लेलॉयर, ल्वी फ्रेदेरिको : (६ सप्टेंबर १९०६ – ). अर्जेंटिनातील जीवरसायनशास्त्रज्ञ. जटिल (गुंतागुंतीच्या संरचना असलेल्या) शर्करांचे साध्या कार्बोहायड्रेटांच्या रूपातील तुकडे करण्याच्या प्रक्रियांविषयी त्यांनी अनुसंधान केले. यातून शर्करा न्यूक्लिओटाइडांचा शोध लागला व त्यांचे कार्बोहायड्रेटाच्या चयापचयातील (शरीरात सतत चालू असणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतील) कार्य स्पष्ट झाले. या संशोधनासाठी त्यांना १९७० सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

लेलॉयर यांचा जन्म पॅरिस येथे व शिक्षण ब्वेनस एअरीझ येथे झाले. १९३२ साली त्यांनी ब्वेनस एअरीझ विद्यापीठाची एम्.डी. पदवी मिळविली. या विद्यापीठाच्या शरीरक्रियावैज्ञानिक संस्थेत साहाय्यक (१९३४-३५) व केंब्रिज विद्यापीठातील जीवरासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून काम केल्यावर १९३७ साली वरील संस्थेतच त्यांनी वसाम्लांच्या ⇨ऑक्सिडीभवनाविषयीचा अभ्यास केला. नंतर काही काळ त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन (१९४४) व कोलंबिया (१९४४-४५) विद्यापीठांत संशोधन केले. अर्जेंटिनाला परतल्यावर त्यांनी ब्वेनस एअरीझ येथील जीववैज्ञानिक व प्रायोगिक वैद्यकाच्या संस्थेत काम केले. १९४७ साली त्यांनी खाजगी आर्थिक मदतीने याच गावी जीवरसायनशास्त्राचे अनुसंधान करणारी संस्था स्थापन केली व ते तिचे संचालक झाले. १९६२ पासून ते ब्वेनस एअरीझ विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात. त्यांनी लॅक्टोजचे (दुग्ध शर्करेचे) उत्पादन करण्यास सुरुवात केली. यातूनच शर्करा न्यूक्लिओटाइडांचा शोध लागला. विशिष्ट यकृत ⇨एंझाइमे असल्याशिवाय ग्लुकोजपासून ग्लायकोजेन ही महत्त्वाची शर्करा शरीरात निर्माण होऊ शकत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. अशा तऱ्हेने ही एंझाइमे त्यांनी शोधून काढली. त्यांनी ग्लायकोजेनच्या वापरावरही अनुसंधान केले आहे व त्याची यंत्रणा उघड केली. याशिवाय त्यांनी ग्लुकोज डायफॉस्फेट (१९४८), युरिडीन डायफॉस्फेट ग्लुकोज (१९५०) व युरिडीन डायफॉस्फेट ॲसिटिलग्लुकोज-अमाइन (१९५३) यांचे विलगीकरण केले. तसेच १९६० साली त्यांनी स्टार्चचे जैव संश्लेषण केले आणि १९६४ मध्ये मक्याच्या दाण्यांमधून ॲडिनोसीन न्यूक्लिओटाइडे वेगळी काढली.

अर्जेंटाइन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे चेअरमन (१९५८-५९), नॅशनल रिसर्च कौन्सिल (१९५८-६४) व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ मेडिसीन (१९६१) चे सदस्यत्व तसेच यू.एस. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६०), अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१९६१), अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, लंडनची रॉयल सोसायटी (१९७२) यांचे परदेशी सदस्यत्व पॅरिस, ग्रानाडा (स्पेन), कार्डोबा इ. विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या आणि टी. ड्यूकेट जोन्स स्मृतिपुरस्कार (१९५८), गेर्डनर प्रतिष्ठान पुरस्कार (१९६६) वगैरे मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.

धुमाळ, रा. रा.