते पुढील पिढ्यांत चालू राहतात व कमी पडणारे गुणविशेष आपोआप वगळले जातात. 

नैसर्गिक निवडीचा सिद्धांत शास्त्रज्ञांनी ज्या प्रमाणात उचलून धरला त्याच्या काही अंशानेही लैंगिक निवडीचा सिद्धांत स्वीकारण्यात आलेला नाही. याला पुढील मुद्दे कारणीभूत आहेत : लैंगिक निवड व वेगळ्या सिद्धांताची तशी गरजच नाही. कारण अनेक प्राणिजातींतून लैंगिक भेद बाह्यांगावर प्रतितच होत नाहीत आणि तरीही या जातींची जोपासना व उत्कर्ष होत आहे. अंतःस्त्रावी ग्रंथी, आनुवंशिक गुण व सभोवतालचे वातावरण यांच्या परिणामांच्या पारस्परिक समन्वयाने लैंगिक स्वभाववैशिष्ट्ये दृष्टिगोचर होतात. त्यामुळे त्यांचा वेगळा विचार करण्याची आवश्यकता भासत नाही. नैसर्गिक निवड या सिद्धांतातच आलेल्या काही तत्त्वांच्या आधारे यावर प्रकाश टाकणे अवघड नाही. शिवाय काही प्राण्यांमध्ये नर−मादी भेद स्पष्ट दिसतो पण त्याचा प्रजो त्पादनास काहीही उपयोग संभवत नाही. उदा., प्रवाल भित्तीत राहणारे अत्यंत रंगीबेरंगी नर पिसे, शिरोभागावर व पाठीवर शिंगे असलेले नर गेंडा भुंगेरे. याखेरीज मादी मिळविण्याच्या चुरशीत एकदा हरलेले नर इतर चुरशींत यशस्वी होऊ शकतात. ज्या माद्यांची वर्णी लागली नसेल, त्या इतर नरांच्या संपर्कात येतातच. यामुळे नैसर्गिक निवड ही जेवढी प्रभावी अथवा महत्त्वाची बाबत ठरते, तेवढी लैंगिक निवड ठरत नाही. यामुळे डार्विन यांनी केलेले लैंगिक निवडीचे विवेचन ग्राह्य धरले जात नाही. 

डार्विन यांनी वर्णन केलेल्या शारीरिक बाह्यांग वैशिष्ट्यांचा उपयोग आणि महत्त्व यांचा विचार विसाव्या शतकात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी जास्त स्पष्ट केलेला आहे. [⟶ प्राण्यांचे वर्तन]. 

पहा : क्रमविकास नैसर्गिक निवड. 

 

अंवडकर, प्र. म्हा.